मु. पो. बातल

भटक्यांच्या आयुष्यात काही जागा अशा असतात कि त्यांच्या मनात राहत्या घरानंतर ती जागा मनात घर करून बसते. तिला अढळ स्थान!
माझ्यासाठी सह्याद्रीत अशा य जागा आहेत. तुमच्याही असतील. तिथं मोजक्या जिवाभावाच्या दोस्तांसोबत एखादा मुक्काम म्हणजे आठवणींची शिदोरीच. त्याचं मूल्य (किंमत शब्द झेपला नसताच इथे त्याच्या तोकडेपणामुळे) मोजण्यापलीकडे असतं.
अशीच एक जागा पाहायला म्या जरा हिमालायकडे गेलो. खूप ऐकलं, वाचलं होतं ह्याबद्दल. शेवटी सुट्टयांचा आणि पैशाचा योग जुळून आला.

मनालीजवळ आल्यापासून अचाट प्रॉमिनंस असलेल्या डोंगररांगा दिसत होत्या, ढगाआडच माथे सगळ्यांचे. आल्यादिवशी सामान गोळा करायलाच दुपार झाल्याने मुक्काम मनालीतच केला.


दुसऱ्या दिवशी ह्याच्या-त्याच्या ओळखीने बातलसाठी गाडी जमवली. 4-व्हील ड्राईव्ह जिप्सी, हेडग्लाससमोर बांधलेला मणिमंत्र, लॉक न होणाऱ्या डॅशबोर्डमध्ये ब्लॅक डॉगची बाटली आणि बडवायजरचा काचेचा ग्लास, निळं आकाश आणि लाहौलचे खडी-मातीचे रस्ते. धूळ उडवत पुढे-पुढे सरकणाऱ्या जिप्सीत माणशी २०६ हाडं आपलं अस्तित्व दाखवत होती. मागं बसलेलं (किंवा पडलेलं) WDM-3D इंजिन उर्फ सागर, बेनं ६ बॅगात डोकं काढत कसंबसं सीटवर गोचिडागत अडकू पाहत होतं. मढीला दोन-दोन आलू पराठे चेपून पुढं निघालो. कमालीच्या डोक्यानं वर चढवलेला रोहतांग आणि त्याहून अशक्य पलीकडे उतरवलेला रस्ता पाहून B.R.O. ला मनोमन दंडवत घातला.

अशात ग्राम्फूला उजवीकडे वळालो आणि डोळ्याचं पारणं फिटायला सुरुवात झाली. डावीकडे अशक्य ऊंच कातळ, त्यात धबधबा!
एकमात्र आहे कि, इथं-तिथं उगाच हिसका देणारी मान कशीबशी सावरायची आणि पुढचा हिसका बसायच्या आत खिडकीतून वर करायची. आपल्या डोक्यावर, अंगा-खांद्यावर बर्फ टिकवत, कधी ढगापल्याड डोकं काढत अनेक शिखरं ऊन-सावलीचा खेळ खेळत होती. तिथं रस्त्याच्या डावीकडे आत CB-११, बाहेर आलेलं CB-१२, त्याच्याच जोडीला CB-१६, रस्त्याच्या उजवीकडे भयंकर prominance मिरवणारं व्हाईटसेल आणि त्याला खेटून असलेला पापसुरा, आणि काय काय आणि काय नाय, माहीत असलेली-नसलेली अनेक शिखरे.
कधी आयुष्यात हिमालाय न पाहिल्यानं ती bumpy but scenic ride संपूच नये असं वाटून गेलं.छत्रुजवळ JCB च्या अट्टाहासावर दीड तास रस्ता-रोको पाळत बातल गाठलं. इथून काही दिवस तरी बातलच आमचं घर होतं. गाडीतून उतरलो आणि उललेल्या पायावर धुळीचं साम्राज्य पसरलं.

