शेंग्याची टरफलं, व्हिक्टोरिया राणी आणि चिल्लर पार्टी

सलग सुट्ट्या आल्यामुळे आणि त्यात मी नीट प्लॅन केल्याने सोमवारी सकाळी परतीचं रिजर्वेशन फुलपाखरांच्या इंद्रायणीऐवजी पेंगाळात आलेल्या 'भुसावळ-पुणे' चं करावं लागलं. साहजिकच, आज लिखाण अवघड होणार होतं.

१५ मिनिटे उशीरा का होईना, गाडी आली, भरून आली. वन-थर्ड प्रोबॅब्लीटीवर IRCTC शी झगडत मिळवलेली खिडकीतली जागा त्या पेंगाळलेल्या पोरीनं सहज बळकावली आणि मला 'वाटेल ती वस्तू कसल्याही परिस्थितीत कशी विकावी' ह्याचे धडे घ्यायला बाहेरच्या सीटवर सोडलं.  'Adjustment' हा मुळातच आपला स्वभाव. आज मात्र लिहूनच वेळ काढावा लागणार होता.

एका कुपेमध्ये १२ पैकी लहान पिल्लं असल्यावर लिहिणं तसंही अवघडच होतं. एरवी असं काही नशीबी आल्यावर खिडकीतले डोंगर मला सोबत करतात. आजतर त्यांचीही साथ नव्हती. थंडी असल्यानं व्हिक्टोरिया राणीनं सगळ्या खिडक्या लावून घेतल्या. बंद खिडक्या आणि लहान मुलं म्हणजे 'Fire in the hole'. जो काय खो-खो आणि जी काय जुगलबंदी सुरु झाली, सांगायची सोय नाही, त्यांच्या कंठप्रतापापुढे माझ्या हेडफोननंदेखील शरणागती पत्करली.
एव्हाना, निद्रासनात असलेली थोर मंडळी व्याघ्रासनात गेली होती, त्यांची वेगळी जुगलबंदी.

चॅट करणं आणि लिहिणं ह्यात कसली तफावत आहे, ह्याचं उत्तम लक्षण म्हणजे नजर! लिहिणाऱ्याची नजर काहीतरी शोधत असते, आणि ते मिळतंच.
आता ह्या समोरच्या महारथीचंच पाहा. (अरे, वाईट बुद्धीला आवर घाला, काय पाहायचंय ते पुढे आहे, ‘ता’ वरून ताकभात नको). हा, तर महारथी जागे झाले, त्यातल्या-त्यात जरा सॉफिस्टिकेटेड वाटलेले, पण ते क्षणभंगूर ठरलं. भेळ पोटात आणि कागदाचा बोळा खिडकीतून बाहेर! सगळी अक्कल बाहेर आली १० रुपयाच्या भेळीत.

इथं 9 o'clock ला व्हिक्टोरिया राणी अजून झोपेत. 2 o'clock ला एक ढोकळा-फाफडा पक्षी. पक्षी कोणत्या अर्थानं म्हणालो ते तुमचं तुम्ही ठरवा. तर, हा पक्षी मांडीवरल्या बॅगवर डोकं ठेवून झोपी गेला, ठीक. हळूहळू पार वज्रासन! तिथं 3 o'clock ला बसलेल्या काकांची पार फजिती ना भौ.

स्टेशन आलं, काही पोरं 'ही पोरी साजूक तुपातली, हिला म्हावऱ्याचा लागलाय नाद' गाणं वाजवत गाडीत चढली. पनवेलला पोहोचलो होतो ह्यात काही शंकाच नाही. पर्सनल गॅडजेट्सवर वाजणारी गाणी सार्वजनिक नसावीत हे लोकांना कधी कळणार? गाणी वाजवत दारात उभं राहून सिगारेटी फुंकणाऱ्या त्या पोरांना मनात शिव्यांची बाराखडी ऐकवत असताना पाशी पोहोचलोच होतो, इतक्यात पायाखाली काहीतरी हालचाल झाली. सीटखाली उंदीर असण्यात काही गैर नाही, पण लहान लेकरू निघावं हे मला जरा नवीनच. ते जस-जसं बाहेर आलं, तस-तसं 12 o'clock बसलेल्या दादाच्या चेहऱ्यावर १२ वाजले. सैतान झोपेतनं उठावा असं काहीसं तोंड झालं. माझ्यासाठी तो वॉर्निंग शॉट होता. आपसुकच माझ्या मुजीक प्लेयरच्या इक्विलायझर आणि प्री-अँपचा gain वाढवण्यात आला. प्लेलिस्टवर शाहीद परवेझ आले आणि मग डोक्यात बाकी काहीच नाही.

कम्युटचं रूपांतर प्रवासात झालं होतं.

कॉट-बेसिस


नुकताच हापिसातनं आलो. घड्याळ, हेडफोन, बाईकची चावी, हापिसचा पट्टा स्वतःच्या ड्रॉवरमध्ये ठेवला. कपडे बदलून निवांत आडवा झालो. सुजन त्याच्या वेगळ्या स्टडी-रूममध्ये जाऊन अभ्यासाला बसला. स्वतःची खोली, सेपरेट पॉवर प्लग, स्वतःचा बेड.. लगेच जुने दिवस आठवले.

ऑगस्ट २०१२. सि-डॅकच्या कोर्सची सुरुवात. बाईक नाही, सायकल नाही. तसं ओळखीचं शहर पण अनोळखी लोक. पेईंग-गेस्ट म्हणून कॉट-बेसिसवर राहण्याचा पहिलाच अनुभव.

गेटवर बांधलेल्या डग्याला त्याच्याच त्रिज्येत फिरवून दोन माळे गाठावे लागायचे.
"आरं पाय कुठं ठेऊ नि पायताण कुठं ठेऊ" एवढ्या चपला-बूट दारात! त्यात सोयीची जागा पाहून रूममध्ये जायचं. बंगाली न्यूज म्हणजे सुजन, बूजगावण्यासारखा असलेला पंकज, अनोळखी लोकांशी जरा कमीच बोलणारा मनिष दादा, आमच्यात सगळ्यात मोठा.. भात-भरू म्हाद्या, कोल्लापूरचं योग्या उर्फ बैल, कोल्लापूरचाच अभ्या उर्फ गिगा, पलीकडं आतल्या खोलीत पाटलांचा उपेश उर्फ उप्या नि लिंबो सायंटिष्ट म्हणजे सुहास. आमच्याच खोलीत कायम लॅपटॉपवर क्रिकेट खेळणारा सरनदीप उर्फ शेरी पाजी आणि त्याचा गजब दोस्त ग्यानेश उर्फ ***-हंटर, गे-नेस.

चड्ड्या वाळत घालायच्या जागा उमगुस्तोवर आठवडा निघून गेला. तेवढ्यात कोण किती वेळ आत कडी लावून बसतं ह्याचं वेळापत्रक पण कळालं.
योग्या काय भी झालं तरी ७ च्या आत तयार.
अं ते म्हाद्या त्या वास मारणाऱ्या रगमध्ये पार गुदमरून मेला तरी झोपणार!
त्याहून दर्जा म्हणजे हे गिगा! ते भी सी-डॅकलाच होतं पण ह्यो आत गेला कि तुम्ही सगळ्या अपेक्षा सोडायच्या, दात घासून केसाला पाणी लावायचं अं कटायचं.

