राजगड-तोरणा-उपंड्या घाट-शिवथरघळ-खुटे घाट

ऑक्टोबर महिना म्हणाल तर आग ओकणारा तळपता सूर्य, वाफा निघत असलेली जमीन, मान टाकलेले रोपटे अणि भन्नाट करपलेला मी! अश्याच ऑक्टोबर महिन्यात Study Leave चालू झाल्यावर मला नको तो कीड़ा करावा वाटला. म्हणालो, ३-४ दिवस एखादा मस्त्त सोलो ट्रेक करुया. शेवटी भीत भीत पाण्यात दगड टाकलाच, विचारला आईला! आई जा म्हणाली..मग आधी खोलीत जाउन ४ उड्या मारल्या अणि मग नेहमी सारखं डोकं खाजवत बसलो. सॅक तयार, मी तयार, आणि ट्रेकचा प्लॅन ढगात! जायच तरी कुठे? नक्की सोलोच करायचा का? की विचारू कोण येतात का.

बराच विचार झाल्यावर राजगड-तोरणा करायचा ठरवले. सौरभ ठाकरेची आठवण झाली. साहेब ही नाही-हो, हो-नाही म्हणत शेवटी तयार झालेच. Solo Trek चा विचार एव्हाना डोक्यातून उडाला होता. सॅक भरून, सगळं सामान घेउन ( काही गोष्टी घ्यायच्या विसरून ) स्वारी निघाली. बसमध्ये बसलो, बस निघाली, ५ मैल गेलो नाही तोच ठाकरेंचा फ़ोन आला.
म्हणे, "मी येत नाहीये, तुला जायचय तर जा किंवा घरी जा परत, आपण नंतर जाऊ."
आता झाली की पंचाईत! मग म्हणालो, जाऊ दे, आपण जाऊ. २००७ च्या क्रिकेट वर्ल्ड कपहुन मायदेशी येताना आपल्या क्रिकेट टीम ला जेवढं वाईट वाटलं नसेल त्यापेक्षा मोठा पोपट माझा होइल. आता घंटा जातोय मी घरी, This bird had already flown. ट्रेक तो हो के रहेगा.

सीटमध्ये गोचीड अड़कावा तसा, कसाबसा लाल डब्याने स्वारगेट ला पोहोचलो तेव्हा पहाटेचे ५ वाजले होते. गुंजावन्याची येष्टी लागते तिथे राजगडला जाणारा ग्रुप दिसला. च्यामारी मेलो, २५-३०चं पब्लिक. घंटा सोलो ट्रेक. हे पब्लिक चावणार. मग मी प्लॅन बदलला, राजगड बाजूला ठेउन आता तोरणा करायचा असं ठरलं. वेल्ह्याची येष्टी यायला अजुन वेळ होता. म्हणालो जरा पोटाची आघाडी शांत करू. पुन्हा कटकट नको. मस्त हादडून आलो तेव्हा ST उभीच होती. डुलक्या खात-खात वेल्हा गाठलं.


सकाळचे ८ वाजले होते. आईला फ़ोन केला तेव्हा माझ्या संगण्यानुसार ठाकरे बाजुलाच चहा पित होता. एकदा वाट नीट विचारून घेतली, कारण राजगड अणि तोरणा दोन्ही ट्रेक पहिल्यांदाच करत होतो. वाटेला लागलो तेव्हा ८.३० वाजले असावेत. कोवळ्या उन्हातच किल्ला चढू असा चंग बांधून सुटलो एकदाचा. गल्ली-बोळ करत करत गावाच्या बाहेर आलो. ४-५ महिन्यानंतर ट्रेकला आल्याचा आनंद अणि समाधान! शेत ओलांडून सोंडेवर चढ़ाई करायला सुरुवात केली अणि मग ट्युब पेटली की मोठ्या गॅपनंतर ट्रेक करताना काय अवस्था होते. एक्कापाव-दुक्काचाकी करत-करत घामानं ओला होउन बर्यापैकी उंची गाठली होती.