मु. पो. बातल:
सॅट इमेजमध्ये पाहिलं होतं अगदी तसंच होतं बातल, बर्फ जमणं-वितळणं ह्या वेगळ्या गोष्टी.
बातल म्हणजे खूपसारे टूरिस्ट, त्यांच्या बुलेट बायका, दहात नऊ लोकांच्या अंगावर एकतर रायडिंगच जॅकेट नाहीतर DSLR, एका हातात हेल्मेट, दुसऱ्या हातात बिडी!
बर्याच ब्रेवरी पुरस्कारानं गौरवलेले चाचा-चाची, त्यांचं कुटुंब आणि गुळाच्या ढेपेला मुंगळे चिटकावेत तसा त्यांचा टरपोलिन शीटचं आभाळ मांडलेला धाबा, थोडं पलीकडे कमी गर्दीचा पण नुकताच म्हणजे ५ वर्षांपूर्वी सेट झालेला परशुराम चाचांचा कांगडी धाबा, टंडूक उर्फ कमांडर आणि ताशी उर्फ मोटू आळीपाळीने चालवत असलेलं एक मोठं गेस्ट हाऊस, GREF चे २ ऑलवेदर हुड्स, आय.टी.बी.पी. चा ट्रांझिट कँप, चंद्राच्या उथळ प्रवाहावर एक छानसा ब्रिज आणि त्याला खेटून एक मंदिर!सेवा परमो धर्मः किंवा अतिथी देवो भवः ला पूर्णपणे पाळणारं गाव आहे बातल. आम्ही तंबू गावमागल्या एका टेकाडापाठी उभा केला. तिघांचं भागेल एवढा खाऊ सोबत आणल्यानं आम्ही निदान खाण्यासाठी तरी कुणावर अवलंबून नव्हतो. बाकी एकाकी वाटलं कि आम्ही तिथं धाब्यासमोर जाऊन उभे राहायचो, लोकं पाहायचो, हापश्यावर प्यायचं पाणी भरायचो. तसे ४ दिवस घालवल्यावर कुठून आलात, कुठे जाणार, क्लाइबिंगला दोघेच कसे वगैरे गोष्टी झाल्या आणि धाबेवाले, आय.टी.बी.पी. वाल्यांसोबत थोडी ओळख झाली, मग गुड मॉर्निंग, गुड नाईट वगैरे..
हवामान पाहिजे तसं मिळेना म्हणून आम्ही चंद्रतालकडे गेलो ४ दिवस. तिथून परातल्यानंतरचे ५ दिवस आणि त्यासाठी बातल आयुष्यभर लक्ष्यात राहील.

आम्ही आल्याआल्याच आय.टी.बी.पी.च्या तिवारी सरांनी "अरे भाई वहाँ पिछे क्यू अकेले रहते हो? यहाँ आ जाओ, हमारे बगल में अपनी टेंट लागओ" असं सुचवलं.
गेल्या रात्रीच वाऱ्यानं आम्हाला हैराण केलं होतं. पडत्या फळाची आज्ञा घेत आम्हीही आमचा मोहम्मद तुघलक केला. गाशा गुंडाळून हवेपासून आडोसा पाहत बाजूलाच टेंट लावला. दुसऱ्या दिवशीच आय.टी.बी.पी.चा विकास दादा ट्रेनिंगसाठी निघून गेला आणि त्याच्या जागी त्याच बसने रुपेश दादा आला.
आता विजयदादा उर्फ तिवारीजी, रुपेशदादा आणि कमलेशजी असे ३ इसम उरले आय.टी.बी.पी.चे.
रुपेशदादा आपला मराठी बंडा, भुसावळचा. बातलमध्ये कुणी समभाषिक भेटला कि गट्टी जमतेच. चार गप्पा झाल्या, नकाशात जोडलेल्या २ गावांच्या गोष्टी झाल्या, मग दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळीच बाहेरून आवाज आला "गुड मॉर्निंग!"
तंबूतनं डोळे चोळत, हातमोजा ओढीत बाहेर डोकावलं आणि समोरच्याच्या पायात लिबर्टीचे कॉम्बॅट शूज दिसले. डोकं वर काढलं तर चहाची किटली! "याला च्या पाजा रं" पासून "चल चहा मारू" म्हणजे भयंकर बाँडींग, चहा पाजला कि माणूस खिशात आला म्हणून समजा!
रुपेशदादानं चहाची सोय करून भारी प्रकार केला होता. थंडीनं पार पिपाणी वाजत असल्यानं स्वतःचे हात काळे न करता आलं टाकलेल्या गरम चहाची किटलीच हाती येणं म्हणजे भन्नाट प्रकार होता. कुडकुडत का होईना पण दात घासून झाले कि बंड्यानं गरम पाणीही करून दिलं थोबाड धुवायला. ८-१० दिवसानंतर तोंडावर गरम पाणी मारल्याचा आनंद काय सांगू!
उरलेल्या विधी उरकून आता काय करायचं ह्याचं बरळत असताना सोयाबीन + बटाट्याची भाजी, आंब्याचं लोणचं आणि २-२ पराठे आणून दिले. खऱ्या अर्थानं लेजर टूर चालू आहे कि काय असं वाटून गेलं.

