जांभिवली ते भिमाशंकर
नेहमीच्या सवयीप्रमाणे नेमकं Weekdays मध्ये ट्रेकला जायचं खूळ डोचक्यात आलं. तेच ते नेहमीच थैमान डोक्यात की जाऊ तर कुठे. साला ट्रेकला कोणी येणार नाहीये, पुन्हा एकटंच जोड़े झिजवत फिरायचय. डोकं खाजवून थोड़े केस उपटले तेव्हा कुठे ट्रेकचा प्लान तयार होत होता. ह्यावेळी जंगलात बोम्बलत भटकायचं असं वाटत होतं. म्हणे पाउस मस्त झोडत आहे घाटमाथ्याना. तसा विचार केला होता की एखाद-दूसरी घाटवाट पिंजून काढावी किंवा मग जंगलात मनसोक्त भटकंती. ह्या विचारांती 'किल्ले' यादीतून गारद झाले.
पावसाळी ट्रेक म्हणजे आपल गाढव होणार वजन घेउन आणि त्यात बूट असे की जरा काय धावायला सुरुवात केली की आमचा साष्टांग नमस्कार आहेच म्हणून समजा. डोक्यात पहिल्यांदा टोला वाजवला तो ट्रेक होता शिवथरचा. पण नंतर विचार केला की मागच्या बारिला तिथल्या ३ वाटा करुन झाल्या आहेत. त्यात उरलेल्या एका वाटेसाठी एवढा प्रवास नको. तिथून परतीचा प्रवास परवडत नाही. बारगळला शिवथरचा प्लान. पुन्हा डोक्याला खाद्य!!!
MSEB ची कृपादृष्टी होईपर्यंत (समजुन घ्या...३ तास उलटले) शेवटी विचार आला लोणावळ्याहून भिमाशंकर गाठावं. आधी केलेली वाट आहे. तरीही पावसाळ्यात काय जंगल आहे ते पाहवं. मजेची गोष्ट म्हणजे weekdays ला भटक्या जमातीचं (अर्थातच ट्रेकर्स बद्दल बोलतोय) कोणीही भेटणं म्हणजे कांग्रेसने देशासाठी काही चांगले करणे किती अशक्य आहे, तितकेच हे.
मुकाट्यानं सॅक भरली. सगळं सामान नीट प्लास्टिकच्या पिशावीमधे गुंडालून सॅकमध्ये कोंबलं. पहिल्यांदा असं वाटत नव्हतं की काहीतरी राहून गेलंय की काय. आधी बस मग ट्रेन असा प्रवास करत रात्री २ ला लोनावाला स्टेशन गाठलं. बाहेर पाउस पुरता ठोकत होता. वाटुन गेल की आता खर्री मजा येइल.. ट्रेक करायचाय काय, घे आता.
वाट तशी डोक्यात होती बर्यापैकी, फ़क्त बोम्ब होती ती सुरुवातीची. आधी केला होता तेव्हा लोनावल्याहून नाही, तर राजमाचीहून सुरुवात केली होती. लोनावल्याहून वळवंड गावाच्या फाट्यापर्यंतची वाट अजिबातच माहित नव्हती. तितक्यात ३-४ ट्रेकर्स दिसले. टोळी ढ़ाकला निघाली होती. मी ते ऐकून चारी मुंडया चीत! वाटुन गेलं की पावसाळ्यात पार्श्वभाग घासत ढ़ाकचा ट्रेक करण्याइतकी हिम्मत येते तरी कुठून. च्यायला असा भलता प्लान करण्याइतका मी वेडा नाही आणि तेवढा कीड़ा माझ्या पार्श्वभागात आहे की नाही ह्याचा शोध मी अद्याप लावला नाहीये. डोक्याला हात लावायची वेळ तेव्हा आली जेव्हा मी त्यांच्याकड़े एक भन्नाट गोष्ट पहिली - चक्क्क संडास घासायचा ब्रश. व्व्वा रे पट्ठ्या! काय शक्कल लढ़वली आहे! किती कामी आली ते त्यांनाच ठाउक. असो, "आवरा" phase मधून बाहेर आलो आणि बराच विचार केल्यावर माझी अक्कल थोड़ी चालली.
