खेतोबा आणि नाखिंड

मागच्या उन्हाळ्यात मावळातले खूप ट्रेक झाले होते. ह्या वेळेस मुंबईत असल्याने उन्हाळा जास्त जाणवणार होता. प्रचंड उकाडा असला तरी आंबट-गोड आंबे आणि इतर रानमेवा खायचा मोह काही आवरेना. आता मुंबईजवळ आंब्यासाठी वन-डे काही करायचं म्हणलं की सर्वात आधी भीमाशंकरचा नंबर लागतो. खुद्द भीमशंकरला जाण्यात मला काही विशेष रस नसल्याने पुन्हा त्या आसपासच्या २ घाटवाटा उरकणं भाग होतं.

२ दिवस नकाशे गिरवून २ घाटवाटांची शिवण करायचं ठरलं. उन्हाळा असल्याने जास्त कुणी ट्रेकला जात नाही, येतो म्हणाणारे येत नाहीत आणि जाणारे सांगत नाहीत. मीही काही जास्त विचारपूस केली नाही, बहुतेकांचा नकार साहजिक होता. कसंय ना 'माहीत असताना पंधरा दिवस वापरलेल्या मोज्याला "वास येतोय का?" असा प्रश्न विचारु नये, विचारलाच तर वास घेऊ नये, वास घेतलाच तर तिथं थांबून काशी करू नये.' दुधाची तहान ताकावर भागवायला लागू नये म्हणून सोलोचा प्लॅन आखला.

हौशी गडी - यतिनशी चर्चा करुन खेतोबा घाट आणि कौल्याच्या धारेचा प्लॅन फायनल केला. शनिवारी ऑफिसमध्ये नसलेलं काम संपवून वेळेत घर गाठलं. (ह्या ब्लॉगमध्ये म्यानिजरच्या नावानं खडे फोडले नाहियेत हो). मेडिकीट, टॉर्च, अर्धा डझन केळी, ३ संत्री, १ लिटर ताक, १ चिक्कीचा छोटा तोटा, २० पारलेच्या गोळ्या, ५ लिटर पाणी घेऊन मी बाईक वर निघालो.

प्लॅन असा होता की बाईक आंबिवलीत ठेवायची.. मुंबईकरांनो हे आंबिवली शहाडजवळचं आंबिवली नव्हे. असेही महाभाग असतात. एकदा प्रितीनं एक किस्सा सांगितला होता, त्यात ती रसाळ-सुमार-महिपतजवळच्या वडगावबद्दल सांगत होती, एक भरकटलेला पुणेरी नग बिनधास्त विचारून गेला, "वडगाव शेरी की वडगाव बुद्रुक?" आता करं जोडण्याव्यतिरिक्त काय करावं कळेना. बर, प्लॅन असा होता की आंबिवलीत बाईक ठेवून जमरुंगच्या कामतपाड्याला ११ नंबरच्या बसने जायचं. शिडीनं मधल्या पदरात जायचं, तिथून खेतोबा घाट चढायचा, पुढं भूताच्या माळानं पदऱ्याच्या वाडीकडे यायचं, गावाकडे न उतरता उजवीकडे नाखिंडीकडे यायचं, नाखिंड किंवा कौल्याच्या धारेनं खाली पेठाच्या वाडीत यायचं, तिथनं आंबिवली. लांबलचक पण सोपा प्लॅन. कर्जतजवळ जायचं असल्याने विशेष अंतर नव्हतं. कडावजवळ रस्त्यात काहीतरी गुंडाळी करून बसलं होतं. पटकन गाडी थांबवाली, टॉर्च काढला आणि नीट पाहिलं. २ घोणस. पहिल्याच बॉलवर चौका! मागच्या मिनीबसला थांबवलं समोरच्या २ बाईक वाल्यांना थांबवलं आणि काठीनं ढकलत-ढकलत दोन्ही महाशयांना रस्त्यावरुन सरकावलं आणि प्रवास पुढे सुरु झाला.

आंबिवलीत पोहोचलो तेव्हा २ वाजले होते. एका हॉटेलापाशी गाडी ठेवली आणि त्या दादाला सांगितलं की मी जातोय, उद्या येईन. जमरुंगात कुणा एका रेतीवाल्याचं लगिन असल्याचं त्यानं सांगितलं तसं मी तिथंच खाट धरली, उगाच रेतीवाल्याच्या अन् रिक्षावाल्याच्या नादात (?!) कामावर जायला उशीर व्ह्यायचा. 'करायचंय ते कर पण मला झोपू दे' अशा काहिशा आविर्भावात त्यानं लाईटीच्या बटणाला काठी मारून बंद केलं. सकाळी कसायाच्या आवारातल्या कोंबड्यानं त्याच्या यमाला आवाज दिला. प्रातःविधी उरकून निघूपर्यंत त्यानं कोंबड्याचं तोरण लावलं होतं.

आंबिवली ते जमरुंग अंदाजे ४ किमी आणि पुढे कामतपाडा २ किमी अशी मॉर्निंग परेड होणार होती, झाली. कामतपाड्यात वाजंत्रीनं जाऊ की शिडीनं जाऊ ते विचारून घेतलं. गावातल्या थोरल्यांनी शिडी, वाजंत्री आणि नाखिंड अशा सगळ्या वाटा दाखवून दिल्या, आणि वाटा चुकणाऱ्यातला असशील तर शिडीनं जा, वाटेवर असून उगाच धडपडणारा असशील तर वाजंत्रीनं जा असा सल्ला दिला. दोन्ही नॉट ऍप्लीकेबल म्हणून मी आपला शिडीकडे निघालो. समोर दिसणाऱ्या जामरुंगच्या डिग्ग्याकडे बघत त्या अलिकडची सोंड चढलो. मग लागलेल्या कुरणातून ला डावीकडून वळसा घालत मागं पोहोचलो. आता कारवीतून वाट जराशी उजवीकडे पदरावर चढू लागली. तिथं धापा टाकून जिभ बाहेर येवून पार कुत्रा झाला. पारलेची गोळी जिभेवर ठेवून पुन्हा चढाई सुरु केली. चघळून गोळी चकोट होण्याआधीच पहिली शिडी लागली. ती चढून मग डावीकडे हातभर ट्रॅवेर्स करून पुढे वर चढलो. अजुन एक शिडी, पहिल्यापेक्षा लहान आणि विचित्र. ती चढून गेलो की ३० फुट स्क्र्अँबल केलं आणि पठरावर पोहोचलो. तिथं पठारावर आधी वस्ती होती, आता नाहीये. उत्पन्नाचे पर्यायी मार्ग गवसल्यानं हल्ली एकतर पदरावरच्या वस्त्या विस्थापित होत आहेत नाहीतर त्याचा 'निवांत'पणा नाहिसा होताना दिसत आहे, आणि त्यात वावगं वाटण्यासारखं काही नाही, आणि त्या लोकांची चूक मुळीच नाही. प्रगती आणि सोई कुणाला नको आहेत? आपण आज कितीही हौशीनं एखाद्या पदऱ्याच्या वस्तीत एक रात्र मुक्कामी राहिलो तरी उद्या फोटो फेसबुकवर टाकायला आणि मला हा ब्लॉग पोस्ट करायला खाली यावसं वाटेलच की.

अगदी ह्याच विचारात वस्तीच्या पडक्या चौकटीचे फोटो काढून मी पुढे निघालो. खेतोबा उतरून आलेली पायवाट वस्तीपाशी आली असणार म्हणून मळलेल्या वाटेनं जाऊ असा विचार केला. जमरुंगच्या दिशेला पाठ करून वस्तीकडे पाहिलं असता वाट थोडी उजवीकडून जाते असा मला अंदाज होता, अगदी तसंच करून मी मधल्या जंगलात शिरलो. पाचच मिनिटांत समोरनं एक वाट आली आणि डावीकडे एक वाट वळाली. टुना-टुना उड्या मारत मी डावीकडे चढायला सुरु केलं. ५ मिनिटं वर आल्यावर खेतोबाला खेटून असलेला कडा दिसला आणि मागे पाहिलं असता वाजंत्री जिथं वर येते ती जागा दिसली. वाट योग्य असल्याची खात्री झाली. यतिननं सांगितलं होतं ते अगदी तंतोतंत जुळलं होतं. वाह रे गड्या!

जसजसा वर चढत होतो, उजवीकडे कडा जवळ येत होता, तसतशी हवा गार झाली, पायाखाली आधी माती, मग गोटे आणि मग धोंडे आले. कडा बाजूला आल्यावर वाट सोडून कड्याजवळ जाण्याचा मोह काही आवरला नाही. माकडं नसल्याची खात्री करून कड्याच्या पोटाशी बसकण मारली. पहिलाच ब्रेक असल्यानं पाण्यापाठोपाठ एक केळं पोटात ढकलून दिलं. पटापट वर आल्यानं घाई नव्हती, त्यात आत्ताशी कुठे ९ वाजले होते. मग निवांत बसलोच होतो तर एक गाणं ऐकून घेतलं.

               How many years can a mountain exist,
Before it is washed to the sea?
Yes, and how many years can some people exist,
Before they're allowed to be free?
Yes, and how many times can a man turn his head,
And pretend that he just doesn't see?
The answer, my friend, is blowin' in the wind, 
The answer is blowin' in the wind.

Yes, and how many times must a man look up,
Before he can see the sky?
Yes, and how many ears must one man have,
Before he can hear people cry?
Yes, and how many deaths will it take 'til he knows,
That too many people have died?
The answer, my friend, is blowin' in the wind, 
The answer is blowin' in the wind.

Lyrics: Bob Dylan, Singer: Bob Dylan, Album: The Freewheelin' Bob Dylan (1963)


      एकच गाणं ऐकलं आणि पुन्हा हेडफोन गुंडाळून आत ठेवून दिले, सिपरमधून पाण्याचे २ घोट ओढले आणि चढाई सुरु केली. वाट मळलेली आणि सावलीत असल्याने चढायला विशेष त्रास होत नव्हता. त्यात ऊन वाढायच्या आत मी पठारावर आल्यानं दमट हवा नव्हती. उन्हात दमट हवेत मोठे घाट चढताना जो काही छळ होतो ते सांगायची गरजच नाही.

      घाट पाहता क्षणीच भयंकर आवडला होता. सणसणीत कडा आणि त्या कड्याला लागून एक हलकीशी धार. त्या धारेवर ही वाट. सह्याद्रीत असे अनेक अजब-गजब प्रकार केलेत. ज्यानं वाट काढली असेल त्याला कोपऱ्यातनं नमस्कार.