भयंकर थंडी आणि त्यात वारा, पूर्ण पावसाळी हवामान म्हणजे तिथं दिवस मोडल्यासारखं आहे. अशात कुठे वर जाता येणं अशक्य व्हायचं. मी आणि सागर गप तंबूत बसलो होतो. आय.टी.बी.पी.च्या टेंटमधून विजयदादाचा आवाज आला, "मेजर साब, बॅट और बॉल कहाँ रखी देखी आपने?" त्यांच्यात वयानं आणि हुद्द्यानं सगळ्यात सिनिअर होते कमलेश सर, त्यांना सगळे एरवी मेजर म्हणायचे.
बॅट मिळत नाही म्हणल्यावर रुपेशनं च्यामायला थेट कुदळच काढली, तिथं मी आणि सागर पार हरलोच. गरगर जे काही हसायला लागला कि सांगायची सोय नाही. कुदळीचा दांडा म्हणजे बॅट. थंडीनं आणि ओलाव्यानं तो रबरी बॉल कॉर्क बॉलसारखा कडक झाला होता. आय.टी.बी.पी. च्या दोन टेंटच्या मधल्या जागेत, जिथं एरवी २ कोंबड्या सोडलेल्या असायच्या, तो आमचा पीच, मागची वॉल आणि त्यावर गिरवलेला स्टंप वगैरे सगळं नेहमीसारखं.
म्हणजे कसं डोकं खाजवायला खिशातनं हात काढू का नको असं वाटत होतं एवढी थंडी, आणि त्यात त्या तसल्या बॉलने क्रिकेट खेळायचं म्हणजे चारही बोटं घशात जाण्याचा प्रकार होता. त्यात पळायचं वगैरे म्हणजे उंटाचा मुका घेतल्यागत अवस्था.
तरीही खेळलो बरं का! चांगलं तासभर खेळलो.पुण्याची गँग भेटणं काय, गरगरनं श्रीकांतला बरोबर ओळखलं.

नंतरचे २-३ दिवस तर मोकळा वेळ होता म्हणून तंबूत न बसता आम्ही बाहेर येऊनच बसायचो. मग कधी ह्याला बाईक चालू करायला मदत कर, कधी त्याला रस्ते समजावून सांग असे भारी प्रकार सुरु झाले होते.' राम तेरी गंगा मैंली'चा हिरो ऋषी कपूर कि राजीव कपूर ह्यावर रुपेश आणि इतर लोकांत लागलेली पैज. एक पैजेपाठी पार वेडे झालेले ४ आय.टी.बी.पी.चे लोक, गेस्ट हाऊसचा इन्चार्ज टंडूक, आणि आम्ही २ वेडे. २ दिवस तर त्यातच गेले.

तिथला फोन हा एक नवीन किस्सा झाला होता.
आय. टी. बी. पी.चा सॅट फोन होता त्यांच्या एका टेंटमध्ये. त्यांनी तो सिव्हिलियन्सना पण वापरायची सोय केली आहे, कॉल करा, STDच्या रेटने पैसे द्या. आम्ही त्याच टेंटमध्ये पडीक असायचो.
जो येईल त्याला हा प्रश्न विचारायचा, "जी, आपने राम तेरी गंगा मैंली देखी है?" त्यात बहुतेक लोक वेडे व्हायचे ते ऐकून, आर्मीच्या टेंटमध्ये हा काय प्रश्न असा चेहरा त्यांचा आणि त्यावर हसून बेजार होणार मी आणि सागर. तिथं आयुष्यभर लक्षात राहतील असे अनुभव आले.
अगदी इथं रोड ट्रिपला आल्यावर त्याच्या नकळत झालेलं त्या बंड्याचं ब्रेकअप आणि त्यावरून त्याचं फोनवर रडणं काय, त्याला कम्फर्ट म्हणून अलगद उठून बाहेर गेलेले आम्ही सगळे, किंवा कुठं गेलो काय पाहिलं ते कमीत-कमी शब्दात फोनवरून आपल्या घरी मांडू पाहणारी पोरं, "मॉम मुझे आपको यहाँ ले आना है" म्हणत डोळ्यात पाणी काढणारा पोरगा, फिरून खूष झालेली ती पोरगी, तिनं ते सांगायला घरी केलेला फोन, शब्दांपेक्षा बोलके डोळे आणि नेमकं पोरगी इथं आली अन् त्या पोरीचे बाबा ऍडमिट व्हावे, मग तिचा खाड्कन पडलेला चेहरा आणि कापरं भरलेला आवाज, विजयदादांचं सकाळी आपल्या पोराशी ते २ च मिनिट बोलणं काय, अलगद ओल्या झालेल्या डोळ्याच्या कडा आणि ते लगेच मागे सारून कामी लागणारा विजयदादा...
रुपेश एकच वाक्य असं बोलून गेला कि पार रुतून बसलं, "कोणाला घरी फोन करून बोलताना रडलेलं पाहून आम्हाला काय वाटतं कधी नाही कळायचं इतरांना दादा, अवघड असतं, पण पाहिजे असतं"
डोकंच हाललं, पण त्याला समजूत घालणारे आपण कोण, त्यांची मानसिक तयारी आणि आपली ह्यात जमीन-आस्मानाचा फरक हे नवीन नाही. मग वेळ मारून न्यायला विषय बदलायचा माफक प्रयत्न करणारा मी.