त्यांना विचारलं, "तुमच्या गाडीतून मला जांभीवलीला सोडाल का?"
थोड़ी कुजबूज केल्यानंतर ब्रशवाला लीडर हो म्हणाला.
जांभिवलीला गाडी-रस्ता कामशेतहून आहे. लोनावाला-पुणे रोडवर कामशेत आहे. तिथून जांभीवली असेल अदमासे 25-28 km असेल. पोहोचलो तेव्हा ४ वाजले होते. पाउस ओसरला होता. ब्रशवाल्यांना टाटा_गुड लक करुन मी ढाकची वाट धरली. रेनकोट वगैरे असा प्रकार निदान ट्रेकला तरी मी वापरत नाही. ढाकचा चढ़ चढ़तानाच बूट धम्माल उडवत होते..त्यात तिथ एवढा सुस्साट वारा होता की काय सांगू. वारा आणि पाउस असा दुहेरी मार खात खात मी पाऊण तासात भीमाशंकरच्या फाट्यापाशी पोहोचलो. पावसाने थोडावेळ निरोप घेतला होता. तितक्यात थांबून मी छानसा दगड पाहून बसकण मारली. बूटामुळं जी काही घसरगुंडी उडाली होती ती पाहून वाटुन गेल एकदा की च्यायला तेल लावत गेला ट्रेक, मस्त वाट आहे इथून खाली सांडशीला उतरायला, घरी जाऊ. पण नंतर पुन्हा विचार केला की आता आलोय तर करुन ट्रेकचा फडशा पाडायचाच!
तेवढा थोडावेळ टाइमपास केला आणि निघालो. एव्हाना, बूटांची जागा Floaters नी घेतली होती.
कुंडेश्वर मंदिराहून खात्या हाताची वाट धरली की डोंगरधार गाठायची. तिथून पुढे थोडा चढ़ लागतो. समोर जंगला पलीकडे कळकराईचा सुळका आणि त्याला लागुन असलेला ढाकचा बलाढ्य डोंगर दिसतो. नंतर ढाकची वाट सोडून उजवीकडे वळतो आणि कुसुरच्या पठाराचा चढ़ चालू होते. मी कुसुरची वाट धरली तेव्हा माझं बिस्किट खाऊन झालं होतं. पहाटेचं धुकं माजलं होतं आणि मी सकाळ व्हायची वाट पाहत होतो. धापा टाकत कुसुरचं पठार गाठलं तेव्हा ५.३० वाजले होते. मी भलताच हळू होतो पण बिनधास्त होतो कारण ब्रशवाल्यांमुळ्ये माझे ३-३.३० तास आधीच वाचले होते.
कुसुरचं पठार अफाट मोठ्ठ आहे आणि तेवढच उंच. त्याची उंची ढाकच्या तोडीसतोड़ आहे. कुसूरच्या पठारावर असंख्य वाटा आहेत, त्यामुळ्ये हरवन्याची शक्यता खूपच जास्त. त्यात ते धुक पाहून माझी दांडी गूल झाली. नशीब माझं की पाउस नव्हता. आधी हा ट्रेक केला तेव्हा वाटलं नव्हतं की पावसाल्यात हे अस काही असेल. थोडा वेळ डोक खाजवून मग वाट नीट लक्षात घेतली.
पाउस अक्षरशः झोडत होता. मी जमेल तेवढी हलकी केलेली sack फेकून द्यावीशी वाटत होती. तेव्हा पाठ थोपटली आणि विचार केला की पाउस आणि जंगले. ते सुद्धा कुसूरचं म्हणजे मजाच आहे.. पैसा वसूल.. खरंच वाटुन गेलं की त्या ब्रशवाल्यानी ट्रेक करू नये आज.