गार वारा, दूर दिसणारं धरण, ह्यासाठीच तर तरसलो होतो. अर्ध्या तासात अर्धी उंची गाठल्यावर जरा धीर आला. गरम इंजिन थोड थंड झाल्यावर पाणी पिउन आत्मा शांत केला. पुन्हा सॅक पाठीवर मारून चढ़ाई सुरु केली. अंदाजे अर्धा तास चढल्यावर बिनी दरवाजा लागला. ठरल्याप्रमाणे किल्ला कोवळ्या उन्हातच गाठला. तोरंजाई मंदिर गाठलं तेव्हा १०.३० वाजले असतील. इतक्यात महाराजांच्या घोषणा देत एक ग्रुप समोर येताना दिसला. नंतर गेल्यावर समजले की हे पब्लिक आपल्या ओळखीचं आहे. ते नुकतेच राजगडहून आले होते. थोड्या गप्पा झाल्या आणि खाऊन-पिउन ते सगळे निघून गेले. किल्ल्यावर मी एकटाच. बोंबलत भटकलो पूर्ण किल्ला.

तोरणा भन्नाट आहे हे सांगायची काहीच गरज नाहीये. भट्टी दरवाजा शोधू म्हणून झाडीत घुसलो. भट्टी गावात उतरणारी वाट शोधून काढली. तसं म्हणावं तर वाट आहे असा म्हणता येणारच नाही. सांगायचा झालं तर वाट मोडली आहे. पावसाळ्यानंतर लगेच जाण्यात काहीच अर्थ नाहीये. चिलखती बुरुजावर जाऊन लंच केला. बुधल्याच्या सावलीत मस्त झोप काढली २ तास. मग जाउन झुंझार माची पाहून आलो, नावाप्रमाणेच आहे अगदी. पुन्हा मंदिराजवळ आलो, सॅक तिथेच ठेवली आणि म्हणलं लाकडं तोडून आणू, गरज वाटल्यास शेकोटी करता येइल. मग वाळक्या काटक्यांची छोटी मोळी बांधून आणली, येताना सूर्यास्त पाहिला. पैसे वसूल झाल्यागत वाटत होतं.

रात्री मॅगी खायचा बेत होता. त्याचा पोपट झाला, कारण १५० रुपयाचं मॅगी आणून ते शिजवायला भांडं आणायचं विसरलो. मग आता खारे बिस्किट खाऊन रात्र काढावी लागणार होती. अंधार झाला. रात्र झाली की सोलो ट्रेकचा सर्वात मोठा लोच्या कळून येतो. माझ्याकडे कॅमेराही नाही उगाच क्लिक-क्लिक करायला. मोबाइल मध्ये "ब्याटरी" फुल्ल पण मेमरी कार्ड नाही. आता मारा माश्या.

बिस्किट खाऊन झाल्यावर डब्बा टाकुन आलो अणि छान तारे पहात बसलो. कळत तर काही नाही त्यातलं. पण तारे ओळखता नाही आले तरी पहायला मज्जा वाटत होती. बाजुला शेकोटी होती म्हणून थंडी वाजत नव्हती. बाजा काढून १०-१५ गाणे वाजवून झाले. फुंकून फुंकून वैताग आल्यावर मंदिराबहेर स्वारी झोपी गेली. साधारण २ वाजले असावेत, बार मधून झिंगत बाहेर यावा तसा एक ग्रुप आला, फुल टाईट. १५ च्या पब्लिकमध्ये १०-१२ बेवडे. च्यामारी! ते आपले झिंगत आले अणि डायरेक्ट मंदिरात, वाटलं की जाउन सांगावं की दारु पिउन मंदिरात कल्ला करू नका. पण च्यायला मी पडलो एकटा. २-३ पोरं जरा ठीक वाटले. त्यांना सांगुन पाहिलं.

ते: "आम्ही चढ़ाई करताना पीत नाही, आता रात्री मस्त पिणार पण मंदिरात नाही बसणार प्यायला, तुला यायचाय तर ये."
मी म्हणालो: "शाबास लेका...तुम्ही प्या, घाण करा. बापाचा किल्ला आहे की आपल्याच."