नंतर एकदा आईस वॉलला जाऊन भोज्जा पराक्रम करून झाला कि एक अख्खा दिवस फक्त पॅकिंग आणि पडी मारण्यासाठी ठेवला. सगळं मस्त मॅनेज केल्यानं सामान विखुरलं असं नव्हतंच, तासाभरातच भराभरीचा कार्यक्रम उरकला. मग उरलेला दिवस विजय आणि रुपेशदादाला ब्रिजपल्याडचं दुर्गा मंदिर धुवून साफ करायला केलेली मदत. त्यादिवशी त्यांचा भयंकर आग्रहामुळे आमचं दोन्ही वेळचं जेवण सरकारी खात्यातनंच झालं.
परत येण्याच्या दिवशी "आपका जाने का जुगाड हो जाएगा, बेफीकर रहो" असं य वेळा सांगणारा चाचांचा मुलगा. मग अखेरीस सामान बांधून झाल्यावर स्वयंपाकीपासून ते चाचा पर्यंत इतक्या दिवसात या-ना-त्या कारणामुळे कामी आलेल्या प्रत्येकाला जाऊन भेटणं काय, गाडीत बसताना  त्यांनी आवर्जून सोडायला येणं काय किंवा गाडी निघाल्यावर मागं उडणाऱ्या धुळीत आम्ही मागं वळू-वळू पाहणं काय. बातलने आम्हाला मोठ्या मनानं आश्रय दिला होता आणि सोबत खूपसाऱ्या आठवणी पण.

ये दिल्ली है मेरे यार..

भारतात कुटं बी जा येक गोष्ट दिसतीच: रेल्वेच्या ब्रिजवरची गर्दी. पाठिवरल्या वेताळ-सदृश्य बॅगा सांभाळत, "चलो भाई, चलो भाई" करत जिना उतरेस्तोवर घाम फुटला. ह्या स्टेशनहून कुठकुठवर तुम्ही रिक्षाने जाऊ शकता ह्याची लिस्ट ऐकत ऑटोवाल्यांच्या लाईनीमधून खुल्या जागेतली टपरी गाठली. १० पैकी फक्त एका टपरीवर चहा नि उरलेल्या साऱ्या टपऱ्यांवर थेट बिअर विक्री.. बरोबर, ये दिल्ली है मेरे यार, बस अच्छे रोड बाकी सब बेकार!
आधी सगळी बोचकी ISBT च्या क्लोक रूममध्ये ठेवायचं ठरलं. रिक्षा केली आणि ISBT गाठलं, सामान टाकलं. रेल्वेचा जिना ते टपरी ह्यातली पायपीट आणि स्टेशन ते ISBT ची रिक्षा-राईड ह्यांत एक गोष्ट कळली कि जर संध्याकाळी कर्वे रोडवर क्लचवर उभं राहून गाडी चालवायची सवय पुणेकरांना असेल, तर एक हात हॉर्नवर ठेवून गाडी चालवायची सवय दिल्लीकरांना आहे. हॉर्न हा फक्त लक्ष्य वेधून सावध करण्यासाठी नसून पुढच्या आणि आजूबाजूच्या लोकांच्या डोक्याची पार मंडई करण्यासाठी असतो हा इथला पाहिला ड्रायविंग नियम असावा. दिल्लीची लोकं शब्दशः हॉर्नी आहेत ह्यात अजिबात शंका उरली नाही.

गरजेपुरतं सामान असलेली छोटी बॅग पाठीशी मारून दिल्लीदर्शन सुरु झालं. बाहेरच्या-बाहेर लाल किल्ला जिकला, आणि डुप्लिकेट इलेक्ट्रॉनिक्स मार्केट मधून वाट काढत पुन्हा ISBTपाशी आलो. 


"Placeholders"


लिटरभर तरी घाम नक्कीच निघाला असावा. ट्रेकआधी 'Delhi Belly' होऊ नये म्हणून ACत बसून काहीपण गिळू म्हणत आम्ही मॅक.डीमध्ये घुसलो.

साधारण पाऊणएक तास तिथं काढून आम्ही ISBTच्या वेटिंग-लॉबीमध्ये आलो. ११.३० वाजता पुन्हा बाहेर पडून Ritz थेटरमध्ये 'Independence Day 2 ते भी हिंदीमध्ये'चं बुकिंग केलं. बॉक्सात मी आणि सागर, बाकी ३ युगुलं. Independence Day 1 न पाहिलेल्या सागरनं किती डुलक्या टाकलात, किती पिच्चर पाहिला देव जाणे. अजिबातच जीव नसलेल्या त्या चित्रपटात थोडंफार डोकं टाकायचं प्रयत्न केला कि मागल्या ३ युगुलांचा चिवचिवाटच जास्त ऐकू येई. "बाबांनो, फॅमिली प्लॅनिंग नंतर करा बे, आधी (इथं सिनेमात) स्वातंत्र्य मिळू दे" असं सुचवावसं वाटलं. पण का उगाच छळ, म्हणून 'पिच्चर पाहू नकात बे' असं फेसबुकवर झळकावून टाकलं. बाहेर आलो तेव्हा अशक्य ऊन. कोटला मैदानावर क्रिकेट खेळणाऱ्या आपल्या-परक्या साऱ्या खेळाडूंना मनोमनी दंडवत घालत आम्ही पुन्हा मॅक.डी गाठलं. पुन्हा एकदा लॉबीत पडी टाकून कसाबसा तासभर घालवला आणि चार्जिंग पॉईंटवर येऊन लोंबकळलो. उरलेला वेळ त्यातच गेला.

