कोळेश्वर - पुन्हा-पुन्हा जावं असं ठिकाण!

बऱ्याच दिवसांनी ट्रेक, बऱ्याच दिवसांनी प्रवास आणि बऱ्याच दिवसांनी लिखाण! 

गेल्या २-३ वर्षांत बोटावर मोजण्याइतके ट्रेक केलेत, त्यावर लिखाण तर अजिबातच नाही. मुळात आवर्जून लिहावं असं काही फिरलोच नाही. गेलं पूर्ण वर्षच घरी असल्याने तर त्या वेळेचा हिशोबच नाही. लॉकडाऊनमध्ये बरीच रंगरंगोटी शिकलो. 'चित्रकला सोड आणि फिरणं पुन्हा सुरू कर' असे कडवट सल्लेही आलेच. कसंय ना, हल्ली काही झालं की त्याचं खापर कोविडवर फोडलं जातंय, माझं मात्र तसं नाही. माझं 'ट्रेकला न जाणारं अस्वल' गेल्या ३-४ वर्षांपासूनच झालंय. जवळपास ८-१० महिने झाले डोंगर फक्त फोटोतच पाहिले, मग बूटावरची बुरशी पुसून आता ट्रेकला जायचंच असं ठरवून थोडं भीत-भीत का होईना ट्रेकचा प्लॅन केला. हो-नाही म्हणत शेवटी इथून एकटंच निघायचं ठरलं. पाठीवरच ओझं आणि पोटावरचं वजन नुसता आराम फर्मावलेल्या पायांना झेपतंय का ह्याची शंका आली, म्हणून गूपचूप मुक्काम टाळून एकच दिवस भटकायचं ठरवलं. परिणामी बरंच ओझं कमी झालं -- ओझं मुक्कामाच्या क्लिअर गणिताचं आणि सामानचंही. वेळ पाहता नेमकं कोणा काका-मामाच्या घरासमोर/पडवीत मुक्काम ठोकण्यात तथ्य नव्हतं. मग पाण्याची जागा पाहून टेंट लावून राहावं म्हणलं तर यंदा वावर कमी असल्याने जनावराची भिती. तसं भित्यापाठी ब्रम्हराक्षस हो, काय करावं आणि काय करू नये हे माहित असताना खरंतर ह्या भितीला जागा नव्हतीच, पण टाळलं. बऱ्याच मित्रांनी "यंदाची वेळ चांगली नाही, सोलो न जाता गावातून सोबत घे कोणाला तरी" असा दम (इतर फुल्या वगळून) दिला. नुकताच आलेला तो कुलंगचा बिबट्याचा विडिओ, हायवेवर होणाऱ्या चोऱ्या-माऱ्या ऐकिवात होत्याच. निमूटपणे गावात फोन करून एकाला सोबत घेण्याची सोय करून ठेवली. जेणेकरून शोधाशोध नको, भले ही शोधाशोध हा ट्रेकचा सगळ्यात आवडीचा भाग असला तरी सध्या नको. 

दोन लोक दोन वेळ पोटभर जेवून उताणे पडतील एवढा खाऊ घेतला. वर काकडी, टोमॅटो आणि संत्री. ४ लीटर पाणी, १ लिटर सरबत. मेडिकल किट, बदलायला शर्ट वगैरे कोंबला की बॅग भरल्यागत वाटलं. 

मध्यरात्री निघायचं टाळून, पहाटे ३.३० ला निघालो. झोपेचं खोबरं! नवीन गाडी, मोकळा हायवे. तासाभरात खंबाटकी घाटाच्या पलीकडे पोहोचलो. वाई फाट्यावर आत वळल्यापासून बाईक जपून चालवत असल्याने रस्त्यात बरंच काही दिसलं. मांढरदेवी फाट्याजवळ मोठं काहीतरी आडवं दिसल्याने गाडी थांबवली. एक उदमांजर नुकतंच कोणीतरी उडवलं होतं. road-kill संदर्भात कितीही पोस्ट कोणीही टाकल्या तरी लोकांच्या डोक्यात प्रकाश पडत नाही. त्याची अजून चिरफाड होण्यापेक्षा बाजूलाच एक कोरडा चर-वजा-खड्डा होता, शेपटला धरून त्याला तिथे आत टाकलं, करायची ती किमया पुढे निसर्ग करेलच.

