नुकताच हापिसातनं आलो. घड्याळ, हेडफोन, बाईकची चावी, हापिसचा पट्टा
स्वतःच्या ड्रॉवरमध्ये ठेवला. कपडे बदलून निवांत आडवा झालो. सुजन त्याच्या वेगळ्या
स्टडी-रूममध्ये जाऊन अभ्यासाला बसला. स्वतःची खोली, सेपरेट पॉवर प्लग, स्वतःचा बेड..
लगेच जुने दिवस आठवले.
ऑगस्ट २०१२. सि-डॅकच्या कोर्सची सुरुवात. बाईक नाही, सायकल नाही.
तसं ओळखीचं शहर पण अनोळखी लोक. पेईंग-गेस्ट म्हणून कॉट-बेसिसवर राहण्याचा पहिलाच अनुभव.
गेटवर बांधलेल्या डग्याला त्याच्याच त्रिज्येत फिरवून दोन माळे गाठावे
लागायचे.
"आरं पाय कुठं ठेऊ नि पायताण कुठं ठेऊ" एवढ्या चपला-बूट
दारात! त्यात सोयीची जागा पाहून रूममध्ये जायचं. बंगाली न्यूज म्हणजे सुजन, बूजगावण्यासारखा
असलेला पंकज, अनोळखी लोकांशी जरा कमीच बोलणारा मनिष दादा, आमच्यात सगळ्यात मोठा.. भात-भरू
म्हाद्या, कोल्लापूरचं योग्या उर्फ बैल, कोल्लापूरचाच अभ्या उर्फ गिगा, पलीकडं आतल्या
खोलीत पाटलांचा उपेश उर्फ उप्या नि लिंबो सायंटिष्ट म्हणजे सुहास. आमच्याच खोलीत कायम
लॅपटॉपवर क्रिकेट खेळणारा सरनदीप उर्फ शेरी पाजी आणि त्याचा गजब दोस्त ग्यानेश उर्फ
***-हंटर, गे-नेस.
चड्ड्या वाळत घालायच्या जागा उमगुस्तोवर आठवडा निघून गेला. तेवढ्यात
कोण किती वेळ आत कडी लावून बसतं ह्याचं वेळापत्रक पण कळालं.
योग्या काय भी झालं तरी ७ च्या आत तयार.
अं ते म्हाद्या त्या वास मारणाऱ्या रगमध्ये पार गुदमरून मेला तरी
झोपणार!
त्याहून दर्जा म्हणजे हे गिगा! ते भी सी-डॅकलाच होतं पण ह्यो आत
गेला कि तुम्ही सगळ्या अपेक्षा सोडायच्या, दात घासून केसाला पाणी लावायचं अं कटायचं.
पहिले काही दिवस तर उप्या आणि सायंटिष्टचं दर्शनच नाय. एकतर डेक्कनने
घरी ये-जा करणार किंवा कडी लावून बसणार. पहिल्यांदा मी ह्यांना पाहिलं ते पिझा खोलीत
नेताना. सुंबडीत पिझा आणणार, सुंबडीत फडशा पाडणार, कुठं आवाज नाय नि ढेकर नाय. मनिष
दादा बिचारा सर्वात उशीरा यायचा, सुजनच्या अलार्मने उठायचा, उठवायचा, परत झोपायचा.
हा झोपला रे झोपला कि लगेच कुणीतरी आंघोळी साठी पाणी सोडणार नि दार उघडं. मग
"दार लोटून घ्या ना बे" पासून "बालदी भरली, आता तरी जा बे" पर्यंत
सगळ्या अपडेट विदर्भी ठेक्यात देणार!
घरी येता-येता तसंच सँडीच्या मेसमध्ये जेवून यायचो. मग तिथं अभ्याशी
गप्पा व्हायला लागल्या. योग्या अन त्यो कॉर्डिनेट करून यायचे, मग हे कसले वांड आहेत
ते कळालं. ते योग्या हसायला लागलं कि डोळ्यात पाणी येईस्तोवर दात काढायचं.