२ घुलाम और ब्लफ़मास्टर

पुण्याहून सुरुवात असल्यानं रेल्वेलाही घाई हा प्रकार माहीत नव्हता. ३ मिनिट उशीरा का होईना गाडी निघाली आणि यार्डात येऊन १० मिनिटं थांबली. सागरचा अप्पर, माझा मिडल बर्थ आणि लोवर बर्थला एक आंटीजी.

"आंटीजी, आपको जब सोना हो बस बोल दिजीये" इति मी, आणि "में तो साला पुरा दिन सो सकता हूँ!" इति माझं मन.
"हा बेटा जरूर" म्हणत आंटींनी उशी उचलली, पाठीशी ठेवली, मांडी घातली आणि पहिला आऊट-स्विंगर लेफ्ट-अलोन केला.

म्यानेजरांच्या फोनवर गाडी खडकीला थांबली. हापिसचं काही काम नाही म्हणून सुरुही झाली. गप्पा मारत कर्जत पास झालं आणि पँट्रीवाला जेवण घेऊन आला. सागरला डोंबिवलीला HDFCचा नाका दाखवून दारात गप्पा मारत वसईकडे निघालो. दुपारी पाळण्यात झोपायची दुर्लभ सुवर्णसंधी अशी उगीच दवडायची नाही ह्यावर एकमत झालं आणि मग आम्ही पक्ष्यांमधनं वाट काढत जागेवर आलो आणि गप पडी मारली.

वामकुक्षी उरकल्यावर पुन्हा खाली येऊन बसलो तोच समोरच्या ताईनं डायरेक्ट चौकार टाकला: "हे आहेत ना, ह्यांना खेळता येत असेल रमी, येते ना?"
मी मान डोलावली, आणि सागर पण वरच्या मजल्यावरून खाली आला.
"हम भी कार्ड्स खेलतें हैं" म्हणत बाजूच्या आंटींनी Attitude-Adjustment केली.
दादाला काही पत्त्यांचा खेळ माहित नव्हता. समोरच्या अप्परला सांडलेला तेलुगू पिच्चरवाला भाऊ तर काही केल्या खाली येईना.
मग काय, २ कॅट बाहेर आले, एकावर एक बॅग ठेऊन टेबल मांडण्यात आलं.
जोकराविना रमी खेळत सागरने २ डाव गिळले, मग प्रत्येकी एक-एक डाव जिंकत रमीला रामराम ठोकायचं ठरलं.
मग खो आला बदाम ७ वर. च्यामायला इथे भी बदाम ७ च, आणि त्यात परत राजे हातात. आंटींना खेळ समजूपर्यंत डेमोडाव झाला. मग सागर, मी, आंटी, दिदी, दादा असे ५ जण खेळणार म्हणल्यावर दिदीनं भारी प्रकार केला. २ कॅट घेऊन बदाम ७ खेळायचं! म्हणजे तुझा राजा सुटायला तू धडपड केली आणि नेमका तुझ्याआधी एखाद्याचा राजा सुटला कि त्याला उचक्या आल्याच म्हणून समजा!
तिथं पण य प्रकारे आडवा-आडवी करत सागरनं २ डाव जिंकले. एव्हाना बाजूच्या साईड-लोवरवाल्या काकूंना पण खेळ पाहण्यात रस आला. "हमारे यहाँ ये खेल नहीं खेलता कोई!"
मग काय खेळायचं असा प्रश्न आला आणि मी चॅलेंज खेळायचं सुचवलं. ज्यांना खेळ माहीत होता त्यांच्या डोळ्यात चमक! दादाला खेळ समजवला, आंटी, "हमारे यहाँ इसे ब्लफ केहतें हैं, आप खेलो में बस देखुंगी"
No points for guessing, सागर सगळ्यात आधी सुटला. मग खेळात थोडी मजा म्हणून मी उगाच चॅलेंज करायला सुरु केलं. त्यात माझ्या "२ गुलाम" आणि "उपर एक" ने जो काही हैदोस मांडला कि सांगायची सोय नाही. बहुदा आमचा गोंगाट ऐकून बाजूच्या कुपेतलं पाखरू आलं. "मुझे भी खेलना है!" तिच्या आईबरोबर पत्ते खेळायची संधी नाकारून पाखरू वर म्हणालं, "मुझे इनके साथ खेलना है!"
पाखराला माझ्या आणि आंटींच्यामध्ये कसंबसं बसवलं. पानं बघत-लपवत-दाखवत खेळ सुरु झाला. परत सागर सुटला. पाखराचे सगळे पत्ते चॅलेंज करायची सोय होती मला, पण स्पोर्टींग नेचर म्हणून मी पाखराला जिंकवलं. सागर जरा लैच सहज सूटतोय म्हणून मी जागा बदलली. तरी सुटायचा ते त्यो सुटलाच! मग शेवटी पाखरू आणि मी राहिलो. "मेरे चार इक्के, उसपे चार" करत म्या डाव जिंकलो, आणि पँट्रीवाला जेवण घेऊन आला.

