कोळेश्वर - पुन्हा-पुन्हा जावं असं ठिकाण!

बऱ्याच दिवसांनी ट्रेक, बऱ्याच दिवसांनी प्रवास आणि बऱ्याच दिवसांनी लिखाण! 

गेल्या २-३ वर्षांत बोटावर मोजण्याइतके ट्रेक केलेत, त्यावर लिखाण तर अजिबातच नाही. मुळात आवर्जून लिहावं असं काही फिरलोच नाही. गेलं पूर्ण वर्षच घरी असल्याने तर त्या वेळेचा हिशोबच नाही. लॉकडाऊनमध्ये बरीच रंगरंगोटी शिकलो. 'चित्रकला सोड आणि फिरणं पुन्हा सुरू कर' असे कडवट सल्लेही आलेच. कसंय ना, हल्ली काही झालं की त्याचं खापर कोविडवर फोडलं जातंय, माझं मात्र तसं नाही. माझं 'ट्रेकला न जाणारं अस्वल' गेल्या ३-४ वर्षांपासूनच झालंय. जवळपास ८-१० महिने झाले डोंगर फक्त फोटोतच पाहिले, मग बूटावरची बुरशी पुसून आता ट्रेकला जायचंच असं ठरवून थोडं भीत-भीत का होईना ट्रेकचा प्लॅन केला. हो-नाही म्हणत शेवटी इथून एकटंच निघायचं ठरलं. पाठीवरच ओझं आणि पोटावरचं वजन नुसता आराम फर्मावलेल्या पायांना झेपतंय का ह्याची शंका आली, म्हणून गूपचूप मुक्काम टाळून एकच दिवस भटकायचं ठरवलं. परिणामी बरंच ओझं कमी झालं -- ओझं मुक्कामाच्या क्लिअर गणिताचं आणि सामानचंही. वेळ पाहता नेमकं कोणा काका-मामाच्या घरासमोर/पडवीत मुक्काम ठोकण्यात तथ्य नव्हतं. मग पाण्याची जागा पाहून टेंट लावून राहावं म्हणलं तर यंदा वावर कमी असल्याने जनावराची भिती. तसं भित्यापाठी ब्रम्हराक्षस हो, काय करावं आणि काय करू नये हे माहित असताना खरंतर ह्या भितीला जागा नव्हतीच, पण टाळलं. बऱ्याच मित्रांनी "यंदाची वेळ चांगली नाही, सोलो न जाता गावातून सोबत घे कोणाला तरी" असा दम (इतर फुल्या वगळून) दिला. नुकताच आलेला तो कुलंगचा बिबट्याचा विडिओ, हायवेवर होणाऱ्या चोऱ्या-माऱ्या ऐकिवात होत्याच. निमूटपणे गावात फोन करून एकाला सोबत घेण्याची सोय करून ठेवली. जेणेकरून शोधाशोध नको, भले ही शोधाशोध हा ट्रेकचा सगळ्यात आवडीचा भाग असला तरी सध्या नको. 

दोन लोक दोन वेळ पोटभर जेवून उताणे पडतील एवढा खाऊ घेतला. वर काकडी, टोमॅटो आणि संत्री. ४ लीटर पाणी, १ लिटर सरबत. मेडिकल किट, बदलायला शर्ट वगैरे कोंबला की बॅग भरल्यागत वाटलं. 

मध्यरात्री निघायचं टाळून, पहाटे ३.३० ला निघालो. झोपेचं खोबरं! नवीन गाडी, मोकळा हायवे. तासाभरात खंबाटकी घाटाच्या पलीकडे पोहोचलो. वाई फाट्यावर आत वळल्यापासून बाईक जपून चालवत असल्याने रस्त्यात बरंच काही दिसलं. मांढरदेवी फाट्याजवळ मोठं काहीतरी आडवं दिसल्याने गाडी थांबवली. एक उदमांजर नुकतंच कोणीतरी उडवलं होतं. road-kill संदर्भात कितीही पोस्ट कोणीही टाकल्या तरी लोकांच्या डोक्यात प्रकाश पडत नाही. त्याची अजून चिरफाड होण्यापेक्षा बाजूलाच एक कोरडा चर-वजा-खड्डा होता, शेपटला धरून त्याला तिथे आत टाकलं, करायची ती किमया पुढे निसर्ग करेलच.

भल्या पहाटे सुद्धा लिफ्ट मागणाऱ्यांना डावलून पुढे जाणं जरा विचित्रच वाटत होतं, पण नाईलाज, जोखीम त्यांनाही नको आणि मलाही, खरंतर स्वार्थ जास्त होता. सालाबादप्रमाणे रस्त्यात लागणाऱ्या 'केजंळ' चा नेमका उच्चार ४ वेळ मनात घोकून झाला. नेमकं केजंळ आहे की केंजळ मध्ये डिजिटल रंगाऱ्याचा typo झालाय माहीत नाही, दिवसागणिक मॅप्रोच्या पाट्या वाढत आहेत हे मात्र नक्की. नाही, म्हणजे करवंदीची दाट जाळी उडवायची आणि त्या जागी रंगबिरंगी फुलांची निरूपयोगी विलायती झाडी लावायची आणि आतमध्ये ते सगळं organic चं गाजर दाखवायला कसब हवं!

कुडकुडत वाई गाठलं. स्टँडसमोर एक हॉटेल चालू होतं. गुळाच्या ढेपेला मुंगळे लागतात तसे लोक त्या हॉटेलसमोर जमा झाले होते. तिथं पोहे खायचा बेत रद्द करून गाडी जरा लांबच थांबवली. बॅगेतलं बिस्कीट काढलं. महाबळेश्वरकडून एक खचाखच भरलेली ट्रॅव्हल्सची बस येऊन हॉटेल समोर थांबली. बसमधून उतरलेल्या निदान अर्ध्या लोकांचा मास्क दाढीसाठी! चुळ भरून लोकांनी हॉटेलच्या समोरच भाग पिचकाऱ्याचा सडा टाकून पवित्र केला, त्यात ३-४ पोलिसही होते. दुकानदाराचा चेहरा एकंदर पाहण्यासारखा झाला होता, पण काही बोलायची सोय नाही, शेवटी धंदा आहे. तसही करोनाचा काळ असो वा नसो, आपण असेच होतो, असेच राहणार. शिक्षणाने प्रगती होते म्हणतात पण ते साफ खोटं आहे. तिथं न थांबण्याची सद्बुद्धी वेळेत आल्याने मनोमन धन्य झालो. 

असो, जोरकडे जाणाऱ्या रस्त्याला लागलो, गावाबाहेर आलो आणि थंडीने कुडकूड सुरू झाली. धोम धरणाच्या पुढे आल्यावर तर हाता-पायाची लाकडं झाली. पहाट झाल्याने बऱ्याच गावात कुठं ना कुठं एखादी आजी स्वेटर घालून, मफलर गुंडाळून पाण्याच्या बंबाजवळ बसून काहीतरी खटाटोप करताना दिसायची. लगेच लहानपणी घालवलेल्या सुट्ट्यांची आठवण झाली. त्या बंबाशी खेळणं हा आवडता कार्यक्रम असायचा गावी. मग ते घासलेटात (रॉकेल/केरोसीन म्हणलं तर फाऊल असतोय!) चिंध्या बुडवून त्यात सोडणं असो किंवा असलेल्या इनलेट मध्ये पाणी ओतू-ओतू तो बंब काठोकाठ भरणं असो, नुसती धमाल. हल्ली फारसे दिसत नाहीत तसे बंब. 

प्रत्येक गावात पहाटे धावायला आलेल्या पोरांनी छोटी शेकोटी लावलेली होतीच. ठार गार पडलेले हात शेकायची प्रचंड ईच्छा होती पण थांबायचं तर सोडाच, पाय वर घेऊन गाडी रेटवावी लागली, हर गली का कुत्ता इस वक्त शेर होता है! नवीन गाडीला सॉरी म्हणत, फूटरेस्टवर जवळपास उभं राहूनच स्पीडब्रेकर नासल्यागत गाडी तशीच दामटवायची. 

नदीवरचा पूल ओलांडून बलकावडेपाशी धरणाच्या बाजूनं वर आलो तोपर्यंत जवळजवळ उजाडलं होतं. पुढच्या फाट्यावर डावीकडे वळलो, अपेक्षेप्रमाणे रस्ता थोडा कच्चा होताच, कित्येक वर्ष असाच आहे. पुढे वर भैरवनाथाच्या मंदिरापाशी येणारा रस्ता चांगला आहे, मंदिरापाशीच ४-५ मोर दिसले. कॅमेरा नसल्याने चांगले फोटो हुकले. पुढल्या वळणावर पण तेच झालं, गाडी थांबवून gloves काढून मोबाईल काढेपर्यंत सगळं गायब.  मग gloves बॅगेत टाकले आणि पुढे आलो तर पुन्हा मोर दिसले. छान व्हिडिओ काढला आणि मग नव्या गाडीचे ४-५ फोटो काढून गावाकडे निघालो. 

गावात मंदिरामागे गाडी उभी करून सपकाळांच्या घरापाशी येऊन त्यांना फोन केला. सपकाळ मामांनी सोबत येणाऱ्या माणसाला बोलवून घेतलं.  भावकीतले असल्याने ह्या मामाचं आडनाव सपकाळच. "गुरं लावून आलो आताच, कापडं बदलतो आणि भाकर खाऊन येतो" म्हणून मामा घरी गेले.

मी गाडीपाशी थांबलो होतो, गाडी म्हणली की एरवी गावातली पोरं येतात, हात लावून बघतात, एक चक्कर मारून आणा म्हणतात, ह्यावेळी काहीच नाही. पोरं लांब उभं राहून बघत राहिली. आपण आपल्या फिरण्यापायी ह्यांचं जगणं अवघड करतोय का असं वाटून गेलं. खरंतर वादाचा मुद्दा आहे, पण वाटून गेलं की निदान आपलं पोट भरणं अवलंबून नाही ट्रेकिंगवर, आपण घरी बसावं. साधारण १५ मिनिटात मामा आले. कुठं फिरायचं सांगितल्यावर मामांनी साधारण हातवारे करून दिशेचा अंदाज दिला आणि आम्ही वाटेला लागलो तेव्हा ८ वाजले होते.

जोर गावातून एका वाटेने कोळेश्वरच्या पठारावर येऊन, अगदी कोकणात पडणाऱ्या कड्यापर्यंत जाऊन मधल्या वाटेने पाण्याचं टाकं आणि कोळेश्वरचं मंदिर पाहायचं आणि मग दुसऱ्या वाटेने खाली जोर गावात यायचं. तसं जोर गावातून कोळेश्वरला जाण्यासाठी निदान ४-५ वाटा आहेत. मामांनी सांगितलेली सगळी नावं मी पहिल्यांदा ऐकत होतो. 

