ठिपठिप्या घाट - कुर्डुगड - निसणीची वाट - दापसरे

टीप : वेलांटी, उकार ह्यांत काय बी चूका दिसल्या तर गप-गुमानं सहन करा किंवा पाठीमागे चर्चा न करता comment म्हणून टाका.

      लोकांसाठी उन्हाळा म्हणजे आंबे, मुरंबा-साखरांबा खाण्याचा महिना. ट्रेकाड्यांचं ही काही फारसं वेगळं प्रकरणं नाहीये. फरक एवढाच कि त्यांना ते पेटीतले हापूस, घरी भर्र पंख्याखाली किंवा बक्कळ पैसेवाला असेल तर AC खोलीत बसून, "काय गरमी आहे, काय गरमी आहे" असा दिवसातून १५ वेळा जप करत खाण्यापेक्षा, जंगलात जाऊन तिथले आंबट-गोड आंबे हादडायला जास्त आवडतं. त्यात भोजनोत्तर मुखशुद्धी करायला करवंदं आणि जांभळं असतातच. खरंतर त्याला सोडून इतरंना जमेची बाजू एवढीच कि ह्या ट्रेकाड्याच्या घरच्यांना काहीसा वाव असतो ह्याचं घोडं गप करून घरी बसवायला. बाकी हिवाळा आणि पावसाळा आला कि ह्यो कुणाचं बी ऐकत नाही. ट्रेक करताना जो करपून काळं-कुट्ट होणार आहे किंवा झाला आहे, तो स्वतः सोडून बाकी सगळ्यांना ह्याची अन ह्याच्या रंगाची काळजी! हां, जर का जन्मतःच "color गेला तर पैसे परत" असा कट्टर कृष्णवर्णीय असेल तर मग त्यात थोडी सवलत मिळते.

      शुक्रवारी हाफिसातून सगळे कलटल्यानंतर थोडा मोकळा वेळ मिळाला, मग तो wikimapia वर नकाशे गिरवण्यात घालवायला सुरुवात केली. विमान उडत-भरकटत शेवटी घोळावरचं आलं. मग जुना अर्धवट राहिलेला, आणि खरंतर भयंकर फसलेला प्लान टिचकी मारून गेला. वेडापशीनं ठरवलं आणि ह्या वेळेला हा पुन्हा एकट्यानं तडीस न्यायचा असं बहुमत झालं. जवळचाच one-day ट्रेक असल्यानं घरची आघाडी थोडीशी धडधडून का होईना पण शांत झाली. शनिवारचा दिवस सगळी कामं उरकण्यात घालवला. गाडीवर जायचं असल्यानं काही खास वेळापत्रक मांडायची गरजच नाही वाटली. गेल्या वेळेस एकटा  By Force होतो, ह्या वेळेस By Choice.

      ह्यावेळेस मात्र अगदी checklist काढून पद्धतशीर सगळं समान गोळा करून सॅक भरली. Tang घेण्याच्या नादात Electral घरीच विसरून, रात्री १ वाजता म्या गाडी घेऊन निघालो. कात्रजच्या चौकात पोहोचलो आणि गाडीतून काय-काय विचित्र आवाज आला. नकळत म्या गाडी थांबवली. वाटीत गोटी ठेऊन वाटी गरागरा फिरवावी तसा काहीसा तो आवाज होता. गाडीची थोडी आदळ-आपट करून मग गाडी चालू केली तर पुन्हा एकदम मस्का firing. म्हणलं नेऊ गाडी हळूहळू.

      खड्ड्यात अगदी जपत गाडी नेत मी दापासार्यात पोहोचलो तेव्हा ३.३० वाजले होते. लग्नाच्या मुहूर्त गाठून कुणीतरी दापासार्यात कल्ला केला होता. गेल्या खेपेला जिथून मोरेमामांच्या घरासमोर गाडी नेली होती, तिथं सगळी गावची मंडळी विदेशी टाकून थर्राट पडली होती. मग म्या गाडी तशीच पुढे शाळेपाशी लाऊन वर्हांड्यात पथारी टाकली. ते दापासार्यातलं कोंबडं ४ वाजताच आरवाया लागलं. कशाची झोप लागतेय आता, वाटून गेलं कि धरून द्यावं एखाद्या कसायाला, जशी माणसं बाराच्या भावात जातात, तसं हे किलोच्या भावात जाईल. माकडटोपी घालायची पाळी येण्याएवढी गुलाबी थंडी होती, त्या कोंबड्याला मनोमन शिव्या घालत कानात बोळा कोंबून तशीच २ तास डुलकी काढली.

