कुंभ्या घाट - तेल्याची नाळ

टीप : वेलांटी, उकार ह्यांत काय बी चूका दिसल्या तर सहन करा किंवा comment म्हणून टाका.

      गुरुवारी, मोठा साहेब घरला गेल्यावर ऑफिसमध्ये बसून चकाट्या पिटत असताना डोक्यात किडा आला. भराभर फोनाफोनी केली आणि नेहमीप्रमाणे जुन्या मित्रांनी नन्नाचा पाढा गाऊन दाखवल्यावर मात्र डोचकं जागेवरून हललं, च्यायला काय व्हायचं ते होऊ दे, आज म्या ट्रेक ला जाणारचं.

      नोकरदार झाल्यापासून बऱ्याचशा ट्रेकची आकडेमोड डोक्यात करून झाली होती, नकाशे गिरवून झाले होते, फकस्त घरातून बाहेर पाडायचं बाकी होतं. हल्ली तो काय लोकांनी उच्छाद मांडलाय फेसबूकवर 'आली  लहर, केला कहर ' का काय ते अनं 'मंदीत  संधी ' कि काय तत्सम प्रकार करायची संधी चालून आली होती. उंडारत फिरायचा चंग मात्र डोक्या पक्का बसला होता. इथून-तिथून माहिती गोळा करून बरेच प्लान तय्यार होते, मग त्यातला एक निवडला . रेटवायला गाडी आहे म्हणून पानशेत पलीकडच्या भागाची निवड झाली. आम्ही ३ डोकी, २ फटफट्या जाणार अस ठरलं. मग मी गप-गुमान सामान गोल करून घरी पोतडी भरली. पहाटे ४ ला निघायचं ठरलं होतं. साधरणतः ३ वाजता मित्रानं फोन केला.

मित्र: "अरे ऐक ना, भाड्या शिव्या घालू नको आता. अरे, आई नको म्हणतीये रे जयला, आणि मला पण पोटात जरा गुडगुडतयं रे, आपण next week जाऊया का? "

मी : "काशी कर, तू डब्बे टाकत बस, आम्ही दोघं जातोय !!"

मित्र : "अरे YZ तुला त्याचा मेसेज नाही आला का? तो पण येणार नाहीये, त्याचा KT च्या recheck चा result आलाय. बोंब बसली आहे परत. अपेक्षेप्रमाणे घोडे लागलेत त्याचे."

(डोळे चोळत, कपाळाला हात!)
मी: "मग तू काशी कर, त्याची तशीही तिरडी उठणार उद्या! आणि ऐक रे, मी जातोय!"

      काय ते घंटाभर झोप होणार होती ती पण पाण्यात. पहाटे ४.३० ला मी गाडी घेऊन बाहेर पडलो. फूल-बाह्यांचा शर्ट, त्यावर स्वेटर, डोक्यावर माकडटोपी एवढा सगळं गुंडाळुन सुद्धा थंडी गोठवत होती. त्यात गाडी सुद्धा अधून-मधून डुरुक-डुरुक करत त्रास देत होती. कशीतरी गाडी हाणत, शेकोटी दिसलं तिथं हात शेकत मी दापसार्यात पोहोचलो. श्री. धोंडीबा मोरे ह्याचं घर गाठून हाक मारली. अतिशय सरळ आणि बोलक्या अश्या मामांनी मला कसा ओळखतो असा विचारलं.

मी : अहो, तुमचा पत्ता आणि नंबर जितेंद्र बंकापुरेने दिला. ते आले होते तुमच्याकडं पावसात.

मामा : पुण्याचं का?

मी : हो.

मामा : त्यातले एक-दोन पोर सोडलं तर ते लई भारी चलतेत सगळे. टर्याक्टर वालं तर तुला माहित च असंल.