वर चढायला कुंबळंची वाट, कोकण, महादेव मुऱ्हा, अस्वल खिंड आणि रायरेश्वरच्या नाखिंडीची बाजू दिसते ती जागा म्हणजे रवीची पाटी, वाडीच्या वाटेला लागलो की मध्ये जे पाण्याचं बारमाही टाकं लागतं ते भोंबोवण्याचं पाणी, मग तसंच पुढे कोळेश्वर मंदिर, मग वाडीकडे न जाता पुन्हा जोर गावाच्या दिशेने आलो की खाली उतरायला बेटकावणेच्या दऱ्याची वाट. तसं विशेष अंतर नाही. साधारण १४-१५ किलोमीटरचा फेरफटका असेल. 

कोळेश्वरचं पठार एकतर भन्नाट मोठं आहे, फिरायला पुष्कळ जागा. बऱ्याच लोकांना पठारावर फिरणं तेवढं आवडत नाही. काही ऐतिहासिक कुतूहल नसतं, दाट जंगलाचे पट्टे असले तरी सलग असतीलच असं नाही. वाटेवरूनच दरीत किंवा त्या पल्याड काही खास दिसेलच असंही नाही. पण, अशा जागी उगाच धावपळ करण्यातही काही हाशील नाही. पठारावरून फिरणं हा माझा आवडता खेळ. पठारावर फिरताना माझं सगळ्यात आवडतं खेळणं म्हणजे कंपास. बेअरिंग (चाकाचं नाही, ते वेगळं!) लावून फिरणं हा प्रकारच भारी आहे. ३० फूट लांबवरच दिसत नसताना भर पावसात, भिरभर वाऱ्यात, दाट धुक्यात लपलेल्या हिरव्यागार पठारावर फिरणं जसं मजेशीर, अगदी तसंच कडक उन्हात, काही ठिकाणी तर अजिबातच झाडं नसलेल्या मोकळ्या पठारावर फिरणं ही वेगळी मजा असते. 

माथ्यावरून क्षेत्र महाबळेश्वरकडे पाहिलं तर एक सोंड मुख्य पठारापासून थोडं बाहेर येते आणि जोर गावाच्या पुढे घुमटीच्या वाटेवर असणाऱ्या धनगरवाडी कडे उतरते. त्या सोंडेवर बाल्कनीसारख्या जागी येऊन डावीकडे डोकावलं की एक वाट कुंभळजाई मंदिराच्या दिशेला डावीकडे उतरते, हीच कुंबळंची वाट आहे. तसं पाहावं तर मामांच्या म्हणण्यानुसार त्याच्याही पुढे अजून २-३ वाटा आहेत वर जाण्यासाठी पण ही जास्त वापरातली आहे आणि वरच्या टप्प्यात चढ जरा सोपा होतो. 

रस्ता आणि मंदिर डावीकडे ठेवून झाडीत शिरलो. पहिल्या १० मिनिटांतच घाम फुटला. चढ विशेष नाही, पण आपलं वजन पण काही कमी नाही. मामांशी गप्पा चालू होत्या. मामा क्षेत्र महाबळेश्वरला हॉटेलमध्ये कामाला होते. गेल्या वर्षभरात काम नसल्याने ते आता गावातच होते. तसंही ह्या वर्षी पाऊस जास्त झाल्याने शेतावर बरीच कामं होती. मला दहाच मिनिटात घाम फुटलेला पाहून मामांची चाल जरा संथावली. दर शंभर पावलाला दोन-दोन मिनिटं थांबून चालल्याने जरा हायसं वाटलं. रानात बराच बांबू, करवंद, जांभूळ आणि आंबा. फळ अद्याप एकालाही नाही. गचपण अजिबात नाही. 

वाट एका दांडावरून वर आल्यावर एका टप्प्याच्या पोटात थोडी डावीकडे वळते आणि हलकेच आडवे जाऊन एका बाल्कनीसारख्या जागेवर येते. भटक्यांना डोंगरातली बाल्कनी म्हणजे काय हे सांगणे न लागे! इथं वारा चांगला असल्याने थोडा रेंगाळलोच. धापा टाकून माझा कुत्रा झाल्याचं मामांना कळलं आणि मग तेच थोडं हवेशीर बसू म्हणाले. बोलता बोलता मामांनी साधारण आर्थरसीट ते केट्स पॉईंटपर्यंतच्या सगळ्या वाटा दाखवल्या. इथं अजून निदान २-३ दिवस भटकंती करायला पुरेल एवढं काही आहे. तासाभरात इथं येऊन टेकलो होतो म्हणजे फारच निवांत आलो म्हणायला हरकत नाही. एरवी अशा पट्ट्यात गवत आणि खुरटी झाडी जाळली जातात. सहज म्हणून मामांना विचारलं की वाट वापरात नाही की यंदा वणवा लावला नाही. मामांनी सांगितलं की हल्ली वनविभागाचे लोकं लक्ष्य ठेवून आहेत, त्यामुळे सद्ध्या तरी कोणी तसं काही केलं नाही. एका अर्थी चांगलंच आहे म्हणा. श्रीखंडाच्या गोळ्या खाऊन आम्ही पुढे निघालो. आता चढ तसा नव्हताच. दोनच मिनिटात एक पुसटशी वाट डावीकडे गेली. मामांनी सांगितलं की तिथं पाणी आहे, जे बारमाही आहे. स्वारी खुश, म्हणलं डोकावून येऊ. गाळातलं पाणी आहे, गाळ थोडा बाजूला सारला की पाणी भरतं. अडीअडचणीला कामी येऊ शकतं. 

पुन्हा मागे येऊन वाटेला लागलो आणि साधारण ५ मिनिटांत पूर्ण पठार नजरेस आलं. तरी वाडी, मंदिर वगैरे असलेल्या ईशान्य दिशेकडला बराच भाग मधल्या टेकाडाच्या मागे लपतो आणि दक्षिण-पूर्व येणाऱ्या भागाचा तर हिशोब वेगळाच, ते फिरायला दिवस कमी पडेल. पठारावर आलो तेव्हा निघून दीड तास झाला होता. एव्हाना मामांनाही माझ्या चालण्याचा अंदाज आला असावा. गेल्या पावसाळ्यात पठारावर झालेल्या बऱ्याच गमतीदार गोष्टी मामांनी सांगितल्या. थोडक्यात सांगायचं झालं तर धुक्यात गवे समोर येणं, सोबत वर आलेलं कुत्रं तब्बल चार दिवसांनी भेदरलेल्या अवस्थेत गावात खाली येणं, खेकडा पार्टीला मुंबईचं पाहुणं येणं, वर गेलेल्या चमूतलं एक नग चूकामूक होऊन वाट हरवून २ दिवस वरच अडकणं काय.. काही म्हणलं तरी जमेची बाजू अशी की ह्यावर्षी शेतीच्या कामातून सवड काढून गावची तरुण मंडळी रानात बरीच फिरली. हल्ली ह्या गावांमधल्या तरुणांमध्ये घाटवाटांबद्दल कुतूहल तसं कमी झाल्याचं दिसून येतं. 

वर आलो तसं मामांनी कोणत्या दिशेला काय आहे हे समजावलं. मामांशी बोलून रवीची पाटी गाठताना नेमकं कुठून कुठे कसं जाणार ह्याचा अंदाज घेतला. खांद्यावर काठी आडवी टाकून त्यावर दोन्ही हात अडकवून मामा रवीच्या पाटीकडे निघाले. मीही घड्याळातल्या कंपासवर नजर टाकून निघालो. 

उन्हाळ्याची सुरुवात म्हणाल्यावर पठार तसं कोरडंच असणार, सोनेरी गवतात वाट न दिसणं गृहीत होतं, मामा मात्र झपाट्याने निघाले होते. वाटेत उजवीकडे थोडा खोलगट भाग आला, कडेला मातीत ससा आणि भेकरचे ठसे. पावसाळ्यात डबकं भरत असणार. जवळच मातीच्या ढेकळामध्ये Stridulation सारखा (चरचर) आवाज झाल्यानं थोडं नीट पाहिलं, फुरसं होतं. मामा थोडं पुढे जाऊन थांबले होते. कॅमरा नसल्याने उगाच मोबाईलवर त्याचे फोटो काढायचा नाद सोडून तसाच पुढे गेलो. मामांनी पाहिला असता तर आधी काठी घातली असती त्यावर हे नक्की. 

वर आल्यापासून साधारण पाऊण तासात आम्ही रवीची पाटी म्हणतात त्या भागात येऊन बसलो होतो. जेमतेम १०:४० वाजले असले तरी भयंकर वातावरण बरंच hazy होतं. रायरेश्वर, लपलेली नाखिंड, अस्वल खिंड, कामथे, महादेव मुऱ्हा, ढवळे, चंद्रगड वगैरे परिचित असलेले डोंगर पाहिले. मामांनी कोळेश्वरच्या ह्या खांद्यावरून रायरेश्वरला थेट चढणारी थोडी अडचणीची वाट असल्याचं पण सांगितलं. 

वाटेवर थोडी सावली पाहून थोडा वेळ बसायचं ठरलं. मग गाव-पुणे-नोकरी अशा गप्पा झाल्या. मामांना त्यांच्या मुलींचं फार कौतुक. त्या आणि गावातल्या अजून काही मुली शिकायला क्षेत्र महाबळेश्वरला आहेत. रोज सकाळी गावातून सगळं चढून जायचं, शाळा करायची, बापाला भेटायचं आणि पुन्हा अंधाराच्या आत घरी यायचं, गावातल्या लहान मुला-मुलींचा अभ्यास घ्यायचा, दिवसभर शेतात किंवा गुरापाठी राबणाऱ्या आईला मदत करायची आणि पास व्हायचं! पोरींनी शाळेला ७० टक्के काढल्याचं मूल्य त्यांना पुरेपुर माहीत होतं. वयगाव, जोर, धनगरवाडी, जाधववाडी, बलकावडे गावात मिळून इथली पोरं अभ्यासात अव्वल आहेत. च्यायला आम्हाला सगळं असून माती खाल्ली, अन ही पोरं बघा! मंदिराच्या दिशेने निघालो तेव्हा ११ वाजले होते. 