मग एकदा शेरी, पंक्या, गेनेस, मी आणि उप्या लॅपटॉपवर क्रिकेटची नॉक-आऊट
सिरीज खेळलो, तिथं उप्याशी गप्पा वाढल्या.. मग ऍप्टी सोडवायला बसलो कि ह्यो येऊन हैदोस
मांडणार! पण काय भी बोला, ऍप्टीच्या बाबतीत एक नंबर! सुहास तसा जिनिअस क्याटेगरीतला,
९ पॉइंटर वगैरे. सगळे झोपले कि गप अभ्यास करणार. आधी तो नि त्याचा लॅपटॉप हे नवरा-बायको
असल्यागत होतं.
मग रात्री मनिष दाच्या खोलीत अड्डा असायचा. सगळ्यात उशीरा घरी येणारा
मनिष दा, सगळ्यांचे कुटाणे सांगायचा. ऐकून हसून पार आडवे! आधी काही दिवस वेळ जाता जात
नव्हता, पण नंतर खिदळायला रात्र कमी पडू लागली.
वेळ गेला, कोर्स संपला. सुजनला दिल्लीला नोकरी लागली, तो गेला. त्यांचा
कोर्स संपल्याने शेरी, गेनेस आधीच निघून गेले होते. जुन्यातल्यामध्ये राहता राहिलो
मनिष दा, मी, पंक्या, उप्या, लिंबो सायंटिष्ट, अभ्या, योग्या नि म्हाद्या. सुजनच्या
जागी आला विक्रांत देशमुख उर्फ पिंट्या!
अभ्याला पण नोकरी लागली पुण्यातच, ते तिथंच राहिलं मग. मी आणि पंक्या
बेरोजगार! तसे ३ महिने काढले, त्यात जी मजा केली त्याला तोड नाही. दुपारी योग्या, उप्यासोबत
धिंगाणा. संध्याकाळी अभ्या नि योग्यासोबत मेसमध्ये. जेवताना आम्ही का हसायचो ते मेसमध्ये
कुणाच्या बापाला भी कळालं नाही कधी.
असंच एकदा एका रविवारी आम्ही हॉलमध्ये गप्पा मारत बसलो होतो आणि
मनिष दाच्या खोलीतनं कुमार सानूचं गाणं वाजायला लागलं. जाऊन पाहिलं तर मनिष दा गप त्याचं
काम करतोय. मनिष दा नं इशार्यानं सांगितलं कि गाणी पिंट्यानं लावल्यात. मागं वळून पाहिलं
तर हे येडं त्याच्या कानावरचे केस कापत होतं.
हॉलमध्ये जाऊन जे काय हसलो तिज्यायला, नादखुळा.
२-३ दिवसातच पिंट्या आमच्यातला झाला. त्यात तो फेमस त्याचा जोनी
ब्रावो डान्समुळे झाला. ते उप्या नि गिगा नाच म्हणायचं अन हे येडं नाचायचं.
एप्रिल संपायला आला आणि मला नोकरी लागली.
(आग्रहाखातर लिहितोय) एरवी ब्रेड आणि बटर माझं आवडतं खाणं. मी कित्येक दिवस रात्रीचं जेवण म्हणून
तेच खाल्लंय. ते योग्या, अभ्या अन मनिष दा... पार पिडायचे ब्रेड बघितला कि.
मग मी चेंडू म्हाद्याच्या कोर्टात टाकायचो. म्हाद्या म्हणजे घाणीचं
आगार. त्याचा आवडता रंग म्हणजे मळखाऊ! म्हंजी बगा आता. त्यानं मळखाऊ रंग म्हणून आर्मी-कॅमोफ्लेजचं
बनियान घेतलं होतं. त्याच्या पोटाच्या नागाऱ्यामुळं त्यांचं पार झबलं झालं होतं, तरी
ते तेच वापरायचं. मळखाऊ रंगाची रग. ती एवढी घाण झालती कि त्यात किडे भी जागेनात. MPSC ची तयारी करणारा हा गडी दलदलीत उतरायची तयारी करतोय असं वाटतंय.