      सकाळी ६ वाजता पुन्हा मोरेमामांचं घर गाठलं तेव्हा तो सारा लवाजमा अजून लोळतच होता. मामा मात्र एकदम मस्त नहा-धोके तय्यार! चला म्हणालं वेळ वाचला. तेव्हाच तिथं एक अजून थोडे वयस्कर मामा आले. ते ही मोरेच.

मोठे मोरे मामा: "कुठं निघालास रं पोर्या ? कोकनदिव्याला जायचंय काय ? पुढं घोळात गेलाय कि रस्ता, येष्टी बी येतीय पुण्यातनं. पन तू एकला काहून (का म्हणून) आलायस?"
त्यांची जी काय कॉम्मेंट्री चालू झाली कि ते आता मला direct रायगडावर धाडतात कि काय असं वाटलं. धोंडिबा मोरे मामांनी माझी उडालेली त्रेधा-तिरपिट पाहून चर्चेला पूर्णविराम दिला.
श्री. धोंडीबा मोरे: अहो दाद्या, हे बेनं एकटचं येतंय इथं. मागच्या बारीला बी आलतं.
श्री. धोंडीबा मोरे (माझ्याकडे वळून): आता काय ठीपठीप्या का? चल!

      मी फक्त मुंडी हलवून होकार दिला. पुढच्या क्षणी मी अन मामा गाडी रस्त्याकडे निघालो होतो. मामांनी ठिपठिप्या घाटाच्या वाटेला लावतानाच, धामणओहोळहून  परत येताना कुठून येणार ते ही दाखवून दिलं. दिवसभर त्यांची होऊ घातलेली सर्कस जाणून मामांनी मला वेळ विचारली आणि ६.३० म्हणाल्यावर थोड्या घाईतच मामा परत निघाले.

      वाट एकदम मळलेली होती. साधारणतः 4 फर्लोंग चालल्यावर डावीकडे घाटमाथा दिसला. उजवीकडे पाण्याचा ओढा असल्याने आणि त्यात सकाळची वेळ असल्याने भरपूर पक्षी दिसले. पण माझं पक्ष्यांबद्दलचं ज्ञान चिऊ, काऊ, बुलबुल, खंड्या, etc "not so popular" मंडळींच्या पलीकडे नसल्यानं तिथं जास्त वेळ न घालवता मी घाटमाथावरून डोकावून वेळ घालवण्याकडे कल दिला. कुर्डूगड तर अगदीच जवळ असल्यागत वाटला. म्हणजे एस. एम. जोशी पूलावरून म.न.पा. कशी जवळ वाटते तसंच काहीसं गणित मी लगेच मांडून निवांत झालो. शेवटी ७.३० वाजता मी तिथून काढता पाय घेतला. 

      घाटवाट अजूनही नियमित वापरात असल्यानं जवळच्या सार्या ढोरवाटा एकदम नळीच्या तोंडाशी येउन मिळतात. नाळीच्या अगदी सुरुवातीलाच कोरलेल्या ४-५ पायऱ्या आहेत. पाण्याच्याच वाटेनं अजून खाली उतरलं कि उजवीकडे छोटं कुंड आहे, त्यात पाणी ठिपठिप पडत असतं, म्हणून हा ठिपठिप्या असं ह्या-त्या पुस्तकात आधीच वाचलं असेल. पुढे पाण्याची वाट डावीकडे ठेऊन, उजव्या सोंडेवरून वाट खाली जाते. ती उतरून मी खाली पदरात पोहोचलो तेव्हा ८ वाजले होते. इथून खाली साखळेवाडीत उतरून कुर्डूपेठेत जाता येतं. पण करवंद आणि आंबे खाण्याच्या नादात माझा प्लान इथं फसला. मी खाली साखळेवाडीत न जाता, उजवीकडे वळून पदरात असलेल्या जंगलातून कुर्डूगड गाठायच ठरवलं. पुन्हा तेच, एकटा असताना एक मत हेच एकमत असतं. ह्या गोष्टीचाच गैरफायदा घेऊन मी जंगलात शिरलो.