मुकाट्यानं जंगलात शिरणारी वाट धरली आणि पावसाचा मारा कमी जाणवू लागला. किर्र जंगल, माजलेल जंगल. पचापचा चिखल तुडवत निघालो. पावसाने वाट मोडली होती, चिखलामुले निसरडी झाली होती. कशीही असली तरी वाट सुन्दर आहे. मस्त जंगल आणि त्यात उतरणारी वाट. नागमोडी वळने घेत-घेत वाट बाहेर थोड्या खुल्या जागी येते. उतररणीचं जंगल संपून एक मोकळ्या पठारावर यायला साधारण २० min लागली. पाउस काय पिछा सोडेना. त्यात अजुन एक पठार. कुसुरला अशी ५-६ पठारं तुडवत जावं लागतं.
मोठ्या पठारावर आलो तेव्हा ६.३० वाजून गेले होते. ह्या पठारावर उजव्या हाताला वळायचं. दीड-दोनशे मीटर चालून आलो की डाव्या हाताला दगडी पडलेली आहेत. तिथ मस्त पाणी पिउन घेतलं. वाटही त्या दगडातूनच आहे. तिथे खेकडे चुकवत वर चढलो. धुकं थोडं ओसरलं होतं. ३०-३५ फूट लांबचं दिसायला लागलं. इथे खरी मज्जा येते. क्रिकेटचे ४-५ stadium मावतील एवढ मोठं पठार दिसतं. गुढघ्याएवढं गवत, समोर लांब दाट झाडी, जी मला आठवत होती पण दिसत नव्हती. मग नेहमीची ट्रिक आठवून योग्य वाट धरली.
हे पठार पार केलं तेव्हा 7.30 वाजले होते. हवा सुस्साट होती म्हणून सुदैवाने धुक अणि ढग गायब झाले. थोडा वेळ पड़ी मारू असा विचार केला आणि पुन्हा गड़गड़... हाका पुन्हा घोड़ आता. पाय ढगात होते. Floaters मुले पायांना थोडा तरी आराम होता. इथून कुसूर गावत पोहोचायला साधारण २ तास तरी लागतात आणि वाट हे तशी सोपी होते.
असो! ढाकचा डोंगर मागे दरीत राहून गेला होता. समोरच जंगल पार करुन आलो ते एका खुल्या जागी. इथून सरळ जाउन हलकेच उजवी कड़े गेलात तर एक धनगर वाडी आहे. वाडीपासून अगदी मळलेल्या वाटेने मी कुसूर गावाकडे उतरायला सुरुवात केली आणि ठरवल्याप्रमाणे गावा अलीकडेच थोड़ी झोप काढली. एका कुडाच्या घरात ताड़पत्री अंथरून दिली तिथच्या म्हातार्यानं. त्यावर मी Banner टाकला आणि ३ तास ताणून दिली.
कुसूर गाव एकदम टुमदार आणि मस्त जागी आहे. मागच्या बाजूला २-3 कोसावर दरी, समोर टाटाचा मोठ्ठा तलाव, उजवीकडे दरी पलिकडे ढाक आणि डाव्या हाताला ५-६ कोसावर वांद्रे खिंड! वस्तीच्या अलीकडेच नाकाला फड़का लावायला लागला. सकाळची वेळ. ८.३० ते ११ मस्त झोप झाली. मग गावाची वाट धरली. गावात मी एकटाच भटकतोय हे उमगाल्यावर म्हातारी मंडळी चावायला लागली.
"बाळ एकट्यान भटकू नग.. लय पाउस हाय.. धूकं हाय.. वाट चुकशील.. वाट लय वंगल हाय.. तुला गावनार न्हाई अन इचाराया कुणी भी नसल..तुला झेपायच न्हाई.. येकटा जीव हायेस.. मधी भूत हाय..तुला काय भे कलायचा न्हाई.. त्यात लई लांब हाय हितून..."
मनात मी एकच गोष्ट म्हणालो.. "घंटा "!
बिस्किट आणि चहा घेतला. पोट जरा कुठे भरलं की सावळ्याची बस आली. मग बसने पाऊण तासात सावळे गाठलं. सावळ्यात तर हद्द झाली. एक म्हातारं मागेच लागलं,
"जाऊ नग, एकट्यान जाऊ नग. "
काळजी आहे मान्य आहे. पण मग विचार करा की एकट्यानं कुसूर पण कसं पार केलं असेल? करतोय म्हणजे कुवत आहे, म्हणूनच करतोय की हो. ह्याचा अर्थ असा नाही होत की वाचकांनी ब्लॉग वाचून कुसूरची वाट धारावी एकट्याने.