आलेली वाट उजवीकडे सोडून थोडं डाव्या बाजूला उतारणाऱ्या वाटेला लागलो. पावसाळ्यात फिरायला भन्नाट मजा येईल खरी पण नीट माहीत नसताना धुक्यात ही वाट सापडणं तसं अवघड आहे. सपाटीला लागलो तसं बोलणं कमी झालं, झपझप पुढे निघालो. तरी मामा मध्येच थांबून माहिती सांगतच होते. डावीकडून एक ठळक वाट येऊन मिळाली. तीच वाट कोळेश्वरच्या खांद्यावरून खाली रायरेश्वर आणि कोळेश्वरच्या मधल्या खोगीरात उतरते. त्या वाटेवर पण एक ठिकाणी उजवीकडे वळालो की पिण्याचं पाणी असल्याचं मामांनी सांगितलं. 'जोर - रायरेश्वर - नाखिंड - उलट येऊन जांभळीच्या वाटेने कोळेश्वर - जोर' असा तंगडतोड प्लॅन करू शकतो. मामांना सांगितल्यावर मामा मिश्किल हसले आणि मला सोबत घ्या म्हणजे होईल म्हणाले. 

वाटेत मध्ये गर्द रानाचे २ चांगले पट्टे लागले. कॅनॉपीत घुसतो तिथेच बिबट्याची विष्ठा दिसली. पठारावर तर किती droppings आहेत ह्याचा हिशोब नाही. भेकरं तर भरपूर, खुराचे ठसे आणि टेकडाच्या पोटात असलेल्या दात जंगलात त्यांचा आवाज. इतका वेळ लांब दिसणारं ते टेकाड आता उजव्या बाजूला ठेवून वाट थोडी डावीकडे वळली. गर्द झाडीत एकदम अनपेक्षित असताना पाण्याची जागा दिसते. हेच ते भोंबोवण्याचं पाणी. निवांत वेळ घालवायला, झोप काढायला एक नंबर जागा!

गुरं ह्याच पाण्यावर जगतात म्हणून त्यांना पद्धतशीर बांधलेलं वेगळं डबकं. माणसांना पिण्यासाठी पत्र्याचं झाकण असलेलं छोटं टाकं. 


दुपारचे बारा वाजले होते, आसपास बरीच गुरं होती, आम्ही असल्यानं पाण्यापाशी येईनात. मग पाणी भरून घेतलं आणि आम्ही मंदिरापाशीच थांबायचं ठरवलं. इथून मंदिर फारफार तर १० मिनिटं पुढे आहे. रवीच्या पाटीपासून तासाभरात इथे पोहोचल्याने मामा जरा निवांत होते. मंदिराच्या पाटीपाशी आलो तेव्हा तो आवारातील खांब सोडला आणि ती मंदिराची पाटी वगळता तर इथं मंदिर असेल हे जाणवलं पण नसतं. मंदिराची जागा खास आहे हे वेगळं सांगायलाच नको. चहूकडे दाट झाडी, दगडाचं कुंपण, जिर्णोद्धाराच्या तोकडेपणाचा लवलेश नाही. लाईटसाठी खांब आणि त्यावर सोलार-पॅनल. बूट कुंपणाबाहेर काढूनच आत गेलो, डोकं टेकवलं. जेवायला सगळं शुद्ध (मामांच्या भाषेत, म्हणजे शाकाहारी) असल्याने मामा आवारात सावलीला बसू म्हणाले. आणलेली फळं खाल्ली नसल्याने मामांनी संत्री देवाला दाखवून बाजूला चरत असलेल्या गाईला भरवला आणि जेवण उरकलं.

जमल्यास ३ पर्यंत वाडीत उतरावं असं मामा बोलून गेले. त्यांना पुढे कोणाच्या शेतात थोडं काम मिळणार असल्याचं कळलं. उगाच आपल्या थोड्या आळसापायी त्यांचं नुकसान करणं चूक वाटलं.  वाडीपाशी जाण्यात तसंही काही तथ्य नव्हतं. परतीच्या वाटेला लागलो तेव्हा दुपारचा १ वाजला होता. तरी ऊन तेवढं जाणवत नव्हतं. इथून जोरकडे उतरणारी वाट रोजच्या वापारात असल्याने जमेल तेवढी सावलीतून आणि प्रशस्त आहे. वाटेत एक फाटा फुटून डावीकडे वळतो, ती वाट कोळेश्वरच्या दक्षिण-पूर्व भागातून माडगणीला उतरते. त्या वाटेवर पण एक देवीचं ठाणं असल्याचं सांगितलं, तिथूनही पुढे माडगणी पर्यंत अंतर बऱ्यापैकी आहे.  उजवीकडच्या वाटेने दऱ्यापाशी बाहेर आलो, तिथे मात्र ऊन लागलं. 

बेटकवणेचा दरा वापरात का आहे ते पाहता क्षणी कळलं. पठारापासून पहिल्या दीड-दोनशे फूटांत जी काही हेराफेरी आहे. त्यांनतर एक सरळ बोडका दांड आहे जो थेट गावाच्या उजवीकडे रानात उतरतो. उतरायला सुरुवात केली तेव्हा १:४० वाजून गेले होते. ऊन असल्याने साधारण पळतच खाली आलो. गावामागच्या रानात पोहोचलो तेव्हा २ वाजले होते. मामांना समोर वाटेत नाग दिसल्याने त्यांनी अचानक थांबवलं. पण मला दिसेपर्यंत तो गायब. मग वाट सोडून थोडं वरच्या बाजूने वळसा घालून आलो. "महादेवाला जाऊन आलो, का उगा नागाला काठी लावावी" म्हणत मामा पुढे निघाले. हे समीकरण माझ्या डोक्यातही आलं नाही. डांबरी रस्त्याला लागलो की मांड्या बोलू लागल्या. फिटनेस अजिबातच नसल्याची पुस्ती मिळाली. एरवी एवढ्याशा उतरणीने फारसा फरक पडत नाही. काठी दामटवत गाव गाठलं तेव्हा मामांना शेताकडे कामावर जाण्याआधी तासभर पडी मारायला वेळ मिळाल्याचं समाधान होतं. मामांनी भाकर खाऊन जाण्याचा आग्रह धरल्याने मीही विशेष विचार केला नाही. 

निघताना मामांनी नाव आणि नंबर लिहून घेतला. आता गावात कधीही गेलो तरी एक गडी सोबतीला येईलच!दुकानवाले सपकाळ मामा वाईला गेले असल्याने फक्त त्यांच्या घरी सुखरूप खाली आल्याचं कळवलं आणि साधारण ४ वाजता परतीच्या प्रवासाला निघालो. रविवारच्या दिवशी लिंबूपाणी पीत दिवसभर बसून राहायला कारण मिळालं होतं.

सौजन्याची ऐशी-तैशी!

ही पोस्ट साऱ्या फुल्या फुल्या फुल्या वगळून!

कधी एकदा एक दिवस असा "नडेल त्याला तोडेल" टाईप येतो की तुम्ही दुर्लक्ष करण्याच्या मनःस्थितीत नसताच, आणि तेही अगदी विनाकारण. म्हणजे ना काम अडलेलं असतं, ना मॅनेजर उखडलेला असतो. पण तुमचं डोकं उडालेलं असतं.
मग ते झेब्रा क्रॉसिंगवर गाड्या उभ्या करणारे असो, किंवा ज्यांच्या अनपढ आई-बापानं त्यांना सिग्नलच्या बाबतीत १० सेकंद म्हणजे ० सेकंद असं काहीसं गणित शिकवलंय ते असो. स्टेशनच्या सब-वे मध्ये असलेले थिल्लर आणि छपरी लोक, गाड्या लेट होणं, पचापच थुंकून लाल झालेला प्लॅटफॉर्म, रेल्वे ट्रॅकवरचा गू, त्या गू वर बसलेल्या त्या माशीने उडून बाजूच्या वडेवाल्याच्या हातावर घोंघावणं वगैरे सगळं अगदी नॉर्मल झालंय आपल्यासाठी. माझी एक तीव्र ईच्छा आहे, मला ना एकदा त्या ऑटो वाल्यांना छळायचंय येता-जाता रस्त्यात त्यांची गाडी अडवून, "रेस कोर्सला जाणार का?" तो "हो" म्हणाला की "जा की मग" म्हणायचं. वाद झालाच तर उलट प्रश्न करायचा, "आमच्या वाटेने आम्ही जात असताना तुम्ही येतातच ना आपली घालायला?"

मग ते पाणी वाल्याने १५ रुपये MRP असलेली बाटली २० रुपयाला विकणे काय, २५ रुपये MRP असलेली लस्सी ४० ला विकणे काय, त्या चिक्कीवाल्यांमध्ये रेल्वेच्या डब्यांची वाटणी, मग त्यात दमदाटीही आलीच. भेळ खाऊन कागद खिडकीबाहेर टाकणारा एक तरी असतोच. मंकी हिल ला गाडी थांबली की लोकांची माणुसकी जागी होते,मग तिथल्या माकडांना काहीतरी उरलेलं खायला देणं आलंच. आपण त्यात त्यांचं बेसिक सर्वाईवल इंस्टिंक्ट संपवतोय वगैरे असले विचार मैलभर लांब असतात. पैसा फेको, तमाशा देखो वाल्या लोकांना काय कळणार हे सगळं. मग, ट्रेनमध्ये पैसे न दिल्याबद्दल तुम्हालाच काहीतरी वाईट बोलून जाणारे भिकारी आलेच. अरे तुम्ही भिकारी आहात, पण मीही श्रीमंत नाही ना, मी का पैसे देऊ तुम्हाला? Thats entirely your problem.
कधीकधी तर वाटून जातं की रेल्वेत RPF आणि TTE  पेक्षा जास्त अथोरिटी हिजड्यांची आहे. ४ टाळ्या वाजवून पैसे गोळा करणे हे त्यांचं काम. पण मला ते अक्षरशः एक्स्टोर्शन वाटतं. ते भयंकर प्रकार असतात. एखाद्या तरुणाला पैसे दे नाहीतर पाय वर करून तोंडाजवळ साडी वर करेन वगैरे असल्या धमक्या चार-चौघात देऊन १० रुपये घेऊन जाणे ह्याला दुसरं काय म्हणायचं? हीच गोष्ट एखाद्या मुलीच्या बाबतीत झाली तर त्याकडे एवढा कानाडोळा होईल का? हे प्रश्न वेगळेच आहेत. पोरगंही शहाणं झालेलं असतं, १० रुपयात वेळ मारून नेतं. ह्यासाठीच मला वरचा बर्थ आवडतो.
बिनपावती ५० रुपये आणि पावती हवी असेल तर ८० रुपये होतील असं एकदम प्रोफेशनली सांगणारा TTE. वाटून जातं की काय abuse केलाय सगळ्या गोष्टींचा.

