भटक्यांच्या आयुष्यात काही जागा अशा असतात कि त्यांच्या मनात राहत्या
घरानंतर ती जागा मनात घर करून बसते. तिला अढळ स्थान!
माझ्यासाठी सह्याद्रीत अशा य जागा आहेत. तुमच्याही असतील. तिथं मोजक्या
जिवाभावाच्या दोस्तांसोबत एखादा मुक्काम म्हणजे आठवणींची शिदोरीच. त्याचं मूल्य (किंमत
शब्द झेपला नसताच इथे त्याच्या तोकडेपणामुळे) मोजण्यापलीकडे असतं.
अशीच एक जागा पाहायला म्या जरा हिमालायकडे गेलो. खूप ऐकलं, वाचलं होतं
ह्याबद्दल. शेवटी सुट्टयांचा आणि पैशाचा योग जुळून आला.
मनालीजवळ आल्यापासून अचाट प्रॉमिनंस असलेल्या डोंगररांगा दिसत होत्या,
ढगाआडच माथे सगळ्यांचे. आल्यादिवशी सामान गोळा करायलाच दुपार झाल्याने मुक्काम मनालीतच
केला.
दुसऱ्या दिवशी ह्याच्या-त्याच्या ओळखीने बातलसाठी गाडी जमवली. 4-व्हील
ड्राईव्ह जिप्सी, हेडग्लाससमोर बांधलेला मणिमंत्र, लॉक न होणाऱ्या डॅशबोर्डमध्ये ब्लॅक
डॉगची बाटली आणि बडवायजरचा काचेचा ग्लास, निळं आकाश आणि लाहौलचे खडी-मातीचे रस्ते.
धूळ उडवत पुढे-पुढे सरकणाऱ्या जिप्सीत माणशी २०६ हाडं आपलं अस्तित्व दाखवत होती. मागं
बसलेलं (किंवा पडलेलं) WDM-3D इंजिन उर्फ सागर, बेनं ६ बॅगात डोकं काढत कसंबसं सीटवर
गोचिडागत अडकू पाहत होतं. मढीला दोन-दोन आलू पराठे चेपून पुढं निघालो. कमालीच्या डोक्यानं
वर चढवलेला रोहतांग आणि त्याहून अशक्य पलीकडे उतरवलेला रस्ता पाहून B.R.O. ला मनोमन
दंडवत घातला.
अशात ग्राम्फूला उजवीकडे वळालो आणि डोळ्याचं पारणं फिटायला सुरुवात
झाली. डावीकडे अशक्य ऊंच कातळ, त्यात धबधबा!
एकमात्र आहे कि, इथं-तिथं उगाच हिसका देणारी मान कशीबशी सावरायची आणि
पुढचा हिसका बसायच्या आत खिडकीतून वर करायची. आपल्या डोक्यावर, अंगा-खांद्यावर बर्फ
टिकवत, कधी ढगापल्याड डोकं काढत अनेक शिखरं ऊन-सावलीचा खेळ खेळत होती. तिथं रस्त्याच्या
डावीकडे आत CB-११, बाहेर आलेलं CB-१२, त्याच्याच जोडीला CB-१६, रस्त्याच्या उजवीकडे
भयंकर prominance मिरवणारं व्हाईटसेल आणि त्याला खेटून असलेला पापसुरा, आणि काय काय
आणि काय नाय, माहीत असलेली-नसलेली अनेक शिखरे.
कधी आयुष्यात हिमालाय न पाहिल्यानं ती bumpy but scenic ride संपूच
नये असं वाटून गेलं.
छत्रुजवळ JCB च्या अट्टाहासावर दीड तास रस्ता-रोको पाळत बातल गाठलं.
इथून काही दिवस तरी बातलच आमचं घर होतं. गाडीतून उतरलो आणि उललेल्या पायावर धुळीचं
साम्राज्य पसरलं.
मु. पो. बातल:
सॅट इमेजमध्ये पाहिलं होतं अगदी तसंच होतं बातल, बर्फ जमणं-वितळणं
ह्या वेगळ्या गोष्टी.
