जून महिन्याच्या सुरुवातीलाच दमदार हजेरी लावून वरुणराजा कुठे
दडी मारून बसला होता देव जाणे. त्यामुळे आमची,
म्हणजे ट्रेकर्स मंडळीची अडचण अशी झाली कि पावसाळी धोपट ट्रेक करावा कि कुठली अडनडी
वाट धरावी. अवघड जागी नेमका पाऊस आला म्हणजे झाली का पंचाईत. हो-नाही, नंतर बघू, जाऊ
दे, जाऊयात असं करत शेवटी ऑफिसला दांडी मारायचं ठरवून मी आणि मंडळीने ट्रेकचा प्लान
मांडायला सुरुवात केली. ट्रेकसाठी बोट
वर केलेल्यांमध्ये माझ्याबरोबर प्रिती, राजस, अमित, आशिष, सोनाली ह्यांचा नंबर लागला.
हे सगळे कसलेले ट्रेकर असल्याने अडनडी काहीतरी प्रयत्न करायला काहीच हरकत नव्हती.
नकाशे गिरवत असताना पर्वत आणि चकदेव पाशी आम्ही सगळेच घुटमळलो.
बरीच वर्षे एकत्र ट्रेक करत असाल तर समोरच्याच्या डोक्यात काय प्लॅन शिंकू पाहतोय हे
कळायला फारसा वेळ लागत नाही. साधारणपणे जी पाउलवाट आम्ही नकाशावर गिरवली तसा इतर पर्यायांचा
विचार मागे राहिला आणि आमची चर्चा "नक्की जायचं ना, की पावसाळ्यानंतर करायचा"
ह्या विचारांना बगल देऊन थेट "मुक्काम इथं करुयात" आणि "सगळ ठीक आहे
पण जळवांचं काय ते पाहवं लागेल" इथवर आली. त्याचं काय ते पाहून घेऊ असं ठरवून
आम्ही प्लॅन ठरवला. तो असा: शुक्रवारी हापिसातनं वेळेत निघून रात्री प्रवास सुरु करायचा
आणि पहाटेपर्यंत दाभ्यात पोहोचायचं. तिथनं सकाळी लवकर निघून रात्री पर्वतगडला मुक्काम
करायचा, दुसऱ्या दिवशी परतीचा प्रवास. हा ट्रेक तसा मोठा होता आणि म्हणून मुंबईपासूनचं
अंतर लक्ष्यात घेता वेळेची आखणी करणं गरजेचं होतं. आमचं वेळापत्रक इंजिनियरिंगच्या
वेळापत्राकाहून क्लिष्ट दिसत होतं.
तिथं जेमतेम साडेतीन-चार महिन्यात सगळा अभ्यासक्रम (ऑप्शनला
टाकायचं) शिकवतात आणि त्यात त्या रद्दीत टाकायला कामी येणाऱ्या फाईली छापायला लावतात.
परीक्षा मात्र महिनाभर चालणार! वा रं गड्या, काय कारभार आहे. आमच्याही ट्रेकचं तसंच
काहीसं होणार होतं. नाकापेक्ष्या मोती जड : चाय से ज्यादा किटली गरम :: ट्रेकपेक्ष्या
प्रवास मोठा! त्यात मग तिथल्या वाहतूकीच्या पर्यायांची गैरसोय पाहता त्यावर अवलंबून
न राहून आम्ही स्वतःची गाडी न्यायचं ठरवलं, इतर मंडळीनीही बिनविरोध होकार दिला.
हापिसातनं निघून अंधेरीकडे जाण्याऱ्या आणि ट्राफिकमध्ये अडकलेल्या
रिक्षांना धावत मागं टाकत मेट्रो गाठली. मग घाटकोपरहून धावत-पळत-लोंबकळत पकडलेली लोकल
सेमीफास्ट निघावी, मग अशक्य चिडचिड. तसंच घरी आल्यावर वाया गेलेल्या वेळेची भरपाई म्हणून
गडबडीत सगळं सामान प्लास्टिकच्या पिशवीत (दोनदा, महत्त्वाचं सामान तिनदा) गुंडाळून
कसंतरी ब्यागेत कोंबलं आणि मुलुंड गाठलं. स्टेशनवरच आशिष भेटला, बाकी सगळ्यांनी प्रितीच्या
घरी हजेरी आधीच लावली होती.