      पाहिला तासभर काहीच अंतर कापलं नाही, फक्त करवंद आणि आंब्यावर येथेच्छ ताव मारला. पोटाची पोतडी भरल्यावर मग दोन पावलातलं अंतर वाढवायची सद्बुद्धि झाली. पण मग अपेक्षेप्रमाणे गचपण लागलं. कारवीतून वाट काढत हळूहळू थोडा वर चढल्यावर मोठ्या झाडांच्या जंगलात आलो. इथं त्रास थोडा कमी होता, पण करवंद नव्हती. तश्यातच मध्ये-मध्ये ठराविक अंतरावर एक कोरडा ओढा पार करावा लागत होता, त्यात ओढ्याजवळ खुरटी झाडी वाढली होती. खाजवा-खाजवीचा अशक्य छळ सुरु झाला. त्यात कोकणाची आर्द्रता (Humidity). आर्द्रता हा शब्द हल्ली इतिहास-जमा झाल्यागत का वाटतोय देव जाणे. इंग्रजी माध्यमात शिकलेली मराठी पोरं  तर आर्द्रता हा शब्द वापर म्हणलं म्हणजे पुण्यात पोरींना होर्न नसलेली गाडी चालवणे किती कष्टप्रद वाटेल तसं थोबाड करतात. असो आर्द्रता ह्या किरकोळ शब्दावर एवढी गरम चर्चा नको. कारण असच एकदा माझा लोणावळा ते भीमाशंकरचा ब्लॉग वाचून एका मुलीने फोन करून धडधडीत आरोप केला होता कि "तू ब्लॉग लिहिताना पोरींना consider च करत नाहीस असं दिसतंय." आता झाली का पंचाईत! तिला तसं का वाटलं असेल हे माझ्यासाठी आजही न उलगडलेलं कोडं आहे. हो, हा तिला मारलेला टोला आहे असं वाटून गेलं तर त्याला म्या काय करणार? व्यक्ती स्वातंत्र्याचा विजय असो! तसही मला त्या एका विलक्षण विचित्र स्वभावाच्या मुलीनं  पुन्हा फोन करावा अशी माझी इच्छा अजिबातच नाहीये. (बघू आता कसं फोन करते ते !)

      जसं इथं विषयांतर झालंय तसंच वाटेच्या बाबतीतही झालं. जांभूळ शोधण्याच्या नादात मी अजून वरच्या अंगाला चढून आलो. शेवटी नाईलाजाने विचित्र अंगविक्षेप करत, मी त्या गचपणातून मोकळ्या पदरावर आलो. अगदी हुश्श झालं. गटागट अर्धा लिटर पाणी पोटात ओतलं आणि बसकण मारली. अवस्था अशी होती कि अंगाला खाज सुटली होती आणि कुणी मला B-Tex ची जाहिरात करायला दिली असती तर मी त्याचा ऋणी झालो असतो.

      थोडं सावलीला बसल्यावर कुर्डूगडाकडे नजर टाकली, आता खरोखरच जवळ आलाय हे पाहून जरा हायसं वाटलं. मग हळूहळू ११ नंबर ची बस कुर्डूगडाच्या अगदी पायथ्याशी येउन झाडीत थबकली. इथं मात्र डुलकी काढायचा मोह माझ्यानं आवरला नाही. खाऊ पोटात कोंबून मी तासभर झोपायचं ठरवलं.

