पंधरा दिवसांपूर्वी झालेला ऊन्हाळ्यातला पावसाळी ट्रेक म्हणजे
आधीच थंडीनं थरथर कापणारे हात, त्यात हे "धामणओहोळ" ज्याचा लोकांनी
"धामणहोळ" किंवा "धामणवहाळ" असा अपभ्रंश केला आहे, त्याचं कोडं
ह्या ब्लॉगमध्ये नेमकं खरडवणं म्हणजे खरंच अवघड काम आहे. असो, हाती घेतलं तर तसं अवघड
नाही. त्याला नेमकी सुरुवात कुठून आणि कशी करू हे कोडं काही सुटत नाही, आणि त्याच विचारात बघता-बघता कधी मी त्या टुमदार आणि देखण्या गावात
जाऊन पोहोचतो ह्याचा पत्ता लागत नाही, टेबलावर ठेवलेली कॉफी गळाभेटीसाठी ताटकळत राहून
गार पडते.
ह्या सगळ्या प्रकरणात प्रमुख कलाकार आहेत धामणओहोळ गावातले शेडगे
आणि काळे कुटुंबीय आणि मग आपला चमू: रोहन, सागर, मनोज, प्रिती, राजस, यज्ञेश, पवन आणि
मी.
पुण्याच्या दक्षिण-पश्चिमेला, (एका) मानवाने निसर्गाची केलेली
हेळसांड ज्याला लोकं "लवासा टाऊनशिप" म्हणतात, त्याच्या पलीकडे साधारण १६
किलोमीटरवर धामणओहोळ आहे. बहुतांश जागा बड्या-धेंड्यांना विकल्या गेल्या असल्या तरीही
लवासा प्रकल्पावर स्टे आणून पर्यावरणाच्या दृष्टीने संवेदनशील अशा ६६ गावांची जी यादी
केली गेली आहे, त्यात धामणओहोळची वर्णी
लागली आहे.
असो, माझी आणि धामणओहोळची ओळख आहे ती फक्त घाट-वाटांमुळे. त्यापैकी
मी एकच वाट केली होती, ज्याला मी लिंग्याघाट समजत होतो. ती वाट तशी ट्रेकर्सच्या ऐकण्यात-माहितीत
असलेली, आणि देवघाट तसा ब-यांपैकी अनोळखी.
भाग १:
मी, मनोज, रोहन, सागर आणि प्रिती ह्या वाटा करण्याच्या हेतूने
धामणओहोळला पोहोचलो. “मी याआधी केलेली वाट नक्की लिंग्याघाटाची होती का?” ह्यातल्या
प्रश्नचिन्हाचं उत्तर हे ह्या एकूण कोड्यातला एक महत्त्वाचा भाग आहे. गावात विचारपूस
केल्यावर आणखीकाही नावं कानावर पडली: निसणीची वाट आणि चिपाचं दार. मग मात्र आम्ही ख-या
अर्थानं मामांच्या मागे प्रश्नाची सरबत्ती मांडली. ह्यातनं भरपूर अशा गोष्टी कळल्या
किजिथं पाळंदे सरांच्या पुस्तकातल्या काही डीटेल्स, काही ब्लॉग्स आणि गावक-यांनी सांगितलेली
माहिती ह्यात तफावत आढळली. मग (स्व-समाधानासाठी) त्याची शहानिशा करण्यासाठी आम्ही हा
आणि ह्या पुढचा वीकेंड पण बूक करून टाकला. एका खेपेला २-२ वाटा केल्या तर इथल्या चारही
वाटा होणार होत्या. चिपाचं दार पुढच्या खेपेसाठी ठेऊन आम्ही आधी देवघाट (जो खरंतर लिंग्याघाट
आहे असा खुलासा आम्हाला ट्रेक करून गावात परतल्यावर झाला) आणि निसणीची वाट (जिला मी
लिंग्या घाट समजत होतो) हा कार्यक्रम उरकायचं ठरवलं.