सामान आवरलं आणि बुधल्याची वाट पकडली. तिथेच कुठेतरी झोपायचा विचार होता. नंतर वाटुन गेलं की तोरणा तर पाहून झालाय, चला राजगडला जाऊ रात्रीच. जेणेकरून उद्या राजगड फिरायला जास्त वेळ मिळेल. रात्री २.३० वाजता तोरणा सोडला. राजगड-तोरणाच्या वाटेवर काय 'Do's and Don'ts' हे अक्षय कडू अणि मंडळी सांगुनच गेली होती. मग त्याप्रमाणे सुटलो. वाटेत मण्यार, फुरसे, विंचू आणि एक घोरपड पाहिल्यावर तर आधी टरकली. मग राजगड जवळची आजीची झोपडी गाठली तेव्हा जरा हायसं वाटलं. ४.३० वाजले होते. म्हातारी म्हणाली पोरा जाशील गडावर तासाभरात इथून. आलास तसा झोप तासभर. सकाळी जा, माझ्या नावचा एक नारळ वाहा पद्मावती देवीला. जागा फारच tempting वाटली.

जाग आली तेव्हा ६.३० वाजले होते. म्हातारीनं गवती चहा दिला. चहा पिउन झाल्यावर निघालो. बलाढ्य असा राजगड. धावत-पळत तोरणा दरवाजा चढलो तेव्हा ७.४५ जाले होते. संजिवनी माची वर मस्त गावत माजलं होतं. नजारा तर भन्नाटच होता. तेव्हाच ठरवलं की इंजिनियर झालो की आधी SLR आणि मग बुल्लेट.

संजिवनीचा कानाकोपरा पाहायला ३ तास गेले. नाश्ता पण संजीवनीच्या टोकावर! पद्मावती मंदीरापाशी आलो तेव्हा 12 वाजले होते. तासभर आराम करून मग फ्रेश होउन किल्ल्याच्या पुरातत्व विभागाच्या माणसाशी गप्पा मारून, बालेकिल्ला पाहून आलो. छान वाटत होतं. अप्रतिम किल्ला अणि तेवढाच अभेद्य. तिथूनच पुढे सुवेळा माचीवर उतरलो. किल्ला पाहून वेडा झालो. नंतर समाधानी मनाने नेढ्यात जाउन बसलो. बिस्किट खायचा कंटाला आला होता, पण झालेल्या गाढव-चुकीवर ईलाज नाही म्हणून खा. आलेया भोगासी. पद्मावती कड़े येताना गुंजवणे दरवाजा पाहून आलो. पुढच्या खेपेला इथून उतरणार अस ठरवून माघारी परतलो. सदरात झोप काढली अणि सूर्यास्त पाहायला पुन्हा बालेकिल्ला गाठला. सूर्यास्त पाहून आलो तेव्हा पुरातत्व विभागाचा माणूस खाली निघून गेला होता. पुन्हा तोच प्रश्न! जाताना भांडं तरी देऊन गेला असतास रे.

चोरदिंडीजवळ येउन बसलो, बाजा वाजवत. पूर्ण किल्ल्यावर एकटा. वाचकांपैकी किती लोकांनी असा एकट्यानं वेळ घालवला असेल हे माहित नाही, पण ज्यांच्या बाबतीत असं झालंय त्यांना तो अनुभव चांगलाच वाटला असावा. निदान मी तरी फार खुश होतो. अंधार झाला तेव्हा पद्मावती मंदिरात लाईट टिमटिम झाली. सोलार!!! आभारी आहे.

११ वाजेपर्यंत बाहेर बिस्किट आणि भाकरवडी खात बसलो. झोप आली की मंदिरात पथारी मारली. रात्री १ च्या सुमारास एक ग्रुप आला. ह्यावेळेस चांगल्या लोकांचा, सिद्धेश दसवाड़कर अणि मंडळी. झोपेतच थोड्या गप्पा मारून मी निवांत झोपी गेलो.

राजगड जर एक दिवसात पूर्ण पाहिला असं मी म्हणत असेन तर तो मुर्खपणा ठरेल. पिंजून काढला राजगड तर ४ दिवस कमी पडतात. पुढच्या खेपेला तेच करू असं ठरवून डुंबा डोंगर करायचा बाकी ठेउन राजगडाचा निरोप घेतला. पद्मावती माचीहून निघालो, चोरदिंडीतुन उतरायला सुरुवात केली तेव्हा ९ वाजले होते आणि ९.३० ला मी गुंजवण्यात.