ठरल्याप्रमाणे ६ लोक अन ८ ब्यागा गाडीत डांबून ११ च्या ऐवजी
१२ वाजता गाडी कोकणाकडे निघाली. वडखळ नाक्यापाशी सारथींसोबत चहा पोटात ढकलून, जुन्या
ट्रेकच्या आठवणीत रमून प्रवास चालू होता. पोलादपूर पासून राजस आणि मी जागं राहाणं गरजेचं
होतं कारण ते आतले रस्ते मला आणि त्यालाच माहित होते. तरी मी डुलक्या घेतच होतो. पारगाव
फाट्यापासून मात्र मी जागं राहण्याचा आटोकाट प्रयत्न करत होतो, आणि काही अंशी ते झालंच.
राजस बिचारा खूप वेळ जागा असल्यानं झोपेला आला होता. मग तो झोपला तसा सकाळ झाली आणि
आम्ही जवळपास पोहोचलोच होतो. शेवटी ७ वाजता आम्ही एकदाचे दाभे गावात पोहोचलो. मी लगेच
बाजूला ठेवलेली सॅक मांडीवर घेतली, गाडीचं दार उघडलं आणि बाहेर पाऊस. ततःक्षणी मी दार
लोटून घेतलं आणि मुटकुळं करून झोपी गेलो. सगळेच झोपले होते.
मला जाग आली तेव्हा सोनालीनं य-वेळा उघडून परत चेन लावून ठेवलेली
तिची सॅक पाठीशी मारून ती आता वैतागून गाडीबाहेर उतरली. मग निर्लज्जपणे तिलाच वेळ विचारली
आणि तिने ९ वाजले असं सांगितल्यावर माझी झोप पार उडून गेली. मग सॅक घेऊन भराभरा बाहेर
आल्यावर एका मामांशी वाटेबद्दल चर्चा केली. मग जरा नवीन म्हणून प्लॅनमध्ये हलकासा बदल
केला. झोपा काढण्यात वाया गेलेला (किंवा सत्कारणी लागलेला) वेळ भरून काढायचा म्हणून
आम्ही रेणोशीतून जायचं ठरवलं. पुन्हा गाडीत बसायचं म्हणाल्यावर सोनालीचा चेहरा कसा
झाला होता ते कायम लक्षात राहील.
दाभे ते रेणोशी जास्त लांब नसल्यानं जास्त वेळ गेला नाही. रेणोशीत
पुन्हा एकदा वाटेची चौकशी केली आणि देखण्या अश्या त्या मंदिरासमोरून समोरच्या शेतापलीकडे
असलेल्या सोंडेवर चढाई सुरु केली. अगदी सुसह्य असा रिमझिम पाऊस चालू झाला होता. ह्या
भागात आतापर्यंत बर्यापैकी पाऊस झाल्यानं सगळीकडे हिरवे गालिचे दिसत होते. भातशेतीची
कामं जोरदार चालू होती. मामांनी सांगितल्याप्रमाणे पुन्हा गाडीरस्ता लागल्यावर असलेल्या
झापाकडे वळलो आणि मग एकदा वाटेची खात्री करून पुढील चढाई सुरु केली. साधारण १० मिनिटात
एका माळावर आलो, आणि वाट भातशेतामध्ये हरवली. मग थोडं डोकं खाजवून योग्य दिशेचा अंदाज
घेतला, कुठे जायचंय त्याचा अंदाज घेतला आणि एका थोड्या अडचणीच्या वाटेवर चढायला सुरुवात
केली. मी पुढे, वर जाउन वाट असल्याची खात्री केली, वाट बर्यापैकी मोडलीच होती पण जाण्यायोग्य
होती, काही अडचणीच्या ठिकाणी, काट्याच्या झुडुपाला गुरासारखं इथं-तिथं वळसा घालून एकमेकांना
मदत करत आम्ही वरच्या पठारावर पोहोचलो. इथून पुढे मळलेली वाट लागली. पाऊस सतत चालू
होता त्यामुळे काही थकवा जाणवला नाही. मिळालेली लय तोडायची नाही म्हणून तसंच पुढे चढाई
चालू ठेवली. अर्धा चढ चढल्यावर रूळ्यातून आलेली वाट येउन मिळते.