पहिले काही दिवस तर उप्या आणि सायंटिष्टचं दर्शनच नाय. एकतर डेक्कनने घरी ये-जा करणार किंवा कडी लावून बसणार. पहिल्यांदा मी ह्यांना पाहिलं ते पिझा खोलीत नेताना. सुंबडीत पिझा आणणार, सुंबडीत फडशा पाडणार, कुठं आवाज नाय नि ढेकर नाय. मनिष दादा बिचारा सर्वात उशीरा यायचा, सुजनच्या अलार्मने उठायचा, उठवायचा, परत झोपायचा. हा झोपला रे झोपला कि लगेच कुणीतरी आंघोळी साठी पाणी सोडणार नि दार उघडं. मग "दार लोटून घ्या ना बे" पासून "बालदी भरली, आता तरी जा बे" पर्यंत सगळ्या अपडेट विदर्भी ठेक्यात देणार!

घरी येता-येता तसंच सँडीच्या मेसमध्ये जेवून यायचो. मग तिथं अभ्याशी गप्पा व्हायला लागल्या. योग्या अन त्यो कॉर्डिनेट करून यायचे, मग हे कसले वांड आहेत ते कळालं. ते योग्या हसायला लागलं कि डोळ्यात पाणी येईस्तोवर दात काढायचं.
मग एकदा शेरी, पंक्या, गेनेस, मी आणि उप्या लॅपटॉपवर क्रिकेटची नॉक-आऊट सिरीज खेळलो, तिथं उप्याशी गप्पा वाढल्या.. मग ऍप्टी सोडवायला बसलो कि ह्यो येऊन हैदोस मांडणार! पण काय भी बोला, ऍप्टीच्या बाबतीत एक नंबर! सुहास तसा जिनिअस क्याटेगरीतला, ९ पॉइंटर वगैरे. सगळे झोपले कि गप अभ्यास करणार. आधी तो नि त्याचा लॅपटॉप हे नवरा-बायको असल्यागत होतं.

मग रात्री मनिष दाच्या खोलीत अड्डा असायचा. सगळ्यात उशीरा घरी येणारा मनिष दा, सगळ्यांचे कुटाणे सांगायचा. ऐकून हसून पार आडवे! आधी काही दिवस वेळ जाता जात नव्हता, पण नंतर खिदळायला रात्र कमी पडू लागली.

वेळ गेला, कोर्स संपला. सुजनला दिल्लीला नोकरी लागली, तो गेला. त्यांचा कोर्स संपल्याने शेरी, गेनेस आधीच निघून गेले होते. जुन्यातल्यामध्ये राहता राहिलो मनिष दा, मी, पंक्या, उप्या, लिंबो सायंटिष्ट, अभ्या, योग्या नि म्हाद्या. सुजनच्या जागी आला विक्रांत देशमुख उर्फ पिंट्या!
अभ्याला पण नोकरी लागली पुण्यातच, ते तिथंच राहिलं मग. मी आणि पंक्या बेरोजगार! तसे ३ महिने काढले, त्यात जी मजा केली त्याला तोड नाही. दुपारी योग्या, उप्यासोबत धिंगाणा. संध्याकाळी अभ्या नि योग्यासोबत मेसमध्ये. जेवताना आम्ही का हसायचो ते मेसमध्ये कुणाच्या बापाला भी कळालं नाही कधी.

असंच एकदा एका रविवारी आम्ही हॉलमध्ये गप्पा मारत बसलो होतो आणि मनिष दाच्या खोलीतनं कुमार सानूचं गाणं वाजायला लागलं. जाऊन पाहिलं तर मनिष दा गप त्याचं काम करतोय. मनिष दा नं इशार्यानं सांगितलं कि गाणी पिंट्यानं लावल्यात. मागं वळून पाहिलं तर हे येडं त्याच्या कानावरचे केस कापत होतं.
हॉलमध्ये जाऊन जे काय हसलो तिज्यायला, नादखुळा.

२-३ दिवसातच पिंट्या आमच्यातला झाला. त्यात तो फेमस त्याचा जोनी ब्रावो डान्समुळे झाला. ते उप्या नि गिगा नाच म्हणायचं अन हे येडं नाचायचं.
एप्रिल संपायला आला आणि मला नोकरी लागली.

(आग्रहाखातर लिहितोय) एरवी ब्रेड आणि बटर माझं  आवडतं खाणं. मी कित्येक दिवस रात्रीचं जेवण म्हणून तेच खाल्लंय. ते योग्या, अभ्या अन मनिष दा... पार पिडायचे ब्रेड बघितला कि.

मग मी चेंडू म्हाद्याच्या कोर्टात टाकायचो. म्हाद्या म्हणजे घाणीचं आगार. त्याचा आवडता रंग म्हणजे मळखाऊ! म्हंजी बगा आता. त्यानं मळखाऊ रंग म्हणून आर्मी-कॅमोफ्लेजचं बनियान घेतलं होतं. त्याच्या पोटाच्या नागाऱ्यामुळं त्यांचं पार झबलं झालं होतं, तरी ते तेच वापरायचं. मळखाऊ रंगाची रग. ती एवढी घाण झालती कि त्यात किडे भी जागेनात. MPSC  ची तयारी करणारा हा गडी दलदलीत उतरायची तयारी करतोय असं वाटतंय.

एकदा शनिवारी रात्री मी, अभ्या, उप्या, सुहास, मनिष दा, पिंट्या गप्पा मारीत बसलो होतो. बाहेरच्या खोलीत पंक्या झोपला होता. ३ वाजाया आलते. उप्या नि मला मस्ती सुचली, गेलो, त्येच्या मोबाईलवर ५ चा अलार्म होता, तो ३ चा केला नि गप त्येच्या पडून राहिलो. एका बाजूला मी, दुसऱ्या बाजूला उप्या. अलार्म वाजला, मी भॉ केलं, त्याची तिथंच वितभर, त्या बाजूला वळला, तिथनं उप्या, मग हातभर... त्येनं जे काय शिव्या दिल्या.. फुल फुल्या-फुल्या-फुल्या.. आम्हाला वाटलं मरतंय कि काय आता ते धक्क्यानं.

आमचा वीकेंड शुक्रवारी रात्री CS ने सुरु व्हायचा उप्या नि सुहासच्या खोलीत. रात्री ११ची वेळ, १०×१० ची खोली, त्यात ५ लोक आणि ५ लॅपटॉप.
GiGa, Snake Eyes, CobraCommander, Pintya, WedaPashi.. मग पहाटे ५ पर्यंत "A ला plant", "गाव हाय तिथं", "बी ला बॉम्बर", "घंताड्या, ये कि", "WedaPashi attacked a teammate", "Maddoxच्या......" .. हे सर्वात frequent.
रिकॉईलचा इचार न करता दिसेल त्यावर गोळ्यांचा फवारा करणारा योग्या, त्यात एखादा फ्रॅग मिळाला कि खुळ्यागत हसणार. शेवटपर्यंत टिकून राउंड जिकवणारे उप्या नि अभ्या. त्या सुहासच्या मागं जाऊन उगाच मरणारे मी नि पिंट्या. पार पहाटेपर्यंत आवाज काय कमी नाही. एक-दोन वेळा तर खालच्या काकींनी आवाज दिला धिंगाणा कमी करा म्हणून, तरी आमचं चालूच.

ते ट्रॉयचं कोल्लापुरी एडिशन.. "ह्येचा तर आधीच गणपत्र्या झालाय", "जातो मी मग", "खटक्यावर बोट!" १५ वेळा पाहून भी खुळ्यागत हसणारा योग्या. रविवारी रात्री बासुरीला जेवायला जायचं, तिथं लै हळू जेवणारा अभ्या, म्हाद्याचा हैद्राबादी भात.