माझा मित्र, कसलेला ट्रेकर, यतिन नामजोशी, त्याला फ़ोन केला. विचारलं की आता अजुन काय करता येइल? २ दिवस आहेत अजुन हातात. पठ्ठ्यानं लगेच शिवथरघळीची वाट सुचवली. ठरल्यानुसार मग मी पुन्हा वेल्हा गाठलं. पेटपूजा केली तेव्हा ११.३० वाजून गेले होते. आता केळदसाठी काही गाडी-बस मिळते का पाहत होतो. बस नाही, जीप नाही. २ तास अडकून पडलो. वेल्हा ते केळद अदमासे १६-१८ किमी आहे. एका बाईक वाल्यानं त्यातलं ४ किमी, म्हणजे काणंद खिंडीच्या घाटाअलीकडे नेउन सोडलं. पुढे ११ नंबरची गाडी. चालत-चालत-चालत-चालत पासली फाट्यावर आलो. १५ मिनिटं बसून पुन्हा केळदची वाट पकडली. दिवस बरबाद झाला होता. केळदला पोहोचलो तेव्हा ५ वाजले होते. इथून शिवथरघळला जायला २ वाटा. एक म्हणजे पटकन उतरणारी वाट म्हणजे: उपांडया घाट, आणि भलतीच फिरून जाणारी वाट म्हणजे: मढे घाट.

मी उपांडयाची वाट धरली. वाट अगदी मळलेली आणि मस्त आहे. आजही लोक ये-जा करतात म्हणजे वापरातली आहे. उड्या मारत कर्णावाडीत पोहोचलो तेव्हा ५.३० वाजले होते. कर्णवडी टुमदार आणि राहायला एक नंबर जागा आहे. लोक खूपच चांगले, मदतगार. कोकणात आल्याचं लगेच जाणवतं. रवींद्र महालेंच्या घरी नाश्ता करुन रानवडीची वाट धरली.

कर्णवडीतुन रानवडीत उतरायला अजुन ४० मिनिटे लागतात. सद्ध्या त्या रस्त्याचे काम चालू आहे म्हणजे कर्णावडीची शांती गुल्ल होणार आहे. रानवडीच्या थोडेसे पुढे गेलात की महाडहून शिवथर कड़े जाणारा रस्ता लागतो. तिथून शिवथर ८ किमी डावीकडे आहे आणि उजवीकडे महाड २४ किमी. चालत-चालत शिवथरला पोहोचलो तेव्हा ७.३० वाजून गेले होते. शिवथरघळच्या मंदिरात मुक्काम करायची व्यवस्था आहे. धर्मशाळेत राहायचं ठरवून मस्त आंघोळ केली. दर्शन घेउन, समर्थांच्या उपसनेला बसलो. तासभर उपासना झाल्यावर फिरायला निघालो. फेरफटका मारून जेवायला निघालो. जेवण झालं.

आता परतीचा प्लॅन ठरवायचा होता. पुन्हा यतिन नामजोशी. अजुन एक वाट सुचवली गड्याने, ती अशी की शिवथरघळहून पुण्याला बसने जाण्यापेक्षा, शिवथरच्या वरच्या अंगाला जी वाडी आहे, तिथे चंद्रराव मोरेंचा वाडा आहे. तिथूनच एक वाट चढून कुंड नावाच्या गावात जाते. ट्रेक तासाभाराचा पण फाडू आहे, धापा टाकुन कुत्रा होइल असा. तर मग ठरलं. उदया सकाळी ह्या वाटेने वर जायचं. कुंड गावातून धारमंडप ला रस्ता जातो. धारमंडपहून वरंधा घाटातून पुण्याकडे/भोरकडे जाणारी बस मिळते.

सकाळी ५ वाजता बुवा आले उठवायला. अंघोळ करुन ६ च्या उपसनेला बसलो. तासभर राम-नाम. दहीभाताचा प्रसाद खाऊन, दक्षिणा देऊन वरच्या वाडीकड़े निघालो तेव्हा ७.३० वाजले होते. शिवथरच्या आसपासचा निसर्ग भन्नाट आहे. ते दृश्य पाहत पाठ टेकवली. तेव्हा भान आलं की आता निघावं नंतर चढताना धूर निघणार आहे. यतिनने सांगितल्यानुसारच होती वाट. छातीवरचा चढ़. घामाने ओला झालो, पण हवा छान होती. राजगड-तोरणा अजुनही दिसतच होते, उंच, अभेद्य!