      झोपलं म्हणाल्यावर तर गेमच झाला. उन्हामुळ्ये चालणं नकोसं झालं होतं. मग २-३ फोन केले, आणि इथून किती वेळ लागेल ह्याचा अंदाज घेतला. मित्रांनी तोंडपाठ असलेली पूरेपूर माहिती बडबडगीते गायल्यागत सुनावली. हे एक भारी आहे ह्यांचं, ट्रेकचं काहीपण विचारा, कधीपण विचारा, माहिती मिळणारच! एकाने तर कहरच केला, हा पठ्ठा सासरी जेवायला गेला होता, अश्या कार्यक्रमात अडकल्यावर एरवी न बोलणारा हा, ट्रेक ला आलोय म्हणाल्यावर पार त्या कुर्डूगडाच्या  मिशीवाल्या हनुमानापर्यंत पोहोचला. निघलो तेव्हा १ वाजले होते. मग गावात एकदा वाट नीट विचारून घेतली. मग गाडी थेट मिशीवाल्या हनुमानापुढं जाऊन थांबली. मिशीवाला हनुमान आयुष्यात पहिल्यांदाच पाहिला.

      हा किल्ला तसा दुर्लक्षित पण खूप मोक्याच्या ठिकाणी आहे. रायगडाकडे जाणार्या वाटांवर हा आणि माणगड असे हे दोन किल्ले. हल्लीच "Tracking" चं खूळ चढ लेल्या, शहरी पैसाछाप ट्रेकर्सना कळलेल्या इतिहासातून हरवल्यागत वाटतात. तेही चांगलंच आहे म्हणा. त्या पलीकडचा कोकणदिवा हल्ली पब्लिक च्या demand मध्ये आहे.

      किल्ला उतरून निसणीच्या वाटेला लागलो. आता दुपारी २ च्या उन्हात जंगलापलीकडे लागणारा चढ चढायचा होता. तिथं खरा उन्हाळा जाणवणार होता. त्या घाटमाथ्यावर दिसणाऱ्या मनोऱ्याकडे पाहत चढाई सुरु केली. पहिला गिअर-दुसरा गिअर करत ढकलगाडी करत वर पोहोचलो. अगदी बोडकं असं पठार त्या मनोऱ्याच्या आणि धामणहोळच्या वस्तीच्या मध्ये आग ओकत आ वासून बसलं होतं.

      कसतरी करत मध्ये एक ठिकाणी पुन्हा करवंद-stop घेऊन गावाबाहेरच्या मंदिरापाशी पोहोचलो. इथं पुन्हा वाट विचारायची होती. मंदिरातल्या अतिशय मितभाषी अश्या गोसावी मामांना वाट विचारली. सोबत एक आजी बसल्या होत्या. एकट्यानं आणि ते पण एवढ्या उन्हात कडमडल्याबद्दल आजींनी गोड शब्दात कान-उघडणी केली खरी पण डब्यातला रव्याचा लाडू पण काढून दिला. ३ वाजले होते. म्हणून आता घाई करणं भाग होतं. मग पाण्यात डुबकी मारण्याच्या उत्साही मनसुब्यावर पाणी सोडलं आणि गूमानं पूलापासून उजवीकडची वाट धरली. इथून परत चढण सुरु होणार होती. त्यावर हा माळ.

      माळापलीकडं रेडे खिंड आणि पुढं रेडे-खिंडीची वाडी. तिथून खाली उतरलात कि दापासरे. ही साधारण ४ तासाची चाल होती असा माझा अंदाज होता. हा पल्ला तसा मोठा होता. आणि त्यात मला ह्या भागाची विशेष माहिती नव्हती. आणि दिवसभर झालेली दम-छाक विचारात घेता, मी वाटा शोधण्याच्या तयारीत नव्हतो. त्यात वाढलेलं  पोट, खाल्लेले bread, पचायला अवघड असं श्रीखंड त्यात अर्धवट झोप ह्यामुळे मला वेळेत दापासार्यात पोहोचणं गरजेचं होतं.