भल्या पहाटे सुद्धा लिफ्ट मागणाऱ्यांना डावलून पुढे जाणं जरा विचित्रच वाटत होतं, पण नाईलाज, जोखीम त्यांनाही नको आणि मलाही, खरंतर स्वार्थ जास्त होता. सालाबादप्रमाणे रस्त्यात लागणाऱ्या 'केजंळ' चा नेमका उच्चार ४ वेळ मनात घोकून झाला. नेमकं केजंळ आहे की केंजळ मध्ये डिजिटल रंगाऱ्याचा typo झालाय माहीत नाही, दिवसागणिक मॅप्रोच्या पाट्या वाढत आहेत हे मात्र नक्की. नाही, म्हणजे करवंदीची दाट जाळी उडवायची आणि त्या जागी रंगबिरंगी फुलांची निरूपयोगी विलायती झाडी लावायची आणि आतमध्ये ते सगळं organic चं गाजर दाखवायला कसब हवं!

कुडकुडत वाई गाठलं. स्टँडसमोर एक हॉटेल चालू होतं. गुळाच्या ढेपेला मुंगळे लागतात तसे लोक त्या हॉटेलसमोर जमा झाले होते. तिथं पोहे खायचा बेत रद्द करून गाडी जरा लांबच थांबवली. बॅगेतलं बिस्कीट काढलं. महाबळेश्वरकडून एक खचाखच भरलेली ट्रॅव्हल्सची बस येऊन हॉटेल समोर थांबली. बसमधून उतरलेल्या निदान अर्ध्या लोकांचा मास्क दाढीसाठी! चुळ भरून लोकांनी हॉटेलच्या समोरच भाग पिचकाऱ्याचा सडा टाकून पवित्र केला, त्यात ३-४ पोलिसही होते. दुकानदाराचा चेहरा एकंदर पाहण्यासारखा झाला होता, पण काही बोलायची सोय नाही, शेवटी धंदा आहे. तसही करोनाचा काळ असो वा नसो, आपण असेच होतो, असेच राहणार. शिक्षणाने प्रगती होते म्हणतात पण ते साफ खोटं आहे. तिथं न थांबण्याची सद्बुद्धी वेळेत आल्याने मनोमन धन्य झालो. 

असो, जोरकडे जाणाऱ्या रस्त्याला लागलो, गावाबाहेर आलो आणि थंडीने कुडकूड सुरू झाली. धोम धरणाच्या पुढे आल्यावर तर हाता-पायाची लाकडं झाली. पहाट झाल्याने बऱ्याच गावात कुठं ना कुठं एखादी आजी स्वेटर घालून, मफलर गुंडाळून पाण्याच्या बंबाजवळ बसून काहीतरी खटाटोप करताना दिसायची. लगेच लहानपणी घालवलेल्या सुट्ट्यांची आठवण झाली. त्या बंबाशी खेळणं हा आवडता कार्यक्रम असायचा गावी. मग ते घासलेटात (रॉकेल/केरोसीन म्हणलं तर फाऊल असतोय!) चिंध्या बुडवून त्यात सोडणं असो किंवा असलेल्या इनलेट मध्ये पाणी ओतू-ओतू तो बंब काठोकाठ भरणं असो, नुसती धमाल. हल्ली फारसे दिसत नाहीत तसे बंब. 

प्रत्येक गावात पहाटे धावायला आलेल्या पोरांनी छोटी शेकोटी लावलेली होतीच. ठार गार पडलेले हात शेकायची प्रचंड ईच्छा होती पण थांबायचं तर सोडाच, पाय वर घेऊन गाडी रेटवावी लागली, हर गली का कुत्ता इस वक्त शेर होता है! नवीन गाडीला सॉरी म्हणत, फूटरेस्टवर जवळपास उभं राहूनच स्पीडब्रेकर नासल्यागत गाडी तशीच दामटवायची. 