दिवस उलटत गेले, नोकरीसाठी पंक्या सुरतला निघून गेला. पिंट्याचं सी-डॅक झालं. रोज उठून ते पिंट्याचं "च्या मायला,....." ऐकायची सवय झाली.
मला शेव-फरसाण आणि चिवडा आवडायचा, त्यावरून पण मला जाम पिडला ह्यांनी. 'चिवडा' म्हणालं कि मनिष दा आणि नाशिकच्या नामदेव चिवडाचा फॅन पिंट्या आठवतो भौ.
'चिवडा' आणि त्याला अनुसरून असलेले हातवारे..समजून घ्या! तिज्यायला चिवडा खायची सोय नाय आता.

वेळ गेला, उप्या नि सुहास कॉलेज संपवून माघारी गेले. मग खो झाला. मळखाऊ म्हाद्या नि त्येच्या नवा लूममेट (हो, हा टायपो नाही, लूममेट च!) उप्या नि सुहासच्या खोलीत राहायला गेले, मी अभ्या नि योग्यासोबत त्यांच्या खोलीत राहायला गेलो.

                                      ..पुढचं भाडं पुढच्या महिन्यात.. 

खेतोबा आणि नाखिंड

मागच्या उन्हाळ्यात मावळातले खूप ट्रेक झाले होते. ह्या वेळेस मुंबईत असल्याने उन्हाळा जास्त जाणवणार होता. प्रचंड उकाडा असला तरी आंबट-गोड आंबे आणि इतर रानमेवा खायचा मोह काही आवरेना. आता मुंबईजवळ आंब्यासाठी वन-डे काही करायचं म्हणलं की सर्वात आधी भीमाशंकरचा नंबर लागतो. खुद्द भीमशंकरला जाण्यात मला काही विशेष रस नसल्याने पुन्हा त्या आसपासच्या २ घाटवाटा उरकणं भाग होतं.

२ दिवस नकाशे गिरवून २ घाटवाटांची शिवण करायचं ठरलं. उन्हाळा असल्याने जास्त कुणी ट्रेकला जात नाही, येतो म्हणाणारे येत नाहीत आणि जाणारे सांगत नाहीत. मीही काही जास्त विचारपूस केली नाही, बहुतेकांचा नकार साहजिक होता. कसंय ना 'माहीत असताना पंधरा दिवस वापरलेल्या मोज्याला "वास येतोय का?" असा प्रश्न विचारु नये, विचारलाच तर वास घेऊ नये, वास घेतलाच तर तिथं थांबून काशी करू नये.' दुधाची तहान ताकावर भागवायला लागू नये म्हणून सोलोचा प्लॅन आखला.

हौशी गडी - यतिनशी चर्चा करुन खेतोबा घाट आणि कौल्याच्या धारेचा प्लॅन फायनल केला. शनिवारी ऑफिसमध्ये नसलेलं काम संपवून वेळेत घर गाठलं. (ह्या ब्लॉगमध्ये म्यानिजरच्या नावानं खडे फोडले नाहियेत हो). मेडिकीट, टॉर्च, अर्धा डझन केळी, ३ संत्री, १ लिटर ताक, १ चिक्कीचा छोटा तोटा, २० पारलेच्या गोळ्या, ५ लिटर पाणी घेऊन मी बाईक वर निघालो.

प्लॅन असा होता की बाईक आंबिवलीत ठेवायची.. मुंबईकरांनो हे आंबिवली शहाडजवळचं आंबिवली नव्हे. असेही महाभाग असतात. एकदा प्रितीनं एक किस्सा सांगितला होता, त्यात ती रसाळ-सुमार-महिपतजवळच्या वडगावबद्दल सांगत होती, एक भरकटलेला पुणेरी नग बिनधास्त विचारून गेला, "वडगाव शेरी की वडगाव बुद्रुक?" आता करं जोडण्याव्यतिरिक्त काय करावं कळेना. बर, प्लॅन असा होता की आंबिवलीत बाईक ठेवून जमरुंगच्या कामतपाड्याला ११ नंबरच्या बसने जायचं. शिडीनं मधल्या पदरात जायचं, तिथून खेतोबा घाट चढायचा, पुढं भूताच्या माळानं पदऱ्याच्या वाडीकडे यायचं, गावाकडे न उतरता उजवीकडे नाखिंडीकडे यायचं, नाखिंड किंवा कौल्याच्या धारेनं खाली पेठाच्या वाडीत यायचं, तिथनं आंबिवली. लांबलचक पण सोपा प्लॅन. कर्जतजवळ जायचं असल्याने विशेष अंतर नव्हतं. कडावजवळ रस्त्यात काहीतरी गुंडाळी करून बसलं होतं. पटकन गाडी थांबवाली, टॉर्च काढला आणि नीट पाहिलं. २ घोणस. पहिल्याच बॉलवर चौका! मागच्या मिनीबसला थांबवलं समोरच्या २ बाईक वाल्यांना थांबवलं आणि काठीनं ढकलत-ढकलत दोन्ही महाशयांना रस्त्यावरुन सरकावलं आणि प्रवास पुढे सुरु झाला.

आंबिवलीत पोहोचलो तेव्हा २ वाजले होते. एका हॉटेलापाशी गाडी ठेवली आणि त्या दादाला सांगितलं की मी जातोय, उद्या येईन. जमरुंगात कुणा एका रेतीवाल्याचं लगिन असल्याचं त्यानं सांगितलं तसं मी तिथंच खाट धरली, उगाच रेतीवाल्याच्या अन् रिक्षावाल्याच्या नादात (?!) कामावर जायला उशीर व्ह्यायचा. 'करायचंय ते कर पण मला झोपू दे' अशा काहिशा आविर्भावात त्यानं लाईटीच्या बटणाला काठी मारून बंद केलं. सकाळी कसायाच्या आवारातल्या कोंबड्यानं त्याच्या यमाला आवाज दिला. प्रातःविधी उरकून निघूपर्यंत त्यानं कोंबड्याचं तोरण लावलं होतं.

आंबिवली ते जमरुंग अंदाजे ४ किमी आणि पुढे कामतपाडा २ किमी अशी मॉर्निंग परेड होणार होती, झाली. कामतपाड्यात वाजंत्रीनं जाऊ की शिडीनं जाऊ ते विचारून घेतलं. गावातल्या थोरल्यांनी शिडी, वाजंत्री आणि नाखिंड अशा सगळ्या वाटा दाखवून दिल्या, आणि वाटा चुकणाऱ्यातला असशील तर शिडीनं जा, वाटेवर असून उगाच धडपडणारा असशील तर वाजंत्रीनं जा असा सल्ला दिला. दोन्ही नॉट ऍप्लीकेबल म्हणून मी आपला शिडीकडे निघालो. समोर दिसणाऱ्या जामरुंगच्या डिग्ग्याकडे बघत त्या अलिकडची सोंड चढलो. मग लागलेल्या कुरणातून ला डावीकडून वळसा घालत मागं पोहोचलो. आता कारवीतून वाट जराशी उजवीकडे पदरावर चढू लागली. तिथं धापा टाकून जिभ बाहेर येवून पार कुत्रा झाला. पारलेची गोळी जिभेवर ठेवून पुन्हा चढाई सुरु केली. चघळून गोळी चकोट होण्याआधीच पहिली शिडी लागली. ती चढून मग डावीकडे हातभर ट्रॅवेर्स करून पुढे वर चढलो. अजुन एक शिडी, पहिल्यापेक्षा लहान आणि विचित्र. ती चढून गेलो की ३० फुट स्क्र्अँबल केलं आणि पठरावर पोहोचलो. तिथं पठारावर आधी वस्ती होती, आता नाहीये. उत्पन्नाचे पर्यायी मार्ग गवसल्यानं हल्ली एकतर पदरावरच्या वस्त्या विस्थापित होत आहेत नाहीतर त्याचा 'निवांत'पणा नाहिसा होताना दिसत आहे, आणि त्यात वावगं वाटण्यासारखं काही नाही, आणि त्या लोकांची चूक मुळीच नाही. प्रगती आणि सोई कुणाला नको आहेत? आपण आज कितीही हौशीनं एखाद्या पदऱ्याच्या वस्तीत एक रात्र मुक्कामी राहिलो तरी उद्या फोटो फेसबुकवर टाकायला आणि मला हा ब्लॉग पोस्ट करायला खाली यावसं वाटेलच की.