असो! एव्हाना मला पाय आहेत अशी जाणीव पुन्हा झाली होती. मग आधी दत्त आणि मग गावच्या मारुतीला नमस्कार करुन वांद्रेची वाट धरली. सावळ्याहून ट्रेक म्हणजे नुसती धम्माल आहे. एकदा का वांद्रे खिंड ओलांडली की मग नुसतं जंगल तुडवत फिरायचं. डांबरी रस्ता पकडला आणि वांद्रे खिंडीच्या फाट्यावर डावीकडे येऊन थांबलो. तिथं एक कातकरी भेटला. माझी सॅक पाहूनच त्यानं ओळखलं कि हे येड निघालंय भीमाशंकरला. थोडी विचारपूस करून मग तो म्हणाला,
"मी निघालोय पदराच्या वाडीकडे ...येतोस तर चल.."
चालायला चालू केल्यावरच म्हातारा म्हणाला, " म्या लई घाईत हाये..बीगी-बीगी चाल.."
आता लागले. म्हातारा १० फूट पुढं आणि मागं मी धापा टाकतोय. Believe Me, माझा एवढा कुत्रा Mountain-Biking ला पण नव्हता हो झाला. नेमका पाउस ही कुठे दडी मारून बसला होता देव जाणे. ते अतरंग म्हातारं जे निघालं ते थेट पाण्याच्या टाक्यापाशी येऊन थांबलं. बहुदा माझी झालेली अवस्था पाहूनच ते म्हणालं,
''ल्येका हितून ५ मिनिटात येती खिंड..मी जातू.. हितून तुला गावल वाट..''
मी आकडेमोड करून मोकळा झालो कि ह्याची ५ म्हणजे आपली १५. घड्याळात १ वाजला होता. जरा काय बूड टेकलं कि पाउस चालू. वाटून गेलं कि इतका वेळ 'येरे येरे पावसा म्हणजे म्हातार्याचा आडोश्याला बैसा' होईल. मग वाटलं म्हातार्यान तीव्र इच्छा केली असेल कि पाउस पडू नये. KT लागू नये अशी इच्छा केल्यावर बाप्पा आम्हाला का पावत नाही देव जाणे. बहुतेक आम्ही "पाव" खातो, म्हणून तो भाव खात असेल.
अकरा नंबरची बस चालू होऊन ती पदर्याच्या वाडीत यायला तासभर गेला. खरतर साधारणपणे (स्वतः चा कुत्रा न करून घेता) सावळ्याहून पदारयाच्या वाडीत यायला तास-दीडतास पुरेसा आहे. इथपर्यंत चा ट्रेक म्हणजे जवळपास ५५%. पुढे अजून ३० किमी तर नक्कीच असेल भीमाशंकर. पदर्याच्यावाडीतही तोच कार्यक्रम.
"जंगल हाय, वाट मोडली हाय, तुला गावायची न्हाई..पुढं भूताचा माळ हाय..तिथं धरतंय.."
मग मलाच ओवाळून टाकलाय असं काही तोंड करून मी निमुटपणे भीमाशंकरची वाट धरली. वाडी सोडली तेव्हा २ वाजले होते आणि जेवायची वेळ झाली होती. वाट गावातून पुढे डावीकडे जाते. ओढा पार करते आणि मग थोडासा चढ चढला कि जंगल लागतं. अगदी त्या तिथं भाकरवडी, ब्रेड-केचअप हादडून घेतलं. जवळच्या ओढ्याच पाणी पिऊन निघालो.