बातल म्हणजे खूपसारे टूरिस्ट, त्यांच्या बुलेट बायका, दहात नऊ लोकांच्या
अंगावर एकतर रायडिंगच जॅकेट नाहीतर DSLR, एका हातात हेल्मेट, दुसऱ्या हातात बिडी!
बर्याच ब्रेवरी पुरस्कारानं गौरवलेले चाचा-चाची, त्यांचं कुटुंब आणि
गुळाच्या ढेपेला मुंगळे चिटकावेत तसा त्यांचा टरपोलिन शीटचं आभाळ मांडलेला धाबा, थोडं
पलीकडे कमी गर्दीचा पण नुकताच म्हणजे ५ वर्षांपूर्वी सेट झालेला परशुराम चाचांचा कांगडी
धाबा, टंडूक उर्फ कमांडर आणि ताशी उर्फ मोटू आळीपाळीने चालवत असलेलं एक मोठं गेस्ट
हाऊस, GREF चे २ ऑलवेदर हुड्स, आय.टी.बी.पी. चा ट्रांझिट कँप, चंद्राच्या उथळ प्रवाहावर
एक छानसा ब्रिज आणि त्याला खेटून एक मंदिर!
सेवा परमो धर्मः किंवा अतिथी देवो भवः ला पूर्णपणे पाळणारं गाव आहे
बातल. आम्ही तंबू गावमागल्या एका टेकाडापाठी उभा केला. तिघांचं भागेल एवढा खाऊ सोबत
आणल्यानं आम्ही निदान खाण्यासाठी तरी कुणावर अवलंबून नव्हतो. बाकी एकाकी वाटलं कि आम्ही
तिथं धाब्यासमोर जाऊन उभे राहायचो, लोकं पाहायचो, हापश्यावर प्यायचं पाणी भरायचो. तसे
४ दिवस घालवल्यावर कुठून आलात, कुठे जाणार, क्लाइबिंगला दोघेच कसे वगैरे गोष्टी झाल्या
आणि धाबेवाले, आय.टी.बी.पी. वाल्यांसोबत थोडी ओळख झाली, मग गुड मॉर्निंग, गुड नाईट
वगैरे..
हवामान पाहिजे तसं मिळेना म्हणून आम्ही चंद्रतालकडे गेलो ४ दिवस. तिथून
परातल्यानंतरचे ५ दिवस आणि त्यासाठी बातल आयुष्यभर लक्ष्यात राहील.
आम्ही आल्याआल्याच आय.टी.बी.पी.च्या तिवारी सरांनी "अरे भाई वहाँ
पिछे क्यू अकेले रहते हो? यहाँ आ जाओ, हमारे बगल में अपनी टेंट लागओ" असं सुचवलं.
गेल्या रात्रीच वाऱ्यानं आम्हाला हैराण केलं होतं. पडत्या फळाची आज्ञा
घेत आम्हीही आमचा मोहम्मद तुघलक केला. गाशा गुंडाळून हवेपासून आडोसा पाहत बाजूलाच टेंट
लावला. दुसऱ्या दिवशीच आय.टी.बी.पी.चा विकास दादा ट्रेनिंगसाठी निघून गेला आणि त्याच्या
जागी त्याच बसने रुपेश दादा आला.
आता विजयदादा उर्फ तिवारीजी, रुपेशदादा आणि कमलेशजी असे ३ इसम उरले
आय.टी.बी.पी.चे.
रुपेशदादा आपला मराठी बंडा, भुसावळचा. बातलमध्ये कुणी समभाषिक भेटला
कि गट्टी जमतेच. चार गप्पा झाल्या, नकाशात जोडलेल्या २ गावांच्या गोष्टी झाल्या, मग
दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळीच बाहेरून आवाज आला "गुड मॉर्निंग!"
तंबूतनं डोळे चोळत, हातमोजा ओढीत बाहेर डोकावलं आणि समोरच्याच्या पायात
लिबर्टीचे कॉम्बॅट शूज दिसले. डोकं वर काढलं तर चहाची किटली! "याला च्या पाजा
रं" पासून "चल चहा मारू" म्हणजे भयंकर बाँडींग, चहा पाजला कि माणूस
खिशात आला म्हणून समजा!