मामांशी बरीच चर्चा करून झाल्यावर मी सुध्दा बुचकळ्यात पडला
होतो की मी नेमकं कोणत्या वाटेत जोडं झिजवलंय. हा, आता “कोणती पण वाट चढलो असू, त्यात
काय एवढं” असा प्रकार ज्यांचा असेल, हे कोडं त्यांच्यासाठी तर नक्कीच नाहीये, नाकाच्या
शेंड्यावर राग येउन अगदी काढता पाय घेतला तरी चालेल. मग शेवटी आम्ही मामांना आम्हाला
लिंग्याघाटाच्या तोंडाशी सोडायला भाग पाडलं. लांबवर दिसणार्या एका टॉवरकडे बोट दाखवत
मी मामांना म्हणालो की मी तिथून वर आलो होतो. तीच निसणीची वाट आहे असं मामांनी पुन्हा
एकदा सांगितलं. घाट उतरायला सुरुवात होते अगदी तिथेच वाघजाई देवीचं छोटं मंदिरवजा स्थान
सुद्धा आहे.
मग त्यांच्या मते देवघाट कोणता ह्या प्रश्नाला उत्तर म्हणून
मामांनी आम्हाला तिथून जवळचं असलेल्या एका नाळेच्या तोंडाशी आणून उभं केलं. मामांचा
निरोप घेऊन आम्ही त्या वाटेनं खाली उतरायला सुरुवातकेली. दगड रचून बनवलेलीटिपिकल वाट,
एखाद्या घाटवाटेला साजेशी अशी ही वाट. अगदी मधोमध उभ्या असलेल्या सुळक्यापासून अजून
खाली उतरून गेल्यावर उजव्या हाताला एक भली-मोठी नैसर्गिक गुहा दिसली. अत्यंत देखणी
अशी जागा. आपोआप वाट सोडून पाय गुहेकडे वळाले हे सांगायला नको. गुहेच्या पोटाशी मातीत
प्राण्यांच्या पायाचे ठसे दिसले, पण आवडअसली तरीही अज्ञानापोटी ते नीट ओळखता आले नाहीत.
जमेल तेवढे फोटो काढून, पोटाचे थोडे चोचले पुरवून, द्राक्ष अक्षरशः गिळून मुखशुद्धी
केली आणि आम्ही तिथून काढता पाय घेतला. गुहेनंतर नळी उतरत असताना अचानक वाट नाहीशी
झाली. तिथून धबधब्याच्या वाटेनं थोडं खाली उतरल्यावर अचानक मोठा टप्पा दिसला. मग थोडी
शोधाशोध केल्यावर वरच्या झाडीत वाट मिळाली. तिच्याने आम्ही पुढे गेलो आणि ओढा/नाळ खाली
उजवीकडे राहून गेली. त्याच वाटेने जंगल तुडवत आम्ही एका फाट्याशी आलो.
“ही डावीकडची वाट वर त्या टॉवरपाशी
जाते, मी ह्याच वाटेने वर गेलोय आधी. उजवीकडे कुर्डूगड.", असं म्हणून मी छानसा
दगड पाहून त्यावर बसकण मारली.
आमच्यापैकी फक्त मी आणि प्रितीने कुर्डूगड केला असल्याने कुर्डुगड
पहायचं ठरलं. गेल्या खेपेला वेळेअभावी मी निव्वळ भोज्जा करून आलो होतो, मात्र ह्यावेळेस
कुर्डूगड एकदा नीट पहायची संधी आयती चालून आली होती. हा किल्ला मा वळ खोर्याचे वतनदार
श्री. बाजी पासलकर ह्यांच्या देखरेखीखाली होता. ही गोष्ट मला तोंडपाठ आहे असं मी म्हणत
नाहीये पण धामणओहोळ गावातल्या किती पोरांना हे माहित असेल देव जाणे. कदाचित त्यांना
हे ही माहित नसेल कि वरसगाव धरणाच्या जलाशयाला बाजीपासलकरांचं नाव का दिलं गेलं. जलाशयाला
नाव दिलं गेलं पण दुर्दैवाने त्यांचा जुना वाडा आणि जमीन त्याच पाण्याखाली बुडाली आहे.