      घाट चढून माथ्यावर पोहोचलो तेव्हा ९.३० वाजले होते. समोर जंगल आणि डावीकडे कड्यापाशीच खेतोबाचं मंदिर. नास्तिक असलो तरीही मला अशी ही डोंगरदऱ्यातली मंदिरं पाहत राहाविशी वाटतात, ह्यांना व्यावसायिकतेचा गंध नसतो अजिबात. नशीबाने येळवलीचे (येरवळ) बाणेरे आजोबा आपल्या २ नातवांना घेऊन तिथं आले होते. एकटाच असल्यानं त्यांनी जरा करड्या शब्दातच उजळणी घेतली, पण नंतर खंडू दादांची ओळख सांगितल्यावर त्यांनी लागलीच त्यांच्या जवळचा देवाला फोडलेला नारळ खायला दिला. मी ही त्यांच्या नातवांना गोळ्या देऊन आपलंसं केलं की स्वारी खुश.

आजोबा: "आता मी वाट दाखिवतो तिथंनं सरल जायचं, वाडीत नगं जाऊस, पंचक्कीला उजवीकडं जायाचं आणि नढ्यानं खाली उतरायचं."

मी: "मग ती नाखिंडीची वाट झाली की."

आजोबा: "तुला आंबे खायचेत नव्हं, त्ये कौल्याला न्हाईत. कौल्याला लै ऊन आता, झाडं भी न्हाईत."

      आजोबांचं म्हणणं खरं होतं. कौल्याच्या धारेनं उतरताना गुढघ्याच्या वाट्या करकरल्या असत्या, त्यापेक्षा नाखिंडीची वाट कधीही सोयीची होती. दोन्ही वाटा तसंही एकाच पदरात येतात.
साधारण १०.३० वाजता आजोबांसोबतच निघालो आणि सावळे-भीमाशंकर वाटेवर मी उजवीकडे वळालो, आजोबा येळवलीकडे निघुन गेले.


      इथून थेट लोणावळापर्यंतचा प्रदेश मी य वेळा भटकल्यानं ठरवून सुद्धा हरवणं अशक्य होतं. त्यामुळे फक्त नजर भिरकवत चालणे हा एकच उद्योग होता, त्यात मला पठारांवर भटकायला प्रचंड आवडतं. हातातली काठी दामटवत डिजेल इंजिन जे निघालं, ते मधल्या कड्याशी एकदा डोकावून, भरपेट करवंदं खात बरोबर दीड तासात म्हणजे १२ ला नेढ्या समोरच्या झाडाखाली जाऊन थांबलं. त्याआधी त्या कच्च्या रस्त्याच्या अलीकडे जे काही बांधकाम चालू आहे ते पाहिलं. दर खेपेला पाहतोय ते वाढतच जातंय. तिथे एक इसम भेटला. त्याला विचारलं की हा नेमका प्रकार काय आहे, तर त्यानं खुलासा केला की फॉरेस्ट डिपार्टमेंटचा हा तुकडा बळकावून तिथं आता कोणतं तरी मंदिर होत आहे. जुन्या मंदिराचा जिर्णोद्धार करत आहेत की डायरेक्ट नवा गडी नव राज्य चालू आहे माहीत नाही. तसंही तिथली परिस्थिती हाताबहेर गेल्यात जमा आहे. विंडमिल्ससाठी रस्ता, आणि आता तर कुसूर जवळून तो कर्जत-भीमशंकर रस्ता थेट जंगल फाडत जाणार आहे. म्हणजे नंतर इथं न फिरकलेलं बरं. खेदजनक असलं तरी डेवलपमेंटच्या नावाखाली खपतंय ह्याला आपण काही करू शकत नाही.

थॅंक्स टू द डेवलपमेंट, घोटाभर मातीतून थपथप माती उडवत उन्हात चालत यावं लागलं. बूट लाल झाले होते. आता ऊन चांगलंच जाणवत होतं. निवांत जागा होती म्हणून तिथंच जेवण उरकायचा मानस होता, पण वारा पडलेला असल्यानं मी मागल्या बाजूस जाऊन जेवायचं ठरवलं.

जरा नीट न्याहाळलं आणि गावाकडून वर आलेली वाट दिसली. २ च मिनिटांत ती वाट रस्ता सोडून उजवीकडे कारवीत शिरली. त्या वाटेनं नेढ्याच्या मागे जाणं शक्य होतं. तिथं जरा पुढे गेलो आणि एक वाट उजवीकडे कारवीत उतरली. ती वाट नाखिंडीची नाही हे मला नक्की माहीत होतं. तिच्यावर फक्त एकदा नजर टाकली आणि वाटेला लागलो. थोडं पुढे डावीकडे आलो, उजवीकडे दरी, त्या पल्याड कोथळीगड आणि डावीकडे नेढं. तसाच पुढे चालत आलो, उजवीकडे कड्याशी डोकावलं, खाली पाण्याचं टाकं! थोडा वळसा टाकून केकताड्याच्या बाजूनं टाक्यापाशी पोहोचलो. गार पाणी! आधी पाण्यानं पोटाचा टँकर भरला आणि ५ मिनिट तिथंच बसून राहिलो. टाक्यापासून पुढे वाट उतरत नव्हती. मग परत वर आलो, सावली हेरली आणि बसलो.

खाली कोथळीगडावर लोकांचं आगळंच ऍडवेंचर चालू होतं. त्यांची बोंबाबोंब आणि एका ए-ओ कॉलला आपल्या-परक्या १०० जणांचा रिप्लाय म्हणजे त्या ऍडवेंचरचाच एक भाग. केळी आणि संत्री खाऊन पोटोबा शांत केला आणि सोबत ३ लीटर पाणी असल्याची खात्री करून नाखिंडीच्या वाटेची सुरुवात पाहून घेतली. पण मग आलोच आहोत तर कौल्याच्या तोंडाशी जाऊन येऊ म्हणून तसाच पुढे गेलो. अगदी ५-७ मिनिटाच्या चालीवर कौल्याच्या धारेची सुरुवात होती. ती पाहिली आणि पुन्हा नाखिंडीच्या वाटेशी आलो. पायपीट बरीच झाली असली तरी अजुन निम्मा ट्रेक बाकी आहे ह्या विचारांती नाखिंडीची वाट उतरायला सुरुवात केली तेव्हा १.३० वाजले होते.

      वाटेत सुरुवातीला थोडा तीव्र उतार आणि मग एका छोट्या कातळाच्या बाजूला आलो, वाट डावीकडे वळते तिथं उजवीकडे छोटी नैसर्गिक (?) गुहा दिसली. मध्ये थोडी पडझड झाली असल्यानं आणि मुळात मला आळस आला असल्यानं मी काही तिथं गेलो नाही. आज रिग्रेट करतोय की तेव्हाच पाहायला हवं होतं जाऊन. असो, तर मी तसाच खाली उतरत गेलो आणि मधल्या पट्टयात अचानक एका जागी येऊन थबकलो. नजर जाईल तिथे आंबे पडले होते. जवळपास अर्धा तास मी काही तिथून हललो नाही. GPS ट्रॅकवर उगा कुरडया येऊ नयेत म्हणून सॅक आणि मोबाईल झाडाखाली ठेवले. घरी नेण्यासाठी पण पिशवी भरेस्तोवर आंबे आणि कैऱ्या भरल्या आणि मग ओझं घेऊन निघालो. तरी रानमेव्यावर ताव मारणं चालूच होतं.

      ही घाटवाट तशी बऱ्यापैकी वापरात असल्यानं मळलेली आहे, हरवण्याची शक्यता कमीच. डाव्या बाजूला एक सोंड सोडून पलीकडे कौल्याची धार उतरत होती.
साधारणतः २.१५ ला मी कोथळी गडाच्या पदरात उतरलो. खाली येताच एक वाट उजवीकडे उतरली, जी कामतपाड्यात जात असावी. आजून २ मिनिटं चाललो आणि कौल्याच्या धारेची वाट येऊन मिळाली. तसंच पुढे चालत पेठच्या पोटाशी जी वाडी आहे तिथं आलो.
कोथळीगडावर त्या उन्हात अन् मुळात गर्दीत जाण्याइतपत माझी हिंमतच नव्हती. उगाच उभ्या उंटिणीचा मुका घ्यायला मी वेडा नाही, म्हणून मी गपगुमान आंबि वलीची वाट धरली. वाटेवर मधल्या खिंडीशी एक दादा भेटला, त्यानं गप्पा मारता-मारता त्या भागातल्या अनेक गजब वाटा सांगितल्या. एका संत्रीत तो आपला दोस्त झाला. तसंही 'संत्र्या'चं नातं पटकन जुळतं. त्याच्याशीच गप्पा मारत पाऊण तासात आंबिवलीत पोहोचलो तेव्हा ३.३० वाजले होते. 
गाडी काढून घरी पोहोचलो तेव्हा ५ वाजले होते, ट्रेक वेळेत झाल्याने सोसायटीत बॉक्सच्या ४ मॅच खेळणं शक्य झालं.


मी हे असंख्य वेळा ऐकलं आहे कि ट्रेकिंग हे एकट्यानं नसावंच, त्रिकुट-चौकट तर असावीच. ह्या ट्रेकच ही तसं म्हणता येईल. उतरताना किंवा चढताना पडला असतास तर काय? वाटेत काही चावलं असतं तर काय? मग नेटवर्क नसतं तर काय? हे करून मिळालं तरी काय? आणि असंख्य तत्सम प्रश्न. खरं सांगायचं झालं तरं हे प्रश्न काहींना हा ब्लॉग वाचल्यावर पडू शकतात, फरक एवढाच आहे कि हे प्रश्न मला ट्रेक सुरु करायच्या आधी पडतात, आणि होय, तरीही मी जातो.

'का?' ह्या प्रश्नाची बरीच उत्तरं आहेत.
'नाही गेलास तर नाही का चालणार?' ह्याचं एकचं उत्तर : नाही चालणार!
'पुन्हा जाशील का?' ह्याचं उत्तर माझ्याकडं पण नाही.

हं, माझ्या सोलो ट्रेक बद्दल तुम्हाला काही आक्षेप असेल तर तसं सौम्य आणि तुम्हालाच शोभेल अश्या शब्दात वैयक्तिक संदेशाद्वारे सांगा, चर्चा करू. उद्धटपणे व्यक्त केलेल्या मताला किंवा टीकेला मधले बोट किंवा आरसा दाखवण्यात येईल.

I do not intend to motivate/discourage anyone from trekking/solo-trekking. I believe this and every other trek has taught me a handful of things. I simply don't expect anyone to pack his/her sack and set off to a solo trek after reading this or any of my blogs.

भिकनाळ आणि पालखीची वाट

      हिवाळ्यात जवळपास सगळेच वीकेंड सत्कारणी लागल्यानं मी आधीच खूश होतो. अमूक-तमूक ट्रेनिंगच्या कारणानं प्रिती १५ दिवसासाठी पुण्यात आली होती. साहजिकच भेट झाली. मी आपला निवांत पुणे शहरातल्या माझ्या सर्वात लाडक्या भागात म्हणजे कर्वे रोडच्या सुजाताची सिताफळ मस्तानी नरड्यातून खाली जातानाचा आंनद घेत होतो आणि अचानक प्रितीनं पिलू सोडलं: "ह्या वीकेंडला भिकनाळ आणि फडताड करायचा? राजस आणि यज्ञेश येतील गाडी घेऊन."