अगदी ह्याच विचारात वस्तीच्या पडक्या चौकटीचे फोटो काढून मी पुढे निघालो. खेतोबा उतरून आलेली पायवाट वस्तीपाशी आली असणार म्हणून मळलेल्या वाटेनं जाऊ असा विचार केला. जमरुंगच्या दिशेला पाठ करून वस्तीकडे पाहिलं असता वाट थोडी उजवीकडून जाते असा मला अंदाज होता, अगदी तसंच करून मी मधल्या जंगलात शिरलो. पाचच मिनिटांत समोरनं एक वाट आली आणि डावीकडे एक वाट वळाली. टुना-टुना उड्या मारत मी डावीकडे चढायला सुरु केलं. ५ मिनिटं वर आल्यावर खेतोबाला खेटून असलेला कडा दिसला आणि मागे पाहिलं असता वाजंत्री जिथं वर येते ती जागा दिसली. वाट योग्य असल्याची खात्री झाली. यतिननं सांगितलं होतं ते अगदी तंतोतंत जुळलं होतं. वाह रे गड्या!

जसजसा वर चढत होतो, उजवीकडे कडा जवळ येत होता, तसतशी हवा गार झाली, पायाखाली आधी माती, मग गोटे आणि मग धोंडे आले. कडा बाजूला आल्यावर वाट सोडून कड्याजवळ जाण्याचा मोह काही आवरला नाही. माकडं नसल्याची खात्री करून कड्याच्या पोटाशी बसकण मारली. पहिलाच ब्रेक असल्यानं पाण्यापाठोपाठ एक केळं पोटात ढकलून दिलं. पटापट वर आल्यानं घाई नव्हती, त्यात आत्ताशी कुठे ९ वाजले होते. मग निवांत बसलोच होतो तर एक गाणं ऐकून घेतलं.

               How many years can a mountain exist,
Before it is washed to the sea?
Yes, and how many years can some people exist,
Before they're allowed to be free?
Yes, and how many times can a man turn his head,
And pretend that he just doesn't see?
The answer, my friend, is blowin' in the wind, 
The answer is blowin' in the wind.

Yes, and how many times must a man look up,
Before he can see the sky?
Yes, and how many ears must one man have,
Before he can hear people cry?
Yes, and how many deaths will it take 'til he knows,
That too many people have died?
The answer, my friend, is blowin' in the wind, 
The answer is blowin' in the wind.

Lyrics: Bob Dylan, Singer: Bob Dylan, Album: The Freewheelin' Bob Dylan (1963)


      एकच गाणं ऐकलं आणि पुन्हा हेडफोन गुंडाळून आत ठेवून दिले, सिपरमधून पाण्याचे २ घोट ओढले आणि चढाई सुरु केली. वाट मळलेली आणि सावलीत असल्याने चढायला विशेष त्रास होत नव्हता. त्यात ऊन वाढायच्या आत मी पठारावर आल्यानं दमट हवा नव्हती. उन्हात दमट हवेत मोठे घाट चढताना जो काही छळ होतो ते सांगायची गरजच नाही.

      घाट पाहता क्षणीच भयंकर आवडला होता. सणसणीत कडा आणि त्या कड्याला लागून एक हलकीशी धार. त्या धारेवर ही वाट. सह्याद्रीत असे अनेक अजब-गजब प्रकार केलेत. ज्यानं वाट काढली असेल त्याला कोपऱ्यातनं नमस्कार.

      घाट चढून माथ्यावर पोहोचलो तेव्हा ९.३० वाजले होते. समोर जंगल आणि डावीकडे कड्यापाशीच खेतोबाचं मंदिर. नास्तिक असलो तरीही मला अशी ही डोंगरदऱ्यातली मंदिरं पाहत राहाविशी वाटतात, ह्यांना व्यावसायिकतेचा गंध नसतो अजिबात. नशीबाने येळवलीचे (येरवळ) बाणेरे आजोबा आपल्या २ नातवांना घेऊन तिथं आले होते. एकटाच असल्यानं त्यांनी जरा करड्या शब्दातच उजळणी घेतली, पण नंतर खंडू दादांची ओळख सांगितल्यावर त्यांनी लागलीच त्यांच्या जवळचा देवाला फोडलेला नारळ खायला दिला. मी ही त्यांच्या नातवांना गोळ्या देऊन आपलंसं केलं की स्वारी खुश.

आजोबा: "आता मी वाट दाखिवतो तिथंनं सरल जायचं, वाडीत नगं जाऊस, पंचक्कीला उजवीकडं जायाचं आणि नढ्यानं खाली उतरायचं."

मी: "मग ती नाखिंडीची वाट झाली की."

आजोबा: "तुला आंबे खायचेत नव्हं, त्ये कौल्याला न्हाईत. कौल्याला लै ऊन आता, झाडं भी न्हाईत."

      आजोबांचं म्हणणं खरं होतं. कौल्याच्या धारेनं उतरताना गुढघ्याच्या वाट्या करकरल्या असत्या, त्यापेक्षा नाखिंडीची वाट कधीही सोयीची होती. दोन्ही वाटा तसंही एकाच पदरात येतात.
साधारण १०.३० वाजता आजोबांसोबतच निघालो आणि सावळे-भीमाशंकर वाटेवर मी उजवीकडे वळालो, आजोबा येळवलीकडे निघुन गेले.


      इथून थेट लोणावळापर्यंतचा प्रदेश मी य वेळा भटकल्यानं ठरवून सुद्धा हरवणं अशक्य होतं. त्यामुळे फक्त नजर भिरकवत चालणे हा एकच उद्योग होता, त्यात मला पठारांवर भटकायला प्रचंड आवडतं. हातातली काठी दामटवत डिजेल इंजिन जे निघालं, ते मधल्या कड्याशी एकदा डोकावून, भरपेट करवंदं खात बरोबर दीड तासात म्हणजे १२ ला नेढ्या समोरच्या झाडाखाली जाऊन थांबलं. त्याआधी त्या कच्च्या रस्त्याच्या अलीकडे जे काही बांधकाम चालू आहे ते पाहिलं. दर खेपेला पाहतोय ते वाढतच जातंय. तिथे एक इसम भेटला. त्याला विचारलं की हा नेमका प्रकार काय आहे, तर त्यानं खुलासा केला की फॉरेस्ट डिपार्टमेंटचा हा तुकडा बळकावून तिथं आता कोणतं तरी मंदिर होत आहे. जुन्या मंदिराचा जिर्णोद्धार करत आहेत की डायरेक्ट नवा गडी नव राज्य चालू आहे माहीत नाही. तसंही तिथली परिस्थिती हाताबहेर गेल्यात जमा आहे. विंडमिल्ससाठी रस्ता, आणि आता तर कुसूर जवळून तो कर्जत-भीमशंकर रस्ता थेट जंगल फाडत जाणार आहे. म्हणजे नंतर इथं न फिरकलेलं बरं. खेदजनक असलं तरी डेवलपमेंटच्या नावाखाली खपतंय ह्याला आपण काही करू शकत नाही.