मग ठरल्याप्रमाणे आम्ही कुर्डूगड पाहुन किल्ल्यावरच जेवणाचा
कार्यक्रम उरकला, आणि कुर्डाई देवीच्या मंदिरापासून ११ नंबरच्या बसने पुन्हा त्याच
फाट्यापाशी आलो. सुर्य आग ओकत असल्याने गाडीचं रेडीएटर मजबूत तापलं होतं, मग गटागट
पाणी पिउन ते गार केलं आणि हाश-हुश करत करत थोडा वेळ आराम केला. सुमारे अर्धा तास अळ्ळम-टळ्ळम
केल्यावर मग पुन्हा तिथून चालते झालो. अगदी ठळक, नियमित वापरातली आणिकमी-अधिक चढणीची
ही वाट.
कुर्डूपेठेतून घाटमाथ्यावर येण्यासाठी जेमतेम पाउण- एक तास लागतो.
वाटेत एका अवघड ठिकाणी लाकडाचे वासे बसवून पाय ठेवायला जागा केली आहे तर काही ठिकाणी
दगड रचूनपाय-या केल्या आहेत. ही वाट चढुन आम्ही
धामणओहोळला पोहोचलो. ह्याच वाटेला गावकरी निसणीची वाट म्हणतात.
गावात परतल्यावर झालेल्या चर्चेपासून ह्या कोड्याला खरी सुरुवात
झाली. "आम्ही देवघाटानं खाली गेलो"
असं ऐकल्याक्षणी आम्हाला गावातल्या काही जाणकार मंडळींनी ते शक्य नसल्याचा टोला हाणला.
त्यांच्याशी बरीच चर्चा केल्यावर आम्हाला मामांनी केलेली लबाडी कळली. मामांनी आम्हाला
सकाळी देवघाटाऐवजी लिंग्याघाटाच्या तोंडाशी सोडलं होतं. मग आमच्या ज्ञानात भर पडली
कि नाळेत थोडं खाली उतरल्यावर एक जेमतेम २०-२५
फुटाचा सुळका दिसतो, त्याला अनुसरून त्या वाटेला लिंग्याघाट असं नाव पडलं. मुद्दा निघालाच
होता म्हणून हातासरशी त्यांनी आम्हाला देवघाटाचा अप्रोच कुठून आहे ते सांगितलं.
“निसणीची वाट म्हणजेच देवघाट का
हो?” तर ह्याचं सरळसोट उत्तर “नाही” असं आहे. त्याचं आकलन आम्हाला दुस-या खेपेला झालं!
भाग २:
ह्या खेपेला मात्र सगळे सोबती वेगळे होते. यज्ञेश, राजस, पवन,
प्रिती आणि पाऊस. ह्यातल्या सगळ्यात जास्त त्रासदायक ठरू शकणा-यांमध्ये पावसाचा नंबर
सगळ्यात वर. पवन आणि मी शनिवार दुपार पासूनच धामणओहोळात ठाण मांडुन बसलो होतो. आम्ही
पुन्हा मामांना गाठलं.
“मामा, ह्यावेळेस देवघाटानं खाली
जायचं”, मी पिल्लु सोडलं.
मामांनी आधी बाहेर पावसाकडे नजर फिरवली आणि मग पु. लं. च्या
“मुंबईकर-पुणेकर-नागपूरकर”मध्ये “पुण्यातल्या दुकानात गि-हाईक कसा दुय्यम असतो” ह्याचं
जसं वर्णन आहे अगदी तसं दुर्लक्ष करून ब-याच वेळानंतर आमच्याकडे करड्या नजरेनं पाहिलं.
“नाही जमायचं. कोण बी जात नाही
तिथं. लय आधी गुरं लावाया जायचं, आता ते बी नाही. लय आधी त्या तिथं चौर्यापाशी उंबर्डीतनं
गावातलं मानुस गुरं वर आणायचं आता ते बी न्हाई येत”, मामांचा सपशेल नकार. म्हातार्यानं
तंबाखू मळून चुरा करावा अगदी तसं आमच्या कार्यक्रमावर पाणी सोडलं गेलं होतं.