पत्त्याचा पत्ता कट झाला होता आणि जेवून पिच्चर बघायचा प्लॅन चालत नाही म्हणल्यावर गप पडी मारायचं ठरलं.
सकाळी जाग आली तेव्हा खिडकीतून बाहेर दिल्लीच्या outskirts चा देखावा होता. जांभयाचं प्रकरण उरकेपर्यंत दिल्ली आलं.

सामान काढून बाहेर येईपर्यंत कुपेतले सहप्रवासी गर्दीत हरवले. सगळ्यात विचित्र गोष्ट म्हणजे, राईस आणि कर्ड शेअर करणारा बिनतोड तेलुगू पिच्चर पाहणारा भाऊ, आजवर पत्ते न खेळणारा दादा, त्याला आणि आम्हाला पत्ते खेळायला भाग पाडणारी दिदी, 'Home is where your Mom is!' असं पुन्हा गिरवून सांगणाऱ्या आंटींजी, ह्यापालिकडे आम्हाला एकमेकांची नावं पण माहित नाहीत, आणि ते विचारायची तसदी पण कुणी घेतली नाही.

Time and again I was lucky enough to say, a long travel had turned into a nice journey.

बाळकडू?

आज लै मोकळा वेळ मिळाला आजूबाजूला डोकवायला.
गल्लीत पोरांच्या खेळण्याचा आवाजच नाही, पोरं आहेत का नाही प्रश्न पडावा.
सांजच्याला थोडं बाहेर पडलो.

डेअरीत दूध विकत घ्यायला आलेलं एक कुटुंब.
लाल-निळ्या रंगाचा ढगळा शर्ट, खाकी रंगाची चड्डी, डोळ्यावर चष्मा असं ते नुकतंच शाळेत जायला लागलेलं पोरगं. बाजूच्या वाड्यात एकानं चेंडू मारला तो ह्या समोर येऊन पडला. पोरगं तुरुतुरु धावत गेलं, त्यानं चेंडू घेतला नि भिंतीपल्याड फेकला.

तिथं त्याची आई, "Oh, Look what he is upto!"
बापानं जाडजूड भरलेलं त्याचं वॉलेट तिच्यासमोर बडवलं आणि पोराकडे आला. धपकन् धपाटा दिला, का ते त्याचं त्याला किंवा त्या चिमुरड्याला माहित. हात धरून तरातरा ओढत त्याला आईकडे आणण्यात आलं.
मग नकळत आईच्या बॅगेतून बाहेर आलेली सॅनिटायझरची बाटली पाहून सगळा खेळ कळला.
फोनवर बोलत कार चालवत बाप त्यांना गाडीत भरून निघून गेला.

फक्त आपण आणि आपल्या आधीच्या पिढीलाच का हो मैदानी खेळाचं व्यसन होतं?
हल्ली मैदानं नाहीत म्हणून खेळ नाहीत असं अवसान गाळलं जातं, पण मला ते काही पटत नाही. फक्त अनोळखी पोरानं मारलेला चेंडू हाताळला म्हणून एवढं रामायण असेल तर पुढचं आयुष्य पोरानं हातमोजे घालून जगावं कि काय?

घरात AC आहे म्हणून खिडक्या बंद, बाहेर दूधवाला-गोळीवाला, चिंच-बोरवाला चोर म्हणून दारं बंद. कबूतरापलीकडे काही पक्षी असतात ते त्यानं कधी पाहावं?

शाळेत रुमलाच्या जागी टिशू-पेपर नेऊन पोरानं रुमालाचे खेळ कधी शिकायचे मग?
त्याचं जग जर चार भिंतीतल्या एका कंप्युटरमध्ये वसवून दिलं तर उद्या उड्या मारत भिंती ओलांडायला कसं शिकेल ते?

हुशार तर नक्कीच असावं त्याने, माझ्यासारखा माठ होऊन काहीच हाशील नाही हे मान्य. पण त्याला ताणण्याला हद्द असावी. मला स्वतःला सत्तरीच्या बोंब असताना, ९६ का पडले, ४ कुठे गेले म्हणून मार खाल्लेले किस्से ऐकलेय मी. का?
जमवेल उद्या ५० सर्टिफिकेट, ४० ट्रॉफ्या...
पण, खोचलेला शर्ट बाहेर येऊपर्यंत आनंदात बुडून, हरपून खेळायला मिळेल का त्याला शब्दशः उभ्या आयुष्यात?