नेमकं असल्यात अजून कुणी नग समोर आला की मग त्याला पडायची शक्यता जास्त असते.
माझंही तेच झालं आज. रेल्वेत हे असे असंख्य प्रकार रिचवत कसतरी कल्याण येत होतं. कर्जतच्या नंतर एक पंचवीशीतला तरुण आला. त्याच्या पॅन्टमधून ढुंगणाचा अर्ध्यापेक्षा जास्त भाग डोकं (की ढुंगण म्हणू?) बाहेर काढू पाहत होता. लालसर डोळे, दारूचा भपकारा, पँटच्या खिशात सिगारेटचा बॉक्स वगैरे. हातात पाण्याची घाणेरडी बॉटल, प्लास्टिकच्या पिशवीत साधारण काल किंवा परवा शिजवलेला भात. चहाचा कप. पायात स्लीपर. दाराजवळच्या कुपेच्या अप्पर बर्थला चढला. पाय तसेच खाली लोंबकळत सोडलेले. माझी बाराखडी मनातल्या मनात तेव्हाच चालू झाली. एक डुलकी झाली, वांगणी-बदलापूर दरम्यान कुठंतरी असू, अप्पर बर्थ वर बसून, ऐटीत टिचकी मारून साहेबानं चहाचा कप खाली लोकांच्या पायाजवळ उडवला. ठीक, जाऊ दे. कल्याणला लोक उतरायला दाराजवळ जमा झाले तरी त्याचे पाय खालीच. स्वतःच्या गर्लफ्रेंडचा एकंदर discomfort पाहून एका सुजाण पोरानं त्याला हटकलं, पाय वर गेले. बरं वाटलं. सगळी गर्दी उतरली की मी टुणकन उडी मारून खाली आलो, चप्पल सरकवली आणि दाराकडे निघालो. काही लोक घाईत गाडीत चढले होते, त्यात त्या साहेबांच्या बरोबर खाली एक पोरगी येऊन बसली. का देव जाणे, साहेबांनी अलमोस्ट माझ्या पायावर शिळा भात सांडला. मग मात्र सटकली.
"काय करतोय रे?" पासून माझा पट्टा जो काही चालू झाला ते त्यानं "कचरा किया तो तेरा क्या जात है?" असं मला विचारल्यावर फुल्यांवरच थांबला. स्वतःचा उगरलेला हात तब्बल ३ वेळ आवरता घ्यावा लागला. शेवटी त्याला गाडीतून खाली उतरवून २०-२५ लोकात चांगल्या दणदणीत आवाजात धमक्या देऊन हकलावल्यावर शांत झालो.

वड्यावरचं तेल वांग्यावर उतरायचंच होतं. कल्याणला लोकल मध्ये चढून ठाकुर्लीला उतरायचं म्हणून साईडला थांबलो. फ्रंटला एक छपरी लटकत होता. एकदा थुंकला, दोनदा थुंकला. इजा-बीजा-तीजा झाल्यावर तिज्यायला घोडा लावायची मला सवय. वाटच पाहत होतो. तिसऱ्यांदा थुंकला.
"झाली नक्षी काढून?", मी.
"काय?", तो.
"घरात असा कोपरा ठेवलायंस थुंकायला? का आई-बापाच्या ताटात थुंकतोस? नाही, म्हणलं, तीनदा थुंकलास, बघू काय कलाकारी आहे ते", मी.
"तुला काय, तू आपली बघ", तो.
"नाही कसंय ना भाऊ, टॅक्स आम्ही भरायचे, स्वछ भारत सेस आम्ही भरायचा आणि तू बापाची जहागिरी असल्यासारखं थुंकत फिरायचं म्हणजे जरा अवघड आहे, पण काय आहे ना, तुझा दोष नाही, तुझे आई-बाप भिकारडे असल्यावर तू तरी काय करणार?" मी.
हाणामारी लागायच्या आतच लोक मध्ये पडले आणि इतक्या वेळ स्वतः मागे पचापच थुंकलेल्या दोघा-तिघांनी त्याला ढकलपट्टी चालू केली. सगळीच पोरं बाजीरावाची औलाद ना इथे. त्यांना त्यांची जागा दाखवून शेवटी डोंबिवलीला उतरलो.

कसंय ना, माझ्या मते, स्वतः काही करायच्या थ्रेशोल्डला येईपर्यंत थांबणे म्हणजे संयम. स्वतः काही ईलाज करू शकत नसताना सहन करणे म्हणजे सहनशक्ती. काही करायची ईच्छा असताना, आणि मुळात त्याची गरज असताना शेपूट घालणे म्हणजे शहाणपण नाही, त्याला चुत्यागिरी म्हणतात.

बाकी, सौजन्याची आणि माणुसकीची एशितैशी.

- WedaPashi

"... दगडांच्या देशा"

"राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा"

लहानपणी हे बक्कळ वेळा ऐकलंय. बाजूच्यांच्या आवाजाला 'काय केसभर आवाज तुझा, हाल इकडंन' असल्या ऍटीट्युडने आवाज वाढवत म्हणलं पण आहे. 
लहानपणी कसंलं भारी होतं ना, मोठे-थोरले जे पितात ती कॉफी म्हणजे कॉफी. उगाच फिल्टर, डबल, कोल्ड आणि तसे अजून १७६० प्रकार माहीतच नव्हते. लोकल ती लोकल, कसली फास्ट अन कसली स्लो. डोंगरांचं पण तसंच होतं. 'कळसुबाई हे महाराष्ट्रातले सर्वोच्च शिखर आहे' असं काही वाचलं कि डोळ्यासमोर नेमकं ते शिखरासारखं काही उभं राहतच नव्हतं. शिखर म्हणजे मंदिराचं शिखर डोक्यात जास्त बसलं होतं.
मग उगाच इंजिनिअरिंगला आलो आणि ते घडीचे पर्वत, वली पर्वत, ज्वालामुखीय पर्वत, अग्निजन्य खडक, हिमनद्या, जमिनीची धूप सगळं सगळं कुठंतरी माथ्यातनं गळून गडप झालं. 'पुढचं पाठ अन् मागचं सपाट' हा प्रकार भयंकर महागात पडतो.

ट्रेकिंग चालू होऊन २-३ साल उलटले तरी उगाच लोकांच्या जत्रेला म्होरक्या बनून भटकल्यावर लोकांच्या चंगळपणाचा शीण आला, स्वतः अपडेट व्हायची भूक कुठंतरी जाणवली. थरावर चढलेले थर उडवत थोडी डोळस भटकंती सुरु झाली आणि जाणवलं कि अगदी आजही आपल्याला अचंब्याने कोड्यात पाडणारं आपल्याकडे भरपूर काही आहे. डोंगरयात्रेला अनेक पैलू आहेत. त्यांची साधारण गोळाबेरीज करायची झालीच तर ती इतिहास, भूगोल, जैवविविधता, लोकजीवन इथवर मांडता येईल. कधीही न थांबणाऱ्या आणि लाखो वर्षांच्या प्रवासाचा साक्षीदार आहे आपला पश्चिम घाट. त्यानं मानवजीवन उदयाला येण्याआधीच्या काळापासून स्वतःत सुद्धा होत असलेले अमूलाग्र बदल रिचवीत वेळेच्या सर्व करामती पाहिल्या आहेत, वेळप्रसंगी तो कोसळला आहे, तर कधी निर्भीडपणे छाती ताणून उभा राहिला आहे. ह्या सर्व घटनांचा इतिहास, भूगोल, जैवविविधता आणि लोकजीवन ह्यांवर प्रभाव न दिसावा तर नवल.

आपल्या आवाक्यात मोजायचं झालंच तर पश्चिम घाटाचा जो भाग आपण पाहतो, तुमच्या-आमच्या दैनंदिन जीवनातला अविभाज्य घटक, ज्यानं आपलं साधारण जीवन सुजलाम्-सुफलाम् केलं तो म्हणजे सह्याद्री.
'आम्ही ट्रेकर, आम्ही ट्रेकर' म्हणत भटकणारेच नाहीत तर इतर प्रवासीगणाला पण कधी कधी आश्चर्य झालंच असेल डोंगरांचे अक्राळ-विक्राळ उंच-ठेंगणे आकार पाहून.
आपण डोंगरदऱ्यात फिरतो, कधी एखाद्या छानशा नैसर्गिक गुहेत, तर कधी एखाद्या घळीत राहायची वेळ देखील येते, कधी पावसाळ्यात किंवा धुक्यात पुरुषभर गवतात वाट हरवल्यावर जरा विसावायला, कुडकुडत का होईना दोन घास एकत्र बसून खायला एखादा सपाट कातळ मिळतो. ही सगळी गंमत सह्याद्रीच्या वैविध्यपूर्ण अशा भौगोलिक रचनेमुळे आहे.
मुळात डोंगराची रचना आणि आजूबाजूचा परिसर ह्या गोष्टी त्या जागेचा इतिहास जागवतात. बऱ्याचदा ह्या विशिष्ट रचना आपल्यासाठी वेगळा अनुभव देऊन जातात. तशात, भटकंतीच्या सोबतीला थोड्याफार अभ्यासाची सांगड घातली की मग तिला डोळस भटकंती म्हणायला हरकत नाही. ह्या सर्व गोष्टी त्या स्वरूपात येण्यामागे विज्ञान आहे, ज्याच्या अभ्यासाची मजा काही औरच!