थॅंक्स टू द डेवलपमेंट, घोटाभर मातीतून थपथप माती उडवत उन्हात चालत यावं लागलं. बूट लाल झाले होते. आता ऊन चांगलंच जाणवत होतं. निवांत जागा होती म्हणून तिथंच जेवण उरकायचा मानस होता, पण वारा पडलेला असल्यानं मी मागल्या बाजूस जाऊन जेवायचं ठरवलं.

जरा नीट न्याहाळलं आणि गावाकडून वर आलेली वाट दिसली. २ च मिनिटांत ती वाट रस्ता सोडून उजवीकडे कारवीत शिरली. त्या वाटेनं नेढ्याच्या मागे जाणं शक्य होतं. तिथं जरा पुढे गेलो आणि एक वाट उजवीकडे कारवीत उतरली. ती वाट नाखिंडीची नाही हे मला नक्की माहीत होतं. तिच्यावर फक्त एकदा नजर टाकली आणि वाटेला लागलो. थोडं पुढे डावीकडे आलो, उजवीकडे दरी, त्या पल्याड कोथळीगड आणि डावीकडे नेढं. तसाच पुढे चालत आलो, उजवीकडे कड्याशी डोकावलं, खाली पाण्याचं टाकं! थोडा वळसा टाकून केकताड्याच्या बाजूनं टाक्यापाशी पोहोचलो. गार पाणी! आधी पाण्यानं पोटाचा टँकर भरला आणि ५ मिनिट तिथंच बसून राहिलो. टाक्यापासून पुढे वाट उतरत नव्हती. मग परत वर आलो, सावली हेरली आणि बसलो.

खाली कोथळीगडावर लोकांचं आगळंच ऍडवेंचर चालू होतं. त्यांची बोंबाबोंब आणि एका ए-ओ कॉलला आपल्या-परक्या १०० जणांचा रिप्लाय म्हणजे त्या ऍडवेंचरचाच एक भाग. केळी आणि संत्री खाऊन पोटोबा शांत केला आणि सोबत ३ लीटर पाणी असल्याची खात्री करून नाखिंडीच्या वाटेची सुरुवात पाहून घेतली. पण मग आलोच आहोत तर कौल्याच्या तोंडाशी जाऊन येऊ म्हणून तसाच पुढे गेलो. अगदी ५-७ मिनिटाच्या चालीवर कौल्याच्या धारेची सुरुवात होती. ती पाहिली आणि पुन्हा नाखिंडीच्या वाटेशी आलो. पायपीट बरीच झाली असली तरी अजुन निम्मा ट्रेक बाकी आहे ह्या विचारांती नाखिंडीची वाट उतरायला सुरुवात केली तेव्हा १.३० वाजले होते.

      वाटेत सुरुवातीला थोडा तीव्र उतार आणि मग एका छोट्या कातळाच्या बाजूला आलो, वाट डावीकडे वळते तिथं उजवीकडे छोटी नैसर्गिक (?) गुहा दिसली. मध्ये थोडी पडझड झाली असल्यानं आणि मुळात मला आळस आला असल्यानं मी काही तिथं गेलो नाही. आज रिग्रेट करतोय की तेव्हाच पाहायला हवं होतं जाऊन. असो, तर मी तसाच खाली उतरत गेलो आणि मधल्या पट्टयात अचानक एका जागी येऊन थबकलो. नजर जाईल तिथे आंबे पडले होते. जवळपास अर्धा तास मी काही तिथून हललो नाही. GPS ट्रॅकवर उगा कुरडया येऊ नयेत म्हणून सॅक आणि मोबाईल झाडाखाली ठेवले. घरी नेण्यासाठी पण पिशवी भरेस्तोवर आंबे आणि कैऱ्या भरल्या आणि मग ओझं घेऊन निघालो. तरी रानमेव्यावर ताव मारणं चालूच होतं.

      ही घाटवाट तशी बऱ्यापैकी वापरात असल्यानं मळलेली आहे, हरवण्याची शक्यता कमीच. डाव्या बाजूला एक सोंड सोडून पलीकडे कौल्याची धार उतरत होती.
साधारणतः २.१५ ला मी कोथळी गडाच्या पदरात उतरलो. खाली येताच एक वाट उजवीकडे उतरली, जी कामतपाड्यात जात असावी. आजून २ मिनिटं चाललो आणि कौल्याच्या धारेची वाट येऊन मिळाली. तसंच पुढे चालत पेठच्या पोटाशी जी वाडी आहे तिथं आलो.
कोथळीगडावर त्या उन्हात अन् मुळात गर्दीत जाण्याइतपत माझी हिंमतच नव्हती. उगाच उभ्या उंटिणीचा मुका घ्यायला मी वेडा नाही, म्हणून मी गपगुमान आंबि वलीची वाट धरली. वाटेवर मधल्या खिंडीशी एक दादा भेटला, त्यानं गप्पा मारता-मारता त्या भागातल्या अनेक गजब वाटा सांगितल्या. एका संत्रीत तो आपला दोस्त झाला. तसंही 'संत्र्या'चं नातं पटकन जुळतं. त्याच्याशीच गप्पा मारत पाऊण तासात आंबिवलीत पोहोचलो तेव्हा ३.३० वाजले होते. 
गाडी काढून घरी पोहोचलो तेव्हा ५ वाजले होते, ट्रेक वेळेत झाल्याने सोसायटीत बॉक्सच्या ४ मॅच खेळणं शक्य झालं.


मी हे असंख्य वेळा ऐकलं आहे कि ट्रेकिंग हे एकट्यानं नसावंच, त्रिकुट-चौकट तर असावीच. ह्या ट्रेकच ही तसं म्हणता येईल. उतरताना किंवा चढताना पडला असतास तर काय? वाटेत काही चावलं असतं तर काय? मग नेटवर्क नसतं तर काय? हे करून मिळालं तरी काय? आणि असंख्य तत्सम प्रश्न. खरं सांगायचं झालं तरं हे प्रश्न काहींना हा ब्लॉग वाचल्यावर पडू शकतात, फरक एवढाच आहे कि हे प्रश्न मला ट्रेक सुरु करायच्या आधी पडतात, आणि होय, तरीही मी जातो.

'का?' ह्या प्रश्नाची बरीच उत्तरं आहेत.
'नाही गेलास तर नाही का चालणार?' ह्याचं एकचं उत्तर : नाही चालणार!
'पुन्हा जाशील का?' ह्याचं उत्तर माझ्याकडं पण नाही.

हं, माझ्या सोलो ट्रेक बद्दल तुम्हाला काही आक्षेप असेल तर तसं सौम्य आणि तुम्हालाच शोभेल अश्या शब्दात वैयक्तिक संदेशाद्वारे सांगा, चर्चा करू. उद्धटपणे व्यक्त केलेल्या मताला किंवा टीकेला मधले बोट किंवा आरसा दाखवण्यात येईल.

I do not intend to motivate/discourage anyone from trekking/solo-trekking. I believe this and every other trek has taught me a handful of things. I simply don't expect anyone to pack his/her sack and set off to a solo trek after reading this or any of my blogs.