हु-हु म्हणता म्हणता २.३० वाजले. जसा घड्याळ बघितलं तसा बोंबललो आणि भीमाशंकरकडे धावत सुटलो. एवढी टरकण्याचं कारण म्हणजे, माझ्या ऐकण्यात अश्या गोष्टी बर्याच वेळा आल्या होत्या कि भीमाशंकरच्या ह्या भागात लूट-मार होते, अर्थात मला लुटयला माझ्याकडे त्या लायक काही नव्हतंच. तरी थोडी-फार उडालीच होती. इथल्या सगळ्यात भयाण आणि माजलेल्या जंगलात मी संध्याकाळी एकटाच हुंदडणार होतो. त्यात पाउस असं चालू झाला होता कि बूड टेकवायला सोय नाही. होतो तिथून अजून थोडा चढ चढल्यावर मी भीमाशंकरला जाणारा गाडी-रस्ता तयार होतोय तिथं आलो. चिखल चिखल आणि अशक्य पिचपिच होती आणि माझी चिडचिड. कसातरी दात-ओठ चावत तो रस्ता चालून भीमाशंकरच्या पाउलवाटेला आलो. डावीकडे वळलो आणि जे सुटलो ते सुटलोच. डोक्यात फक्त एकच विचार - संध्याकाळी अंधारायच्या आत मला भीमाशंकर गाठायचं. फारशी भीती नव्हती. पण रस्ता चुकलो तर खरच वाट लागली असती कारण माझ्याकडे पोटात कोंबायला काहीच नव्हतं. त्यात भन्नाट पाउस. किती धुकं असेल ह्याचा साधा विचार ही करवत नव्हता. मग मात्र पोटात गोळा आला.
टुनाटुना उड्या मारत मी जंगल तुडवायला सुरुवात केली. साप दिसला कि त्याच्या मागं पळणारा मी, पण मला अजिबातच लाज वाटत नाही हे सांगायला कि मला खेकड्यांची भीती वाटते आणि नेमके तेच आपली नांगी कि काय असतंय ते वर करून जागोजागी ठाण मांडून बसले होते. सॅक ओली होऊन दुप्पट हमाली केल्यागत वाटेल इतकी जड झाली होती. रस्ता खूपच सोपा आहे आणि सुदैवाने जास्त कोणी फिरकत नसल्याने एकच ठळक अशी वाट आहे. त्यामुळे डोक्याला खाद्य कमी.
निघाल्यापासून साधारण पाऊण तासात, शिट्ट्या मारत, गाणी गात मी एका माळावर आलो. इथून वाट हळूहळू डावीकडे धारेकडे येत आहे ह्याची जाणीव होते. तसे न झाल्यास दुसरी वाट शोधणे. मध्ये आलेलं जंगल पार करून मी डोंगरधारेवर आलो.. इथून पैसा वसूल असं दृश्य दिसतं. खाली कोकणात पेठचा किल्ला. पण साला धुकं एवढ होतं कि काहीच दिसेना. फक्त झु-झु वारा होता. ते तसं असलं तरी पाउस सुसह्य होता.
दीड तास असाच अथक पण बिनधास्त चालल्यावर मी त्या 'तथा-कथित' भूताच्या माळावर आलो. उगाच आपल्या लगोर्या लावून ठेवल्यात. विशेष वेळ न घालवता मी भूताच्या माळाहून पुढे निघालो. ४.३० वाजून गेले होते. इथून वाट थोडी डावीकडे वळते. माळाचा विस्तार राहतो उजवीकडे. ह्यापुढे धुकं इतकं वाढलं कि पुढचं २५ फूट दिसणं मुश्कील होतं. आता थोडी दम-छाक झाल्यासारखं वाटतं होतं. पण थांबायला काहीच सोय नव्हती.. ५ वाजून गेले होते आणि पुढे बरंच अंतर बाकी होतं. मी विचार केला कि आता कमळजाई देवीच्या मंदिरापाशी थांबू. तिथून भीमाशंकर पुढे तासभर आहे. पाय बोंबलत होते पण इलाज नव्हता. मागच्या वेळी हा ट्रेक केला तेव्हा सावळ्यात रात्री झोपलो होतो. त्यामुळे एवढ थकवा नव्हता. पण ह्या वेळेस तसं न करता एकाच दिवसात करण्याच्या हट्टापायी निघालो होतो; आणि आता भीमाशंकरशिवाय कुठे ही थांबणं अशक्य होतं. सतत पाउस चालू होता आणि त्यामुळेच न थांबता मी ३ तास पायपीट केली होती.