गडगडा किल्ल्यावरून दिसणारा परिसर 

सुरुवात करायचीच झाली तर लांबलचक पण ठेंगण्या डोंगररांगा, उंच-ठेंगणे सुळके, छाताड काढून उभे राहिलेले कातळकडे, कमी-अधिक रुंदी-उंचीच्या बेलाग भिंती ज्यांना आपण डाईक्स ह्या नावानं जास्त चांगलं ओळखतो, ह्या काही आपल्या परिचयाच्या गोष्टी झाल्या.. मग त्यात नजर टिकत नाही एवढे लांब सडे, अरुंद घळ्या, नैसर्गिक गुहा, रांजण-खळगेही आलेच.
पसरट डोंगररांगांचं उदाहरण द्यायचं झालं तर उत्तर किंवा उत्तर-पूर्व महाराष्ट्रात असलेल्या पश्चिम घाटाचा काही भाग योग्य उदाहरण ठरतं. 
साधारण कमी चढ-उताराच्या डोंगररांगा, कुठंतरी एखादं तुलनेत कमी उंचीचं शिखर. ह्या रांगांचा माथा तसा समतल आणि दूरवर पसरलेला असतो. ह्या प्रकारची डोंगरयात्रा करायची झालीच तर मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र ह्यांच्या सीमेवरील बार्शी, उस्मानाबाद, लातूर, माहुरगड भाग, पूर्व सोडून थोडं उत्तरेकडे सरकलात तर बीड आणि उस्मानाबाद जिल्ह्याच्या सीमेवरील येरमाळ्याकडील भाग, मग त्यात पार बीड शहराजवळील बिंदूसारा नदीचं खोरं किंवा येडशी-बार्शी दरम्यानचा रामलिंगचा परिसर ह्या देखण्या जागा आहेत. नाशिक आणि औरंगाबाद जिल्ह्याच्या जवळचं सांगायचं झालं तर गौताळा-कन्नड भाग, मग मनमाड-नगरसोलचा अंकाई-टंकाईच्या आसपासचा भाग थेट औरंगाबादच्या गुहांपर्यंत पसरत जातो. तुलनेने उंची विशेष नसलेल्या, अगदी मंद उताराच्या ह्या रांगांना भूगोलाच्या भाषेत 'Sills' म्हणतात. थोडक्यात सांगायचं झालं तर वाहत आलेला लावा पसरला आणि तो पूर्ण थंड होऊपर्यंत एकावर एक जे थर जमले, त्या ह्या रांगा. आता, जेवढा जास्त वेळ लागला थंड व्हायला त्यावर खडकाचा प्रकार ठरतो. त्यावरून ह्या सगळ्या भागात भटकलात तर जाणवतं कि बार्शी-येरमाळ्याची ढेकळं आणि गौताळा किंवा अंकाई-टंकाईच्या आसपासच्या डोंगरांवर मिळणारी दगडं ह्यात फरक आहे. रंग, आकार, ठिसूळपणा सगळं वेगळं! ठिसूळ खडकांच्या sills असलेल्या भागात माणसानं कलेच्या भुकेपोटी खोदलेल्या गुहा सापडणं म्हणजे काही तुरळक उदाहरणे सोडली तर तसं अवघड. 

घाटमाथ्यावरून थेट कोकणात कोसळणारे कडे हे एक सह्याद्रीचं अद्भुत वैशिष्ट्य आहे. एरवी कड्यासारखा कडा म्हणून लहान-मोठे सगळे टप्पे एकमेकांचे भाऊ-बंधू वाटायचे. थोड्या अभ्यासानंतर वाटून गेलं कि त्यातही भरपूर विविधता आहे. ती कशी आणि कुठे मांडता येईल असा विचार नक्की डोक्यात आला नसेल तर नवल.

महाबळेश्वरच्या आर्थर सीट पॉईंटवरून दिसणारी दरी (P.C. सागर मेहता)

काही ठिकाणी कोकणकड्यासारखे बेलाग कडे आहेत, तर काही ठिकाणी आर्थर सीट वरून दिसतात तसे कडे आहेत. दोघात जो फरक आहे तो वाखाणण्याजोगा नक्कीच आहे. साधारणतः सह्याद्रीत सर्वच ठिकाणी कोकण आणि घाटमाथा यामध्ये ज्या प्रकारचे टप्पे आढळतात त्याला जगभर डेक्कन ट्रॅप्स असं संबोधलं जातं. एकावर एक असे खडकाचे थर जमून तयार झालेला घाटमाथा आणि परिणामी दिसणारी खोल दरी. नीट पाहिलं तर हे वेगळे थर ओळखता पण येतात. कोकणकडा सोडून जरा उजवीकडे म्हणजे नळीच्या वाटेकडे डोकावलं तर असे थरच्या थर दिसून येतात, किंवा कोळेश्वर, रायरेश्वर, आर्थर सीट, वासोटा, धाकोबा यांसारख्या ठिकाणी तर हे थर नजरेत पटकन येतात. ह्यांची एक वेगळीच गंमत असते. नजर न टिकावी एवढी खोल दरी समोर असली तरी ह्यात कुठे न कुठे एका थरावरून दुसऱ्या थरावर असं करत कोकणातून घाटमाथ्यावर जाणाऱ्या कमी-जास्त कठीण चढणीच्या वाटादेखील आहेत. ह्या वाटा कधी वरच्या टप्प्यात आडव्या फिरतात आणि कुठे एखादी खिंड किंवा तत्सम लहान जागा मिळाली की त्यातून माथ्यावर येतात. ह्यातल्या बर्याच वाटांच्या नावात 'पाज', 'सर', 'निसणी' असे शब्द येतात. 
याउलट असतात ते थेट कोसळणारे कडे, ज्यांना एक वेगळं भौगोलिक वैशिष्ट्य म्हणता येईल. कोकणकडा, नाफ्त्याची पश्चिम बाजू, नागफणी, नानाचा अंगठा, कात्रा आणि करंड्याचा रतनगडाच्या बाजूकडील भाग हे आपल्या परिचयातले कातळकडे. 

ह्या अशा कड्यासोबतच डोंगरयात्रेत माझ्यामते सर्वात जास्त लक्षवेधक रचना म्हणजे डाईक्स आणि सुळके. 
तेलबैला (P.C. सागर मेहता)

डाईक्सचं उत्तम उदाहरण द्यायचं झालं तर मोरोशीचा भैरवगड. कल्याणहून नगरकडे जाताना नाणेघाटनंतर रस्त्याबाजूचा एक डोंगर लक्ष्य वेधून घेतो. केसात फणी उभी ठेवावी असा त्याचा आकार आहे, तोच भैरवगडाचा डाईक. त्याचबरोबर डाईक्स म्हणलं कि पदरगड, धोडप किंवा मावळातल्या तेलबैलाच्या जुळ्या भिंती नजरेसमोर उभ्या राहतात. डाईक्सची अजून उदाहरणं म्हणजे ब्रम्हगिरीच्या पूर्वेकडे असलेला तळईचा डोंगर, पनवेल-खोपोली रस्त्यावर मोरबे धरणाजवळचा इर्शाळगड, अंजनेरीच्या पूर्वेकडे असलेला रांजणगिरी, कांचन्याच्या शेजारचा लेकुरवाळीचा डोंगर,  कुंजारगडाच्या बाजूलाच असलेला कोंबडकडा सुद्धा किरकोळ उंचीचा असला तरी माझ्यामते डाईक्स गटात मोडतो. सरळसोट, कमी-अधिक लांब, उंच आणि अरुंद. साधारणतः लांबी जास्त आणि रुंदी तुलनेने कमी अशा रचनेला डाईक म्हणता येईल, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे उंचीची काही अट नाही. मग जशी रुंदी वाढत जाते, आणि लांबी कमी होत जाते तिथं थोडा गोंधळ उडतो: डाईक कि सुळका? ह्याच उत्तर दोन्ही पैकी काहीच नाही.

जगभरात ह्या अशा रचनेसाठी 'Butte' अशी एक संज्ञा आहे. ह्यांचं सर्वात जवळचं उदाहरण द्यायचं झालं तर वांगणीचा चंदेरी, ज्याला आपण सोईस्कररीत्या सुळका मानतो. चंदेरीसोबतच तुलनेने अपिरिचित उदाहरणं शोधायची झालीच तर त्या यादीत अंजनेरीच्या दक्षिणेला असलेला कोथळ्याचा डोंगर, घरगड ज्याला आपण गडगडा असंही ओळखतो त्याच्या बाजूचाच अघेरा डोंगर इत्यादी नाव जोडता येतील. औंधा-पट्टा जोडगोळीतला औंधा किल्लाही ह्यातलं एक उदाहरण म्हणता येईल. इंद्राईच्या डावीकडे खेटून असलेला छोटा डोंगर, कांचना आणि कोळधेर ह्यांच्या मध्ये असलेला बाफळ्याचा डोंगर, इखाऱ्याची वरची शेंडी अशी अजून काही उदाहरणं देता येतील.
ह्यांचं साधारण वैशिष्ट्य असं दिसतं कि लांबी आणि रुंदी ह्या दोन महत्त्वाच्या बाबींवर तुलना करायची झाली तर डाईक्स पेक्षा हे कमी लांबीचे आणि जास्त रुंद असतात, बेलाग असल्याने चारही बाजूने शक्यतो कडा किंवा अति तीव्र उतार.

मोसे खोऱ्यात फिरताना लक्ष्य वाढणारा एक लहानसा सुळका (P.C: प्रिती पटेल)

आकारात रुंदी कमी कमी होत गेली की जी भौगोलिक रचना बनते तिला आपण सुळका असं म्हणतो. जीवधन किल्ल्याला खेटून असलेली वानरलिंगी, बाण, अग्निबाण, मनमाडजवळची हडबीची शेंडी, कर्नाळ्याचा अंगठा, ढाकचा कळकराई, घरगडसमोरचा डांग्या, माहुलीचा वजीर हे सगळे सुळके आहेत. बोलीभाषेत ह्या अशा रचनांना 'लिंगी' असंही संबोधलं जातं. कमी-अधिक अवघड श्रेणीच्या अशा ह्या सुळक्यांवर चढाई करणं हा गेल्या ३-४ दशकांपासून आपल्याकडील एक लोकप्रिय साहसी क्रीडाप्रकार झाला आहे. 

ह्यानंतर सांगायचं झालं तर 'सडा' नावाचा जो प्रकार आहे त्याची दखल घ्यावीच लागेल. अगदी मोजक्या जागी विविध आकाराच्या दगडांचे सडे आपल्याला सह्याद्रीत आढळून येतात. असे सडे पार करणं हा दमछाक करणारा प्रताप असला तरी तो एक वेगळा अनुभव असतो. अशा सड्यांचं उत्तम उदाहरण म्हणजे प्रचितगडाजवळचा सडा, ज्याला आपण 'प्रचितचा सडा' असं ओळखतो. 


असे सडे साधारण त्या भागात भरपूर प्रमाणात आढळतात. पांढरपाणी सडा, वाल्मिकी सडा, झोळंबी सडा, वागूळ सडा, येंबुळ सडा, दाजीपुर अभयारण्यातला सडा, जवळचं पाहायचं झालं तर तुलनेने कमी क्षेत्रफळाचा असा सडा धाकोबा किल्ल्याच्याजवळ आहे. हे सडे निर्माण होण्याचं प्रमुख कारण म्हणजे 'फ्रीझ-थॉ' नावाची एक प्रक्रिया. अगदी खोलात न शिरता सांगायचं झालं तर ही प्रक्रिया म्हणजे खडकांच्या चिरांमध्ये पाणी मुरणे आणि ते प्रसरण पावणे, ज्यामुळे खडकाचे तुकडे होणे.