नदीवरचा पूल ओलांडून बलकावडेपाशी धरणाच्या बाजूनं वर आलो तोपर्यंत जवळजवळ उजाडलं होतं. पुढच्या फाट्यावर डावीकडे वळलो, अपेक्षेप्रमाणे रस्ता थोडा कच्चा होताच, कित्येक वर्ष असाच आहे. पुढे वर भैरवनाथाच्या मंदिरापाशी येणारा रस्ता चांगला आहे, मंदिरापाशीच ४-५ मोर दिसले. कॅमेरा नसल्याने चांगले फोटो हुकले. पुढल्या वळणावर पण तेच झालं, गाडी थांबवून gloves काढून मोबाईल काढेपर्यंत सगळं गायब.  मग gloves बॅगेत टाकले आणि पुढे आलो तर पुन्हा मोर दिसले. छान व्हिडिओ काढला आणि मग नव्या गाडीचे ४-५ फोटो काढून गावाकडे निघालो. 

गावात मंदिरामागे गाडी उभी करून सपकाळांच्या घरापाशी येऊन त्यांना फोन केला. सपकाळ मामांनी सोबत येणाऱ्या माणसाला बोलवून घेतलं.  भावकीतले असल्याने ह्या मामाचं आडनाव सपकाळच. "गुरं लावून आलो आताच, कापडं बदलतो आणि भाकर खाऊन येतो" म्हणून मामा घरी गेले.

मी गाडीपाशी थांबलो होतो, गाडी म्हणली की एरवी गावातली पोरं येतात, हात लावून बघतात, एक चक्कर मारून आणा म्हणतात, ह्यावेळी काहीच नाही. पोरं लांब उभं राहून बघत राहिली. आपण आपल्या फिरण्यापायी ह्यांचं जगणं अवघड करतोय का असं वाटून गेलं. खरंतर वादाचा मुद्दा आहे, पण वाटून गेलं की निदान आपलं पोट भरणं अवलंबून नाही ट्रेकिंगवर, आपण घरी बसावं. साधारण १५ मिनिटात मामा आले. कुठं फिरायचं सांगितल्यावर मामांनी साधारण हातवारे करून दिशेचा अंदाज दिला आणि आम्ही वाटेला लागलो तेव्हा ८ वाजले होते.

जोर गावातून एका वाटेने कोळेश्वरच्या पठारावर येऊन, अगदी कोकणात पडणाऱ्या कड्यापर्यंत जाऊन मधल्या वाटेने पाण्याचं टाकं आणि कोळेश्वरचं मंदिर पाहायचं आणि मग दुसऱ्या वाटेने खाली जोर गावात यायचं. तसं जोर गावातून कोळेश्वरला जाण्यासाठी निदान ४-५ वाटा आहेत. मामांनी सांगितलेली सगळी नावं मी पहिल्यांदा ऐकत होतो. 

वर चढायला कुंबळंची वाट, कोकण, महादेव मुऱ्हा, अस्वल खिंड आणि रायरेश्वरच्या नाखिंडीची बाजू दिसते ती जागा म्हणजे रवीची पाटी, वाडीच्या वाटेला लागलो की मध्ये जे पाण्याचं बारमाही टाकं लागतं ते भोंबोवण्याचं पाणी, मग तसंच पुढे कोळेश्वर मंदिर, मग वाडीकडे न जाता पुन्हा जोर गावाच्या दिशेने आलो की खाली उतरायला बेटकावणेच्या दऱ्याची वाट. तसं विशेष अंतर नाही. साधारण १४-१५ किलोमीटरचा फेरफटका असेल. 