मी : हो. (आणि जो काय हशा पिकला तिथं कि सांगायला सोय नाही)

      मामांशी बोलून, वाटेबद्दल सविस्तर माहिती काढून, त्यांच्या पडवीत गाडी लावून मी घोळ कडे पायपीट सुरु केली तेव्हा ८ वाजले होते. गावापासून थोडं चालल्यानंतर गाडीरस्ता डाव्याबाजूने वर चढायला लागतो, तिथं उजवीकडे झाडीत पायी जाणार्यांसाठी शोर्ट-कट आहे. तो चढ चढून वर येऊ पर्यंत डिजल इंजन तापलं होतं. मनातली इच्छा आणि पाउलवाटेवर धावा बोलायला तयार असलेले पाय, यामध्ये सुटलेलं पोट आपल्या अस्तित्वाची जाणीव करून देत होतं. सकाळी गावाबाहेर परसाकडं आलेल्या लोकांपासून नजर इकडे-तिकडे भिरकावत घोळ गावात पोहोचलो तेव्हा ८.४५ वाजून गेले होते. इतर घाटमाथ्यांच्या जवळ असलेल्या गावासारखं, घोळ गाव तसं बर्यापैकी एकलकोंडी आहे, आणि हल्ली स्वच्छ आहे.

      घोळ गावातून माझ्या ऐकण्यात ३ चांगले ट्रेक होते. एक म्हणजे गर्जाईवाडीतून कोकणदिवा त्यापुढं कावळ्या घाट किंवा दुसरा म्हणजे घोळ ते खानु ट्रेक अन त्यापुढं बोचेघोळ नाळेनं खाली कोकणात वरिंगीत जाता येतं , आणि तिसरा म्हणजे कुंभ्यातून खाली माणगड चा ट्रेक, ज्यासाठी मी आलो होतो. हा ट्रेक तसा मोठा आहे. घोळ ते कुंभेगाव ते माजूर्णे ते मशिदवाडी आणि तिथून माणगड. मला वाटेची सुरुवात पुसटशी लक्षात होती, पण आता गावातून सिमेंटचा रस्ता झाल्यानं मला काही कळेना. मग एका मामांना वाट विचारून घेतली.

मामा : अरे वाट लय सरळ हाय, पन तू एकटा का जातुया? सोबत न्हाई कुणी? धा वाजायलेत, पोहोचायला लय ऊन होईल.

मी : ( "पहिले पाढे पंचावन्न" अश्या अविर्भावात ) आता काय करणार मामा, कुणी येईना झालंय, मग एकटाच निघालो.

आणि मी आधी वेळ पाहिली. मामाचं घडयाळ चांगलं तासभर पुढं होतं दिसतंय. आत्ता कुठं ९ वाजले होते. तासाभरात तर आम्ही सकाळच्या साऱ्या विधी उरकून गाडी दामटवत हापिसात पोहोचतो.

मामा : माजूर्ण्यात जागा-बिगा पाहाया जातंयस काय? तिथं पार कुंभ्यात रस्ता आलाय आता. जागेला लई भाव.

मी  : नाही हो, मी भटकायला आलोय.


      एवढंच काय ते बोलून मी काढता पाय घेतला. मामांच्या बोलण्यातनं ज्या गोष्टी समजल्या त्याचं वाईट वाटत होतं. बारामतीच्या चोरांच्या आणि तत्सम हरामखोरांच्या नजरेत लवासापाठोपाठ आता हा भाग पण सलत आहे. वाटून गेलं कि बरं आहे मी आलोय, एकदा कां हा भाग so-called Develope झाला तर मग इथ माझ्यासारख्यांच घोडं कशाला येतंय? विचार करत अर्धा तास कधी चाललो ते कळलंच नाही. एव्हाना घोळ गाव आता मागे डावीकडे राहिलं होतं. वाट उजवीकडून फिरून येते. वाटेत एक आजोबा भेटले, त्यांनी जरा शोर्ट-कट दाखवून दिला

आजोबा : तिथं म्होरं वाट डावीकडं जाती, तिथंच उजवीकडं  बोरीत शिरायचं आणि कडं-कडंनं जायचं. खरी वाट खालनं हाय पन तिथं मधमाश्या उठल्यात. माशी वर आली तर कायबी भ्यायचं न्हाई. गप-गुमान कडं-कडंनं जायचं.

मी : बर आजोबा. चिक्की खाणार का? पाणी हवंय?

आजोबा : दाताला येती का पाहू, पाणी दे मोप असलं तर.