मग नंबर लागेल तो टेबल लँड्सचा. जवळपास सर्वच दिशेनं फार कमी फरकाने असणाऱ्या कमी-अधिक उंचीच्या भिंती. कुठेतरी त्यात एक भेद असल्याने वर चढायला वाट. बाकी साधारण विस्तार सपाट!
ह्याला जगभरात 'Mesa' म्हणतात. आपल्या परिसरात ह्याची पुष्कळ नसली तरी ठळक उदाहरणं आहेत. सातशिरा, सुसेरा (सासऱ्याच्या डोंगर पण नाव आहे ह्याला), अंजनेरीच्या बाजूलाच त्या मुळेगाव-वाढोली खोऱ्यातला डोंगर अशी काही उदाहरणं आहेत. पाचगणीचा टेबल लँड तर सर्वज्ञात आहेच. कुलंग आणि मनोहरगडाचा आकार मला तसा ह्या व्याख्येत बसतो असं वाटतं, पण निर्मितीची प्रक्रिया मला तेवढी ठळक माहित नसल्यामुळे उगा मी काहीतरी लिहायचं अन् ते नेमकं बाजीरावाची शेंडी अब्दालीला बांधावी असं काही व्हायला नको, म्हणून काही लिहिणं टाळतो.

वरील प्रकारांव्यतिरिक्त आपल्या भूगोलात अरुंद दऱ्या किंवा उंच घळी असेही प्रकार आढळतात. अरुंद दरीचं सर्वज्ञात सर्वोत्कृष्ट उदाहरण म्हणजे रतनगड - घाटघर परिसरातली सांधण व्हॅली. सांधणसारख्याच एक-दोन लहान नोंदी सोडल्या तर अशी रचना सहसा आढळत नाही. 
हा, एस्कार्पमेंट आणि घळ (narrow gorge) ह्यामध्ये गल्लत होऊ शकते कदाचित, पण ती एका विचारांती टाळता येईल. एस्कार्पमेंटचा आवाका तुलनेने तसा मोठा असतो आणि पूर्ण असतो, कधीकधी घळी मधल्या पदारात येऊन लुप्त होतात, किंवा साधारणतः कमी-जास्त प्रमाणात दिशा बदलतात त्यामुळे माथ्यापासून ते तळापर्यंत एकसंध राहिलंच असं नाही. जवळपास सामान उंचीच्या लांब पसरलेल्या पठाराला मध्ये एखादा अरुंद spur वरपासून ते खालपर्यंत भेदत असेल तर ती रचना म्हणजे एस्कार्पमेंट. ह्यांचा विचार करून माझंही जरा तळ्यात-मळ्यातच झालंय मत. 

A typical needle hole in the mountain (P.C. सागर मेहता)

आपल्या आसपास सर्रास दिसणारा आणखी एक प्रकार म्हणजे नेढं. कितीही देखणं पण निरुपयोगी वाटलं तरी ह्याची ह्या यादीत नोंद होणं गरजेचं आहे. मला तर त्याचं खास आकर्षण आहे. काही ठिकाणी नेढ्यामध्ये सहज जाता येतं तर काही ठिकाणी मात्र खूप कसरत केली तरी ते शक्य होत नाही. एरवी राजगड, रतनगड इथली नेढी पुष्कळ वेळा पहिली तरी आमची हरिश्चंद्रगडाचं नेढं पाहायची भूक काही मिटेना. अशक्य उपद्व्याप करत आम्ही नेढ्याच्या पट्ट्यात पोहोचलो खरे पण कारवीच्या जाळ्या काही पुढे सरकू देईनात. थोडा अभ्यास आणि अनुभव जोडीला घेऊन एक गणित मांडलं कि नेढ्याला त्याच्या पट्ट्यात जाऊन गाठणं अवघड ठरतं कारण नेढं असतं कातळात, म्हणजे नेढ्यात जायचं असेल तर एकतर कातळ चढावा लागेल किंवा उतरावा लागेल. मांडलेल्या गणितानुसार दुसऱ्या दिवशी मुक्काम वाढवून थोडं खालच्या पट्ट्यांतून मार्ग काढत गेलो. तिथेही अवघड टप्पे लागलेच, पण कशीबशी जाण्याजोगी वाट काढता आली. सरतेशेवटी ३० फुटाचा कातळ चढून नेढ्यात विसावलो त्याचं समाधान आजवर कशात नाही.

महाराष्ट्र आणि सह्याद्रीच्या बाहेर डोकवायचं झालं तर हंपी आणि बदामी ह्या भागांचा तिथल्या विशेष डोंगर रचनेसाठी उल्लेख करावा वाटतो. ह्या परिसरात साधारण लालसर-राखाडी रंगाचे, गुळगुळीत, लहान किंवा मोठ-मोठाले दगड विखुरलेले आढळून येतात. ह्या दगडांना आपण बोल्डर ह्या नावाने जास्त ओळखतो. 
Boulders around Hampi

हे दगडही एक वेगळ्या प्रकारची डोंगरसृष्टी आहे. स्थानिकांनी ह्यांचा वापर साहसी क्रीडा-पर्यटनाच्या विकासाकरिता पुरेपूर केलेला दिसून येतो. या भागात बोल्डरिंगसारखा लोकप्रिय साहसी क्रीडाप्रकार गेल्या काही दशकांपासून मूळ धरत आहे, ही त्याचे जमेची बाजू!

डोंगरभटकंती करत असताना ह्या डोंगररचनेचा अभ्यास करणे ही एक जमेची बाजू ठरते. हा अभ्यास आपल्या सुरक्षिततेसाठी आणि भटकंतीच्या मनसोक्त आणि संपूर्ण आनंदासाठी कारणीभूत ठरतो. अभ्यासाचा कितीही कंटाळा असला तरी माझ्यामते ह्या प्रकारचा अभ्यास एखाद्याला नक्कीच भुरळ पाडू शकतो हे मात्र खरंय!

मु. पो. बातल

भटक्यांच्या आयुष्यात काही जागा अशा असतात कि त्यांच्या मनात राहत्या घरानंतर ती जागा मनात घर करून बसते. तिला अढळ स्थान!
माझ्यासाठी सह्याद्रीत अशा य जागा आहेत. तुमच्याही असतील. तिथं मोजक्या जिवाभावाच्या दोस्तांसोबत एखादा मुक्काम म्हणजे आठवणींची शिदोरीच. त्याचं मूल्य (किंमत शब्द झेपला नसताच इथे त्याच्या तोकडेपणामुळे) मोजण्यापलीकडे असतं.
अशीच एक जागा पाहायला म्या जरा हिमालायकडे गेलो. खूप ऐकलं, वाचलं होतं ह्याबद्दल. शेवटी सुट्टयांचा आणि पैशाचा योग जुळून आला.

मनालीजवळ आल्यापासून अचाट प्रॉमिनंस असलेल्या डोंगररांगा दिसत होत्या, ढगाआडच माथे सगळ्यांचे. आल्यादिवशी सामान गोळा करायलाच दुपार झाल्याने मुक्काम मनालीतच केला.


दुसऱ्या दिवशी ह्याच्या-त्याच्या ओळखीने बातलसाठी गाडी जमवली. 4-व्हील ड्राईव्ह जिप्सी, हेडग्लाससमोर बांधलेला मणिमंत्र, लॉक न होणाऱ्या डॅशबोर्डमध्ये ब्लॅक डॉगची बाटली आणि बडवायजरचा काचेचा ग्लास, निळं आकाश आणि लाहौलचे खडी-मातीचे रस्ते. धूळ उडवत पुढे-पुढे सरकणाऱ्या जिप्सीत माणशी २०६ हाडं आपलं अस्तित्व दाखवत होती. मागं बसलेलं (किंवा पडलेलं) WDM-3D इंजिन उर्फ सागर, बेनं ६ बॅगात डोकं काढत कसंबसं सीटवर गोचिडागत अडकू पाहत होतं. मढीला दोन-दोन आलू पराठे चेपून पुढं निघालो. कमालीच्या डोक्यानं वर चढवलेला रोहतांग आणि त्याहून अशक्य पलीकडे उतरवलेला रस्ता पाहून B.R.O. ला मनोमन दंडवत घातला.

अशात ग्राम्फूला उजवीकडे वळालो आणि डोळ्याचं पारणं फिटायला सुरुवात झाली. डावीकडे अशक्य ऊंच कातळ, त्यात धबधबा!
एकमात्र आहे कि, इथं-तिथं उगाच हिसका देणारी मान कशीबशी सावरायची आणि पुढचा हिसका बसायच्या आत खिडकीतून वर करायची. आपल्या डोक्यावर, अंगा-खांद्यावर बर्फ टिकवत, कधी ढगापल्याड डोकं काढत अनेक शिखरं ऊन-सावलीचा खेळ खेळत होती. तिथं रस्त्याच्या डावीकडे आत CB-११, बाहेर आलेलं CB-१२, त्याच्याच जोडीला CB-१६, रस्त्याच्या उजवीकडे भयंकर prominance मिरवणारं व्हाईटसेल आणि त्याला खेटून असलेला पापसुरा, आणि काय काय आणि काय नाय, माहीत असलेली-नसलेली अनेक शिखरे.
कधी आयुष्यात हिमालाय न पाहिल्यानं ती bumpy but scenic ride संपूच नये असं वाटून गेलं.



छत्रुजवळ JCB च्या अट्टाहासावर दीड तास रस्ता-रोको पाळत बातल गाठलं. इथून काही दिवस तरी बातलच आमचं घर होतं. गाडीतून उतरलो आणि उललेल्या पायावर धुळीचं साम्राज्य पसरलं.

मु. पो. बातल:
सॅट इमेजमध्ये पाहिलं होतं अगदी तसंच होतं बातल, बर्फ जमणं-वितळणं ह्या वेगळ्या गोष्टी.
बातल म्हणजे खूपसारे टूरिस्ट, त्यांच्या बुलेट बायका, दहात नऊ लोकांच्या अंगावर एकतर रायडिंगच जॅकेट नाहीतर DSLR, एका हातात हेल्मेट, दुसऱ्या हातात बिडी!
बर्याच ब्रेवरी पुरस्कारानं गौरवलेले चाचा-चाची, त्यांचं कुटुंब आणि गुळाच्या ढेपेला मुंगळे चिटकावेत तसा त्यांचा टरपोलिन शीटचं आभाळ मांडलेला धाबा, थोडं पलीकडे कमी गर्दीचा पण नुकताच म्हणजे ५ वर्षांपूर्वी सेट झालेला परशुराम चाचांचा कांगडी धाबा, टंडूक उर्फ कमांडर आणि ताशी उर्फ मोटू आळीपाळीने चालवत असलेलं एक मोठं गेस्ट हाऊस, GREF चे २ ऑलवेदर हुड्स, आय.टी.बी.पी. चा ट्रांझिट कँप, चंद्राच्या उथळ प्रवाहावर एक छानसा ब्रिज आणि त्याला खेटून एक मंदिर!