कोळेश्वरचं पठार एकतर भन्नाट मोठं आहे, फिरायला पुष्कळ जागा. बऱ्याच लोकांना पठारावर फिरणं तेवढं आवडत नाही. काही ऐतिहासिक कुतूहल नसतं, दाट जंगलाचे पट्टे असले तरी सलग असतीलच असं नाही. वाटेवरूनच दरीत किंवा त्या पल्याड काही खास दिसेलच असंही नाही. पण, अशा जागी उगाच धावपळ करण्यातही काही हाशील नाही. पठारावरून फिरणं हा माझा आवडता खेळ. पठारावर फिरताना माझं सगळ्यात आवडतं खेळणं म्हणजे कंपास. बेअरिंग (चाकाचं नाही, ते वेगळं!) लावून फिरणं हा प्रकारच भारी आहे. ३० फूट लांबवरच दिसत नसताना भर पावसात, भिरभर वाऱ्यात, दाट धुक्यात लपलेल्या हिरव्यागार पठारावर फिरणं जसं मजेशीर, अगदी तसंच कडक उन्हात, काही ठिकाणी तर अजिबातच झाडं नसलेल्या मोकळ्या पठारावर फिरणं ही वेगळी मजा असते. 

माथ्यावरून क्षेत्र महाबळेश्वरकडे पाहिलं तर एक सोंड मुख्य पठारापासून थोडं बाहेर येते आणि जोर गावाच्या पुढे घुमटीच्या वाटेवर असणाऱ्या धनगरवाडी कडे उतरते. त्या सोंडेवर बाल्कनीसारख्या जागी येऊन डावीकडे डोकावलं की एक वाट कुंभळजाई मंदिराच्या दिशेला डावीकडे उतरते, हीच कुंबळंची वाट आहे. तसं पाहावं तर मामांच्या म्हणण्यानुसार त्याच्याही पुढे अजून २-३ वाटा आहेत वर जाण्यासाठी पण ही जास्त वापरातली आहे आणि वरच्या टप्प्यात चढ जरा सोपा होतो. 

रस्ता आणि मंदिर डावीकडे ठेवून झाडीत शिरलो. पहिल्या १० मिनिटांतच घाम फुटला. चढ विशेष नाही, पण आपलं वजन पण काही कमी नाही. मामांशी गप्पा चालू होत्या. मामा क्षेत्र महाबळेश्वरला हॉटेलमध्ये कामाला होते. गेल्या वर्षभरात काम नसल्याने ते आता गावातच होते. तसंही ह्या वर्षी पाऊस जास्त झाल्याने शेतावर बरीच कामं होती. मला दहाच मिनिटात घाम फुटलेला पाहून मामांची चाल जरा संथावली. दर शंभर पावलाला दोन-दोन मिनिटं थांबून चालल्याने जरा हायसं वाटलं. रानात बराच बांबू, करवंद, जांभूळ आणि आंबा. फळ अद्याप एकालाही नाही. गचपण अजिबात नाही. 

वाट एका दांडावरून वर आल्यावर एका टप्प्याच्या पोटात थोडी डावीकडे वळते आणि हलकेच आडवे जाऊन एका बाल्कनीसारख्या जागेवर येते. भटक्यांना डोंगरातली बाल्कनी म्हणजे काय हे सांगणे न लागे! इथं वारा चांगला असल्याने थोडा रेंगाळलोच. धापा टाकून माझा कुत्रा झाल्याचं मामांना कळलं आणि मग तेच थोडं हवेशीर बसू म्हणाले. बोलता बोलता मामांनी साधारण आर्थरसीट ते केट्स पॉईंटपर्यंतच्या सगळ्या वाटा दाखवल्या. इथं अजून निदान २-३ दिवस भटकंती करायला पुरेल एवढं काही आहे. तासाभरात इथं येऊन टेकलो होतो म्हणजे फारच निवांत आलो म्हणायला हरकत नाही. एरवी अशा पट्ट्यात गवत आणि खुरटी झाडी जाळली जातात. सहज म्हणून मामांना विचारलं की वाट वापरात नाही की यंदा वणवा लावला नाही. मामांनी सांगितलं की हल्ली वनविभागाचे लोकं लक्ष्य ठेवून आहेत, त्यामुळे सद्ध्या तरी कोणी तसं काही केलं नाही. एका अर्थी चांगलंच आहे म्हणा. श्रीखंडाच्या गोळ्या खाऊन आम्ही पुढे निघालो. आता चढ तसा नव्हताच. दोनच मिनिटात एक पुसटशी वाट डावीकडे गेली. मामांनी सांगितलं की तिथं पाणी आहे, जे बारमाही आहे. स्वारी खुश, म्हणलं डोकावून येऊ. गाळातलं पाणी आहे, गाळ थोडा बाजूला सारला की पाणी भरतं. अडीअडचणीला कामी येऊ शकतं. 

