आज लै मोकळा वेळ मिळाला आजूबाजूला डोकवायला.
गल्लीत पोरांच्या खेळण्याचा आवाजच नाही, पोरं आहेत का नाही प्रश्न
पडावा.
सांजच्याला थोडं बाहेर पडलो.
डेअरीत दूध विकत घ्यायला आलेलं एक कुटुंब.
लाल-निळ्या रंगाचा ढगळा शर्ट, खाकी रंगाची चड्डी, डोळ्यावर चष्मा
असं ते नुकतंच शाळेत जायला लागलेलं पोरगं. बाजूच्या वाड्यात एकानं चेंडू मारला तो ह्या
समोर येऊन पडला. पोरगं तुरुतुरु धावत गेलं, त्यानं चेंडू घेतला नि भिंतीपल्याड फेकला.
तिथं त्याची आई, "Oh, Look what he is upto!"
बापानं जाडजूड भरलेलं त्याचं वॉलेट तिच्यासमोर बडवलं आणि पोराकडे
आला. धपकन् धपाटा दिला, का ते त्याचं त्याला किंवा त्या चिमुरड्याला माहित. हात धरून
तरातरा ओढत त्याला आईकडे आणण्यात आलं.
मग नकळत आईच्या बॅगेतून बाहेर आलेली सॅनिटायझरची बाटली पाहून
सगळा खेळ कळला.
फोनवर बोलत कार चालवत बाप त्यांना गाडीत भरून निघून गेला.
फक्त आपण आणि आपल्या आधीच्या पिढीलाच का हो मैदानी खेळाचं व्यसन
होतं?
हल्ली मैदानं नाहीत म्हणून खेळ नाहीत असं अवसान गाळलं जातं,
पण मला ते काही पटत नाही. फक्त अनोळखी पोरानं मारलेला चेंडू हाताळला म्हणून एवढं रामायण
असेल तर पुढचं आयुष्य पोरानं हातमोजे घालून जगावं कि काय?
घरात AC आहे म्हणून खिडक्या बंद, बाहेर दूधवाला-गोळीवाला, चिंच-बोरवाला
चोर म्हणून दारं बंद. कबूतरापलीकडे काही पक्षी असतात ते त्यानं कधी पाहावं?
शाळेत रुमलाच्या जागी टिशू-पेपर नेऊन पोरानं रुमालाचे खेळ कधी
शिकायचे मग?
त्याचं जग जर चार भिंतीतल्या एका कंप्युटरमध्ये वसवून दिलं तर
उद्या उड्या मारत भिंती ओलांडायला कसं शिकेल ते?
हुशार तर नक्कीच असावं त्याने, माझ्यासारखा माठ होऊन काहीच हाशील
नाही हे मान्य. पण त्याला ताणण्याला हद्द असावी. मला स्वतःला सत्तरीच्या बोंब असताना,
९६ का पडले, ४ कुठे गेले म्हणून मार खाल्लेले किस्से ऐकलेय मी. का?
जमवेल उद्या ५० सर्टिफिकेट, ४० ट्रॉफ्या...
पण, खोचलेला शर्ट बाहेर येऊपर्यंत आनंदात बुडून, हरपून खेळायला
मिळेल का त्याला शब्दशः उभ्या आयुष्यात?
लहानपणीच डिओची सवय लावली गेली तर ते पोरगं खोडरबर विकत घेताना
त्याचा वास घेईल का कधी?
लीडवाली पेन्सिल का तर म्हणे टोक काढायला वेळ जायला नको. अरे
टोक काढताना त्या लाकडी पेन्सिलच्या चकत्या काढण्याची मजा स्वतः जगून त्याला कसं वंचित
ठेवू शकता?
पावसात भिजू नये म्हणून कार किंवा रिक्षाने ने-आण करणार, मग
तो कसा कधी अवकाळी पावसात टिकेल? हवा बदलली कि चड्डया आणि डॉक्टर बदलायची वेळ येते
मग.
मित्रांच्या गळ्यात हात टाकून घरी चालत येण्यागत दुसरं सुख नाही.
सर्दी होते म्हणून हे नको खाऊ, खोकला होतो म्हणून ये नको खाऊ,
an apple a day keeps doctor away का काय म्हणत पोरगं फक्त तीच फळं खातं.
करवंद काय? माहित नाही!
आवळे काय? माहित नाही!
ऊस खाल्ला का कधी? असं काही करतात का!
बोरं खातो? नको, खोकला होतो!
तिखट खातो? नाही!
बर्गर खातो? हा, मॅकडोनाल्डसमध्ये!
खाण्याच्या बाबतीत असं शेण खाल्लं तर ते कोल्हापुरातली एखादी
पंगत कसं जेवेल?
कसंय ना घाणीचं, धुळीचं ग्रहण दाखवत त्याला मातीपासून वेगळं
करायचं, आणि मग तग धरेल अशी अपेक्षा ठेवायची.