      विचारात एवढा गुंतलो की उरलेली मस्तानी कधी संपली ते कळलं नाही आणि स्ट्रॉचा फुर्रर्रर आवाज आला तेव्हा कुठं खऱ्या अर्थानं विचारमंथन सुरु केलं. फडताड हे नाव काही माझ्यासाठी आणि तिच्यासाठी नवीन नव्हतं. २००८ मध्ये एकदा स्टुडिओतल्या संजय काकाकडे असताना दिवकरच्या तोंडी हे नाव ऐकलं होतं. छातीत धडकी भरावी असा तो ट्रेक हे ऐकूनच होतो. एकंदरच कळून चुकलं की जायचंय तर तयारीने जावं लागेल. तसं म्हणलं तर आमच्यासोबत जो एक गडी येणार होता त्यानं हा ट्रेक केला होता, त्यामुळे एकदा त्याच्याशी चर्चा करून प्लॅन करायला हरकत नव्हती. पण मग त्यानं प्लॅन ऐकायच्या आधीच माघार घेतली. कुणाच्या पोटात दुखलं तर दुखू दे, जे होईल ते बघू म्हणून आम्ही प्लॅन कायम ठेवला.

      शुक्रवारी संध्याकाळी भेटून मी आणि प्रितीनं खाण्याचं सामान गोळा केलं आणि ठरल्याप्रमाणं राजस आणि यज्ञेश रात्री कारने पुण्याला आले. ट्रेक तसा अवघड म्हणून ते येताना सोबत सगळं इक्विपमेंट घेऊनच आले होते. पौड रोडपाशी प्रितीला पिकअप करून ते सगळे मला कात्रजच्या नाक्यावर भेटले. यज्ञेशशी माझी नीट ओळख करून देईपर्यंत आम्ही चेलाडीला पोहोचलो. राजसला थोडा आराम मिळावा म्हणून चेलाडीपासून प्रितीनं गाडी चालवायला घेतली. 'झोपेची वेळ + थंडी + वेल्ह्यापर्यंत ठिकठाक असा रस्ता' ह्या सगळ्या सॉर्टेड-आऊट गोष्टींना मात देणारी प्रितीची ड्रायविंग! डोळा अजिबातच लागला नाही. हसत-खिदळत वेल्ह्यात पोहोचलो तेव्हा पहाट झाली होती. गावात कुस्तीची स्पर्धा असल्यानं आदल्या रात्री चपटी न लावलेले सगळे जागे झाले होते, त्यामुळं आम्हालाच उशीर झाल्यागत वाटत होतं, पण आम्ही गडबड करणाऱ्यातले नाही. आम्ही काही तासभर तिथून हललो नाही. चहा आणि क्रिमरोल पोटात कोंबून आम्ही पुढं निघालो.

      आता गाडी राजस चालवत होता. कानंद खिंडीजवळ झालेलं स्वर्गीय नर्तकाचं दर्शन, अभेद्य दिसणारा तोरणा, हवेतला गारवा आणि चांडाळ चौकडी.. सगळं काही मनासारखं. गाडी 5 मिनिट बाजूला थांबवून विशेष वटवट न करता आम्ही सगळेच निःशब्द होऊन निसर्गाची ती उधळण टिपत होतो. उगाच ट्रेक मारणं, घाटवाट उडवणं असल्या गप्पा नाहीत, घड्याळाशी स्पर्धा नाही. पासली फाट्याच्या नंतर अतिशय सुमार अश्या रस्त्यानं गाडी जपून चालवत आम्ही कुसरपेठेत आलो. एका जीपमध्ये गावातली चिल्लर पार्टी रंगबिरंगी कपडे घालून बसली होती. वेल्ह्याच्या जत्रेत जायची उत्सुकता त्यांच्यात दिसत होती. एरवी गुरापाठी बिनधास्त भटकणारी, झाडाच्या अंगाखांद्यावर खेळणारी किंवा शहरातली पोरं कायम वंचित राहतील असे ना-ना प्रकारचे खेळ खेळताना दिसणारी ही कारटी आज पावडर फासून, तयार होऊन जाताना किती वेगळी वाटत होती. गावतल्या थोरल्या मंडळींना विचारुन सावलीच्या जागी गाडी ठेवली.

      कुसरपेठेतून भिकनाळेचा साधारण अंदाज मला होता, तरी आम्ही गावात थोडी चौकशी केलीच. फाटक्या आणण्यासाठी मावशी त्याच बाजूला निघाल्या होत्या, मग आम्ही त्यांच्यासोबतच निघालो. सिंगापुरच्या दिशेनं थोडं पुढे जाऊन धुत्या हाताला वळलात की एक पत्र्याचं खोपटं दिसतं, त्याच्या समोरच एक विहीर-वजा-डबकं खोदलं आहे. पाणी पिण्यालायक आहे, तिथंच प्रवासात संपलेल्या बाटल्या भरून आम्ही चालु लागलो. कोवळ्या उन्हामुळं गारठा जरा कमी झाला होता.  छाताड काढून उभा असलेला लिंगाणा, त्यापल्याड इंचभर डोकं वर काढून मिरवणारं रायलिंग, समोरच्या बाजूला रायगड, अन् नजर थोडी डावीकडे भिरकवली की रानापलीकडं आ वासून बसलेल्या भिकनाळेचा कडा दिसायला लागला. उजव्या हाताला थोडं पुढे पोटाशी आग्या नाळ. पुढे ती बैलगाडीची चाकोरी सोडून डावीकडे वर कारवीत शिरलो, अन् मग तसंच दरी डावीकडे ठेवून सोंडेवर चालत गेलो. साधारणतः 35-40 मिनिटं तशी विशेष चढण नसलेल्या सोंडेवर पायपीट केल्यावर उजवीकडल्या कारवीच्या दाट जाळीमागे फडताड कडून येणाऱ्या वाटेजवळ मावशींने आम्हाला सोडलं आणि त्या माघारी गेल्या.

      मी त्या जागी दीड-एक वर्षांपूर्वी आलो होतो. समोरच कड्यापलीकडे भिकनाळ आणि तिच्या तोंडाशी असलेली दाट कारवी. घसा ओला करून आम्ही परत डावीकडे कारवीत शिरलो. एका ढोरवाटेवर थोडं उतरून एका छोट्या आणि कोरड्या मिऱ्यापाशी येऊन थांबलो. नाळीच्या तोंडाशी तर आलो होतो पण आत शिरायला वाट मिळते का हे पाहायचं होतं. प्रिती आणि यज्ञेश थोडं पुढे पाहायला गेले आणि मी आणि राजस कारवीत शिरलो. दोनच मिनिटांत कारवीत शिरलो. दोनच मिनिटांत कारवी ओलांडून नाळेच्या तोंडाशी पोहोचलो आणि प्रिती आणि यज्ञेशला हाळी दिली, मग तसे ते दोघेही हजर झाले.

      पोटातल्या कावळ्यांचा ऑपेरा ऐकू यायच्या आत वाटेच्या सुरुवातीलाच बूड टेकवायला सोयीस्कर अशी सावली पाहुन नाश्ता करून घ्यायचा ठराव बिनविरोध मंजूर झाला. तितक्यात चान्स पाहून मी तोट्या उघडून धारातीर्थी पडून आलो. मग ब्रेड, बिस्किट, चिवड्या पाठोपाठ खजूर पोटात ढकलले आणि आम्ही निघालो. तासभर कधी आणि कसा गेला ते कळलंच नाही, पण मग उत्तराभिमुख असल्यानं नाळेत दिवसभर सावली राहणार हे साहजिक होतं, आणि जमेची बाजू अशी होती की आजचा मुक्काम पणदेरी गावात होता, त्यामुळे वेळेचं विशेष बंधन नव्हतं. उगाच हायामारी करत उड्या मारत जाणे हा प्लॅनच नव्हता.

      'एकच पायवाट' असं काही कौतुकास्पद प्रकरण ते नव्हतंच. उन्हाळ्यातही चिवटपणे तग धरून असलेली बोचरी झुडपी आणि निसटणारे दगड ह्यातनं वाट काढत, अनेकदा मिसकॉल देत आम्ही खाली उतरत होतो. बूटाच्या तोंडाशी, मोज्याच्या लोकरात, पॅंटच्या पायाशी अडकणारी रावणं आणि काटाळं झटकत साधारण अर्ध्या तासात आम्ही एका मोठ्या धोंड्यापाशी आलो. त्या पलिकडची उडी पाहता मी आणि यज्ञेश पाठीवरून काढून सॅक खाली ठेवली, आणि रोप आणि बाकीचं सामान बाहेर काढलं. थोडं वरच्या बाजूला रोप बांधायला योग्य जागा पाहून आम्ही रोप बांधला आणि यज्ञेशला खाली सोडलं. त्या पाठोपाठ राजस आणि प्रिती मग मी. पॅच संपतो तिथंच कोपऱ्यात एक माणूस पद्धतशीर फेरी मारून येईल एवढी नैसर्गिक गुहा आहे. ती गुहा म्हणजे वटवाघुळांचं आगार! ब्याटम्यानमधल्या बेल भौ सारखं आम्ही डोकं खाली वाकवून रोप गूंडाळून बॅगेत भरला आणि निघालो.

      जसं थोडं खाली आलो तशी नाळ रुंद झाली. झाडी-काटकी वाढली, तरी उतार काही मंदावेना. तसंच टप्पे उतरत आम्ही खाली येऊ लागलो. वाटेत एका ठिकाणी थबकलो. समोर उडी टाकायला 60 फूटाचा कडा, आणि इथं पडी टाकायला मस्त सावली! मग टेकायला छानशी सावली हेरली आणि बसलो. उदरभरणाचा कार्यक्रम उरकण्यात आला. ते 'वदनी कवळ घेता' राहिलं बाजूला आणि आमच्या पैजा चालु झाल्या त्या समोरच्या नाळेवर. मी ठाम होतो पाहुनच की त्यात वाट असणार! समोरच्या अभेद्य वाटणाऱ्या कड्याला माणसाच्या अचाट इच्छाशक्तीनं कुठंतरी भेद दिला असावा असं वाटत होतं.