पुन्हा मागे येऊन वाटेला लागलो आणि साधारण ५ मिनिटांत पूर्ण पठार नजरेस आलं. तरी वाडी, मंदिर वगैरे असलेल्या ईशान्य दिशेकडला बराच भाग मधल्या टेकाडाच्या मागे लपतो आणि दक्षिण-पूर्व येणाऱ्या भागाचा तर हिशोब वेगळाच, ते फिरायला दिवस कमी पडेल. पठारावर आलो तेव्हा निघून दीड तास झाला होता. एव्हाना मामांनाही माझ्या चालण्याचा अंदाज आला असावा. गेल्या पावसाळ्यात पठारावर झालेल्या बऱ्याच गमतीदार गोष्टी मामांनी सांगितल्या. थोडक्यात सांगायचं झालं तर धुक्यात गवे समोर येणं, सोबत वर आलेलं कुत्रं तब्बल चार दिवसांनी भेदरलेल्या अवस्थेत गावात खाली येणं, खेकडा पार्टीला मुंबईचं पाहुणं येणं, वर गेलेल्या चमूतलं एक नग चूकामूक होऊन वाट हरवून २ दिवस वरच अडकणं काय.. काही म्हणलं तरी जमेची बाजू अशी की ह्यावर्षी शेतीच्या कामातून सवड काढून गावची तरुण मंडळी रानात बरीच फिरली. हल्ली ह्या गावांमधल्या तरुणांमध्ये घाटवाटांबद्दल कुतूहल तसं कमी झाल्याचं दिसून येतं. 

वर आलो तसं मामांनी कोणत्या दिशेला काय आहे हे समजावलं. मामांशी बोलून रवीची पाटी गाठताना नेमकं कुठून कुठे कसं जाणार ह्याचा अंदाज घेतला. खांद्यावर काठी आडवी टाकून त्यावर दोन्ही हात अडकवून मामा रवीच्या पाटीकडे निघाले. मीही घड्याळातल्या कंपासवर नजर टाकून निघालो. 

उन्हाळ्याची सुरुवात म्हणाल्यावर पठार तसं कोरडंच असणार, सोनेरी गवतात वाट न दिसणं गृहीत होतं, मामा मात्र झपाट्याने निघाले होते. वाटेत उजवीकडे थोडा खोलगट भाग आला, कडेला मातीत ससा आणि भेकरचे ठसे. पावसाळ्यात डबकं भरत असणार. जवळच मातीच्या ढेकळामध्ये Stridulation सारखा (चरचर) आवाज झाल्यानं थोडं नीट पाहिलं, फुरसं होतं. मामा थोडं पुढे जाऊन थांबले होते. कॅमरा नसल्याने उगाच मोबाईलवर त्याचे फोटो काढायचा नाद सोडून तसाच पुढे गेलो. मामांनी पाहिला असता तर आधी काठी घातली असती त्यावर हे नक्की. 

वर आल्यापासून साधारण पाऊण तासात आम्ही रवीची पाटी म्हणतात त्या भागात येऊन बसलो होतो. जेमतेम १०:४० वाजले असले तरी भयंकर वातावरण बरंच hazy होतं. रायरेश्वर, लपलेली नाखिंड, अस्वल खिंड, कामथे, महादेव मुऱ्हा, ढवळे, चंद्रगड वगैरे परिचित असलेले डोंगर पाहिले. मामांनी कोळेश्वरच्या ह्या खांद्यावरून रायरेश्वरला थेट चढणारी थोडी अडचणीची वाट असल्याचं पण सांगितलं. 