रुळ्यातनं आलेली वाट सोबत एक पाण्याचा पाईप घेऊन येते, त्यामुळे
वाट तशी प्रशस्त आणि ठळक आहे, आणि त्यामुळे साहजिकच वस्ती जवळ असल्याचं एक लक्षण आहे.
चढ संपला की इथं एक धनगरवाडा लागतो, लामजमुरा. 12 वाजले असल्यानं आता पोटात कावळे ओरडत
होते म्हणून आम्ही त्या वस्तीत सोबत आणलेला खाऊ खाऊन, ताक पिऊन उचाटची वाट धरली. इतर
धनगरपाड्याच्या तुलनेत इथं बरीच वस्ती आहे. कच्चा रस्ता तुडवात आम्ही खिंड पार केली.
तिथंच शाळेपाशी डाव्या हाताला वळून खाली उतरायला सुरुवात केली तेव्हा 1.30 वाजले होते.
इथून पुढे 2 वाटा खाली उतरतात, एक लमाज गावात तर दूसरी वाघवळे
गावात. त्यातली वाघवळे ची वाट सोपी आणि पर्वतगडाकडे जाण्यास सोईस्कर आहे. साधारणतः
तासाभरात आम्ही वाघवळे गावात पोहोचलो. वाघवळेला उतरत असताना समोरच पर्वतगड छाती काढून
उभा असलेला दिसत होता. दुपारचे 3 वाजले होते. आमचा गाडीवाला ठरल्याप्रमाणं उचाटला गाडी
घेऊन येणं अपेक्षित होतं. वाघवळेहून उचाटला
पायी चालत साधारण 10 मिनिटं लागतात. तो तिथं आला असेल असं मानून आम्ही उचाट गावाकडं
निघालो. ठरल्याजागी तो न भेटल्यानं आम्ही गावात चौकशी केली असता असं कळलं की गावात
अशी कोणती गाडी आलीच नाही. त्यात इथं नेटवर्क नाही. तरी तो नेटवर्क असलेल्या जागी असेल
अशी आशा करून आम्ही गावातल्या एका घरातून लँडलाईन फोन वरून त्याला कॉल केला, आणि सुदैवानं
त्यानं उचलला.
दादा: गाडी येत नाही हो तिथं,
फिरून यावं लागेल, 150 किमी, वेळ जाईल.
राजस: तू कुठे आहेस?
दादा: आहिर गावात. गाडी अडकली
होती, कसबसा निघालो आणि परत आलोय.
मग त्याला तिथेच थांबायला सांगून आम्ही पुन्हा चर्चा केली आणि
ट्रेकचा प्लॅन बदलला. मुक्कामासाठी सर्व सामान असलं तरीही आम्ही पर्वतला न जाता साळोशीत
मुक्काम करून दुसऱ्या दिवशी तिथून दाभ्यात जाता येईल असा विचार केला कारण इतक्या उशीरा
पर्वतगडावर मुक्कामासाठी जाणं तसं अवघड होतं, त्यात गाडीवाल्याला शिंदीचा रस्ता समजेल
की नाही त्यात शंका होती. मग त्याला पुन्हा फोन करून दाभ्यात राहायला सांगून आम्ही
साळोशीकडे निघालो. उचाट ते साळोशी अंतर 3 किमी आहे, त्यामुळे काही विशेष वाटलं नाही.