तरी आम्ही काही माघार घेतली नाही, नेटाने खोदून-खोदून माहिती
विचारली. त्या दरम्यान देवघाटाची वाट किती अवघड आणि त्याहून किती माजलेली आहे ह्याचं
कीर्तन आमच्यासमोर गायलं गेलं. पावसामुळे शेतीची कामं अडकून पडल्याने गावातली बरीच
पुरुष मंडळी जमली. ते एकाच स्वरात सांगत होते की त्या वाटेनं उंबर्डीपर्यंत आजवर एकही
व्यक्ती गेली नाहीये गेल्या ३५-४० वर्षांत, खुद्द मामाही नाही. माजलेलं गवत, मोडलेली
वाट, नाकावरचा ऊतार, आणि त्यात हा अवकाळी पाऊस.
दुपार आम्ही आसपासची मंदिरं, विहिरी पाहण्यात आणि वॉचटॉवरवर
बसून घालवणं पसंत केलं. शांत गाणी (अर्थातच,
कानात हेडफोन टाकून) ऐकत तिथं किंवा अशाच कुण्या आडगावी घालवलेली दुपार ही खोलीत भर्र
पंख्याखाली लोळत घालवलेल्या आळशी दुपारीपेक्षा खूपच जास्त सुखदायी ठरते. त्यातलं गाणं
ही अर्थातच सेकंडरी गोष्ट. सेकंडरी म्हणजेच दुय्यम असं म्हणायला हरकत नाही. पण इथं
दुय्यम जरा सावत्र पोराला वापरावा तसा शब्द वाटतो.
When
everything has come and gone, We'll look back on this road we're on.
Yeah,
we'll see how far we've come.
Yeah,
we've come a long way.
Let's not
talk about the future, Let's not talk about the days gone past.
All this
time we've been running round in circles, yeah.
Well, I
can feel a change a coming, And I know we're gonna make it last.
From now
on we'll be going somewhere slowly, instead of going nowhere fast.
- Bryan
Adams. Track: Nowhere Fast, Album: Room Service.
संध्याकाळी पावसामुळे गावाबाहेर फेरफटका मारता आला नाही आणि
नाईलाजानं पायाची भिंगरी काळेंच्या व्हरांड्यात अडखळली. मस्त गप्पा रंगल्या. दिवेलागणीची
वेळ झाली आणि जवळ-जवळ रिकामी झाल्यावर खळखळ वाजणा-या काडेपेटीतून कशा चार-पाच काड्या
निघतात, तशी ती स्वारगेटहून ३.३० ला निघालेली धामणओहोळची एस.टी. आली आणि बसमधून इन-मीन-तीन
डोकी उतरली. दिवसात ही स्वारगेटहून इथं येणारी एकमेव एस.टी. ही मुक्कामी येउन पहाटे
५. ४५ ला निघते.
रात्री झोपण्याआधी एस. टी. चालक आणि वाहक काका, नथु काळे मामा
आणि आमच्या पुन्हा गप्पा रंगल्या. साधे डिझेलचे पण पैसे निघत नसताना नुकसान सोसून ह्या
आणि खरंतर ह्याहून अधिक आडगावात सेवा अविरत चालू ठेवण्याबद्दल एस.टी.चे आभार मानावे
तेवढे कमी. निदान ट्रेकर्स तरी ह्याला नक्कीच दुजोरा देतील. ह्या गप्पांमध्ये आम्हाला
सोबत होती कान खाली पाडून बोटभर-वितभर सरकत, हात-पाय ताणत आमच्या सतरंजीवर आलेला काळे
काकांचा आळसावलेला भुभू राजा, अर्धा डझन मोठ्या कोंबड्या (जिवंत) आणि त्यांची पिल्लावळं
ह्यांची.
उरलेल्या ३ स्टूजेसना येता-येता रात्र झाली. रात्रभर बाहेर पाऊस
कोसळतच होता आणि कुत्रं गोणपाटावर झोपतं तसं मुटकूळं करुन आम्ही कसंतरी कुडकुडत डुलक्या
काढत होतो. पहाटे ५.४५ म्हणजे
अगदी वेळेवर एस.टी. निघून गेली. पाऊस चालूच होता. सकाळी पाऊसत्याचं काम संपवून जरा
ओसरला तसं आम्ही स्वतःहून जायची मानसिक तयारी करून, पुन्हा पाण्यात दगड टाकायचा म्हणून
मामांशी बोलायला सुरुवात केली. शेवटी, पूर्ण वाट नाही पण निदान चौर्यापर्यंत सोडायला
मामा तयार झाले. वाटेत पाण्याची टाकी आहेत त्या जागेलाच गावातले लोक चौर्या म्हणतात.