कुत्र्यासारखा धापा टाकत खुटे घाट चढून वर पोहोचलो तेव्हा ८.३० वाजले होते. कुंड गाव नजरेत होतं आता. पठारावरुन कुंड गावात जायला १५ मिनिट पुरेसे. कुंड गावातून वेळ न घालवता धारमंडपची वाट धरली. शिळींब फाट्यावर पोहोचलो तेव्हा ९.३० वाजले होते. डोळ्याचं पारणं फेडनारा निसर्ग, बोलण्यापलीकडच सृष्टि-सौंदर्य.
शीळ घालत, चालत-चालत धारमंडपला पोहोचलो तेव्हा १०.३० वाजून गेले होते. १० मिनिट थांबलो तेव्हा लगेच बस मिलाली स्वारगेटची. पुढच्या खेपेत इथून पुढे भोरकडे जाताना लागणार्या शिरगावच्या मोहनगड ऊर्फ जसलोडगड करायचा मनसुबा आखून त्यावर एक नजर टाकली आणि डुलकी..जाग आली तेव्हा बस कात्रज घाटात होती, वाजले होते १.३०. यतिनला मी वन-पिस असल्याची खबर दिली अणि पुन्हा सोलापूरला जाण्यासाठी ट्रेन पकडली. ट्रेक झाल्याचा आनंद फट्टे होता. स्वस्तात मस्त ट्रेक झाला म्हणून अजुन खुश. सोलो केला हा ट्रेक म्हणून ढगाला चार बोट कमी अशी अवस्था होती.

मी हे असंख्य वेळा ऐकलं आहे कि ट्रेकिंग हे एकट्यानं नसावंच, त्रिकुट-चौकट तर असावीच. ह्या ट्रेकच ही तसं म्हणता येईल. उतरताना किंवा चढताना पडला असतास तर काय, वाटेल काही चावलं असतं तर काय, मग network नसतं तर काय, हे करून मिळालं तरी काय, आणि असंख्य तत्सम प्रश्न.
खरं सांगायचं झालं तरं हे प्रश्न काहींना हा ब्लॉग वाचल्यावर पडू शकतात, फरक एवढाच आहे कि हे प्रश्न मला ट्रेक सुरु करायच्या आधी पडतात, आणि होय, तरीही मी जातो.

'का?' ह्या प्रश्नाची बरीच उत्तरं आहेत.
'नाही गेलास तर नाही का चालणार?' ह्याचं एकचं उत्तर : नाही चालणार!
'पुन्हा जाशील का?' ह्याचं उत्तर माझ्याकडं पण नाही.

I do not intend to motivate/discourage anyone from trekking/solo-trekking. I believe this and every other trek has taught me a handful of things. I simply don't expect anyone to pack his/her sack and set off to a solo trek after reading this or any of my blogs.

असंच काहीतरी खरडलेलं

शनिवारची रात्र...थोडासा थकलेलोच..एक शांत खोली..तिच्यासोबत गप्पा मारून झाल्यावर एकटा निपचित पडलेला जीव. MSEB च्या कृपेने हळूहळू फिरणारा पंखा. बाहेर अगदी Typical मराठवाडी पाऊस..."पडतोय हेच नशीब म्हणायला लावणारा".
झोप काही लागेना. म्हणलं जरा गाणी ऐकू, झोप येते का पाहू. ज्यावर नुकतेच लोकांचे FB वर ट्रेकचे Updates पहिले त्याच बटाट्या mobile वर गाणी लावली. लावली तोच संदीप खरेने लिहिलेलं आणि सलीलने गायलेलं गाणं वाजलं..
म्हणे,

आता आता छाती केवळ भीती साठवते..
डोंगर बघता उंची नाही, खोली आठवते...