साळोशीत अतिशय प्रेमळ अशा शेलार आजोबांच्या घरी आमच्या राहण्याची
सोय झाली, जेवणही तिथेच. रात्रभर पाऊस कोसळत होता. पहाटे कुठे त्यानं जरा विश्रांती
घेतली. सकाळी आम्ही निघायची वेळ आणि पाऊसाने परत येण्यास गाठ पडली. दिवसाचा कार्यक्रम
असा होता की साळोशीतून निघून झडणी मार्गे दाभे गाठायचं. परतीच्या प्रवासाचा विचार केला
असता हा पल्ला तसा लांबचा होता, पण आम्ही करू अशी खात्री होती कारण प्रिती आणि राजसने
ही वाट केली होती. पटकन खादाडी उरकून, वाटेबद्दल थोडी चर्चा करून आम्ही 8.30 वाजता
साळोशी सोडलं. पावसाची रिपरिप चालू असल्यानं चढ तसा जास्त जाणवत नव्हता, सोबतीला वारा
आणि मागं कांदाटचं खोरं. ह्याहून आणिक काय हवंय ट्रेक करताना. मानवी हस्तक्षेपाचा लवलेशही नसावा असं ते रान. कोयनेच्या पाण्यापासून
कांदाटीला विभागणार्या पर्वतरांगेवर झडणीचा पाडा आहे. साधारणतः 2 तास विशेष घाई-गडबड-धावपळ
न करता आम्ही झडणीत पोहोचलो. झडणीत प्रमुख वस्ती आहे ती गवळी समाजाची, त्यामुळे दही-ताक
ह्यांची चंगळ! दोन-दोन वाट्या दह्यावर ताव मारून आम्ही गावापलीकडे असलेल्या धारेवर
चढाई सुरु केली. थोडाफार थकवा जाणवत होता, आणि ते स्वाभाविक होतं. तसंच दम काढत जेमतेम
20 मिनिटे चढ चढल्यावर उजवीकडून एक वाट वर येताना दिसली.
गवळी मामा (श्री. बरगे) : आमी
लोणी न्येतो महाबलेश्वरला तवा हिथुन खाली खरोशीत जातो अन तिथनं येष्टी मिलती.
तिथं आम्ही अजुन एकदा चर्चा केली
की इथून पुढे 3 तास चालत दाभे गाठयचं की खाली खरोशीत उतरून पुढे जे मिळेल त्यानं दाभ्यात जायचं?
मामांच्या मते खरोशीत जाणं सोईचं
होतं. मग आम्हीही वेळेची आकडेमोड करून खरोशीत जायचा निर्णय घेतला. कड्याला उजव्या कडेकडेने वळसा घालत
वाट खाली उतरत होती. वाटेत जळवा होत्या म्हणून विशेष वेळ न घालवता आम्ही पटापट उतरत
गेलो, तरी जळवांशी युद्ध चालूच होतं. समोर कोयनेचं पाणी आणि त्यापल्याड महाबळेश्वरच्या
ईशान्येकडंचा भाग डोळ्याचं पारणं फिटेल असं दृश्य रंगवू पाहत होता, पावसाने विश्रांती
घेऊन उघडीप दिल्यानं त दृश्ये आणखीच लोभस झालं. मग तसं आम्हीही पळापळी बंद करून त्यास
योग्य ती दाद दिली आणि आनंद लुटला. दुपारी 2 च्या सुमारास आम्ही खरोशीत पोहोचलो.
आता इथं नेटवर्क नसल्यानं गाडी बोलवायची कशी हा प्रश्न होता.
त्या रस्त्याला वाहतूक तशी अगदीच कमी. 10 मिनिटं आराम करून मी आणि सोनाली दाभ्याकडे
पायी निघालो. सर्वांची दांडी यात्रा होण्यापेक्ष्या मी आणि सोनालीनं ते अंतर जमेल तसं
कापायचं आणि गाडी पाठवायची असं मीच ठरवलं. वर्षात 4 महीने हिमालयात घालवणाऱ्या सोनालीला
त्यात काही वावगं वाटलं नाही. गप्पा मारत आम्ही 7 किमी कधी चाललो ते कळलंच नाही. आम्ही
पोहोचून गाडी परत पाठवूपर्यंत बाकी मंडळीही बरंच अंतर चालत आली होती.
कोरडे होऊन, आवरून, थोडा खाऊ खाऊन आम्ही 4.30 ला दाभे सोडलं.
प्रतापगडाजवळ जेवण उरकून आम्ही डुलक्या काढत, गप्पा मारत 11 ला मुलुंडला पोहोचलो.
अगदी अखलेल्या प्लॅननुसार नाही पण ट्रेक नक्कीच खूप मजेशीर झाला
होता. हिलाच पावसाळी उनाड भटकंती म्हणतात का हो? साहजिकच ह्याप्रकारच्या भटकंतीला तिथंला भूगोल पाठ हवाच आणि
त्याहून महत्त्वाचं म्हणजे तसा अनुभवी आणि तंदुरूस्त चमू हवा.