ह्यावेळेस शंकर मामांचे आडनाव बंधू, मारुती शेडगे सुद्धा आमच्या सोबतीला होते. सोबत
हुशार आणि तरतरीत दिसणारे २ कुत्रे, शंकर मामांचा पांढरा ‘राजा’ आणि मारुती मामांचा
काळा ‘काळ्या’. आम्ही घाटमाथ्याकडे धूम ठोकली.
निसणी आणि लिंग्याघाटाच्या वाटा डावीकडे ठेऊन आम्ही उजवीकडे
असलेल्या टेकाडाकडे वळलो. अगदी टेकाडावर न जाता त्याच्या पोटातल्या कारवीतून वाट काढत
आम्ही एका नाळेशी पोहोचलो. ह्या भागाला गावातले लोक दुर्गाडी म्हणतात. मामांपाठोपाठ
आम्ही नाळेतून खाली उतरायला सुरुवात केली. पुन्हा पावसाला सुरुवात झाली होती आणि त्यामुळे
नाळेतला चिखल आणि चिकट झालेले दगड-गोटे ह्यामुळे एकूणच आमची गाडी हळूहळू पुढे जात होती.
मामा आपले टपाटप ह्या दगडावरून त्या दगडावर उड्या मारत उतरत होते. साधारणतः ३० मिनिटे
तसा प्रकार केल्यावर आम्ही उजवीकडच्या पदरात शिरलो. कारवीतून वाट काढत एका मोकळ्या
जागी आलो. तिथून लिंग्याघाटाच्या अगदी समोरची
नाळ दिसली. पावसाळ्यात इथून धबधब्यांचा प्रताप पाहून डोळ्याचं पारणं फिटेल अशी
ती जागा. तसंच कारवीतून पुढे आल्यावर एक मोकळा माळ लागला. गेल्या रविवारी साधारण ह्याच
वेळी माझी आणि प्रितीची चर्चा झाली होती की इथं येता येईल का आणि आज आम्ही तिथं होतो,
अर्थात मामांच्या मदतीमुळेच.
ब-याच वेळा असं होतं की आपण काहीतरी ठरवतो आणि नंतर त्याला तडीस
नेत नाही. ट्रेकचं पण तसंच आहे. ठरवा, पोतडी भरा आणि निघा. ट्रेकला जाण्यापूर्वी माहिती
घेणे जरुरी आहे. पण, कधीकधी आपण खूप अभ्यास करत बसतो आणि ट्रेक तसाच राहून जातो. माझं
वैयक्तिक मत (खास करून घाटवाटांबद्दल) असं आहे की त्या-त्या वाटेची माहिती आणि अजून
नवीन वाटा त्या-त्या जागी जाऊन पहिल्या आणि गावच्या वयस्कर माणसांशी चर्चा केल्यावर
चांगल्याच कळतात. बाकी अभ्यास तर चालूच असतो की आपला. इथल्या लिखाणाप्रमाणे आम्ही तिथंही
इथं-तिथं वाट सोडून फेरफटका मारला, फोटो-फोटो खेळलो. इतक्यात मामांनी न राहवून हाळी
दिली. दोन्ही मामा पाण्याच्या टाक्यापाशी उभे होते. चांगलेच मोठे असे एक आणि त्याहून
थोडे छोटेखानी असे एक अशी २ पाण्याची टाकी पाहून ही वाट वापरातली होती ह्यावर मला नक्की
विश्वास बसला.
आम्हाला वाटलं की आता इथून पुढे वाट आम्हालाच शोधावी लागणार,
पण मामा अजून पुढे जात राहिले आणि त्यांनी खात्री केली की ते आम्हाला योग्य वाटेला
लावूनच परततील. त्यांनी आमच्यासाठी आत्तापर्यंत केलेली २-३ तासाची मरमर त्यांना वाटणा-या
आपुलकीची ग्वाही देत होती. ऐनाच्या झाडांची जागा आता बोच-या काट्याच्या झुडपांनी घेतली,
डोक्यावर पाऊस चालूच. १५ मिनिटं कसं तरी अंगविक्षेप करत आम्ही एका नाळेच्या तोंडाशी
आलो.