      पोळ्या, लसुण-शेंगादाण्याची चटणी, दही, गोडलिंबू आणि खजूराचं लोणचं आणि मग त्यावर  गूळ-खवा पोळी असं जेवण आणि मग त्यावर ताक असं सगळं पोटात ढकलल्यावर आमची आळशी गाढवं झाली. बॅगेला पाठ टेकवून आम्ही परत नाळ चर्चेत आणली.  यज्ञेश आणि माझं एकच म्हणणं: वाट असणार, वर एखादा पॅच असणार. प्रिती, राजस् आणि यज्ञेशचं मत असं होतं की खाली जाऊ, गावात थोडी विचारपूस करू म्हणजे नक्की काय ते कळेल. आता खाली जाण्याचा मार्ग शोधणं गरजेचं होतं. मी उजवीकडे शिरलो तर यज्ञेश एक टप्पा उतरून खाली गेला. बराच आटापिटा केल्यावर सुद्धा मला वरून वाट मिळाली नाही. मग यज्ञेशने आम्हाला हाक दिली आणि आम्ही तिघे तो टप्पा उतरून यज्ञेशपर्यंत गेलो. उजवीकडे दिसणाऱ्या कड्याखालच्या घळीत आम्ही पोहोचलो. वाट शोधायला गेल्यावर कारवी आणि ऊन्हामुळे जो काही छळ झाला होता त्यानंतर मोकळ्या घळीत येऊन हायसं वाटलं.

      पुढे गावात पोहोचणं काही विशेष अवघड नसलं तरी बराच डिसेंट बाकी होता. मग विशेष घाई न करता आम्ही निवांत खाली उतरत गेलो. नाळेत असल्याने इथे-तिथे भरकटण्याचा प्रश्नच नव्हता. थोडं पुढे राहून मी आपला सुपर मारिओ खेळाल्यागत उड्या मारत मारत सावली हेरायचो आणि डुलकी काढायचो. जसं खाली आलो तसं मग आम्ही अजूनच निवांत झालो. मध्येच एका ठिकाणी एकाच कुटुंबाची वस्ती लागली. हे लोक सगळ्यात बेकार. एकाच पट्टयातली झाडं उभीच्या उभी तोडतात, पेटवतात आणि त्यावर माती-वाळू दाबून धूर करतात. त्यातनं कोळसा होतो. जंगलातले अख्खेच्या अख्खे पट्टे गायब करणारे हे लोक. सद्यपरिस्थिती पाहता डोमेस्टिक मागणीसाठी जीवंत झाडातून असा कोळसा काढणं पर्यावरणाच्या आणि विशेषतः वन्यजीवासाठी किती नुकसानदायी आहे, तसंच ते कितपत महाग पडेल हे सांगायची गरज नाहीये. त्यांना उचक्या देत आम्ही तासाभारात पणदेरी गावाशी पोहोचलो. ५.३० च्या सुमारास पोहोचल्यानं शेताची कामं संपवून गावाबाहेर निवांत बसलेला बळीराजा. त्यांच्याशी वाटेबद्दल विचारपूस केली आणि भिकनाळेतून दिसलेल्या 'त्या' वाटेवर शिक्कामोर्तब झालं. गावात क्रिकेट  खेळत असणाऱ्या पोरांमध्ये जाऊन चार पट्टे फिरवायचा मोह आवरून मी आणि यज्ञेश सरपंचांच्या घराकडे निघालो. त्यांनीही वाट असल्याच्या दाव्याला दुजोरा दिला. शाळेत मुक्कामाची परवानगी घेऊन आम्ही पुन्हा उरलेल्या दोन कारटयांपाशी आलो.

      बदललेल्या प्लॅननुसार आम्ही पालखीच्या नाळेनं वर जायचं ठरवलं. कोळसेवाल्यांच्या वस्तीपर्यंत कालच्याच वाटेने जायचं होतं. कोरड्या नाळेतून जाताना गुढघ्याच्या वाट्या करकरतात आणि मांड्या बोंबलतात. म्हणून तिथून पुढे नाळेनं वर जाण्याऐवजी आम्ही डावीकडल्या सोंडेवर चढून मधल्या पट्टयातल्या जंगलातून त्या छोट्या धारेवर चढायचं ठरवलं.

      कोळसेवाल्यांच्या वस्तीपाशी वर जायची वाट विचारली असता त्यांच्यातला एक दादा थोडं वर वाट दाखवायला आला. पुसट अशी ती पाऊल वाट. दादाच्या सांगण्यानुसार तीच वाट फडताडला जाण्यासाठीही वापरली जाऊ शकते हे कळल्यावर त्यांना ती ही वाट विचारून घेतली. कातळकड्याच्या खाली मधल्या गचपणात उजवीकडे वळालो. डुकराच्या शिकारीसाठी केलेला चर ओलांडण्यासाठी बरेच द्राविडी प्राणायाम करावे लागले. ते करून आम्ही पदरातल्या रानात शिरलो. इंजिन आधीच तापलेलं असल्यानं आणि त्यात तिथं दाट पण उंच झाडी असल्यानं तो सुखद पट्टा पार करायला विशेष वेळ लागला नाही. त्यात तिथं झाडीत एका कारची चावी मिळाल्यानं विशेष वापरात नसली तरी योग्य वाटेवर असल्याची खात्री झाली.

    रानातून पालखीच्या नाळेत शिरायची जागा दाखवली आणि दादा खाली निघून गेले. 'वाट' म्हणायला तसं फारसं काही नव्हतंच तिथे, पण 'वाट' लागायला बरंच काही. भर उन्हात त्या वाटेनं जायचं म्हणजे शिक्षा! स्क्रीचे दोन खडे पॅच चढून एका झुडपीपाशी आम्ही विसावलो. नरडं ओलं करून पुन्हा निघणं जीवावर आलं होतं पण तिथं बसून उन्हानं काहिली करून घेण्यात काही हाशिल नव्हतं. मग पुढे यज्ञेश, मग प्रिती आणि राजस आणि गरजेनुसार मध्ये किंवा शेवटी मी असा कॉन्वॉय वरवर सरकू लागला.  पुढे आणिएक छोटा पॅच आणि दोन एक्सपोज्ड  ट्रॅवर्स पार करून आम्ही नाळेत पोहोचलो. नाळेची लांबी जास्त नसल्याने नाळ कमी खिंड जास्त वाटली ती. बरीच हायामारी करून झाली असल्यानं आणि वरची झाडी नजरेत आल्यानं आपण वर पोहोचल्यात जमा आहोत असं गृहीत धरलं आणि जेवण उरकायचं ठरवलं. खिंडीत असल्यानं तिथं सावली होती. जेवणाचा कार्यक्रम गप्पा रंगल्यानं दीड तास चालला. मी, प्रिती आणि राजस बऱ्याच वर्षांनंतर एकत्र ट्रेक करत होतो, त्यामुळे बरेच किस्से एक्सचेंज झाले. कसलीच घाई नव्हती.

      शेवटी ४.३० वाजता आम्ही तिथून निघालोच. १५ मिनिट वर चढून आलो आणि जसजसं वर आलो तसतसं एक-एक करत चार बोटं तोंडात घालायची वेळ आली. समोर ५० फुटाचा अवघड, खडा पॅच. मग मात्र इशारे झाले की झाला तो टाईमपास पुरेसा आहे, आता कामाला लागा. इथून-तिथून मिथुन झाल्यावर चढायला योग्य जागा पाहून यज्ञेश वर चढू लागला. यज्ञेशच्या हालचालीतला द्राविडी प्राणायाम पाहता पॅच तसा अवघड वाटला. जे धरेल ते निसटून हातात येत होतं. यज्ञेश वर पोहोचला आणि त्यानं रोप लावला. पण यज्ञेश गेला तिथून वर जाणं म्हणजे जरा अवघडच होतं म्हणून मी थोडं बाजूने जिथं कातळ होता तिथून प्रयत्न केला आणि वर गेलो. हा खटाटोप उरकेपर्यंत अंधारून आलं. नाळीच्या तोंडाशी उजेड असला तरी अजुन बरंच अंतर कापायचं होतं, आणि बाकीचे दोघे + सामान वर येतायेता काळोख होणं साहजिक होतं. त्यात उल्हास म्हणजे मी वर आलो तिथं वर रोप बांधायला जागा नव्हती आणि रोप आहे त्या ठिकाणी ठेवून मी चढलो तसं चढताना जरा गडबड झाली की झोपाळा झालाच म्हणून समजा.  मग मी थोडं खाली उतरून सेल्फ-अरेस्टसाठी छानशी जागा निवडली आणि रोप फिरवून घेतला जेणेकरून कुणी स्विंग झालंच तर ते मला कंट्रोल करता येईल आणि बॅगा झपझप ओढता येतील. आधी २ बॅगा वर घेतल्या ज्यात पाणी + हेडलँप होते. मग प्रिती चढून वर आली आणि राजसने उरलेल्या २ बॅगा वर पाठवल्या. त्या वर ओढताना आई आठवाली आणि लगेच वाटून गेलं की गंज चढता कामा नये, ह्या असल्या आडवाटेची सवय असलीच पाहिजे. ओढलेल्या २ बॅगा तिनं वर नेईपर्यंत अंधारात राजस वर आला. सगळा सेट-अप व्यवस्थित बॅगेत जाईपर्यंत ८ वाजले होते. तसं म्हणावं तर पालखीची वाट झाली होती आणि आम्ही खुश होतो. थोडी बिस्किटं पोटात ढकलून आम्ही रवाना झालो.

      घाटमाथ्यावर आलो तरी अजुन गंमत बाकी होतीच. रात्री त्या कारवीतल्या गचपणातून कुसरपेठ ते मोठ्या नाळेच्या वरपर्यंत आलेल्या धारेवर येणं म्हणजे छळ होता. पण मी आधी तिथं वरवरंच ३ वेळा भटकल्यानं मला नेमकी वाट माहित नसली तरी दिशेचा अंदाज होता. शेवटी अंधारात कारवीच्या दाट जाळीतून मारामारी करत आम्ही एका सपाटीला आलो. इथून पुढे वाट मला नक्की माहित होती. मग, दुपारचं खाणं पार जिरलं असल्यानं आम्ही तिथं निवांत बसून खजूरावर ताव मारला. दमछाक झाल्यासारखं वाटणं स्वाभाविक होतं. उशीर तर झालाच होता, पण आता धावपळ करण्यात काही हाशील नव्हतं. तसंही असे ट्रेक करताना आपण उगाच घाई करत येण्यात अर्थ नाहीये हे माझं वैयक्तिक मत. पण मग चारही डोकी एकाच विचाराची असली की घड्याळ पाहत ट्रेक 'मारण्या'पेक्षा निवांत गप्पा मारत खोल दरीत दिसणाऱ्या टीमटीमत्या लाईट पाहण्यात भरपूर काही हाशील होतं. आम्ही तसंही पुण्यात पहाटेच जाणार होतो. त्यात चांदोबा पण साथीला होताच.

      रमत-गमत आदल्या दिवशी सकाळी आलो त्याच धारेवरच्या वाटेनं आम्ही रात्री १२ वाजता कुसरपेठेत आलो. गाडी काढून मध्ये वाटेत काणंद खिंडीच्या अलीकडे एका छानशा जागी गाडी थांबवून झोप काढली आणि पहाटे पुण्यात. आता फडताड साठीचा योग येणं गरजेचं झालं होतं.