रुपेशदादानं चहाची सोय करून भारी प्रकार केला होता. थंडीनं पार पिपाणी
वाजत असल्यानं स्वतःचे हात काळे न करता आलं टाकलेल्या गरम चहाची किटलीच हाती येणं म्हणजे
भन्नाट प्रकार होता. कुडकुडत का होईना पण दात घासून झाले कि बंड्यानं गरम पाणीही करून
दिलं थोबाड धुवायला. ८-१० दिवसानंतर तोंडावर गरम पाणी मारल्याचा आनंद काय सांगू!
उरलेल्या विधी उरकून आता काय करायचं ह्याचं बरळत असताना सोयाबीन +
बटाट्याची भाजी, आंब्याचं लोणचं आणि २-२ पराठे आणून दिले. खऱ्या अर्थानं लेजर टूर चालू
आहे कि काय असं वाटून गेलं.
भयंकर थंडी आणि त्यात वारा, पूर्ण पावसाळी हवामान म्हणजे तिथं दिवस
मोडल्यासारखं आहे. अशात कुठे वर जाता येणं अशक्य व्हायचं. मी आणि सागर गप तंबूत बसलो
होतो. आय.टी.बी.पी.च्या टेंटमधून विजयदादाचा आवाज आला, "मेजर साब, बॅट और बॉल
कहाँ रखी देखी आपने?" त्यांच्यात वयानं आणि हुद्द्यानं सगळ्यात सिनिअर होते कमलेश
सर, त्यांना सगळे एरवी मेजर म्हणायचे.
बॅट मिळत नाही म्हणल्यावर रुपेशनं च्यामायला थेट कुदळच काढली, तिथं
मी आणि सागर पार हरलोच. गरगर जे काही हसायला लागला कि सांगायची सोय नाही. कुदळीचा दांडा
म्हणजे बॅट. थंडीनं आणि ओलाव्यानं तो रबरी बॉल कॉर्क बॉलसारखा कडक झाला होता. आय.टी.बी.पी.
च्या दोन टेंटच्या मधल्या जागेत, जिथं एरवी २ कोंबड्या सोडलेल्या असायच्या, तो आमचा
पीच, मागची वॉल आणि त्यावर गिरवलेला स्टंप वगैरे सगळं नेहमीसारखं.
म्हणजे कसं डोकं खाजवायला खिशातनं हात काढू का नको असं वाटत होतं एवढी
थंडी, आणि त्यात त्या तसल्या बॉलने क्रिकेट खेळायचं म्हणजे चारही बोटं घशात जाण्याचा
प्रकार होता. त्यात पळायचं वगैरे म्हणजे उंटाचा मुका घेतल्यागत अवस्था.
तरीही खेळलो बरं का! चांगलं तासभर खेळलो.
पुण्याची गँग भेटणं काय, गरगरनं श्रीकांतला बरोबर ओळखलं.
नंतरचे २-३ दिवस तर मोकळा वेळ होता म्हणून तंबूत न बसता आम्ही बाहेर
येऊनच बसायचो. मग कधी ह्याला बाईक चालू करायला मदत कर, कधी त्याला रस्ते समजावून सांग
असे भारी प्रकार सुरु झाले होते.' राम तेरी गंगा मैंली'चा हिरो ऋषी कपूर कि राजीव कपूर
ह्यावर रुपेश आणि इतर लोकांत लागलेली पैज. एक पैजेपाठी पार वेडे झालेले ४ आय.टी.बी.पी.चे
लोक, गेस्ट हाऊसचा इन्चार्ज टंडूक, आणि आम्ही २ वेडे. २ दिवस तर त्यातच गेले.
तिथला फोन हा एक नवीन किस्सा झाला होता.