भिकनाळ आणि पालखीची वाट

      हिवाळ्यात जवळपास सगळेच वीकेंड सत्कारणी लागल्यानं मी आधीच खूश होतो. अमूक-तमूक ट्रेनिंगच्या कारणानं प्रिती १५ दिवसासाठी पुण्यात आली होती. साहजिकच भेट झाली. मी आपला निवांत पुणे शहरातल्या माझ्या सर्वात लाडक्या भागात म्हणजे कर्वे रोडच्या सुजाताची सिताफळ मस्तानी नरड्यातून खाली जातानाचा आंनद घेत होतो आणि अचानक प्रितीनं पिलू सोडलं: "ह्या वीकेंडला भिकनाळ आणि फडताड करायचा? राजस आणि यज्ञेश येतील गाडी घेऊन."

      विचारात एवढा गुंतलो की उरलेली मस्तानी कधी संपली ते कळलं नाही आणि स्ट्रॉचा फुर्रर्रर आवाज आला तेव्हा कुठं खऱ्या अर्थानं विचारमंथन सुरु केलं. फडताड हे नाव काही माझ्यासाठी आणि तिच्यासाठी नवीन नव्हतं. २००८ मध्ये एकदा स्टुडिओतल्या संजय काकाकडे असताना दिवकरच्या तोंडी हे नाव ऐकलं होतं. छातीत धडकी भरावी असा तो ट्रेक हे ऐकूनच होतो. एकंदरच कळून चुकलं की जायचंय तर तयारीने जावं लागेल. तसं म्हणलं तर आमच्यासोबत जो एक गडी येणार होता त्यानं हा ट्रेक केला होता, त्यामुळे एकदा त्याच्याशी चर्चा करून प्लॅन करायला हरकत नव्हती. पण मग त्यानं प्लॅन ऐकायच्या आधीच माघार घेतली. कुणाच्या पोटात दुखलं तर दुखू दे, जे होईल ते बघू म्हणून आम्ही प्लॅन कायम ठेवला.

      शुक्रवारी संध्याकाळी भेटून मी आणि प्रितीनं खाण्याचं सामान गोळा केलं आणि ठरल्याप्रमाणं राजस आणि यज्ञेश रात्री कारने पुण्याला आले. ट्रेक तसा अवघड म्हणून ते येताना सोबत सगळं इक्विपमेंट घेऊनच आले होते. पौड रोडपाशी प्रितीला पिकअप करून ते सगळे मला कात्रजच्या नाक्यावर भेटले. यज्ञेशशी माझी नीट ओळख करून देईपर्यंत आम्ही चेलाडीला पोहोचलो. राजसला थोडा आराम मिळावा म्हणून चेलाडीपासून प्रितीनं गाडी चालवायला घेतली. 'झोपेची वेळ + थंडी + वेल्ह्यापर्यंत ठिकठाक असा रस्ता' ह्या सगळ्या सॉर्टेड-आऊट गोष्टींना मात देणारी प्रितीची ड्रायविंग! डोळा अजिबातच लागला नाही. हसत-खिदळत वेल्ह्यात पोहोचलो तेव्हा पहाट झाली होती. गावात कुस्तीची स्पर्धा असल्यानं आदल्या रात्री चपटी न लावलेले सगळे जागे झाले होते, त्यामुळं आम्हालाच उशीर झाल्यागत वाटत होतं, पण आम्ही गडबड करणाऱ्यातले नाही. आम्ही काही तासभर तिथून हललो नाही. चहा आणि क्रिमरोल पोटात कोंबून आम्ही पुढं निघालो.

      आता गाडी राजस चालवत होता. कानंद खिंडीजवळ झालेलं स्वर्गीय नर्तकाचं दर्शन, अभेद्य दिसणारा तोरणा, हवेतला गारवा आणि चांडाळ चौकडी.. सगळं काही मनासारखं. गाडी 5 मिनिट बाजूला थांबवून विशेष वटवट न करता आम्ही सगळेच निःशब्द होऊन निसर्गाची ती उधळण टिपत होतो. उगाच ट्रेक मारणं, घाटवाट उडवणं असल्या गप्पा नाहीत, घड्याळाशी स्पर्धा नाही. पासली फाट्याच्या नंतर अतिशय सुमार अश्या रस्त्यानं गाडी जपून चालवत आम्ही कुसरपेठेत आलो. एका जीपमध्ये गावातली चिल्लर पार्टी रंगबिरंगी कपडे घालून बसली होती. वेल्ह्याच्या जत्रेत जायची उत्सुकता त्यांच्यात दिसत होती. एरवी गुरापाठी बिनधास्त भटकणारी, झाडाच्या अंगाखांद्यावर खेळणारी किंवा शहरातली पोरं कायम वंचित राहतील असे ना-ना प्रकारचे खेळ खेळताना दिसणारी ही कारटी आज पावडर फासून, तयार होऊन जाताना किती वेगळी वाटत होती. गावतल्या थोरल्या मंडळींना विचारुन सावलीच्या जागी गाडी ठेवली.

      कुसरपेठेतून भिकनाळेचा साधारण अंदाज मला होता, तरी आम्ही गावात थोडी चौकशी केलीच. फाटक्या आणण्यासाठी मावशी त्याच बाजूला निघाल्या होत्या, मग आम्ही त्यांच्यासोबतच निघालो. सिंगापुरच्या दिशेनं थोडं पुढे जाऊन धुत्या हाताला वळलात की एक पत्र्याचं खोपटं दिसतं, त्याच्या समोरच एक विहीर-वजा-डबकं खोदलं आहे. पाणी पिण्यालायक आहे, तिथंच प्रवासात संपलेल्या बाटल्या भरून आम्ही चालु लागलो. कोवळ्या उन्हामुळं गारठा जरा कमी झाला होता.  छाताड काढून उभा असलेला लिंगाणा, त्यापल्याड इंचभर डोकं वर काढून मिरवणारं रायलिंग, समोरच्या बाजूला रायगड, अन् नजर थोडी डावीकडे भिरकवली की रानापलीकडं आ वासून बसलेल्या भिकनाळेचा कडा दिसायला लागला. उजव्या हाताला थोडं पुढे पोटाशी आग्या नाळ. पुढे ती बैलगाडीची चाकोरी सोडून डावीकडे वर कारवीत शिरलो, अन् मग तसंच दरी डावीकडे ठेवून सोंडेवर चालत गेलो. साधारणतः 35-40 मिनिटं तशी विशेष चढण नसलेल्या सोंडेवर पायपीट केल्यावर उजवीकडल्या कारवीच्या दाट जाळीमागे फडताड कडून येणाऱ्या वाटेजवळ मावशींने आम्हाला सोडलं आणि त्या माघारी गेल्या.

      मी त्या जागी दीड-एक वर्षांपूर्वी आलो होतो. समोरच कड्यापलीकडे भिकनाळ आणि तिच्या तोंडाशी असलेली दाट कारवी. घसा ओला करून आम्ही परत डावीकडे कारवीत शिरलो. एका ढोरवाटेवर थोडं उतरून एका छोट्या आणि कोरड्या मिऱ्यापाशी येऊन थांबलो. नाळीच्या तोंडाशी तर आलो होतो पण आत शिरायला वाट मिळते का हे पाहायचं होतं. प्रिती आणि यज्ञेश थोडं पुढे पाहायला गेले आणि मी आणि राजस कारवीत शिरलो. दोनच मिनिटांत कारवीत शिरलो. दोनच मिनिटांत कारवी ओलांडून नाळेच्या तोंडाशी पोहोचलो आणि प्रिती आणि यज्ञेशला हाळी दिली, मग तसे ते दोघेही हजर झाले.