च्या मारी ह्यांच्या. काय लिखाण आहे! थेट विषयाला हात घालणारं..
म्हणतात ना, ट्रेकर लोकांची जात च वेगळी..ह्याचं ही काही तसंच आहे, ह्यांना गाणी ऐकवा आणि फोटो दाखवा अन मग हे येडं जागीच हरवतं. मग तिथं सलीलने गायलेल्या गाण्यातले डोंगर राहतात बाजूलाच, अन हेय येडं दरवेळेप्रमाणे कुठल्यातरी डोंगर-दर्यांत आणि जास्त करून एखाद्या घळीत हरवतं. मग काय, उगाच तो भिरभिरणारा वारा, एक मस्त पेटलेली शेकोटी आणि त्यात 'जवळ असून लांब असणारे, किंवा लांब असून जवळ असणारे' ट्रेकाडे मित्रं आठवतात. मैफील जमायला वेळ लागत नाही. ह्याचं कारण असं कि ही आणि ह्यासारखी अनेक गाणी गाऊन ह्या कार्ट्याने रात्री जागवलेल्या असतात, बसमध्ये अंताक्षरीत किल्ला लढवलेला असतो, तर कधी थकवा दूर पळवलेला असतो. त्यात ते रात्रीचे गाणे तर सगळ्यात भारी. न विसरणारे.. साला शेकोटीसमोर ही गाणी गाताना शब्द कसे अचूक आठवायचे, आणि आता, ही गाणी ऐकून त्या रात्री डोळ्यासमोर दंगा करतात. सामरद गावातली 'ती' शेकोटी आठवल्यावाचून राहात नाही.
तिथे सलीलच चालूच असतं...

कधी दाटू येत पसारा घनांचा, कसा सावळा रंग होतो मनाचा..
असे हालते आत हळुवार काही, जसा स्पर्श पाण्यावरी चांदण्यांचा..
आताशा असे हे मला काय होते, कुण्या काळचे पाणी डोळ्यात येते..

फक्त दोनच वर्षांपूर्वी नियमित रानोमाळ बोंबलत भटकायचं चंद्रीयेड लागलेलं हे येडं, आजही मुंबईहून येताना लागणारा, पूर्ण एक महिना रोज मुंबई-पुणे-मुंबई करताना पाहिलेला खंडाळा घाट, पंधरा वेळा इकडून-तिकडून चढलेलं, पिंजून काढलेलं राजमाचीच जंगल थोबड्याचा "आ" वासून पाहतं. जादूच आहे. राजमाची चे तर हजार किस्से आहेत. मी लिहित बसलो अन तुम्ही वाचत बसलात तर कुठे Server Timed-Out व्हायचा..

मग गाडी झुकझुक करत लोणावळ्याच्या आठवणी बगलेत मारून पुण्यात येते. कामशेत हून पुणे येईपर्यंत हे येडं कुठेतरी ढाक च्या जंगलात, किंवा मांजरसुम्ब्याजवळ किंवा कुसूरच्या पठारावर हुंडारत असतं. आता पुण्याच्या गोष्टी skip करतो.
वाटतंय पुण्यापर्यंत येऊनच सगळा का अडतंय?
पुढचा प्रवास - पुणे ते तुळजापूर.. निव्वळ रखरखाट...

'ट्रेक ला जाणं सोडा, कड्यावरून डोकवायची भूक तिथं बोडकं टेकाड पाहून भागवावी लागणार' ही भयंकर जाणीव होते. अन मग, गांधी-टोपी घातलेल्या, गावंडळ म्हातार्यानं चुना लावून तंबाखू मळावी तसा कचरा होतो ह्या सगळ्या आठवणींचा, उरते ती फक्त भयंकर जाणीव आणि रखरखाट. मग गाडी 'कशासाठी?..पोटासाठी, खंडाळ्याच्या घाटासाठी..' करत करत नको तिथं येते.. खंडाळ्याच्या आठवणी एव्हाना मनात खोल खड्डा करून बसलेल्या असतात..

शेकोटी तर कधीची विझून गेलेली, आणि हरवलेलं हे येडं जागेवर येतं तेव्हा पुन्हा होतं तिथंच, आपल्या खोलीत असतं.. आता जरा जास्तच एकटं..सलीलच गाणं पण इतक्यात संपलेलं असतं. मग काय, दुसरं गाणं, दुसर्या ट्रेक च्या आठवणीत हरवून ऐकायची किंवा ऐकून हरवण्याची सवयच झाली आहे म्हणा..तिथं ट्रेकर्स च्या टोळ्या त्या-त्या पायथ्याच्या आडगावी, आडरात्री पोहोचतात..आणि इथ हे येडं जी गाणी गात रात्रभर जागायचं, तीच गाणी ऐकत, Every Dog has his day म्हणून आपलीच समजूत काढत कधी झोपी जातं त्याचं त्यालाच माहित.