एक फसलेला प्लॅन

      मी एरवीच एकटा फिरतो. मग त्यातले धोके, नफा-तोटा ह्या सगळ्या गोष्टींचं चर्वण-कीर्तन झालंय आधीही. माझ्या नशीबानं म्हणा किंवा  तोडक्या-मोडक्या अभ्यासानं म्हणा मी आजतागायत कधी सोलो ट्रेकला अवघड प्रसंगाच्या कात्रीत अडकलो नाहीये आणि त्यात वावगं वाटण्यासारखं काही नाहीये खरंतर. पण कधी वाट चुकणं कसं महाग पडू शकतं ह्याची परिणीती मला आज ना उद्या येणारच होती असं म्हणायला हरकत नाहीये.

      मुंबईतली नवी नोकरी म्हणजे डोक्याला गंज चढवून कटकट आणणारी होती. शेत नसणाऱ्यानं उगाच बैल विकत घेऊन दावणीला बांधून ठेवावेत अशी अवस्था. अन् त्यातही कधी सठी-माशी काम आलंच तर ते असं की 'वाळूत मुतले, न फेस ना पाणी', त्यात उल्हास म्हणजे फक्त दुसरा आणि चौथा शनिवार सुट्टी आणि त्यात महिन्यात ५ वीकेंड आले की त्या चिकट गुजरात्याचा फायदा. नेमकं तसंच झालं होतं. पाचवा आणि पहिला वीकेंड निरर्थक पाट्या टाकल्यावर डोक्याचा आणि मनाचा प्रोटोकॉल गंडल्यासारखं वाटायला लागलं. पावसाआधी येणाऱ्या ढगांची बातमी ऐकून मनावरचं मळभ दूर करायची कूणकूण लागली. साहजिकच सोलो ट्रेकचा प्लॅन शिजला.

      संथ टिकटिक करत तो शनिवारचा दिवस पुढे सरकला. 'बैल गेला, झोपा केला' करत पूर्ण दिवस चकाट्या पिटल्यावर, जोरात लागावी अन् नेमकं नाड्याला गाठ बसावी तसं ६ नंतर म्यानिजरला त्याचा हुद्दा गवासला. ऑसिलोस्कोप घेऊन माझ्या समोर हजर. त्याचं जोडं त्याच्या गळ्यात बांधून 'बाप दाखव नाहीतर श्राद्ध घाल' ह्या आविर्भावात हापिसातून निघालो ते म्यानिजरला त्याचे पितर आठवूनच.

      इथंच उशीर झाल्यानं पुढच्या सगळ्या प्लॅनला खो बसला होता. गाड्या कोंडून पडलेल्या प्रत्येक चौकात म्यानिजरला उचक्या देत तासाभरात कांजूरला पोहोचलो. लोकलमध्ये लोंबकळत घर गाठलं. विशेष सामान वागवायचं नसल्यानं बॅग पटकन भरली. घरची तोंडीपरीक्षा पास करून आता जाऊ की पहाटे जाऊ करत शेवटी ११ वाजता मी निघलोच. पावसाचं चिन्ह नव्हतं. ओळखीच्या आणि आवडत्या रस्त्यानं बाईक दामटवत २ तासात पळू गाठलं. गावात जाऊन सारी कुत्री उठवण्यापेक्षा गावाच्या सुरुवातीला असलेल्या मंदिरात पडी टाकायचं ठरवलं. बाजूच्या दादाला मी झोपत असल्याची माहिती देऊन मी झोपी गेलो.

      केवळ ढग पाहण्यासाठी रिठ्याच्या दारानं वर धकोबाला जाऊन दाऱ्या घाटानं खाली यायचं असा साधा आणि शब्दशः सरळ प्लॅन होता. त्यातलं रिठ्याचं दार मी केलं नव्हतं. अट अशी होती की ऊन वाढायच्या आतच धकोबा गाठलं तरंच ढग नाहीतर पोपट, त्यामुळे ६ ला उठून मी डोंगराची वाट धरली.

      गावामागेच एक ओढा लागतो, पावसाळा सोडल्यास एरवी तो कोरडा असतो. तो ओलांडून पुढे आलात की हलकी चढण लागते. हाती येईल तेवढ्या रानमेव्यावर ताव मारत मी पुढे सरकलो. मग एक कच्चा रस्ता लागतो. त्यावर उजवीकडे वळलात की पुन्हा पळू आणि डावीकडे माणसाचा उच्छाद! क्रिकेटचं मैदान भरेल एवढा जंगलाचा पट्टा गायब करून प्लॉट काढलेत. ही वीकेंड होम - सेकेंड होमची कंसेप्टच मला मूळी पचत नाही. ह्या असल्या पोकळ अन् फाफट प्रकारामुळे किमती आसमानाला भिडल्यात. परिणामी, म्हस्याचं मुरबाड, मुरबाडचं बदलापुर होत चाललंय. पैसा पाहिजे म्हणून मरा, त्यातनं तरलात तर मग स्वतःला तारण ठेवून कर्ज घ्या, त्यातनं थोडं टक्कल बाहेर पडलं की अक्कल लढवा आणि दुसरं घर घ्या. प्रत्येकाचं दुसरं घर.. त्यासाठी अतोनात लाकूडतोड, बाला रेती पाहिजेन म्हणून नदीतनं वाळू/रेती उपसा. प्लॉट पडले म्हणून रस्ता. रस्ता पाहिजे म्हणून कुर्हाड, कुर्हाड झाली की जे.सी.बी.! हे सर्व निसर्गाच्या सानिद्ध्यात पाहिजे असला अट्टहास म्हणजे तर वरतांड! निसर्गाच्या जवळ जाण्याच्या हाव्व्यासापोटी आपण निसर्गाचीच आई-माई एक करतोय. निसर्गाचं कसंय की ते प्रकरण नुकतेच पाय फुटलेल्या कुत्र्याच्या पिलासारखं आहे. आपल्याला त्याच्या जवळ जायचं तर असतं, गोंजारायचं तर असतं, पण जेवढं जवळ जाल तेवढं ते लांब पळतं आणि मग आपण जरा काय अग्रेशन दाखवलं, हात मारला की ते लागतं केकाटायला.

      अररर! भरकटलो. माफी असावी. नेमक्या ह्याच विचारात दाऱ्या घाटाच्या दिशेनं चालत आलो. माहितीप्रमाणं दाऱ्याची वाट सोडून डाव्या हाताला वळालो. १५ मिनिटानं वाट अरुंद होत होत पार गचपणातच गेली. दाऱ्या घाटाची नाळ आता उजवीकडे लपली होती. तसंच थोडं पुढे आलो की गचपण थोडं कमी झालं कारण मी एका ओढ्यापाशी आलो होतो. त्याच ओढ्यातनं मला वर जायचं होतं. तिथंच थोडा नाश्ता करून मी वर जायला सुरुवात केली. एक टप्पा - तो चढून वर. मग थोडा मारिओ खेळावा लागला. मग दुसरा टप्पा - तो चढून वर. ह्यात टप्पा म्हणजे काहीच अवघड नाही. कोणत्याही नाळेत एरवीच ते लहान १० फूटी पॅच असतात तसे. मग डावीकडे घुसलो. अजून थोडं वर गेलो की मग तिसरा टप्पा, जरा विचित्र. तिथं पाणी. गाडीचं गरम रेडिएटर जरा थंड करून मग त्यावर पाणी ओतलं. जरा दम खाऊन सुरुवात करणार तितक्यात एक आजोबा आले.

      संभाषण "इथं कशाला घालतोयस" पासून सुरु झाल्यावरंच मला अंदाज आला की काहीतरी बिनसलंय किंवा तसं होण्याच्या मार्गावर आहे. "आरं तू चुकलायंस" करत त्यांनी मला खाली येण्याचा सल्ला दिला. मी ठाम. Huh! The day has just begun. Retreating from the mountain in the early hours of a long summer day is very unlike of me. Aberrant!

      मग मी हट्टाने त्यांना वाट विचारलीच. त्यांनी मला डावीकडे खाली जायला सांगितलं. मी कोड्यात. ते गेल्यावर मी डोक्यात रंगवलेले नकाशे आणि माझं GPS लोकेशन ह्यावर विचार केला आणि मी बरोबर वाटेवर होतो असं एकमत झालं. ८ वाजले होते. पुढे सरकलो. अगदी पाचच मिनिटं चढलो आणि वाट गायब. बराच वेळ इथून-तिथून प्रयत्न केला वाट शोधायचा. वर काय मी कसापण गेलो असतो, पण वाटेवर राहणं गरजेचं होतं. मग आजोबांनी संगितल्याप्रमाणे थोडं खाली आलो. तिथं पट्टयातून फिरणाऱ्या बऱ्याच वाटा होत्या पण त्यातून डावीकडे जाणं हे निव्वळ चूक होतं. रिठ्याचं दार ज्या घळीत होतं त्या घळीतून उगाच बाहेर येणं मला पटतच नव्हतं. पण आजोबांनी मनात चुकचुकणारी पाल सोडली होती, शंकेचा भूंगा मागे सोडला होता. तरी recon म्हणून मी डावीकडल्या तब्बल ४ नाळा पार तोंडाशी जाऊ-जाऊ पाहिल्या.

      शेवटी सावलीत थांबलो तेव्हा १० वाजून गेले होते. ३ लीटर पाणी शिल्लक होतं. तसं असलं तरी वर जाण्यात मला काडीमात्र इंटरस्ट नव्हता. मी जिथे होतो तिथून वरच्या पाण्याशी पोहोचायला तासभर नक्कीच गेला असता आणि मी जे ढग पाहायला आलो होतो ते केव्हाच गायब झाले होते. तिथं सिद्धावर ढगांचा गराडा दिसत होता. अनोळखी नाळेत पाऊस आला असता काय तारांबळ उडेल ह्या कल्पनेपोटी मी माघार घेतली. प्लॅन फसला होता. मी हरवलो नव्हतो, मुळीच नाही. जंगलात आपण कुठे आहोत आणि कुठे जायचंय ह्याचा गंध नसणे म्हणजे हरवणे. मला मी कुठे आहे ह्याचा अंदाज होताच. कोणत्या नाळेतून वर जायचं होतं ते ही पुरेपूर माहीत झालं होतं. आजोबा भेटले नसते तर मी सद्ध्या धकोबाला बसलो असतो. असो, गाव जेमतेम तासाभरावर होतं. मग पुन्हा टेकायला दगड पाहून सावली हरली आणि मागल्या सोलो ट्रेकचा ब्लॉग लिहायला घेतला. त्यात गुलाम अलींनी मला पार शांत करून सोडलं.

      एक अजनबी झोंकेने जब पूछा मेरे ग़म का सबब,
      सेहराके भीगी रेथ पर मैंने लिखा, आवारगी!