      पोटातल्या कावळ्यांचा ऑपेरा ऐकू यायच्या आत वाटेच्या सुरुवातीलाच बूड टेकवायला सोयीस्कर अशी सावली पाहुन नाश्ता करून घ्यायचा ठराव बिनविरोध मंजूर झाला. तितक्यात चान्स पाहून मी तोट्या उघडून धारातीर्थी पडून आलो. मग ब्रेड, बिस्किट, चिवड्या पाठोपाठ खजूर पोटात ढकलले आणि आम्ही निघालो. तासभर कधी आणि कसा गेला ते कळलंच नाही, पण मग उत्तराभिमुख असल्यानं नाळेत दिवसभर सावली राहणार हे साहजिक होतं, आणि जमेची बाजू अशी होती की आजचा मुक्काम पणदेरी गावात होता, त्यामुळे वेळेचं विशेष बंधन नव्हतं. उगाच हायामारी करत उड्या मारत जाणे हा प्लॅनच नव्हता.

      'एकच पायवाट' असं काही कौतुकास्पद प्रकरण ते नव्हतंच. उन्हाळ्यातही चिवटपणे तग धरून असलेली बोचरी झुडपी आणि निसटणारे दगड ह्यातनं वाट काढत, अनेकदा मिसकॉल देत आम्ही खाली उतरत होतो. बूटाच्या तोंडाशी, मोज्याच्या लोकरात, पॅंटच्या पायाशी अडकणारी रावणं आणि काटाळं झटकत साधारण अर्ध्या तासात आम्ही एका मोठ्या धोंड्यापाशी आलो. त्या पलिकडची उडी पाहता मी आणि यज्ञेश पाठीवरून काढून सॅक खाली ठेवली, आणि रोप आणि बाकीचं सामान बाहेर काढलं. थोडं वरच्या बाजूला रोप बांधायला योग्य जागा पाहून आम्ही रोप बांधला आणि यज्ञेशला खाली सोडलं. त्या पाठोपाठ राजस आणि प्रिती मग मी. पॅच संपतो तिथंच कोपऱ्यात एक माणूस पद्धतशीर फेरी मारून येईल एवढी नैसर्गिक गुहा आहे. ती गुहा म्हणजे वटवाघुळांचं आगार! ब्याटम्यानमधल्या बेल भौ सारखं आम्ही डोकं खाली वाकवून रोप गूंडाळून बॅगेत भरला आणि निघालो.

      जसं थोडं खाली आलो तशी नाळ रुंद झाली. झाडी-काटकी वाढली, तरी उतार काही मंदावेना. तसंच टप्पे उतरत आम्ही खाली येऊ लागलो. वाटेत एका ठिकाणी थबकलो. समोर उडी टाकायला 60 फूटाचा कडा, आणि इथं पडी टाकायला मस्त सावली! मग टेकायला छानशी सावली हेरली आणि बसलो. उदरभरणाचा कार्यक्रम उरकण्यात आला. ते 'वदनी कवळ घेता' राहिलं बाजूला आणि आमच्या पैजा चालु झाल्या त्या समोरच्या नाळेवर. मी ठाम होतो पाहुनच की त्यात वाट असणार! समोरच्या अभेद्य वाटणाऱ्या कड्याला माणसाच्या अचाट इच्छाशक्तीनं कुठंतरी भेद दिला असावा असं वाटत होतं.

      पोळ्या, लसुण-शेंगादाण्याची चटणी, दही, गोडलिंबू आणि खजूराचं लोणचं आणि मग त्यावर  गूळ-खवा पोळी असं जेवण आणि मग त्यावर ताक असं सगळं पोटात ढकलल्यावर आमची आळशी गाढवं झाली. बॅगेला पाठ टेकवून आम्ही परत नाळ चर्चेत आणली.  यज्ञेश आणि माझं एकच म्हणणं: वाट असणार, वर एखादा पॅच असणार. प्रिती, राजस् आणि यज्ञेशचं मत असं होतं की खाली जाऊ, गावात थोडी विचारपूस करू म्हणजे नक्की काय ते कळेल. आता खाली जाण्याचा मार्ग शोधणं गरजेचं होतं. मी उजवीकडे शिरलो तर यज्ञेश एक टप्पा उतरून खाली गेला. बराच आटापिटा केल्यावर सुद्धा मला वरून वाट मिळाली नाही. मग यज्ञेशने आम्हाला हाक दिली आणि आम्ही तिघे तो टप्पा उतरून यज्ञेशपर्यंत गेलो. उजवीकडे दिसणाऱ्या कड्याखालच्या घळीत आम्ही पोहोचलो. वाट शोधायला गेल्यावर कारवी आणि ऊन्हामुळे जो काही छळ झाला होता त्यानंतर मोकळ्या घळीत येऊन हायसं वाटलं.

      पुढे गावात पोहोचणं काही विशेष अवघड नसलं तरी बराच डिसेंट बाकी होता. मग विशेष घाई न करता आम्ही निवांत खाली उतरत गेलो. नाळेत असल्याने इथे-तिथे भरकटण्याचा प्रश्नच नव्हता. थोडं पुढे राहून मी आपला सुपर मारिओ खेळाल्यागत उड्या मारत मारत सावली हेरायचो आणि डुलकी काढायचो. जसं खाली आलो तसं मग आम्ही अजूनच निवांत झालो. मध्येच एका ठिकाणी एकाच कुटुंबाची वस्ती लागली. हे लोक सगळ्यात बेकार. एकाच पट्टयातली झाडं उभीच्या उभी तोडतात, पेटवतात आणि त्यावर माती-वाळू दाबून धूर करतात. त्यातनं कोळसा होतो. जंगलातले अख्खेच्या अख्खे पट्टे गायब करणारे हे लोक. सद्यपरिस्थिती पाहता डोमेस्टिक मागणीसाठी जीवंत झाडातून असा कोळसा काढणं पर्यावरणाच्या आणि विशेषतः वन्यजीवासाठी किती नुकसानदायी आहे, तसंच ते कितपत महाग पडेल हे सांगायची गरज नाहीये. त्यांना उचक्या देत आम्ही तासाभारात पणदेरी गावाशी पोहोचलो. ५.३० च्या सुमारास पोहोचल्यानं शेताची कामं संपवून गावाबाहेर निवांत बसलेला बळीराजा. त्यांच्याशी वाटेबद्दल विचारपूस केली आणि भिकनाळेतून दिसलेल्या 'त्या' वाटेवर शिक्कामोर्तब झालं. गावात क्रिकेट  खेळत असणाऱ्या पोरांमध्ये जाऊन चार पट्टे फिरवायचा मोह आवरून मी आणि यज्ञेश सरपंचांच्या घराकडे निघालो. त्यांनीही वाट असल्याच्या दाव्याला दुजोरा दिला. शाळेत मुक्कामाची परवानगी घेऊन आम्ही पुन्हा उरलेल्या दोन कारटयांपाशी आलो.

      बदललेल्या प्लॅननुसार आम्ही पालखीच्या नाळेनं वर जायचं ठरवलं. कोळसेवाल्यांच्या वस्तीपर्यंत कालच्याच वाटेने जायचं होतं. कोरड्या नाळेतून जाताना गुढघ्याच्या वाट्या करकरतात आणि मांड्या बोंबलतात. म्हणून तिथून पुढे नाळेनं वर जाण्याऐवजी आम्ही डावीकडल्या सोंडेवर चढून मधल्या पट्टयातल्या जंगलातून त्या छोट्या धारेवर चढायचं ठरवलं.