मामांनी आम्हाला त्या नळीतून सरळ
खाली जायला सांगितलं, “अजिबात हिकडं-तिकडं व्ह्यायचं न्हाई, कणा-कणा खाली जाते वाट.
बरं का म्याडम, न्हाई गावली वाट तर पुना वरी या. वरी यायची वाट सापडंल ना? सावकाश जा.”
त्यांचा निरोप घेऊन आम्ही पुढे निघालो. मी आणि यज्ञेश वाट पाहायला
पुढे सरसावलो. पोटात कावळे ओरडायला लागले होते पण पावसामुळे एकंदरच सगळं सुसह्य झालं
होतं. आम्ही थोडं खाली उतरलो आणि वाट पाहायला थांबलो तितक्यात वरून मामांचा आवाज आला.
ते अजूनही कड्यावरून आमच्यावर लक्ष्य ठेवून होते. काय देवमाणसं आहेत! हल्लीच एक विनोद
वाचण्यात आला होता. जगात फक्त २ च लोकांना तुमची काळजी असते. एक म्हणजे आई आणि दुसरा
म्हणजे तो माणूस जो तुम्हाला सांगतो, "भावा, स्टॅंड काढ स्टॅंड." तसंच ट्रेकला
आल्यावर आईनंतर सगळ्यात जास्त काळजी असते ती गावातल्या काही प्रेमळ लोकांना.
पावसामुळे त्यांचा आवाज काही आमच्या कानी येईना, पण मग तरीही
सगळं कळल्यासारखं माना डोलावून आम्ही मामांना परत जायला सांगितलं आणि खाली उतरायला
लागलो. धबधब्यातून खाली उतरताना कसरत होत होती पण थकवा अजिबात जाणवत नव्हता. मामांच्या
सांगण्यानुसार आम्ही नाळेतूनच खाली उतरत होतो आणि तसंही दुसरीकडे कुठे वाटाण्याला काहीच
वाव नव्हता. उजवीकडच्या भिंताडाला लागून नळीने आम्ही खाली उतरत आलो. मामांचा निरोप
घेतल्यापासून साधारणतः तासभर दगड-गोट्यातून उतरल्यावर आम्ही कोकणात उतरलो. तिथं डावीकडून
अजून एक मोठा ओढा येउन मिळतो. लिंग्या घाट आणि त्या समोरच्या ३-४ घळींचं पाणी पिऊन
हा ओढा पावसाळ्यात दुथडी भरून वाहत असताना ओलांडणे म्हणजे मोठ्या जिकिरीचं काम असावं
ह्यात तिळमात्र शंका नाही.
निसटत्या दगडातून पुढे उंबर्डीकडे जाणारी वाट सोडून आम्ही डावीकडच्या
डोंगराकडे म्हणजेच निसणीच्या वाटेकडे आमचा मोर्चा वळवला. सगळे विसाव्याला आणि खादाडीला
बसायच्या तयारीत असताना मी वाट पाहायची म्हणून डावीकडे घुसखोरी केली. सवयीप्रमाणे तसाच
अजून थोडं, अजून थोडं असं करत काट्यातून घुसत मी वाट शोधून काढली. खात्री करण्यासाठी
थोडंसं पुढं जाऊ म्हणून मी अगदी पाच मिनिटं
पुढे गेलो आणि अचानक एका जागी येउन थबकलो. सुरुवातीला काही चौरसाकृती दगडं दिसली, मग
नेमकं काय प्रकरण आहे ते पाहण्यासाठी अजून फेरफटका मारला आणि पुरता वेडा झालो. एकावर
एक अगदी पध्दतशीर रचलेली दगड, जुन्या पडक्या बांधकामाचे अवशेष, कोरीव पाय-या इ. मग
कुठे दिवा पेटला डोक्यात कि आपण कोळी राज्याच्या दरबारापाशी आलोय. मामांनी आधीच्या
बोलण्यात त्याचा उल्लेख केला होता. मग मात्र सगळ्यांना आपलंसं करण्यासाठी खाली धूम
ठोकली. तोपर्यंत खालची मंडळी वाट पाहतच होती. त्यांनी त्यांचं थोबाड उघडून माझी कानउघडणी
करण्याआधी मी वरच्या गमतीची बडबडगीते गायली. मग मला लाडू आणि खजूर आणि अजून ब-याच प्रकारचा
खाऊ पुरवण्यात आला. तो अक्षरशः हादडल्यावर पुढच्या पाचंच मिनिटात आम्ही वर चढत होतो.