      मी आजोबांना पाणी दिलं आणि चिक्की देतो तोच त्यांनी लाल पेरू काढून दिला. आणि पुन्हा एकदा वाट समजावून दिली आणि आजोबा गेले. मी आपलं हळू-हळू चालत त्या फाट्यावर आलो, आणि मग उजवीकडची वाट धरली. खाली डावीकडच्या झाडीत माश्यांची भुणभुण ऐकू आली आणि मग मी थोडं घाबरतच तिथनं सटकलो. एक मोठ्ठा माळ तुडवत साधरणतः १०.०० च्या सुमारास मी एका टेपाडाच्या पोटाशी आलो, तिथं ओढ्याला थोडं पाणी होतं. तिथं बसकण मारली. दूर तिथं कोकणदिवा छाताड काढून उभा होता, आणि खाली ते कावळ्या घाट चढताना डाव्या बाजूला दिसणारे छोटे-छोटे टेकाड डोकं वर काढत होते. मग मला पेरूची आठवण झाली. पेरू पाठोपाठ, बांधून आणलेली मूठभर सुकी भेळ पोटात ढकलून पाणी ढोसून मी निघालो. इथं मोबाईलला network नाही.

      थोडं पुढे जाऊन डाव्या बाजूनं त्या टेकाडाला अर्धा वळसा घालून, वाट त्याच्या डाव्या अंगावर घेऊन जाते. तिथून पुढं टेकाड-वळसा मग माळ असा भारी प्रकार सुरु झाला. अशी पायपीट अजून एकदा केली आणि मग गुगली पडली: २ वाटा - त्यातली एक डावीकडून वळसा घालणार आणि दुसरी उजवीकडच्या झाडीतून थेट वर. जवळ नकाश्याची प्रिंट नाही, अन मरायला GPS पण नाही. मग तिथं थोडं डोकं खाजवून, कोकणदिव्याच्या दिशेवरून थोडा अंदाज घेऊन उजवीकडची वाट धरली. धापा टाकत, कारवीतून हलका चढ चढून वर एका खिंडीत आलो. मस्त गार वारा लागला आणि एका मोठ्या पठारापलीकडं कोकण दिसलं. म्या भरकटलो नसल्याचं पक्कं झालं. खिंड आणि त्यात तिथं हळदीची पुडी दिसल्यावर जवळ देवाचं ठाणं असलंच पाहिजे. मग सॅक ठेऊन सोबत पाण्याची छोटी बाटली घेऊन मी डावीकडं झाडीत शिरलो. वर-खाली असं अर्धातास भटकल्यावर शेवटी दगड-देव सापडला. खिंडीतून तिथं जायला ठळक नसली तरी तशी सोपी वाट होती.

      इथून वाट अगदी मस्त ठळक आणि मळलेली होती, वाटेत एका ठिकाणी छान गार पाणी पण आहे. उन्हाळ्यापर्यंत ते नसेल हे नक्की. पाणी ढोसून जरासं काय झाडीतून बाहेर आलो कि दूरवर JCB चा आवाज आला, आणि कुंभ्याची वस्ती जवळ आली आहे ह्याची खबर देऊन गेला. वाट थोडी डावीकडं वळली अन वाडी नजरेत आली. शिवथरच्या खुट्या घाटावर ते कुंड गाव आहे अगदी तशीच कुंभ्याची वाडी. कुंभ्याच्या वाडीच्या उजवीकडे एक मोठ कुरण आहे, तिथं जाण्याचा मोह काय मला आवरता आला नाही. वरून खाली डोकावून पाहिलं, खाली दूर कोकणात MIDC दिसली, कोणती ते माहित नाही, बहुदा विळे-भागडची असावी. त्याअलीकडे कडपे, जिते, दूरवर विश्रामगड / कुर्डूगड दिसला. मुख्य रांगेपासून सुटावलेला विश्रामगड आणि मी यामध्ये कुठतरी ठिपठिपची नाळ आहे.

      माझा खरा प्लान असा होता कि कुंभ्यानं माजूर्ण्यात जायचं, माणगड करायचा, बोरवाडीतून निझामपूर, तिथून पुढं जिते आणि तिथनं ठिपठिप्या आणि मग दापसरे. पण भिडे गुरुजींची मोहीम माजूर्ण्यातनं गेली आहे म्हणाल्यावर रस्ता पुरता थोपटवलेला असणार, त्यात माजूर्ण्यापर्यंत मातीचा कच्चा रस्ता उन्हात तुडवणं म्हणजे अशक्य चिडचिड ! माणगड आणि तो मधला ४०० m चा बोगदा पहायचं टाळून मी डोक्याचे काटे पुन्हा फिरवले. एकटाच असल्याने माझं मत ते बहुमत असा प्रकार होता. मग गाडी-रस्त्यावरची पायपीट टाळून पदरातलं जंगल तुडवत ठिपठिप्या गाठायचं खुळ माझ्या डोक्यात आलं. म्हणजे मग गावात तशी चौकशी करायला बरं. नाहीतर मी एकटा आहे म्हणाल्यावर मला गावातले लोक साहजिकच माजूर्ण्याला पाठवणार ही भीती होती.