लहानपणीच डिओची सवय लावली गेली तर ते पोरगं खोडरबर विकत घेताना त्याचा वास घेईल का कधी?
लीडवाली पेन्सिल का तर म्हणे टोक काढायला वेळ जायला नको. अरे टोक काढताना त्या लाकडी पेन्सिलच्या चकत्या काढण्याची मजा स्वतः जगून त्याला कसं वंचित ठेवू शकता?

पावसात भिजू नये म्हणून कार किंवा रिक्षाने ने-आण करणार, मग तो कसा कधी अवकाळी पावसात टिकेल? हवा बदलली कि चड्डया आणि डॉक्टर बदलायची वेळ येते मग.
मित्रांच्या गळ्यात हात टाकून घरी चालत येण्यागत दुसरं सुख नाही.

सर्दी होते म्हणून हे नको खाऊ, खोकला होतो म्हणून ये नको खाऊ, an apple a day keeps doctor away का काय म्हणत पोरगं फक्त तीच फळं खातं.
करवंद काय? माहित नाही!
आवळे काय? माहित नाही!
ऊस खाल्ला का कधी? असं काही करतात का!
बोरं खातो? नको, खोकला होतो!
तिखट खातो? नाही!
बर्गर खातो? हा, मॅकडोनाल्डसमध्ये!

खाण्याच्या बाबतीत असं शेण खाल्लं तर ते कोल्हापुरातली एखादी पंगत कसं जेवेल?
कसंय ना घाणीचं, धुळीचं ग्रहण दाखवत त्याला मातीपासून वेगळं करायचं, आणि मग तग धरेल अशी अपेक्षा ठेवायची.


कशापायी?

कालच एका मित्रासोबत चर्चा झाली. जनाब केहते हैं, "यार यहाँ हम विकेंड के लिये तरसते हैं| Saturday-Sunday मस्त सोनेका और तू वहाँ बावले जैसे घुमने जाता है.."
"पहिले पाढे पंचावन्न"चा शोध का आणि कसा सहजा-सहजी लागला असावा ह्याची परिणीती आली. हा प्रश्न प्रत्येक ट्रेकरला आयुष्यात किमान एकदा विचारला जातोच. प्रत्येकाचं वेगळं उत्तर असू शकतं.
संदीप आणि सलिलच्या गाण्यात काही apt ओळी आहेत ज्या हा आटापिटा सहज उलगडून व्यक्त करतात.

'मी जुनाट दारापरी किरकिरा बंदी,
तो सताड उघड्या खिडकीपरी स्वच्छंदी'

लहानपणी चालू झालेला, "चांगला इंजिनिअर" गावचा प्रवास, "चांगला ट्रेकर" व्हायचंय ह्या गावी कधी निघाला हे नेमकं शब्दात आणि काळात मांडणं अशक्य आहे.
मला आठवतं लहानपणी रेल्वे प्रवासात खिडकी हा माझ्यासाठी अनिवार्य घटक होता. डोकावून काय-काय पाहायचो, नजरेत काय-काय साठायचं ते नेमकं आठवत नाही. कितीही आटापिटा केला तरी खिडकीतल्या दुसऱ्या दांडीच्या वरून पाहिलंच नाही, उंचीच नव्हती तेवढी.
आज मात्र नजर फक्त आणि फक्त तिसऱ्या-चौथ्या दांडीच्या वरच असते, ओळखीचे आणि अनोळखी डोंगर शोधत. मुंबई-पुणे आणि मुंबई-नाशिक प्रवासात तर खिडकीतून एक नजर टाकून डोंगर पाहून सांगू शकतो कि कोणतं स्टेशन येणार आहे. ही तऱ्हा बर्याच ट्रेकर्सची असेल आणि.

और जनाब पूछेन्गे, "भाई, क्या उखाड लोगे इससे?"
साहजिकच, त्याची मारायला पंधरा गोष्टी असल्या तरीही मी खपली काढणारच नाही, कारण ते त्याला पचायचं नाही.

अगदी कॉलेजला जात होतो त्या दिवसांत मला शिस्त हा प्रकार नव्हताच, आजही तो आहे का नाही हा वेगळाच मुद्दा. सकाळी उठायची बोंब होती, ८.४० च्या ऐवजी ९.५०! जसा ट्रेकला जायला लागलोय सकाळची ५.२७ असो किंवा रात्री १.४७, गाडी नाय चुकणार! शनिवार-रविवार ट्रेक करून जर अगदीच पिपाणी वाजली तर सोमवारी डायरेक्ट सुट्टी! आधी प्रवास करून आलो तरी उरलेल्या प्लास्टिक रॅपर्सचा पत्ताच लागत नव्हता. आता ट्रेक असो किंवा साधा प्रवास, सगळं माझ्यासोबत घरी येतं.

