काल लंचब्रेकमध्ये जेवण उरकल्यावर
हापिसात परत येताना पाऊस आला, छत्री नसल्यानं मी बस-स्टॉपच्या शेड मध्ये थांबलो.
त्या भर पावसात एक चिमुरडी डब्बा घेऊन पळत जाताना दिसली अं पटकन
ती शाळेत शिकलेली कविता आठवली.
"गिरणीचा भोंगा आत्ता होईल,
दमलेला बाप फाटकात येईल,
उशीर झाला म्हणून रागवेल काय?
झपझप चाललेत नाजूक पाय.."
समोर त्या केळीच्या स्टॉलपाशी
उभं राहून गपगप घाईनं केळी गिळणारा माणूस काय...आणि भिजायला नको, परत ACत जाऊन बसायचंय
म्हणूस स्टॉपशी निवांत उभा असलेला मी.. विरोधाभास!
नजर थोडी दुसरीकडे भिरकावली. काचेची
उंच बिल्डिंग, पण त्याच्याच पोटाशी टिकाव धरून भगव्या रंगात आपलं अस्तित्त्व मिरवणारं
छोटं मंदिर.. विरोधाभास!
त्याच इमारतीच्या डाव्या कोपर्यात
एक जुनं पण आता पानं गळालेलं झाड, अन् उजव्या कोपर्यात पावसात बहरून हिरवं टवटवीत झालेलं
झाड...
ऐकण्यात आलं होतं की ते डावीकडचं
झाड इंजेक्शन देऊन मारण्यात आलंय, का तर म्हणे पार्किंगला जागा हवी. मंदिरानं उजव्या
झाडाची बाजू घेतल्यानं त्याला जीवदान. इथं पण डावं-उजवं... विरोधाभास!
मी ह्या गोष्टी पाहत असताना एक
इसम माझ्याबाजुला नारळपाणी/शहाळं पीत उभा होता.. त्याचं अन् त्याच्या मित्राचं गार्हाणं
चालू होतं की ऑफिस कॅंटीन मधलं जेवण कसं अनहायजनिक आहे... म्हणून शहाळं पिणारं ते.
पिऊन झालं, गडी निघाला आणि समोरच्या पानटपरीवर जाऊन 'चैतन्यकांडी'चे
झुरके घेऊ लागला..
Hygiene आणि व्यसन ह्यात जुंपलेली
रश्शीखेच तो सोईनं सहज हरला.... विरोधाभास!
ती 'ठाणे स्टेशन ते आगरकर चौक'
फेरी मारणारी अवाढव्य AC बस रिकामी असते गर्दीच्या वेळेतपण, उलटपक्षी त्या बेस्टच्या
बस भरून येतात कधीही.... विरोधाभास!
परवाच त्या फूटपाथवर एक काका पाय
निसटून पडले. आमच्याकडं फूटपाथ गुळगुळीत आणि भर रस्त्यातल्या पॉटहोल्समुळे जीवाला मुकणारे
बाईकवाले... विरोधाभास!
बिनतारी यंत्रणेत सेवा पुरावणाऱ्या
त्या प्रतिष्ठीत कंपनीत खुद्द Kirchhoffला कोड्यात पाडून वेडं करेल असं वायरींचं जंजाळ....विरोधाभास!
गडबडीत ऑफिसला जाणाऱ्याला झोपेसाठी
भाडं नाकारणारा रिक्षावाला... विरोधाभास!
डोक्यावर डोंगराएवढं काम असून
सुद्धा लंच झाल्यानंतर लंचटाईम मधला उरलेला वेळ कामी न लावता उगाच ही नोट खरडवणारा
मीआणि घास गिळता-गिळता इन-आउटच्या इंटर्या करणारे gatekeeper काका.....विरोधाभास!