      मग चढ संपेपर्यंत अगदी आरामात आलो. मागे वरसगाव धरणाचं पाणी दिसत होतं, त्यावरून मध्येच एखाधी गार वार्याची झुळूक! स्वर्गीय आनंद.. मग पुन्हा नामजोशींना फोन करून कळवले, सूर्यास्ताला अवकाश आहे तोपर्यंत बंड्यानं घोडं हाणायला सांगितलं आणि मी नेमकं तेच केलं. साधारणतः ३.४५ ला मी माळावर होतो आणि तिथनं डिजल इंजन चालू केलं. माळावर लांब एक भेकर दिसलं. पावसाळ्यात तर हा भाग एकदम झाक असणार.

      माझ्यासाठी हीच खरी गम्मत आहे एकट्यान भटकण्याची, मी आजवर एकट्यानं जे अंतर कापलं ह्याचं समाधान माझ्यासाठी तरी एकमेवाद्वितीय आहे, चालेल तेवढं कमीच वाटतं. बडबड नाही, थांबणं नाही, मतभेद नाहीत कि कुणाची काळजी नाही. ज्या गोष्टींना आपल्या खोपडीतल्या "processing unit" सोबत गुजगोष्टी करण्यासाठी जो एकांत हवा असतो तो इथं भरभरून मिळतो.

      इकडं-तिकडं नजर फिरवत, हातातली काठी दामटवत अख्खा माळ कधी मागे टाकला ते कळलंच नाही. डिजल इंजन थेट रेडे खिंडीत येउन थांबवलं तेव्हा ५ वाजायला ५ मिनिटं होते. इथून वाडी फक्त १० मिनिटाच्या चालीवर आहे. सोबत आणलेली बिस्किटे, श्रीखंड, ब्रेड वाडीतल्या मामांना देऊन दापासार्याकडे निघालो. उजवीकडे ठिपठिप्याच्या नाळेशी असलेलं पठार दिसलं. मग तसंच चाल न मोडता दापासार्यात येउन मामांचा निरोप घेतला तेव्हा ६ वाजले होते. मग हळुहळु तानाजी सागरचा देखणा परिसर न्याहाळत पानशेत गाठलं. पानशेत मध्ये आलो तेव्हा अंधारून आलं होतं आणि अगदी typical वीकेंड पिकनिक पब्लिक  पुण्याकडे धाव घेऊ पाहत होतं. त्या गर्दीत हरवून ८ वाजता पुणे गाठलं, ट्रेक ठरल्याप्रमाणे वेळेत झाला होता तो ही ह्या वेळेस वाट न चुकता!

      मी हे असंख्य वेळा ऐकलं आहे कि ट्रेकिंग हे एकट्यानं नसावंच, त्रिकुट-चौकट तर असावीच. ह्या ट्रेकच ही तसं म्हणता येईल. उतरताना किंवा चढताना पडला असतास तर काय? वाटेत काही चावलं असतं तर काय? मग नेटवर्क नसतं तर काय? हे करून मिळालं तरी काय? आणि असंख्य तत्सम प्रश्न. खरं सांगायचं झालं तरं हे प्रश्न काहींना हा ब्लॉग वाचल्यावर पडू शकतात, फरक एवढाच आहे कि हे प्रश्न मला ट्रेक सुरु करायच्या आधी पडतात, आणि होय, तरीही मी जातो.

'का?' ह्या प्रश्नाची बरीच उत्तरं आहेत.
'नाही गेलास तर नाही का चालणार?' ह्याचं एकचं उत्तर : नाही चालणार!
'पुन्हा जाशील का?' ह्याचं उत्तर माझ्याकडं पण नाही.

हं, माझ्या सोलो ट्रेक बद्दल तुम्हाला काही आक्षेप असेल तर तसं सौम्य आणि तुम्हालाच शोभेल अश्या शब्दात वैयक्तिक संदेशाद्वारे सांगा, चर्चा करू. उद्धटपणे व्यक्त केलेल्या मताला किंवा टीकेला मधले बोट किंवा आरसा दाखवण्यात येईल.

I do not intend to motivate/discourage anyone from trekking/solo-trekking. I believe this and every other trek has taught me a handful of things. I simply don't expect anyone to pack his/her sack and set off to a solo trek after reading this or any of my blogs.