      कोळसेवाल्यांच्या वस्तीपाशी वर जायची वाट विचारली असता त्यांच्यातला एक दादा थोडं वर वाट दाखवायला आला. पुसट अशी ती पाऊल वाट. दादाच्या सांगण्यानुसार तीच वाट फडताडला जाण्यासाठीही वापरली जाऊ शकते हे कळल्यावर त्यांना ती ही वाट विचारून घेतली. कातळकड्याच्या खाली मधल्या गचपणात उजवीकडे वळालो. डुकराच्या शिकारीसाठी केलेला चर ओलांडण्यासाठी बरेच द्राविडी प्राणायाम करावे लागले. ते करून आम्ही पदरातल्या रानात शिरलो. इंजिन आधीच तापलेलं असल्यानं आणि त्यात तिथं दाट पण उंच झाडी असल्यानं तो सुखद पट्टा पार करायला विशेष वेळ लागला नाही. त्यात तिथं झाडीत एका कारची चावी मिळाल्यानं विशेष वापरात नसली तरी योग्य वाटेवर असल्याची खात्री झाली.

    रानातून पालखीच्या नाळेत शिरायची जागा दाखवली आणि दादा खाली निघून गेले. 'वाट' म्हणायला तसं फारसं काही नव्हतंच तिथे, पण 'वाट' लागायला बरंच काही. भर उन्हात त्या वाटेनं जायचं म्हणजे शिक्षा! स्क्रीचे दोन खडे पॅच चढून एका झुडपीपाशी आम्ही विसावलो. नरडं ओलं करून पुन्हा निघणं जीवावर आलं होतं पण तिथं बसून उन्हानं काहिली करून घेण्यात काही हाशिल नव्हतं. मग पुढे यज्ञेश, मग प्रिती आणि राजस आणि गरजेनुसार मध्ये किंवा शेवटी मी असा कॉन्वॉय वरवर सरकू लागला.  पुढे आणिएक छोटा पॅच आणि दोन एक्सपोज्ड  ट्रॅवर्स पार करून आम्ही नाळेत पोहोचलो. नाळेची लांबी जास्त नसल्याने नाळ कमी खिंड जास्त वाटली ती. बरीच हायामारी करून झाली असल्यानं आणि वरची झाडी नजरेत आल्यानं आपण वर पोहोचल्यात जमा आहोत असं गृहीत धरलं आणि जेवण उरकायचं ठरवलं. खिंडीत असल्यानं तिथं सावली होती. जेवणाचा कार्यक्रम गप्पा रंगल्यानं दीड तास चालला. मी, प्रिती आणि राजस बऱ्याच वर्षांनंतर एकत्र ट्रेक करत होतो, त्यामुळे बरेच किस्से एक्सचेंज झाले. कसलीच घाई नव्हती.

      शेवटी ४.३० वाजता आम्ही तिथून निघालोच. १५ मिनिट वर चढून आलो आणि जसजसं वर आलो तसतसं एक-एक करत चार बोटं तोंडात घालायची वेळ आली. समोर ५० फुटाचा अवघड, खडा पॅच. मग मात्र इशारे झाले की झाला तो टाईमपास पुरेसा आहे, आता कामाला लागा. इथून-तिथून मिथुन झाल्यावर चढायला योग्य जागा पाहून यज्ञेश वर चढू लागला. यज्ञेशच्या हालचालीतला द्राविडी प्राणायाम पाहता पॅच तसा अवघड वाटला. जे धरेल ते निसटून हातात येत होतं. यज्ञेश वर पोहोचला आणि त्यानं रोप लावला. पण यज्ञेश गेला तिथून वर जाणं म्हणजे जरा अवघडच होतं म्हणून मी थोडं बाजूने जिथं कातळ होता तिथून प्रयत्न केला आणि वर गेलो. हा खटाटोप उरकेपर्यंत अंधारून आलं. नाळीच्या तोंडाशी उजेड असला तरी अजुन बरंच अंतर कापायचं होतं, आणि बाकीचे दोघे + सामान वर येतायेता काळोख होणं साहजिक होतं. त्यात उल्हास म्हणजे मी वर आलो तिथं वर रोप बांधायला जागा नव्हती आणि रोप आहे त्या ठिकाणी ठेवून मी चढलो तसं चढताना जरा गडबड झाली की झोपाळा झालाच म्हणून समजा.  मग मी थोडं खाली उतरून सेल्फ-अरेस्टसाठी छानशी जागा निवडली आणि रोप फिरवून घेतला जेणेकरून कुणी स्विंग झालंच तर ते मला कंट्रोल करता येईल आणि बॅगा झपझप ओढता येतील. आधी २ बॅगा वर घेतल्या ज्यात पाणी + हेडलँप होते. मग प्रिती चढून वर आली आणि राजसने उरलेल्या २ बॅगा वर पाठवल्या. त्या वर ओढताना आई आठवाली आणि लगेच वाटून गेलं की गंज चढता कामा नये, ह्या असल्या आडवाटेची सवय असलीच पाहिजे. ओढलेल्या २ बॅगा तिनं वर नेईपर्यंत अंधारात राजस वर आला. सगळा सेट-अप व्यवस्थित बॅगेत जाईपर्यंत ८ वाजले होते. तसं म्हणावं तर पालखीची वाट झाली होती आणि आम्ही खुश होतो. थोडी बिस्किटं पोटात ढकलून आम्ही रवाना झालो.

      घाटमाथ्यावर आलो तरी अजुन गंमत बाकी होतीच. रात्री त्या कारवीतल्या गचपणातून कुसरपेठ ते मोठ्या नाळेच्या वरपर्यंत आलेल्या धारेवर येणं म्हणजे छळ होता. पण मी आधी तिथं वरवरंच ३ वेळा भटकल्यानं मला नेमकी वाट माहित नसली तरी दिशेचा अंदाज होता. शेवटी अंधारात कारवीच्या दाट जाळीतून मारामारी करत आम्ही एका सपाटीला आलो. इथून पुढे वाट मला नक्की माहित होती. मग, दुपारचं खाणं पार जिरलं असल्यानं आम्ही तिथं निवांत बसून खजूरावर ताव मारला. दमछाक झाल्यासारखं वाटणं स्वाभाविक होतं. उशीर तर झालाच होता, पण आता धावपळ करण्यात काही हाशील नव्हतं. तसंही असे ट्रेक करताना आपण उगाच घाई करत येण्यात अर्थ नाहीये हे माझं वैयक्तिक मत. पण मग चारही डोकी एकाच विचाराची असली की घड्याळ पाहत ट्रेक 'मारण्या'पेक्षा निवांत गप्पा मारत खोल दरीत दिसणाऱ्या टीमटीमत्या लाईट पाहण्यात भरपूर काही हाशील होतं. आम्ही तसंही पुण्यात पहाटेच जाणार होतो. त्यात चांदोबा पण साथीला होताच.

      रमत-गमत आदल्या दिवशी सकाळी आलो त्याच धारेवरच्या वाटेनं आम्ही रात्री १२ वाजता कुसरपेठेत आलो. गाडी काढून मध्ये वाटेत काणंद खिंडीच्या अलीकडे एका छानशा जागी गाडी थांबवून झोप काढली आणि पहाटे पुण्यात. आता फडताड साठीचा योग येणं गरजेचं झालं होतं.