सेवा परमो धर्मः किंवा अतिथी देवो भवः ला पूर्णपणे पाळणारं गाव आहे बातल. आम्ही तंबू गावमागल्या एका टेकाडापाठी उभा केला. तिघांचं भागेल एवढा खाऊ सोबत आणल्यानं आम्ही निदान खाण्यासाठी तरी कुणावर अवलंबून नव्हतो. बाकी एकाकी वाटलं कि आम्ही तिथं धाब्यासमोर जाऊन उभे राहायचो, लोकं पाहायचो, हापश्यावर प्यायचं पाणी भरायचो. तसे ४ दिवस घालवल्यावर कुठून आलात, कुठे जाणार, क्लाइबिंगला दोघेच कसे वगैरे गोष्टी झाल्या आणि धाबेवाले, आय.टी.बी.पी. वाल्यांसोबत थोडी ओळख झाली, मग गुड मॉर्निंग, गुड नाईट वगैरे..
हवामान पाहिजे तसं मिळेना म्हणून आम्ही चंद्रतालकडे गेलो ४ दिवस. तिथून परातल्यानंतरचे ५ दिवस आणि त्यासाठी बातल आयुष्यभर लक्ष्यात राहील.

आम्ही आल्याआल्याच आय.टी.बी.पी.च्या तिवारी सरांनी "अरे भाई वहाँ पिछे क्यू अकेले रहते हो? यहाँ आ जाओ, हमारे बगल में अपनी टेंट लागओ" असं सुचवलं.
गेल्या रात्रीच वाऱ्यानं आम्हाला हैराण केलं होतं. पडत्या फळाची आज्ञा घेत आम्हीही आमचा मोहम्मद तुघलक केला. गाशा गुंडाळून हवेपासून आडोसा पाहत बाजूलाच टेंट लावला. दुसऱ्या दिवशीच आय.टी.बी.पी.चा विकास दादा ट्रेनिंगसाठी निघून गेला आणि त्याच्या जागी त्याच बसने रुपेश दादा आला.
आता विजयदादा उर्फ तिवारीजी, रुपेशदादा आणि कमलेशजी असे ३ इसम उरले आय.टी.बी.पी.चे.
रुपेशदादा आपला मराठी बंडा, भुसावळचा. बातलमध्ये कुणी समभाषिक भेटला कि गट्टी जमतेच. चार गप्पा झाल्या, नकाशात जोडलेल्या २ गावांच्या गोष्टी झाल्या, मग दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळीच बाहेरून आवाज आला "गुड मॉर्निंग!"
तंबूतनं डोळे चोळत, हातमोजा ओढीत बाहेर डोकावलं आणि समोरच्याच्या पायात लिबर्टीचे कॉम्बॅट शूज दिसले. डोकं वर काढलं तर चहाची किटली! "याला च्या पाजा रं" पासून "चल चहा मारू" म्हणजे भयंकर बाँडींग, चहा पाजला कि माणूस खिशात आला म्हणून समजा!
रुपेशदादानं चहाची सोय करून भारी प्रकार केला होता. थंडीनं पार पिपाणी वाजत असल्यानं स्वतःचे हात काळे न करता आलं टाकलेल्या गरम चहाची किटलीच हाती येणं म्हणजे भन्नाट प्रकार होता. कुडकुडत का होईना पण दात घासून झाले कि बंड्यानं गरम पाणीही करून दिलं थोबाड धुवायला. ८-१० दिवसानंतर तोंडावर गरम पाणी मारल्याचा आनंद काय सांगू!
उरलेल्या विधी उरकून आता काय करायचं ह्याचं बरळत असताना सोयाबीन + बटाट्याची भाजी, आंब्याचं लोणचं आणि २-२ पराठे आणून दिले. खऱ्या अर्थानं लेजर टूर चालू आहे कि काय असं वाटून गेलं.

भयंकर थंडी आणि त्यात वारा, पूर्ण पावसाळी हवामान म्हणजे तिथं दिवस मोडल्यासारखं आहे. अशात कुठे वर जाता येणं अशक्य व्हायचं. मी आणि सागर गप तंबूत बसलो होतो. आय.टी.बी.पी.च्या टेंटमधून विजयदादाचा आवाज आला, "मेजर साब, बॅट और बॉल कहाँ रखी देखी आपने?" त्यांच्यात वयानं आणि हुद्द्यानं सगळ्यात सिनिअर होते कमलेश सर, त्यांना सगळे एरवी मेजर म्हणायचे.
बॅट मिळत नाही म्हणल्यावर रुपेशनं च्यामायला थेट कुदळच काढली, तिथं मी आणि सागर पार हरलोच. गरगर जे काही हसायला लागला कि सांगायची सोय नाही. कुदळीचा दांडा म्हणजे बॅट. थंडीनं आणि ओलाव्यानं तो रबरी बॉल कॉर्क बॉलसारखा कडक झाला होता. आय.टी.बी.पी. च्या दोन टेंटच्या मधल्या जागेत, जिथं एरवी २ कोंबड्या सोडलेल्या असायच्या, तो आमचा पीच, मागची वॉल आणि त्यावर गिरवलेला स्टंप वगैरे सगळं नेहमीसारखं.
म्हणजे कसं डोकं खाजवायला खिशातनं हात काढू का नको असं वाटत होतं एवढी थंडी, आणि त्यात त्या तसल्या बॉलने क्रिकेट खेळायचं म्हणजे चारही बोटं घशात जाण्याचा प्रकार होता. त्यात पळायचं वगैरे म्हणजे उंटाचा मुका घेतल्यागत अवस्था.
तरीही खेळलो बरं का! चांगलं तासभर खेळलो.



पुण्याची गँग भेटणं काय, गरगरनं श्रीकांतला बरोबर ओळखलं.

नंतरचे २-३ दिवस तर मोकळा वेळ होता म्हणून तंबूत न बसता आम्ही बाहेर येऊनच बसायचो. मग कधी ह्याला बाईक चालू करायला मदत कर, कधी त्याला रस्ते समजावून सांग असे भारी प्रकार सुरु झाले होते.' राम तेरी गंगा मैंली'चा हिरो ऋषी कपूर कि राजीव कपूर ह्यावर रुपेश आणि इतर लोकांत लागलेली पैज. एक पैजेपाठी पार वेडे झालेले ४ आय.टी.बी.पी.चे लोक, गेस्ट हाऊसचा इन्चार्ज टंडूक, आणि आम्ही २ वेडे. २ दिवस तर त्यातच गेले.

तिथला फोन हा एक नवीन किस्सा झाला होता.
आय. टी. बी. पी.चा सॅट फोन होता त्यांच्या एका टेंटमध्ये. त्यांनी तो सिव्हिलियन्सना पण वापरायची सोय केली आहे, कॉल करा, STDच्या रेटने पैसे द्या. आम्ही त्याच टेंटमध्ये पडीक असायचो.
जो येईल त्याला हा प्रश्न विचारायचा, "जी, आपने राम तेरी गंगा मैंली देखी है?" त्यात बहुतेक लोक वेडे व्हायचे ते ऐकून, आर्मीच्या टेंटमध्ये हा काय प्रश्न असा चेहरा त्यांचा आणि त्यावर हसून बेजार होणार मी आणि सागर. तिथं आयुष्यभर लक्षात राहतील असे अनुभव आले.
अगदी इथं रोड ट्रिपला आल्यावर त्याच्या नकळत झालेलं त्या बंड्याचं ब्रेकअप आणि त्यावरून त्याचं फोनवर रडणं काय, त्याला कम्फर्ट म्हणून अलगद उठून बाहेर गेलेले आम्ही सगळे, किंवा कुठं गेलो काय पाहिलं ते कमीत-कमी शब्दात फोनवरून आपल्या घरी मांडू पाहणारी पोरं, "मॉम मुझे आपको यहाँ ले आना है" म्हणत डोळ्यात पाणी काढणारा पोरगा, फिरून खूष झालेली ती पोरगी, तिनं ते सांगायला घरी केलेला फोन, शब्दांपेक्षा बोलके डोळे आणि नेमकं पोरगी इथं आली अन् त्या पोरीचे बाबा ऍडमिट व्हावे, मग तिचा खाड्कन पडलेला चेहरा आणि कापरं भरलेला आवाज, विजयदादांचं सकाळी आपल्या पोराशी ते २ च मिनिट बोलणं काय, अलगद ओल्या झालेल्या डोळ्याच्या कडा आणि ते लगेच मागे सारून कामी लागणारा विजयदादा...
रुपेश एकच वाक्य असं बोलून गेला कि पार रुतून बसलं, "कोणाला घरी फोन करून बोलताना रडलेलं पाहून आम्हाला काय वाटतं कधी नाही कळायचं इतरांना दादा, अवघड असतं, पण पाहिजे असतं"
डोकंच हाललं, पण त्याला समजूत घालणारे आपण कोण, त्यांची मानसिक तयारी आणि आपली ह्यात जमीन-आस्मानाचा फरक हे नवीन नाही. मग वेळ मारून न्यायला विषय बदलायचा माफक प्रयत्न करणारा मी.

नंतर एकदा आईस वॉलला जाऊन भोज्जा पराक्रम करून झाला कि एक अख्खा दिवस फक्त पॅकिंग आणि पडी मारण्यासाठी ठेवला. सगळं मस्त मॅनेज केल्यानं सामान विखुरलं असं नव्हतंच, तासाभरातच भराभरीचा कार्यक्रम उरकला. मग उरलेला दिवस विजय आणि रुपेशदादाला ब्रिजपल्याडचं दुर्गा मंदिर धुवून साफ करायला केलेली मदत. त्यादिवशी त्यांचा भयंकर आग्रहामुळे आमचं दोन्ही वेळचं जेवण सरकारी खात्यातनंच झालं.