वाटेवर थोडी सावली पाहून थोडा वेळ बसायचं ठरलं. मग गाव-पुणे-नोकरी अशा गप्पा झाल्या. मामांना त्यांच्या मुलींचं फार कौतुक. त्या आणि गावातल्या अजून काही मुली शिकायला क्षेत्र महाबळेश्वरला आहेत. रोज सकाळी गावातून सगळं चढून जायचं, शाळा करायची, बापाला भेटायचं आणि पुन्हा अंधाराच्या आत घरी यायचं, गावातल्या लहान मुला-मुलींचा अभ्यास घ्यायचा, दिवसभर शेतात किंवा गुरापाठी राबणाऱ्या आईला मदत करायची आणि पास व्हायचं! पोरींनी शाळेला ७० टक्के काढल्याचं मूल्य त्यांना पुरेपुर माहीत होतं. वयगाव, जोर, धनगरवाडी, जाधववाडी, बलकावडे गावात मिळून इथली पोरं अभ्यासात अव्वल आहेत. च्यायला आम्हाला सगळं असून माती खाल्ली, अन ही पोरं बघा! मंदिराच्या दिशेने निघालो तेव्हा ११ वाजले होते. 

आलेली वाट उजवीकडे सोडून थोडं डाव्या बाजूला उतारणाऱ्या वाटेला लागलो. पावसाळ्यात फिरायला भन्नाट मजा येईल खरी पण नीट माहीत नसताना धुक्यात ही वाट सापडणं तसं अवघड आहे. सपाटीला लागलो तसं बोलणं कमी झालं, झपझप पुढे निघालो. तरी मामा मध्येच थांबून माहिती सांगतच होते. डावीकडून एक ठळक वाट येऊन मिळाली. तीच वाट कोळेश्वरच्या खांद्यावरून खाली रायरेश्वर आणि कोळेश्वरच्या मधल्या खोगीरात उतरते. त्या वाटेवर पण एक ठिकाणी उजवीकडे वळालो की पिण्याचं पाणी असल्याचं मामांनी सांगितलं. 'जोर - रायरेश्वर - नाखिंड - उलट येऊन जांभळीच्या वाटेने कोळेश्वर - जोर' असा तंगडतोड प्लॅन करू शकतो. मामांना सांगितल्यावर मामा मिश्किल हसले आणि मला सोबत घ्या म्हणजे होईल म्हणाले. 

वाटेत मध्ये गर्द रानाचे २ चांगले पट्टे लागले. कॅनॉपीत घुसतो तिथेच बिबट्याची विष्ठा दिसली. पठारावर तर किती droppings आहेत ह्याचा हिशोब नाही. भेकरं तर भरपूर, खुराचे ठसे आणि टेकडाच्या पोटात असलेल्या दात जंगलात त्यांचा आवाज. इतका वेळ लांब दिसणारं ते टेकाड आता उजव्या बाजूला ठेवून वाट थोडी डावीकडे वळली. गर्द झाडीत एकदम अनपेक्षित असताना पाण्याची जागा दिसते. हेच ते भोंबोवण्याचं पाणी. निवांत वेळ घालवायला, झोप काढायला एक नंबर जागा!

गुरं ह्याच पाण्यावर जगतात म्हणून त्यांना पद्धतशीर बांधलेलं वेगळं डबकं. माणसांना पिण्यासाठी पत्र्याचं झाकण असलेलं छोटं टाकं. 