इथे पठार - जंगल - पठार - चढण अशी मालिका चालू होती. कमळजाईच्या पठारावर आलो तेव्हा जरा हायसं वाटलं. इथून पुढं १०-१५ मिनिटात मंदिरापाशी येईन असं वाटलं. अगदीच न राहावल्यान मी बसकण मारली. पायात गोळे, पाठीवर कमालीची जड sack, गेल्या १२ तासात केलेली भन्नाट धावपळ ह्यामुळे मी काही अर्धा तास उठलो नाही.
६ वाजले तेव्हा मात्र मग मी आपली गाडी हलवली. त्यात इथून चढण आहे, आणि वरच्या अंगाला ओढा पार करायचाय म्हणजे निघालेलं बरं. स्वारी जोशात उठली आणि मटकन आपटली, पेकाड शेकून निघालं. कसातरी करत पुन्हा वाट धरली तेव्हा ठरवलं कि, नाही, आता धावपळ नाही.इथला निसर्ग एवढा देखणा आहे कि त्याची मजा घेतच जायचं. ह्याच गोष्टी ध्यानात ठेवून जेव्हा मी चढणीला लागलो तेव्हा शोध लागला कि आपल्याला कमळजाई मंदिर लागलंच नाहीये.. पण वाट तर बरोबर दिसत आहे, दोन्ही बाजूला व्यवस्थित दगडं. तेव्हा कळलं कि ही नवीन\दुसरी वाट असावी आणि ते तसंच होतं. त्याच वाटेने मी डोळ्याचं पारणं फिटेल असा निसर्गसौंदर्य पाहत ७.३० वाजता भीमाशंकर गाठलं.
माझी अवस्थाच इतकी भन्नाट होती कि मी कुठून आलो आहे आणि मला कशाची गरज आहे हे ओळखून एका गोसाव्यानं मला अंघोळीची व्यवस्था करू का विचारलं.. मी नंदीबैला सारखी मुंडी डोलावली आणि १५ मिनिटात त्यांनी त्यांच्या खोलीत गरम पाण्याची सोय करून दिली. मस्त अंघोळ करून मी महादेवाच्या दर्शनाला गेलो. डोकं टेकवून आलो तोपर्यंत मंदिरच्या पूजामंडपात ह्या गोसाव्यानं मी कसा आलो, एकटाच का, एकटा येऊ नये.. अशा गोष्टी काढल्या तेव्हा मी आपला मनात अजून कुठंतरी पठारावर हरवलो होतो.
मी हे असंख्य वेळा ऐकलं आहे कि ट्रेकिंग हे एकट्यानं नसावंच, त्रिकुट-चौकट तर असावीच. ह्या ट्रेकच ही तसं म्हणता येईल. उतरताना किंवा चढताना पडला असतास तर काय? वाटेत काही चावलं असतं तर काय? मग नेटवर्क नसतं तर काय? हे करून मिळालं तरी काय? आणि असंख्य तत्सम प्रश्न. खरं सांगायचं झालं तरं हे प्रश्न काहींना हा ब्लॉग वाचल्यावर पडू शकतात, फरक एवढाच आहे कि हे प्रश्न मला ट्रेक सुरु करायच्या आधी पडतात, आणि होय, तरीही मी जातो.
'का?' ह्या प्रश्नाची बरीच उत्तरं आहेत.
'नाही गेलास तर नाही का चालणार?' ह्याचं एकचं उत्तर : नाही चालणार!
'पुन्हा जाशील का?' ह्याचं उत्तर माझ्याकडं पण नाही.
हं, माझ्या सोलो ट्रेक बद्दल तुम्हाला काही आक्षेप असेल तर तसं सौम्य आणि तुम्हालाच शोभेल अश्या शब्दात वैयक्तिक संदेशाद्वारे सांगा, चर्चा करू. उद्धटपणे व्यक्त केलेल्या मताला किंवा टीकेला मधले बोट किंवा आरसा दाखवण्यात येईल.
I do not intend to motivate/discourage anyone from trekking/solo-trekking. I believe this and every other trek has taught me a handful of things. I simply don't expect anyone to pack his/her sack and set off to a solo trek after reading this or any of my blogs.
Subscribe to:
Posts (Atom)