      १२ च्या सुमारास मी पोटातल्या पोटातल्या जंगलात उतरत होतो. बडत्याचीमाची - बोरमाच - कुंभामाची करत ठिपठिप्या घाटात यायचं ठरलं होतं. साधारण २० मिनिटात मी पदरातल्या जंगलात पोहोचलो. तिथनं बडत्याची माची म्हणजे अजून १० मिनिट चाल. इथून पूर्ण ट्रेक म्हणजे वाट अगदी सरळ साधी आणि सोप्पी होती. बडत्याच्या माचीत आल्यावर मला lunch करायचं सुचलं. वाडीत काही गुरं, कुत्री आणि २-४ म्हातारी मंडळी सोडली तर कुणीच नाही. मोदी येणार असल्याने सगळे रायगडाकडे गेले असणार.

      गावापलीकडं एक मस्त मोठं झाड गाठून मी जेवायचं ठरवलं. ठरल्यापणे मी झाडाखाली बसलो, अख्खी sack उलटी केली तरीही जेवणाची पिशवी सापडेना. मग ध्यानी आलं कि पिशवी टेबलावरच राहिली, मग अजून एक चूक ध्यानी आली कि, त्यासोबत मेडीकीट पण घरीच राहिली आहे. भयंकर चिडचिड झाली. पोटातले कावळे आता अजूनच बोंबलायला लागले. पुन्हा वाडीत येउन दुकान आहे का ह्याची चौकशी केली. मग कळलं कि इथं काही नाही पण बोरमाच ला एक दुकान आहे. मग मात्र बोरमाच कडे धूम ठोकली.

      इथून बोरमाचपर्यंत ही तशी तासभर लांब पण सरळ-सोट चाल आहे. घोटभर पाणी पीत-पीत, पोटातला कलकलाट बंद करत मी बोरमाच मध्ये पोहोचलो. म्हणू नये, पण गुरं कशी भेदरलेल्या नजरेनं पाहतात तशी  गावातली मंडळी मला पाहत होती. शेवटी थोडी विचारपूस करून मी श्री. म्हाळुंगे ह्यांच्या छोटेखानी दुकानात पोहोचलो. तिथं पारले-G बिस्कीट मिळालं. मग पाणी आणि पारले-G खाऊन पोटोबा शांत केला, घडयाळात पाहीलं कि १.४५ झालेत. डिजल इंजन आता थकलं होतं. ट्रेकला एकटा असल्याने Lunch शेअर करायला लावून अजून कुणाचा छळ केला नाही ह्याचा मनोमन आनंद झाला. एकट्यानं ट्रेक करताना आपल्या कुवतीची जाणीव होते, मनातल्या विचारांना मोकळा वेळ देता येतो. आणि डोक्यातलं वादळ शांत करता येतं, हे माझं वैयक्तिक मत आहे.

      भानावर येउन २.०० च्या सुमारास पुन्हा गाडं हाणंल. म्हाळुंगे काकूंनी सांगितल्याप्रमाणे कुंभामाची इथून अर्धा तास होती. जेवून मस्त आळस आला होता, तरीच वाट चुकलो. आणि म्या डोंगराच्या अगदी पोटाशी येउन झाडीत अडकलो. पायाखाली जी वाट होती ती नक्कीच ढोरवाट असावी. मग अजून थोडं पुढं गेल्यावर उजवीकडच्या नळीतून एक वाट खाली आली. का कि देवजाणे मला ती वाट म्हणजे ठिपठिप्याची नाळ वाटली. मग मी तरीही थोडं पहायचं ठरवलं. थोडं पूढे गेलो आणि पाहिलं तर ती वाट उतरून उजवीकडंच जात होती. मग त्या नळीत अजून वर चढून जायचं ठरवलं. वर दाट कारवी दिसत होती. तरी थोडं वर चढल्यावर उजवीकडं वाडी दिसली. मग मी अंदाज बांधला कि ती साखळेवाडी असावी, फोना-फोनी करून खात्री केली आणि नाळेत वर चढायला सुरुवात केली.