एकदा शनिवारी रात्री मी, अभ्या, उप्या, सुहास, मनिष दा, पिंट्या
गप्पा मारीत बसलो होतो. बाहेरच्या खोलीत पंक्या झोपला होता. ३ वाजाया आलते. उप्या नि
मला मस्ती सुचली, गेलो, त्येच्या मोबाईलवर ५ चा अलार्म होता, तो ३ चा केला नि गप त्येच्या
पडून राहिलो. एका बाजूला मी, दुसऱ्या बाजूला उप्या. अलार्म वाजला, मी भॉ केलं, त्याची
तिथंच वितभर, त्या बाजूला वळला, तिथनं उप्या, मग हातभर... त्येनं जे काय शिव्या दिल्या..
फुल फुल्या-फुल्या-फुल्या.. आम्हाला वाटलं मरतंय कि काय आता ते धक्क्यानं.
आमचा वीकेंड शुक्रवारी रात्री CS ने सुरु व्हायचा उप्या नि सुहासच्या
खोलीत. रात्री ११ची वेळ, १०×१० ची खोली, त्यात ५ लोक आणि ५ लॅपटॉप.
GiGa, Snake Eyes, CobraCommander, Pintya,
WedaPashi.. मग पहाटे
५ पर्यंत "A ला plant", "गाव हाय तिथं", "बी ला बॉम्बर",
"घंताड्या, ये कि", "WedaPashi attacked a teammate",
"Maddoxच्या......" .. हे सर्वात frequent.
रिकॉईलचा इचार न करता दिसेल त्यावर गोळ्यांचा फवारा करणारा योग्या,
त्यात एखादा फ्रॅग मिळाला कि खुळ्यागत हसणार. शेवटपर्यंत टिकून राउंड जिकवणारे उप्या
नि अभ्या. त्या सुहासच्या मागं जाऊन उगाच मरणारे मी नि पिंट्या. पार पहाटेपर्यंत आवाज
काय कमी नाही. एक-दोन वेळा तर खालच्या काकींनी आवाज दिला धिंगाणा कमी करा म्हणून, तरी
आमचं चालूच.
ते ट्रॉयचं कोल्लापुरी एडिशन.. "ह्येचा तर आधीच गणपत्र्या झालाय",
"जातो मी मग", "खटक्यावर बोट!" १५ वेळा पाहून भी खुळ्यागत हसणारा
योग्या. रविवारी रात्री बासुरीला जेवायला जायचं, तिथं लै हळू जेवणारा अभ्या, म्हाद्याचा
हैद्राबादी भात.
दिवस उलटत गेले, नोकरीसाठी पंक्या सुरतला निघून गेला. पिंट्याचं
सी-डॅक झालं. रोज उठून ते पिंट्याचं "च्या मायला,....." ऐकायची सवय झाली.
मला शेव-फरसाण आणि चिवडा आवडायचा, त्यावरून पण मला जाम पिडला ह्यांनी.
'चिवडा' म्हणालं कि मनिष दा आणि नाशिकच्या नामदेव चिवडाचा फॅन पिंट्या आठवतो भौ.
'चिवडा' आणि त्याला अनुसरून असलेले हातवारे..समजून घ्या! तिज्यायला
चिवडा खायची सोय नाय आता.
वेळ गेला, उप्या नि सुहास कॉलेज संपवून माघारी गेले. मग खो झाला.
मळखाऊ म्हाद्या नि त्येच्या नवा लूममेट (हो, हा टायपो नाही, लूममेट च!) उप्या नि सुहासच्या
खोलीत राहायला गेले, मी अभ्या नि योग्यासोबत त्यांच्या खोलीत राहायला गेलो.
..पुढचं भाडं पुढच्या महिन्यात..
हाट लेका लय हासलो ����
ReplyDeleteDhanyawaad mitra :)
ReplyDeletepintya mumbait aala hota, sangitla astas tar chiwda gheun aala asta to
ReplyDelete