      १२ वाजता तिथून निघालो आणि गावाजवळ आलो. तिथं प्लॉटपाशी दादा भेटले. त्यांना सारी हकीकत सांगितली आणि त्यांनीही मी वाटेवर होतो ते च सांगितलं. 'चपटी'वाल्या आजोबांनी मला नक्कीच वाटेवरून हुकवलं होतं.  सोबत आणलेल्या ब्रेड आणि बटरच्या बदल्यात भाकरी, दही, इंद्रायणीचा भात आणि बटाट्याचं कालवण असली भारी डील वरपून मी घराकडे निघालो. वर न जाण्याचा निर्णय योग्यच होता ह्या गोष्टीवर शिक्का बसला तो मिल्ह्यात लागलेल्या पावसानं. वाटेत पिकअप-ड्रॉप सर्विस देत-देत घर गाठलं.

      भरपूर काही शिकलो होतो ह्या ट्रेकमध्ये. जिद्दीने करायचं ठरवलंच असतं तर रिठ्याचं दार झालंही असतं. पण कधीकधी माघार कशी घ्यावी ह्याचा धडा मिळाला होता.

Mountains will always be there, trick is to make sure you are too. ~ Harvey Voge.

      मी हे असंख्य वेळा ऐकलं आहे कि ट्रेकिंग हे एकट्यानं नसावंच, त्रिकुट-चौकट तर असावीच. ह्या ट्रेकच ही तसं म्हणता येईल. उतरताना किंवा चढताना पडला असतास तर काय? वाटेत काही चावलं असतं तर काय? मग नेटवर्क नसतं तर काय? हे करून मिळालं तरी काय? आणि असंख्य तत्सम प्रश्न. खरं सांगायचं झालं तरं हे प्रश्न काहींना हा ब्लॉग वाचल्यावर पडू शकतात, फरक एवढाच आहे कि हे प्रश्न मला ट्रेक सुरु करायच्या आधी पडतात, आणि होय, तरीही मी जातो.

'का?' ह्या प्रश्नाची बरीच उत्तरं आहेत.
'नाही गेलास तर नाही का चालणार?' ह्याचं एकचं उत्तर : नाही चालणार!
'पुन्हा जाशील का?' ह्याचं उत्तर माझ्याकडं पण नाही.

हं, माझ्या सोलो ट्रेक बद्दल तुम्हाला काही आक्षेप असेल तर तसं सौम्य आणि तुम्हालाच शोभेल अश्या शब्दात वैयक्तिक संदेशाद्वारे सांगा, चर्चा करू. उद्धटपणे व्यक्त केलेल्या मताला किंवा टीकेला मधले बोट किंवा आरसा दाखवण्यात येईल.

I do not intend to motivate/discourage anyone from trekking/solo-trekking. I believe this and every other trek has taught me a handful of things. I simply don't expect anyone to pack his/her sack and set off to a solo trek after reading this or any of my blogs.


विरोधाभास


काल लंचब्रेकमध्ये जेवण उरकल्यावर हापिसात परत येताना पाऊस आला, छत्री नसल्यानं मी बस-स्टॉपच्या शेड मध्ये थांबलो. त्या भर पावसात एक चिमुरडी डब्बा घेऊन पळत जाताना दिसली अं पटकन ती शाळेत शिकलेली कविता आठवली.

"गिरणीचा भोंगा आत्ता होईल,
दमलेला बाप फाटकात येईल,
उशीर झाला म्हणून रागवेल काय?
झपझप चाललेत नाजूक पाय.."

समोर त्या केळीच्या स्टॉलपाशी उभं राहून गपगप घाईनं केळी गिळणारा माणूस काय...आणि भिजायला नको, परत ACत जाऊन बसायचंय म्हणूस स्टॉपशी निवांत उभा असलेला मी.. विरोधाभास!

नजर थोडी दुसरीकडे भिरकावली. काचेची उंच बिल्डिंग, पण त्याच्याच पोटाशी टिकाव धरून भगव्या रंगात आपलं अस्तित्त्व मिरवणारं छोटं मंदिर.. विरोधाभास!

त्याच इमारतीच्या डाव्या कोपर्यात एक जुनं पण आता पानं गळालेलं झाड, अन् उजव्या कोपर्यात पावसात बहरून हिरवं टवटवीत झालेलं झाड...

ऐकण्यात आलं होतं की ते डावीकडचं झाड इंजेक्शन देऊन मारण्यात आलंय, का तर म्हणे पार्किंगला जागा हवी. मंदिरानं उजव्या झाडाची बाजू घेतल्यानं त्याला जीवदान. इथं पण डावं-उजवं... विरोधाभास!

मी ह्या गोष्टी पाहत असताना एक इसम माझ्याबाजुला नारळपाणी/शहाळं पीत उभा होता.. त्याचं अन् त्याच्या मित्राचं गार्हाणं चालू होतं की ऑफिस कॅंटीन मधलं जेवण कसं अनहायजनिक आहे... म्हणून शहाळं पिणारं ते. पिऊन झालं, गडी निघाला आणि समोरच्या पानटपरीवर जाऊन 'चैतन्यकांडी'चे झुरके घेऊ लागला..
Hygiene आणि व्यसन ह्यात जुंपलेली रश्शीखेच तो सोईनं सहज हरला.... विरोधाभास!

ती 'ठाणे स्टेशन ते आगरकर चौक' फेरी मारणारी अवाढव्य AC बस रिकामी असते गर्दीच्या वेळेतपण, उलटपक्षी त्या बेस्टच्या बस भरून येतात कधीही.... विरोधाभास!

परवाच त्या फूटपाथवर एक काका पाय निसटून पडले. आमच्याकडं फूटपाथ गुळगुळीत आणि भर रस्त्यातल्या पॉटहोल्समुळे जीवाला मुकणारे बाईकवाले... विरोधाभास!

बिनतारी यंत्रणेत सेवा पुरावणाऱ्या त्या प्रतिष्ठीत कंपनीत खुद्द Kirchhoffला कोड्यात पाडून वेडं करेल असं वायरींचं जंजाळ....विरोधाभास!

गडबडीत ऑफिसला जाणाऱ्याला झोपेसाठी भाडं नाकारणारा रिक्षावाला... विरोधाभास!


डोक्यावर डोंगराएवढं काम असून सुद्धा लंच झाल्यानंतर लंचटाईम मधला उरलेला वेळ कामी न लावता उगाच ही नोट खरडवणारा मीआणि घास गिळता-गिळता इन-आउटच्या इंटर्या करणारे gatekeeper काका.....विरोधाभास!

कांदाट खोर्यात उनाड भटकंती

      जून महिन्याच्या सुरुवातीलाच दमदार हजेरी लावून वरुणराजा कुठे दडी मारून बसला होता देव जाणे.  त्यामुळे आमची, म्हणजे ट्रेकर्स मंडळीची अडचण अशी झाली कि पावसाळी धोपट ट्रेक करावा कि कुठली अडनडी वाट धरावी. अवघड जागी नेमका पाऊस आला म्हणजे झाली का पंचाईत. हो-नाही, नंतर बघू, जाऊ दे, जाऊयात असं करत शेवटी ऑफिसला दांडी मारायचं ठरवून मी आणि मंडळीने ट्रेकचा प्लान मांडायला सुरुवात केली. ट्रेकसाठी बोट वर केलेल्यांमध्ये माझ्याबरोबर प्रिती, राजस, अमित, आशिष, सोनाली ह्यांचा नंबर लागला. हे सगळे कसलेले ट्रेकर असल्याने अडनडी काहीतरी प्रयत्न करायला काहीच हरकत नव्हती.

      नकाशे गिरवत असताना पर्वत आणि चकदेव पाशी आम्ही सगळेच घुटमळलो. बरीच वर्षे एकत्र ट्रेक करत असाल तर समोरच्याच्या डोक्यात काय प्लॅन शिंकू पाहतोय हे कळायला फारसा वेळ लागत नाही. साधारणपणे जी पाउलवाट आम्ही नकाशावर गिरवली तसा इतर पर्यायांचा विचार मागे राहिला आणि आमची चर्चा "नक्की जायचं ना, की पावसाळ्यानंतर करायचा" ह्या विचारांना बगल देऊन थेट "मुक्काम इथं करुयात" आणि "सगळ ठीक आहे पण जळवांचं काय ते पाहवं लागेल" इथवर आली. त्याचं काय ते पाहून घेऊ असं ठरवून आम्ही प्लॅन ठरवला. तो असा: शुक्रवारी हापिसातनं वेळेत निघून रात्री प्रवास सुरु करायचा आणि पहाटेपर्यंत दाभ्यात पोहोचायचं. तिथनं सकाळी लवकर निघून रात्री पर्वतगडला मुक्काम करायचा, दुसऱ्या दिवशी परतीचा प्रवास. हा ट्रेक तसा मोठा होता आणि म्हणून मुंबईपासूनचं अंतर लक्ष्यात घेता वेळेची आखणी करणं गरजेचं होतं. आमचं वेळापत्रक इंजिनियरिंगच्या वेळापत्राकाहून क्लिष्ट दिसत होतं.

      तिथं जेमतेम साडेतीन-चार महिन्यात सगळा अभ्यासक्रम (ऑप्शनला टाकायचं) शिकवतात आणि त्यात त्या रद्दीत टाकायला कामी येणाऱ्या फाईली छापायला लावतात. परीक्षा मात्र महिनाभर चालणार! वा रं गड्या, काय कारभार आहे. आमच्याही ट्रेकचं तसंच काहीसं होणार होतं. नाकापेक्ष्या मोती जड : चाय से ज्यादा किटली गरम :: ट्रेकपेक्ष्या प्रवास मोठा! त्यात मग तिथल्या वाहतूकीच्या पर्यायांची गैरसोय पाहता त्यावर अवलंबून न राहून आम्ही स्वतःची गाडी न्यायचं ठरवलं, इतर मंडळीनीही बिनविरोध होकार दिला.

      हापिसातनं निघून अंधेरीकडे जाण्याऱ्या आणि ट्राफिकमध्ये अडकलेल्या रिक्षांना धावत मागं टाकत मेट्रो गाठली. मग घाटकोपरहून धावत-पळत-लोंबकळत पकडलेली लोकल सेमीफास्ट निघावी, मग अशक्य चिडचिड. तसंच घरी आल्यावर वाया गेलेल्या वेळेची भरपाई म्हणून गडबडीत सगळं सामान प्लास्टिकच्या पिशवीत (दोनदा, महत्त्वाचं सामान तिनदा) गुंडाळून कसंतरी ब्यागेत कोंबलं आणि मुलुंड गाठलं. स्टेशनवरच आशिष भेटला, बाकी सगळ्यांनी प्रितीच्या घरी हजेरी आधीच लावली होती.