परत येण्याच्या दिवशी "आपका जाने का जुगाड हो जाएगा, बेफीकर रहो" असं य वेळा सांगणारा चाचांचा मुलगा. मग अखेरीस सामान बांधून झाल्यावर स्वयंपाकीपासून ते चाचा पर्यंत इतक्या दिवसात या-ना-त्या कारणामुळे कामी आलेल्या प्रत्येकाला जाऊन भेटणं काय, गाडीत बसताना  त्यांनी आवर्जून सोडायला येणं काय किंवा गाडी निघाल्यावर मागं उडणाऱ्या धुळीत आम्ही मागं वळू-वळू पाहणं काय. बातलने आम्हाला मोठ्या मनानं आश्रय दिला होता आणि सोबत खूपसाऱ्या आठवणी पण.

ये दिल्ली है मेरे यार..

भारतात कुटं बी जा येक गोष्ट दिसतीच: रेल्वेच्या ब्रिजवरची गर्दी. पाठिवरल्या वेताळ-सदृश्य बॅगा सांभाळत, "चलो भाई, चलो भाई" करत जिना उतरेस्तोवर घाम फुटला. ह्या स्टेशनहून कुठकुठवर तुम्ही रिक्षाने जाऊ शकता ह्याची लिस्ट ऐकत ऑटोवाल्यांच्या लाईनीमधून खुल्या जागेतली टपरी गाठली. १० पैकी फक्त एका टपरीवर चहा नि उरलेल्या साऱ्या टपऱ्यांवर थेट बिअर विक्री.. बरोबर, ये दिल्ली है मेरे यार, बस अच्छे रोड बाकी सब बेकार!
आधी सगळी बोचकी ISBT च्या क्लोक रूममध्ये ठेवायचं ठरलं. रिक्षा केली आणि ISBT गाठलं, सामान टाकलं. रेल्वेचा जिना ते टपरी ह्यातली पायपीट आणि स्टेशन ते ISBT ची रिक्षा-राईड ह्यांत एक गोष्ट कळली कि जर संध्याकाळी कर्वे रोडवर क्लचवर उभं राहून गाडी चालवायची सवय पुणेकरांना असेल, तर एक हात हॉर्नवर ठेवून गाडी चालवायची सवय दिल्लीकरांना आहे. हॉर्न हा फक्त लक्ष्य वेधून सावध करण्यासाठी नसून पुढच्या आणि आजूबाजूच्या लोकांच्या डोक्याची पार मंडई करण्यासाठी असतो हा इथला पाहिला ड्रायविंग नियम असावा. दिल्लीची लोकं शब्दशः हॉर्नी आहेत ह्यात अजिबात शंका उरली नाही.

गरजेपुरतं सामान असलेली छोटी बॅग पाठीशी मारून दिल्लीदर्शन सुरु झालं. बाहेरच्या-बाहेर लाल किल्ला जिकला, आणि डुप्लिकेट इलेक्ट्रॉनिक्स मार्केट मधून वाट काढत पुन्हा ISBTपाशी आलो. 


"Placeholders"


लिटरभर तरी घाम नक्कीच निघाला असावा. ट्रेकआधी 'Delhi Belly' होऊ नये म्हणून ACत बसून काहीपण गिळू म्हणत आम्ही मॅक.डीमध्ये घुसलो.

साधारण पाऊणएक तास तिथं काढून आम्ही ISBTच्या वेटिंग-लॉबीमध्ये आलो. ११.३० वाजता पुन्हा बाहेर पडून Ritz थेटरमध्ये 'Independence Day 2 ते भी हिंदीमध्ये'चं बुकिंग केलं. बॉक्सात मी आणि सागर, बाकी ३ युगुलं. Independence Day 1 न पाहिलेल्या सागरनं किती डुलक्या टाकलात, किती पिच्चर पाहिला देव जाणे. अजिबातच जीव नसलेल्या त्या चित्रपटात थोडंफार डोकं टाकायचं प्रयत्न केला कि मागल्या ३ युगुलांचा चिवचिवाटच जास्त ऐकू येई. "बाबांनो, फॅमिली प्लॅनिंग नंतर करा बे, आधी (इथं सिनेमात) स्वातंत्र्य मिळू दे" असं सुचवावसं वाटलं. पण का उगाच छळ, म्हणून 'पिच्चर पाहू नकात बे' असं फेसबुकवर झळकावून टाकलं. बाहेर आलो तेव्हा अशक्य ऊन. कोटला मैदानावर क्रिकेट खेळणाऱ्या आपल्या-परक्या साऱ्या खेळाडूंना मनोमनी दंडवत घालत आम्ही पुन्हा मॅक.डी गाठलं. पुन्हा एकदा लॉबीत पडी टाकून कसाबसा तासभर घालवला आणि चार्जिंग पॉईंटवर येऊन लोंबकळलो. उरलेला वेळ त्यातच गेला.

२ घुलाम और ब्लफ़मास्टर

पुण्याहून सुरुवात असल्यानं रेल्वेलाही घाई हा प्रकार माहीत नव्हता. ३ मिनिट उशीरा का होईना गाडी निघाली आणि यार्डात येऊन १० मिनिटं थांबली. सागरचा अप्पर, माझा मिडल बर्थ आणि लोवर बर्थला एक आंटीजी.

"आंटीजी, आपको जब सोना हो बस बोल दिजीये" इति मी, आणि "में तो साला पुरा दिन सो सकता हूँ!" इति माझं मन.
"हा बेटा जरूर" म्हणत आंटींनी उशी उचलली, पाठीशी ठेवली, मांडी घातली आणि पहिला आऊट-स्विंगर लेफ्ट-अलोन केला.

म्यानेजरांच्या फोनवर गाडी खडकीला थांबली. हापिसचं काही काम नाही म्हणून सुरुही झाली. गप्पा मारत कर्जत पास झालं आणि पँट्रीवाला जेवण घेऊन आला. सागरला डोंबिवलीला HDFCचा नाका दाखवून दारात गप्पा मारत वसईकडे निघालो. दुपारी पाळण्यात झोपायची दुर्लभ सुवर्णसंधी अशी उगीच दवडायची नाही ह्यावर एकमत झालं आणि मग आम्ही पक्ष्यांमधनं वाट काढत जागेवर आलो आणि गप पडी मारली.

वामकुक्षी उरकल्यावर पुन्हा खाली येऊन बसलो तोच समोरच्या ताईनं डायरेक्ट चौकार टाकला: "हे आहेत ना, ह्यांना खेळता येत असेल रमी, येते ना?"
मी मान डोलावली, आणि सागर पण वरच्या मजल्यावरून खाली आला.
"हम भी कार्ड्स खेलतें हैं" म्हणत बाजूच्या आंटींनी Attitude-Adjustment केली.
दादाला काही पत्त्यांचा खेळ माहित नव्हता. समोरच्या अप्परला सांडलेला तेलुगू पिच्चरवाला भाऊ तर काही केल्या खाली येईना.
मग काय, २ कॅट बाहेर आले, एकावर एक बॅग ठेऊन टेबल मांडण्यात आलं.
जोकराविना रमी खेळत सागरने २ डाव गिळले, मग प्रत्येकी एक-एक डाव जिंकत रमीला रामराम ठोकायचं ठरलं.
मग खो आला बदाम ७ वर. च्यामायला इथे भी बदाम ७ च, आणि त्यात परत राजे हातात. आंटींना खेळ समजूपर्यंत डेमोडाव झाला. मग सागर, मी, आंटी, दिदी, दादा असे ५ जण खेळणार म्हणल्यावर दिदीनं भारी प्रकार केला. २ कॅट घेऊन बदाम ७ खेळायचं! म्हणजे तुझा राजा सुटायला तू धडपड केली आणि नेमका तुझ्याआधी एखाद्याचा राजा सुटला कि त्याला उचक्या आल्याच म्हणून समजा!
तिथं पण य प्रकारे आडवा-आडवी करत सागरनं २ डाव जिंकले. एव्हाना बाजूच्या साईड-लोवरवाल्या काकूंना पण खेळ पाहण्यात रस आला. "हमारे यहाँ ये खेल नहीं खेलता कोई!"
मग काय खेळायचं असा प्रश्न आला आणि मी चॅलेंज खेळायचं सुचवलं. ज्यांना खेळ माहीत होता त्यांच्या डोळ्यात चमक! दादाला खेळ समजवला, आंटी, "हमारे यहाँ इसे ब्लफ केहतें हैं, आप खेलो में बस देखुंगी"
No points for guessing, सागर सगळ्यात आधी सुटला. मग खेळात थोडी मजा म्हणून मी उगाच चॅलेंज करायला सुरु केलं. त्यात माझ्या "२ गुलाम" आणि "उपर एक" ने जो काही हैदोस मांडला कि सांगायची सोय नाही. बहुदा आमचा गोंगाट ऐकून बाजूच्या कुपेतलं पाखरू आलं. "मुझे भी खेलना है!" तिच्या आईबरोबर पत्ते खेळायची संधी नाकारून पाखरू वर म्हणालं, "मुझे इनके साथ खेलना है!"
पाखराला माझ्या आणि आंटींच्यामध्ये कसंबसं बसवलं. पानं बघत-लपवत-दाखवत खेळ सुरु झाला. परत सागर सुटला. पाखराचे सगळे पत्ते चॅलेंज करायची सोय होती मला, पण स्पोर्टींग नेचर म्हणून मी पाखराला जिंकवलं. सागर जरा लैच सहज सूटतोय म्हणून मी जागा बदलली. तरी सुटायचा ते त्यो सुटलाच! मग शेवटी पाखरू आणि मी राहिलो. "मेरे चार इक्के, उसपे चार" करत म्या डाव जिंकलो, आणि पँट्रीवाला जेवण घेऊन आला.

पत्त्याचा पत्ता कट झाला होता आणि जेवून पिच्चर बघायचा प्लॅन चालत नाही म्हणल्यावर गप पडी मारायचं ठरलं.
सकाळी जाग आली तेव्हा खिडकीतून बाहेर दिल्लीच्या outskirts चा देखावा होता. जांभयाचं प्रकरण उरकेपर्यंत दिल्ली आलं.

सामान काढून बाहेर येईपर्यंत कुपेतले सहप्रवासी गर्दीत हरवले. सगळ्यात विचित्र गोष्ट म्हणजे, राईस आणि कर्ड शेअर करणारा बिनतोड तेलुगू पिच्चर पाहणारा भाऊ, आजवर पत्ते न खेळणारा दादा, त्याला आणि आम्हाला पत्ते खेळायला भाग पाडणारी दिदी, 'Home is where your Mom is!' असं पुन्हा गिरवून सांगणाऱ्या आंटींजी, ह्यापालिकडे आम्हाला एकमेकांची नावं पण माहित नाहीत, आणि ते विचारायची तसदी पण कुणी घेतली नाही.

Time and again I was lucky enough to say, a long travel had turned into a nice journey.