इससे पेहले कि जनाब कुछ कहे, माहीत आहे, सगळे नॉन-ट्रेकर्स कचरा नाही करत. पण, महत्त्वाचा मुद्दा असा कि शक्यतो दुनिया आपल्या बापाची जागिर असल्यागत कचरा टाकणारा नग नॉन-ट्रेकर असण्याची शक्यता जास्त असते.

Not all best people around are Travelers and Mountaineers, but most of the times Mountaineers and Travelers are the best bunch of people around.

आधी रात्री ट्रेनने बोरघाटातून जाताना उल्हास व्हॅलीच्या पल्याड त्या सुनिल शेट्टीच्या बंगल्याच्या लाईट्स भारी वाटायच्या. आता त्याच डोळ्यात सलतात. डोंगरावर जाणारा नागमोडी रस्ता तेव्हा खूप भारी वाटायचा, आता तो नजरेत सलतो. लहानपणी भूगोलात "वृक्षतोडीमुळे जमिनीची धूप होते" असा मांडलेला वनलायनर म्हणजे किती गहन प्रश्न आहे ते जाणवतं. Deforestation आणि त्याच्या परिणामाची ग्रॅव्हिटी जर घरी बसून कळली किंवा जाणवली असं मत असेल तर त्यावर हसू येतं. तसंही 'कळणे' आणि 'जाणवणे' ह्यातली उडी प्रत्येकाला झेपेलच असं नाही.

स्वतःचं सामान वागवणं म्हणजे हमाली नव्हे हे पटलं तर ट्रेकिंग खूप भारी प्रकार आहे.

जनाब सोचते हैं कि वहाँ जंगलमें खाने-पीने कि तो लग जाती होगी.
आता त्या बाहेर बिस्लेरी पिणाऱ्याला कसं सांगावं कि अहुप्याच्या टाक्याचं पाणी म्हणजे काय जादू आहे.
तू आंब्यासाठी उन्हाळ्याची वाट पाहा, आम्ही आंबा, करवंद, जांभूळ आणि इतर रानमेव्यासाठी डोंगराची वाट धरतो.

गेल्या मे महिन्यात किस्सा झाला, मित्र म्हणाला, "कल्याणच्या बाजारात जांभळं आणि करवंद छान मिळालीत."
आता त्याला सांगितलं खरी करवंदं काय असतात तर त्याला ते पचणार नाही.
पटकन् म्हण आठवली, "सरड्याची झेप कुंपणापर्यंत!"

लोणावळ्याच्या अमुक-तमुक पॉईंटवर शंभराच्या गर्दीत पाहिलेला सनसेट जर त्याला आवडला तर मी त्याला का उगा कोकणदिवा, अंगठेसरच्या सनसेटच्या गमती सांगू?
राजमाची पॉईंटला लागलेलं धुकं आणि जरा उघडीप झाल्यावर दरीत दिसलेले ढग त्याला भारी वाटले असतील तर का मी त्याला रायरेश्वरचं धुकं आणि पावसाआधी कुलंगहून दरीत दिसणाऱ्या ढगांचं गाजर दाखवू.

भूगोलात खूप वेळा वाचलेलं असतं ना ह्या नदीचं खोरं, त्या नदीचं खोरं.. खोऱ्यानं पैसे कामवायचं वय झालं तरी बहुतांश लोकांना माहित नसतं नदीचं खोरं म्हणजे काय प्रकार असतो.
 
अब जनाब जरूर पूछेन्गे, "जानकर भी क्या उखाड लिया भाई?"
"पालथ्या घड्यावर पाणी!", बाबा, तू खोरं म्हणजे Gillette च्या ऍडच पाहा, कांदाट, कोयना, भातसा, वेळवंडी आमच्यापर्यंतच राहू दे.

लहानपणी जर नावडतं स्टेशन असेल तर उल्हास नगर. सगळाच उल्हास आहे तिथं. उल्हास नदीचा नाला झालेलं पाहून घाण वाटायचं, आता लोकांची कीव येते.
उल्हास नदीला शिव्या घालणारे लोक, त्यांना काय कळणार कि उल्हास व्हॅली खरंतर काय प्रकार आहे आणि तिचं आपण काय करतोय!

दारू ढोसून आलेल्या हँगओवरपेक्ष्या ट्रेकमुळे असलेली सोमवारीची अंगदुखी बरी.
ट्रेकमुळे वेगळीच तयारी होते, पावसात भिजून सर्दी होणं वगैरे प्रकार दुर्मिळ होतात.

जनाबने एक बात खूब कही, "ट्रेक ना करने से नुकसान तो नही होता नजर आ रहा.."
तेच म्हणतोय मी, कशापायी?