      चांगलाच घाम काढला नळेनं. ३.०० वाजताच्या सुमारास, नळीत साधारण ६० % चढल्यावर वाट पुसट झाली, मोडली होती. त्यात आदल्या रात्री न झोपल्यानं आणि धड न जेवल्यानं माझा दमेश भुकेश खन्ना झाला होता. भुकेनं सुधरतच नव्हतं. पायात गोळे यायला सुरुवात झाली होती. मग जरा इकडे-तिकडे घुसून वाट शोधली, एक-दोन वेळा उजवीकडच्या काटेरी झाडीत अडकत पुन्हा मधोमध असलेल्या कारवीत शिरलो. जेमतेम अर्धा लिटर पाणी शिल्लक होतं, ते वाचवत पाण्याचे घोट घेत चढाई सुरु ठेवली.. मग तसंच जोर काढत शेवटी वर पोहोचलो आणि बसकण मारली.

      झाडीतून थोडं मोकळ्या जागी आलो अन पुन्हा कोकणदिवा दिसला! आता मात्र घाम फुटला. कारण जेवढं मला कळतंय, ठिपठीप्यातून कोकणदिवा दिसणारच नाही, शक्यच नाही! मग उजवीकडे थोडी नजर फिरवली कि उमगलं कि आपण पुन्हा घोळ जवळ घाट-माथ्यावर आलोय, वाट कोणती ते माहित नाही. पण नक्कीच ही ठिपठिप्याची नाळ नाही. आता हसावं कि रडावं ते कळेना. आढावा घेत असतानाच मग गुराला दिलेली हाक कानी आली. आणि मी त्या दिशेने धाव घेतली. श्री. हरिश्चंद्र पोळेकर आपली गुरं हाकत होते. मग त्यांच्याबरोबर साधारण २० मिनिटे चालत मी घोळ गावात आलो. येता-येता काकांकडून माहिती मिळाली कि मी ज्या वाटेने आलो ती तेल्याची नाळ आहे. त्यांच्याच घरी पाणी पिउन मी दापासर्याकडे निघालो.. safe & sound. तासाभरात मी दापसर्यात पोहोचलो आणि मामांचा निरोप घेऊन पुण्याकडे निघालो. एव्हाना काही प्रश्न मनात घर करून बसले होते.

      मी हे असंख्य वेळा ऐकलं आहे कि ट्रेकिंग हे एकट्यानं नसावंच, त्रिकुट-चौकट तर असावीच. ह्या ट्रेकच ही तसं म्हणता येईल. उतरताना किंवा चढताना पडला असतास तर काय? वाटेत काही चावलं असतं तर काय? मग नेटवर्क नसतं तर काय? हे करून मिळालं तरी काय? आणि असंख्य तत्सम प्रश्न. खरं सांगायचं झालं तरं हे प्रश्न काहींना हा ब्लॉग वाचल्यावर पडू शकतात, फरक एवढाच आहे कि हे प्रश्न मला ट्रेक सुरु करायच्या आधी पडतात, आणि होय, तरीही मी जातो.

'का?' ह्या प्रश्नाची बरीच उत्तरं आहेत.
'नाही गेलास तर नाही का चालणार?' ह्याचं एकचं उत्तर : नाही चालणार!
'पुन्हा जाशील का?' ह्याचं उत्तर माझ्याकडं पण नाही.

हं, माझ्या सोलो ट्रेक बद्दल तुम्हाला काही आक्षेप असेल तर तसं सौम्य आणि तुम्हालाच शोभेल अश्या शब्दात वैयक्तिक संदेशाद्वारे सांगा, चर्चा करू. उद्धटपणे व्यक्त केलेल्या मताला किंवा टीकेला मधले बोट किंवा आरसा दाखवण्यात येईल.

I do not intend to motivate/discourage anyone from trekking/solo-trekking. I believe this and every other trek has taught me a handful of things. I simply don't expect anyone to pack his/her sack and set off to a solo trek after reading this or any of my blogs.