      ठरल्याप्रमाणे ६ लोक अन ८ ब्यागा गाडीत डांबून ११ च्या ऐवजी १२ वाजता गाडी कोकणाकडे निघाली. वडखळ नाक्यापाशी सारथींसोबत चहा पोटात ढकलून, जुन्या ट्रेकच्या आठवणीत रमून प्रवास चालू होता. पोलादपूर पासून राजस आणि मी जागं राहाणं गरजेचं होतं कारण ते आतले रस्ते मला आणि त्यालाच माहित होते. तरी मी डुलक्या घेतच होतो. पारगाव फाट्यापासून मात्र मी जागं राहण्याचा आटोकाट प्रयत्न करत होतो, आणि काही अंशी ते झालंच. राजस बिचारा खूप वेळ जागा असल्यानं झोपेला आला होता. मग तो झोपला तसा सकाळ झाली आणि आम्ही जवळपास पोहोचलोच होतो. शेवटी ७ वाजता आम्ही एकदाचे दाभे गावात पोहोचलो. मी लगेच बाजूला ठेवलेली सॅक मांडीवर घेतली, गाडीचं दार उघडलं आणि बाहेर पाऊस. ततःक्षणी मी दार लोटून घेतलं आणि मुटकुळं करून झोपी गेलो. सगळेच झोपले होते.

      मला जाग आली तेव्हा सोनालीनं य-वेळा उघडून परत चेन लावून ठेवलेली तिची सॅक पाठीशी मारून ती आता वैतागून गाडीबाहेर उतरली. मग निर्लज्जपणे तिलाच वेळ विचारली आणि तिने ९ वाजले असं सांगितल्यावर माझी झोप पार उडून गेली. मग सॅक घेऊन भराभरा बाहेर आल्यावर एका मामांशी वाटेबद्दल चर्चा केली. मग जरा नवीन म्हणून प्लॅनमध्ये हलकासा बदल केला. झोपा काढण्यात वाया गेलेला (किंवा सत्कारणी लागलेला) वेळ भरून काढायचा म्हणून आम्ही रेणोशीतून जायचं ठरवलं. पुन्हा गाडीत बसायचं म्हणाल्यावर सोनालीचा चेहरा कसा झाला होता ते कायम लक्षात राहील.

      दाभे ते रेणोशी जास्त लांब नसल्यानं जास्त वेळ गेला नाही. रेणोशीत पुन्हा एकदा वाटेची चौकशी केली आणि देखण्या अश्या त्या मंदिरासमोरून समोरच्या शेतापलीकडे असलेल्या सोंडेवर चढाई सुरु केली. अगदी सुसह्य असा रिमझिम पाऊस चालू झाला होता. ह्या भागात आतापर्यंत बर्यापैकी पाऊस झाल्यानं सगळीकडे हिरवे गालिचे दिसत होते. भातशेतीची कामं जोरदार चालू होती. मामांनी सांगितल्याप्रमाणे पुन्हा गाडीरस्ता लागल्यावर असलेल्या झापाकडे वळलो आणि मग एकदा वाटेची खात्री करून पुढील चढाई सुरु केली. साधारण १० मिनिटात एका माळावर आलो, आणि वाट भातशेतामध्ये हरवली. मग थोडं डोकं खाजवून योग्य दिशेचा अंदाज घेतला, कुठे जायचंय त्याचा अंदाज घेतला आणि एका थोड्या अडचणीच्या वाटेवर चढायला सुरुवात केली. मी पुढे, वर जाउन वाट असल्याची खात्री केली, वाट बर्यापैकी मोडलीच होती पण जाण्यायोग्य होती, काही अडचणीच्या ठिकाणी, काट्याच्या झुडुपाला गुरासारखं इथं-तिथं वळसा घालून एकमेकांना मदत करत आम्ही वरच्या पठारावर पोहोचलो. इथून पुढे मळलेली वाट लागली. पाऊस सतत चालू होता त्यामुळे काही थकवा जाणवला नाही. मिळालेली लय तोडायची नाही म्हणून तसंच पुढे चढाई चालू ठेवली. अर्धा चढ चढल्यावर रूळ्यातून आलेली वाट येउन मिळते. रुळ्यातनं आलेली वाट सोबत एक पाण्याचा पाईप घेऊन येते, त्यामुळे वाट तशी प्रशस्त आणि ठळक आहे, आणि त्यामुळे साहजिकच वस्ती जवळ असल्याचं एक लक्षण आहे. चढ संपला की इथं एक धनगरवाडा लागतो, लामजमुरा. 12 वाजले असल्यानं आता पोटात कावळे ओरडत होते म्हणून आम्ही त्या वस्तीत सोबत आणलेला खाऊ खाऊन, ताक पिऊन उचाटची वाट धरली. इतर धनगरपाड्याच्या तुलनेत इथं बरीच वस्ती आहे. कच्चा रस्ता तुडवात आम्ही खिंड पार केली. तिथंच शाळेपाशी डाव्या हाताला वळून खाली उतरायला सुरुवात केली तेव्हा 1.30 वाजले होते.

      इथून पुढे 2 वाटा खाली उतरतात, एक लमाज गावात तर दूसरी वाघवळे गावात. त्यातली वाघवळे ची वाट सोपी आणि पर्वतगडाकडे जाण्यास सोईस्कर आहे. साधारणतः तासाभरात आम्ही वाघवळे गावात पोहोचलो. वाघवळेला उतरत असताना समोरच पर्वतगड छाती काढून उभा असलेला दिसत होता. दुपारचे 3 वाजले होते. आमचा गाडीवाला ठरल्याप्रमाणं उचाटला गाडी घेऊन येणं अपेक्षित होतं.  वाघवळेहून उचाटला पायी चालत साधारण 10 मिनिटं लागतात. तो तिथं आला असेल असं मानून आम्ही उचाट गावाकडं निघालो. ठरल्याजागी तो न भेटल्यानं आम्ही गावात चौकशी केली असता असं कळलं की गावात अशी कोणती गाडी आलीच नाही. त्यात इथं नेटवर्क नाही. तरी तो नेटवर्क असलेल्या जागी असेल अशी आशा करून आम्ही गावातल्या एका घरातून लँडलाईन फोन वरून त्याला कॉल केला, आणि सुदैवानं त्यानं उचलला.

दादा: गाडी येत नाही हो तिथं, फिरून यावं लागेल, 150 किमी, वेळ जाईल.
राजस: तू कुठे आहेस?
दादा: आहिर गावात. गाडी अडकली होती, कसबसा निघालो आणि परत आलोय.

      मग त्याला तिथेच थांबायला सांगून आम्ही पुन्हा चर्चा केली आणि ट्रेकचा प्लॅन बदलला. मुक्कामासाठी सर्व सामान असलं तरीही आम्ही पर्वतला न जाता साळोशीत मुक्काम करून दुसऱ्या दिवशी तिथून दाभ्यात जाता येईल असा विचार केला कारण इतक्या उशीरा पर्वतगडावर मुक्कामासाठी जाणं तसं अवघड होतं, त्यात गाडीवाल्याला शिंदीचा रस्ता समजेल की नाही त्यात शंका होती. मग त्याला पुन्हा फोन करून दाभ्यात राहायला सांगून आम्ही साळोशीकडे निघालो. उचाट ते साळोशी अंतर 3 किमी आहे, त्यामुळे काही विशेष वाटलं नाही.

      साळोशीत अतिशय प्रेमळ अशा शेलार आजोबांच्या घरी आमच्या राहण्याची सोय झाली, जेवणही तिथेच. रात्रभर पाऊस कोसळत होता. पहाटे कुठे त्यानं जरा विश्रांती घेतली. सकाळी आम्ही निघायची वेळ आणि पाऊसाने परत येण्यास गाठ पडली. दिवसाचा कार्यक्रम असा होता की साळोशीतून निघून झडणी मार्गे दाभे गाठायचं. परतीच्या प्रवासाचा विचार केला असता हा पल्ला तसा लांबचा होता, पण आम्ही करू अशी खात्री होती कारण प्रिती आणि राजसने ही वाट केली होती. पटकन खादाडी उरकून, वाटेबद्दल थोडी चर्चा करून आम्ही 8.30 वाजता साळोशी सोडलं. पावसाची रिपरिप चालू असल्यानं चढ तसा जास्त जाणवत नव्हता, सोबतीला वारा आणि मागं कांदाटचं खोरं. ह्याहून आणिक काय हवंय ट्रेक करताना. मानवी हस्तक्षेपाचा  लवलेशही नसावा असं ते रान. कोयनेच्या पाण्यापासून कांदाटीला विभागणार्या पर्वतरांगेवर झडणीचा पाडा आहे. साधारणतः 2 तास विशेष घाई-गडबड-धावपळ न करता आम्ही झडणीत पोहोचलो. झडणीत प्रमुख वस्ती आहे ती गवळी समाजाची, त्यामुळे दही-ताक ह्यांची चंगळ! दोन-दोन वाट्या दह्यावर ताव मारून आम्ही गावापलीकडे असलेल्या धारेवर चढाई सुरु केली. थोडाफार थकवा जाणवत होता, आणि ते स्वाभाविक होतं. तसंच दम काढत जेमतेम 20 मिनिटे चढ चढल्यावर उजवीकडून एक वाट वर येताना दिसली.

गवळी मामा (श्री. बरगे) : आमी लोणी न्येतो महाबलेश्वरला तवा हिथुन खाली खरोशीत जातो अन तिथनं येष्टी मिलती.
तिथं आम्ही अजुन एकदा चर्चा केली की इथून पुढे 3 तास चालत दाभे गाठयचं की खाली खरोशीत उतरून पुढे जे मिळेल त्यानं दाभ्यात जायचं?
मामांच्या मते खरोशीत जाणं सोईचं होतं. मग आम्हीही वेळेची आकडेमोड करून खरोशीत जायचा निर्णय घेतला. कड्याला उजव्या कडेकडेने वळसा घालत वाट खाली उतरत होती. वाटेत जळवा होत्या म्हणून विशेष वेळ न घालवता आम्ही पटापट उतरत गेलो, तरी जळवांशी युद्ध चालूच होतं. समोर कोयनेचं पाणी आणि त्यापल्याड महाबळेश्वरच्या ईशान्येकडंचा भाग डोळ्याचं पारणं फिटेल असं दृश्य रंगवू पाहत होता, पावसाने विश्रांती घेऊन उघडीप दिल्यानं त दृश्ये आणखीच लोभस झालं. मग तसं आम्हीही पळापळी बंद करून त्यास योग्य ती दाद दिली आणि आनंद लुटला. दुपारी 2 च्या सुमारास आम्ही खरोशीत पोहोचलो.

      आता इथं नेटवर्क नसल्यानं गाडी बोलवायची कशी हा प्रश्न होता. त्या रस्त्याला वाहतूक तशी अगदीच कमी. 10 मिनिटं आराम करून मी आणि सोनाली दाभ्याकडे पायी निघालो. सर्वांची दांडी यात्रा होण्यापेक्ष्या मी आणि सोनालीनं ते अंतर जमेल तसं कापायचं आणि गाडी पाठवायची असं मीच ठरवलं. वर्षात 4 महीने हिमालयात घालवणाऱ्या सोनालीला त्यात काही वावगं वाटलं नाही. गप्पा मारत आम्ही 7 किमी कधी चाललो ते कळलंच नाही. आम्ही पोहोचून गाडी परत पाठवूपर्यंत बाकी मंडळीही बरंच अंतर चालत आली होती.