दुपारचे बारा वाजले होते, आसपास बरीच गुरं होती, आम्ही असल्यानं पाण्यापाशी येईनात. मग पाणी भरून घेतलं आणि आम्ही मंदिरापाशीच थांबायचं ठरवलं. इथून मंदिर फारफार तर १० मिनिटं पुढे आहे. रवीच्या पाटीपासून तासाभरात इथे पोहोचल्याने मामा जरा निवांत होते. मंदिराच्या पाटीपाशी आलो तेव्हा तो आवारातील खांब सोडला आणि ती मंदिराची पाटी वगळता तर इथं मंदिर असेल हे जाणवलं पण नसतं. मंदिराची जागा खास आहे हे वेगळं सांगायलाच नको. चहूकडे दाट झाडी, दगडाचं कुंपण, जिर्णोद्धाराच्या तोकडेपणाचा लवलेश नाही. लाईटसाठी खांब आणि त्यावर सोलार-पॅनल. बूट कुंपणाबाहेर काढूनच आत गेलो, डोकं टेकवलं. जेवायला सगळं शुद्ध (मामांच्या भाषेत, म्हणजे शाकाहारी) असल्याने मामा आवारात सावलीला बसू म्हणाले. आणलेली फळं खाल्ली नसल्याने मामांनी संत्री देवाला दाखवून बाजूला चरत असलेल्या गाईला भरवला आणि जेवण उरकलं.

जमल्यास ३ पर्यंत वाडीत उतरावं असं मामा बोलून गेले. त्यांना पुढे कोणाच्या शेतात थोडं काम मिळणार असल्याचं कळलं. उगाच आपल्या थोड्या आळसापायी त्यांचं नुकसान करणं चूक वाटलं.  वाडीपाशी जाण्यात तसंही काही तथ्य नव्हतं. परतीच्या वाटेला लागलो तेव्हा दुपारचा १ वाजला होता. तरी ऊन तेवढं जाणवत नव्हतं. इथून जोरकडे उतरणारी वाट रोजच्या वापारात असल्याने जमेल तेवढी सावलीतून आणि प्रशस्त आहे. वाटेत एक फाटा फुटून डावीकडे वळतो, ती वाट कोळेश्वरच्या दक्षिण-पूर्व भागातून माडगणीला उतरते. त्या वाटेवर पण एक देवीचं ठाणं असल्याचं सांगितलं, तिथूनही पुढे माडगणी पर्यंत अंतर बऱ्यापैकी आहे.  उजवीकडच्या वाटेने दऱ्यापाशी बाहेर आलो, तिथे मात्र ऊन लागलं. 

बेटकवणेचा दरा वापरात का आहे ते पाहता क्षणी कळलं. पठारापासून पहिल्या दीड-दोनशे फूटांत जी काही हेराफेरी आहे. त्यांनतर एक सरळ बोडका दांड आहे जो थेट गावाच्या उजवीकडे रानात उतरतो. उतरायला सुरुवात केली तेव्हा १:४० वाजून गेले होते. ऊन असल्याने साधारण पळतच खाली आलो. गावामागच्या रानात पोहोचलो तेव्हा २ वाजले होते. मामांना समोर वाटेत नाग दिसल्याने त्यांनी अचानक थांबवलं. पण मला दिसेपर्यंत तो गायब. मग वाट सोडून थोडं वरच्या बाजूने वळसा घालून आलो. "महादेवाला जाऊन आलो, का उगा नागाला काठी लावावी" म्हणत मामा पुढे निघाले. हे समीकरण माझ्या डोक्यातही आलं नाही. डांबरी रस्त्याला लागलो की मांड्या बोलू लागल्या. फिटनेस अजिबातच नसल्याची पुस्ती मिळाली. एरवी एवढ्याशा उतरणीने फारसा फरक पडत नाही. काठी दामटवत गाव गाठलं तेव्हा मामांना शेताकडे कामावर जाण्याआधी तासभर पडी मारायला वेळ मिळाल्याचं समाधान होतं. मामांनी भाकर खाऊन जाण्याचा आग्रह धरल्याने मीही विशेष विचार केला नाही. 

निघताना मामांनी नाव आणि नंबर लिहून घेतला. आता गावात कधीही गेलो तरी एक गडी सोबतीला येईलच!दुकानवाले सपकाळ मामा वाईला गेले असल्याने फक्त त्यांच्या घरी सुखरूप खाली आल्याचं कळवलं आणि साधारण ४ वाजता परतीच्या प्रवासाला निघालो. रविवारच्या दिवशी लिंबूपाणी पीत दिवसभर बसून राहायला कारण मिळालं होतं.