राजवाड्याच्या भागात बक्कळ फिरून खूप समाधानी झालो होतो, हरपलेलं
भान घड्याळ बघून पुन्हा आकडेमोडीत गुंतलं. आता निघायला हवं. अगदी जेमतेम अर्धा तास
वामकुक्षी घेऊन पाऊस पुन्हा पूर्ण तयारीनिशी हजर झाला. ज्याप्रकारे अंधारून आलं होतं
ते पाहता चिपाचं दार हुकणार होतं. पण मला त्याची खंत नव्हती. अशावेळी मी एक गोष्ट आठवतो:
Harvey Voge ने म्हणलं आहे, "Mountains will always be there, the trick is
to make sure you are too".
समाधानी मनाने आम्ही राजवाड्यामागची सोंड चढायला घेतली. माझ्या
आणि प्रितीच्या अंदाजाप्रमाणे त्या वाटेने आम्ही कुर्डूपेठहून निसणीच्या वाटेकडे जाणा-या
पाऊलवाटेवर येणार होतो, आणि तसंच झालं. पण ही चढाई जरा छातीवर येत होती, त्यात आम्ही
दमलेलो. अगदी सर्वसाधारण गतीने आम्ही वर चढून येताना पाऊण तास कसा गेला ते कळलंच नाही.
निसणीच्या वाटेला ही वाट येउन मिळते तिथं उंबराचं मोठं झाड आहे हे मामांनी आम्हाला
आधी म्हणजे मागच्या आठवड्यात सांगितलं होतं. धन्य आहेत ते. मग काय गेल्या आठवड्यातच
तुडवलेल्या वाटेने डोळ्याचे पारणे फिटतील असं दृश्य पाहत आम्ही टॉवरपर्यंत आलो. पाऊस
आता दडी मारून बसला होता. चीपाचं दार पण झालं असतं अशी कुरकुर लागली खरी पण जास्त वेळ
नाही. तिथंच निवांत जागी बसून गप्पा मारत जेवण उरकल्यावर थकवा कुठच्या कुठं पळून गेला
होता. गावात परत आल्यावर मामांनी आग्रहानं पाजलेला चहा, काळे मामांनी केलेलं कौतुक
आपुलकीचा एक ठेवा कायमस्वरूपी देऊ करून गेला. भेट लवकरच होणार होती हे आम्हाला माहित होतंच. चिपाचं दार उघडलं
होतं.
तुम्ही म्हणत असाल कि ह्याला मी
कोडं का म्हणतोय? साधा तर ट्रेक आहे. घाट माथ्यावर एक गाव, गावातून ४ घाटवाटा असं नेहमीचंच समीकरण.
माझ्यासाठी तरी हे एक कोडं होतं आणि त्याला बरीच कारणे आहेत.
१. 'चिपाचं दार' ही कोणत्याही
पुस्तकात उल्लेख नसलेली वाट. मान्य आहे कि अश्या बर्याच वाटा आहेत सह्याद्रीमध्ये.
२. लिंग्याघाटाला देवघाट समजणे,
निसणीच्या वाटेला लिंग्याघाट समजणे, निसणीची वाट आणि देवघाट ह्या दोन्ही एकच असा गैरसमज.
३. लिंग्याघाटाला तसं नाव का दिलं
गेलं असेल ह्याबद्दल असणारं दुमत.
४. जरा लांब पण सोपी असली तरी
सहजा-सहजी देवघाटाची वाट
दाखवण्याबद्दल गावकर्यांत असलेली
उदासीनता.
५. दुर्लक्षित अवस्थेत व विशेष
माहित नसलेला कोळी राज्याचा राजवाडा. खरंतर राजवाडा म्हणण्यासारखं तिथं काही उरलं नाहीये,
पण भेट द्यावी अशी जागा ती नक्कीच आहे.