      कोरडे होऊन, आवरून, थोडा खाऊ खाऊन आम्ही 4.30 ला दाभे सोडलं. प्रतापगडाजवळ जेवण उरकून आम्ही डुलक्या काढत, गप्पा मारत 11 ला मुलुंडला पोहोचलो. अगदी अखलेल्या प्लॅननुसार नाही पण ट्रेक नक्कीच खूप मजेशीर झाला होता. हिलाच पावसाळी उनाड भटकंती म्हणतात का हो? साहजिकच ह्याप्रकारच्या भटकंतीला तिथंला भूगोल पाठ हवाच आणि त्याहून महत्त्वाचं म्हणजे तसा अनुभवी आणि तंदुरूस्त चमू हवा.

गाडा

पावसापासून वाचवण्यासाठी पॅकेट बॅगेत ठेवून झीप (बॅगेची) लावून "कांजूर 15, कांजूर 15" अशी आरोळी ठोकत असलेल्या बसकड धूम ठोकली, मोबाईल काही हातातून सोडवेना.
बसमध्ये धक्के खात, स्वतः पेक्ष्या मोबाईलला जास्त जपत प्रवास सुरु झाला. वाटेत एक शाळा आहे, तिथं पण गर्दी, हॉर्न वाजवू नका वगैरे वगैरे तत्सम सुचनांकडे सपशेल दुर्लक्ष्य करत रॅट-रेस चालूच होती. जवळ 1000 रुपये आहेत म्हणल्यावर आज फ्लोटर घेता येईल, अरे मग कोणती घ्यायची असल्या फालतू विचारात मी गर्क होतो. तितक्यातच माझं लक्ष्य एका पोराकडे गेलं. ते कारटं गळ्यातला टाय ढीला करून मैदानात साचलेल्या पाण्याकडं धावत सुटलं होतं, दूरवर त्याची सॅक घेऊन हताशपणे त्याकडं पाहणारी त्याची आई! ते पाहून लहानपण नाही आठवलं तर नवल!

मग मी थेट शाळेतल्या पंदेरे बाईंच्या तासात पोहोचलो. मला आजवर झोडणार्यांमध्ये पावसापाठोपाठ ह्या बाईंचा नंबर लागेल. अर्थातच मी काही कमी छळीक नव्हतो. स्वप्निल काळेच्या डुक्कर मुसंड्या काय आणि अवधूत चाळकेला सतरंजीत गुंडाळून मारणे काय किंवा तेजल गायकवाडला दंडावर चावणे असो, ह्या निरागस कृत्यांपासून ते थेट रहाणेसोबत साजरा केलेला सेंड-ऑफ़ इथवरचा प्रवास फार मोठा होता. ती सकाळी उठायच्या गडबड, मग तोंडात ब्रश ठेवून काढलेली डुलकी, त्यावर आईने ओरडून सांगणे "पश्या पाणी काढलयं!".. माझे केस कधी विंचरले गेलेच नाहीत..ते स्लीपर पायात ढकलून शाळेत पळणं, मग वर्गात जाऊन स्वप्निल काळे, निशांत समेळ आणि आदित्य कल्लोळकरच्या मधली जागा पकडणे, ते डोक्यावरून जाणारं गणित, चाकाचा शोध नी ती अणकुचिदार हत्यारं आणि काय काय. मधल्या सुट्टीत मटकीची उसळ, खान्देशी लोणच्याच्या बदल्यात काळेने दाण्याच्या कुटाच्या चटणीवर मारलेला ताव, काल रात्री सिनेमात अक्षय कुमारने दिलिप ताहिल किंवा मोहन जोशीला मारलेली किक हा गाशा गुंडाळून उरल्या वेळेत चोर-पोलिस खेळणं, किंवा नजर चूकवून पुलावरून रेल्वे पाहणे काय, मग त्यात 2 लोकल ऐवजी एक एक्सप्रेस दिसली तर मग चांदीच चांदी. ह्या एका कारणास्तव उद्यान आणि कोयना आमच्यासाठी जगात भारी गाडया होत्या. मस्ती एवढी होती की झोपेचा प्रश्नच आला नाही, मग ते रांगेत सू ला जाणे काय, 100 पानी वही विमानात इन्वेस्ट करणे काय, मग कधी त्याचं रॉकेट तर कधी हळू उडणारे Cessena काय.

प्रोमोशन-डिमोशन तिथेही होतंच की: सतरंजी ते बाक, 100 पानी वह्या ते 200 पानी वह्या, चोर-पोलिस ते खो-खो, नाईलाजनं स्वप्निल काळे ऐवजी बेंचमेट म्हणून मानसी करमरकर येणं काय, अभ्यासात तसा मी कच्चाच. मग त्या चाफेकर बाईंच्या तासाला वर्गाबाहेर उभे राहणे काय, तिथं उभारून बाहेरचा पाऊस पाहणे काय. मग हळूहळू अभ्यास वाढत गेला, मित्रही वाढले. आज मोबाईल मध्ये असलेल्या क्रिकबझवर स्कोअर पाहण्यापेक्षा TV वाल्या दुकानात स्कोअर पाहण्यात जास्त मजा होती.
बसमध्ये ड्रायवर काकांच्या मागच्या सिटवर उलटे गूढघ्यावर बसून समोरचं पाहण्याची सर धावत पकडलेल्या लोकल मधल्या सीट ला कधी यावी! कसंय ना, तेव्हा खिशात दमडी नसायची तरी आपण दुनियेला फाट्यावर मारायचो आणि आज म्हणे आपण दुनियादारीत अडकलो आहोत. नाही, चूक. तेव्हाही दुनियादारी होती च. फक्त ते वजन आपल्या आई-बाबांनी अलगद पेलून धरलं होतं.. आता जेव्हा काही नगण्य अंशी ते आपण पेलत आहोत, तर आपल्याला जुने दिवस आठवत आहेत.

हल्ली खूप लोक दिसले असं शाळेतले दिवस आठवून गिरवणारे. माझा मुद्दा हा नाहीये की माझं शालेय जीवन काय भारी होतं आणि आता मुलांचं कसं कमी मजेचं आहे.

Change is the only constant! आता आयुष्य अपग्रेड करून सोपं करण्याच्या नादात आपण जर त्यातली सिंप्लिसिटी हरपत असू तर ती आपली चूक. पाऊस तर आजही पडतोय, मैदानात पाणी आज ही सचतं, कागदाच्या होड्या-विमानं आजही बनू शकतात.. आपणच बदललोय.



The Unsocial

The guy was riding on his old hawk to the workplace which is about 6 miles. The way people ride and drive in this city is renowned for its haphazard notoriousness.

The guy had worn his regular outfit that usually is barring the dress-code rules in the company he worked for. The guy had headsets on, that didn't cost him much. The typical tech-factory CDAC emblem on his shirt, the MNC-Badge hanging to the waist buckle, and no wrist watch was only emphasizing that he works for a good company and on a computer, and probably as a developer. Developers have already got so many virtual leaches to piss them off.

Though the bicycle was old enough to trash, the guy had religiously loved it for it being his first road-bike ever. If you are in a good physical shape, a bicycle can really be less irritating to ride than a bike in the rush hours of day, simply you being clearly out of the rat race in the traffic.

The guy wasn't a too good a rider at all, occasionally, he would just set off to his home roughly 90 miles away on this bicycle just because he wants to. Traffic does annoy anyone, the guy wasn't an exception. Though he would normally manage to sneak out of the rabble at the traffic signals, desperates honking at the red light, sometimes, very rarely someone, more often an educated illiterate would get to bear his tough looks, or worst case a wrath of bad words for dashing derailleur on his bicycle.

The guy would nod in complete despair and speak to himself, "Didn't they go to school where they teach a Red light is a Stop and a Green is a Go? Honking at the people up front waiting the light to turn Green, doesn't change the light to Green, or does it?"
There are so many situations wherein a Cyclist has given lesser priority over even a pedestrian.

One morning when the guy was riding easy on a reserved bicycle track, came across a fat lady strolling right in the middle of the track. The guy rang the bell so that she gives him a way. But the fat lady had other ideas.

(Translated):
The Fat Lady, "Whats the hurry about? Can't you see I am walking? Is it not now up to us (older citizen she meant, though she didn't look any older than mid-40s) whre to walk?"
The guy tried to explain, "But aunt, this.. <interrupted>.. listen.. <interrupted>.."
Now, that Fat lady would talk a bit louder, such that the guy needed to take his headsets off.

The scene was a good recipe for other older-fitness-enthusiasts to gather around, like the guy had hit the fat lady.

The guy looked at the mob pitifully, grinned and took a stance to explain.
The guy didn't speak much, just pointed at the board that has a Bicycle symbol drawn on it and said, 

"The school where I went in, and the books that my parents made me read when I was a kid, they all taught me with this picture and words 'bicycle' written below it. Hope you all had chance to go to one such basic schooling facility and read similar books. Did it never occur to you all that why would a corporation have pavement reserved to walk and a track reserved for Bicycles only(waving the two fingers to emphasize) where we are standing right now? You guys are mature and old, behave like you are!"

The mob made way for the guy to go, the fat lady was never seen next morning or ever after. The guy would though feel bad for the Fat lady and thought, Why are we so much into the victimized state of mind? We all have handful of things to whine about.

Some other day later, the guy was riding his way to a movie theater. A reputed movie theater can either be a good bird-watching place or can be a place where the crowd tries to behave well and not turn into a rabble, possibly not out of conscience, but out of shame. The crowd we call as public. The guy was never a block to fit in such a crowd, though he would make sure that he has his mind focused on what he is there for, and not on what he should complain about and get irritated by.

The guy and his friends who rode their way to the theater finally bumped into the seats. There was a group of girls, typical college group that he discovered later, who came and took the seats next to guys. These days a few of the theaters follow a thing that after a few minutes of relatively tolerable jewelry ads and health advice, they play our national anthem, which to me is perfectly alright and good-to-have thing. Just when the instructions to stand up in respect were flashed on screen, one of the girls exclaimed, <Translated>

"See, that's why I was asking all of you not to hurry to screen and we had enough time to get us coke and some more chips."

The other girl in total agreement and disappointment said, 

"Yeah, makes sense. I forgot that they play this thing at the beginning, damn, we shouldn't have hurried and instead could have got chips and coke, now we have to wait till the interval."

In the mean time when they were whining about it, the anthem was over and people were taking their seats.

The guy, again in complete despair bumped into the seat and thought, Why are we so irritated to stand for our national anthem and/or being ashamed of doing so? And, then we expect ourselves staying in a better country than our very own. Its not India who made us what we are, its us who make India what it is. The guy grinned again, took a sip of a western beverage, suppressed his thoughts and was lost in the mob..