आय. टी. बी. पी.चा सॅट फोन होता त्यांच्या एका टेंटमध्ये. त्यांनी
तो सिव्हिलियन्सना पण वापरायची सोय केली आहे, कॉल करा, STDच्या रेटने पैसे द्या. आम्ही
त्याच टेंटमध्ये पडीक असायचो.
जो येईल त्याला हा प्रश्न विचारायचा, "जी, आपने राम तेरी गंगा
मैंली देखी है?" त्यात बहुतेक लोक वेडे व्हायचे ते ऐकून, आर्मीच्या टेंटमध्ये
हा काय प्रश्न असा चेहरा त्यांचा आणि त्यावर हसून बेजार होणार मी आणि सागर. तिथं आयुष्यभर
लक्षात राहतील असे अनुभव आले.
अगदी इथं रोड ट्रिपला आल्यावर त्याच्या नकळत झालेलं त्या बंड्याचं
ब्रेकअप आणि त्यावरून त्याचं फोनवर रडणं काय, त्याला कम्फर्ट म्हणून अलगद उठून बाहेर
गेलेले आम्ही सगळे, किंवा कुठं गेलो काय पाहिलं ते कमीत-कमी शब्दात फोनवरून आपल्या
घरी मांडू पाहणारी पोरं, "मॉम मुझे आपको यहाँ ले आना है" म्हणत डोळ्यात पाणी
काढणारा पोरगा, फिरून खूष झालेली ती पोरगी, तिनं ते सांगायला घरी केलेला फोन, शब्दांपेक्षा
बोलके डोळे आणि नेमकं पोरगी इथं आली अन् त्या पोरीचे बाबा ऍडमिट व्हावे, मग तिचा खाड्कन
पडलेला चेहरा आणि कापरं भरलेला आवाज, विजयदादांचं सकाळी आपल्या पोराशी ते २ च मिनिट
बोलणं काय, अलगद ओल्या झालेल्या डोळ्याच्या कडा आणि ते लगेच मागे सारून कामी लागणारा
विजयदादा...
रुपेश एकच वाक्य असं बोलून गेला कि पार रुतून बसलं, "कोणाला घरी
फोन करून बोलताना रडलेलं पाहून आम्हाला काय वाटतं कधी नाही कळायचं इतरांना दादा, अवघड
असतं, पण पाहिजे असतं"
डोकंच हाललं, पण त्याला समजूत घालणारे आपण कोण, त्यांची मानसिक तयारी
आणि आपली ह्यात जमीन-आस्मानाचा फरक हे नवीन नाही. मग वेळ मारून न्यायला विषय बदलायचा
माफक प्रयत्न करणारा मी.
नंतर एकदा आईस वॉलला जाऊन भोज्जा पराक्रम करून झाला कि एक अख्खा दिवस
फक्त पॅकिंग आणि पडी मारण्यासाठी ठेवला. सगळं मस्त मॅनेज केल्यानं सामान विखुरलं असं
नव्हतंच, तासाभरातच भराभरीचा कार्यक्रम उरकला. मग उरलेला दिवस विजय आणि रुपेशदादाला
ब्रिजपल्याडचं दुर्गा मंदिर धुवून साफ करायला केलेली मदत. त्यादिवशी त्यांचा भयंकर
आग्रहामुळे आमचं दोन्ही वेळचं जेवण सरकारी खात्यातनंच झालं.
परत येण्याच्या दिवशी "आपका जाने का जुगाड हो जाएगा, बेफीकर रहो"
असं य वेळा सांगणारा चाचांचा मुलगा. मग अखेरीस सामान बांधून झाल्यावर स्वयंपाकीपासून
ते चाचा पर्यंत इतक्या दिवसात या-ना-त्या कारणामुळे कामी आलेल्या प्रत्येकाला जाऊन
भेटणं काय, गाडीत बसताना त्यांनी आवर्जून सोडायला
येणं काय किंवा गाडी निघाल्यावर मागं उडणाऱ्या धुळीत आम्ही मागं वळू-वळू पाहणं काय.
बातलने आम्हाला मोठ्या मनानं आश्रय दिला होता आणि सोबत खूपसाऱ्या आठवणी पण.