भिकनाळ आणि पालखीची वाट

      हिवाळ्यात जवळपास सगळेच वीकेंड सत्कारणी लागल्यानं मी आधीच खूश होतो. अमूक-तमूक ट्रेनिंगच्या कारणानं प्रिती १५ दिवसासाठी पुण्यात आली होती. साहजिकच भेट झाली. मी आपला निवांत पुणे शहरातल्या माझ्या सर्वात लाडक्या भागात म्हणजे कर्वे रोडच्या सुजाताची सिताफळ मस्तानी नरड्यातून खाली जातानाचा आंनद घेत होतो आणि अचानक प्रितीनं पिलू सोडलं: "ह्या वीकेंडला भिकनाळ आणि फडताड करायचा? राजस आणि यज्ञेश येतील गाडी घेऊन."

      विचारात एवढा गुंतलो की उरलेली मस्तानी कधी संपली ते कळलं नाही आणि स्ट्रॉचा फुर्रर्रर आवाज आला तेव्हा कुठं खऱ्या अर्थानं विचारमंथन सुरु केलं. फडताड हे नाव काही माझ्यासाठी आणि तिच्यासाठी नवीन नव्हतं. २००८ मध्ये एकदा स्टुडिओतल्या संजय काकाकडे असताना दिवकरच्या तोंडी हे नाव ऐकलं होतं. छातीत धडकी भरावी असा तो ट्रेक हे ऐकूनच होतो. एकंदरच कळून चुकलं की जायचंय तर तयारीने जावं लागेल. तसं म्हणलं तर आमच्यासोबत जो एक गडी येणार होता त्यानं हा ट्रेक केला होता, त्यामुळे एकदा त्याच्याशी चर्चा करून प्लॅन करायला हरकत नव्हती. पण मग त्यानं प्लॅन ऐकायच्या आधीच माघार घेतली. कुणाच्या पोटात दुखलं तर दुखू दे, जे होईल ते बघू म्हणून आम्ही प्लॅन कायम ठेवला.

      शुक्रवारी संध्याकाळी भेटून मी आणि प्रितीनं खाण्याचं सामान गोळा केलं आणि ठरल्याप्रमाणं राजस आणि यज्ञेश रात्री कारने पुण्याला आले. ट्रेक तसा अवघड म्हणून ते येताना सोबत सगळं इक्विपमेंट घेऊनच आले होते. पौड रोडपाशी प्रितीला पिकअप करून ते सगळे मला कात्रजच्या नाक्यावर भेटले. यज्ञेशशी माझी नीट ओळख करून देईपर्यंत आम्ही चेलाडीला पोहोचलो. राजसला थोडा आराम मिळावा म्हणून चेलाडीपासून प्रितीनं गाडी चालवायला घेतली. 'झोपेची वेळ + थंडी + वेल्ह्यापर्यंत ठिकठाक असा रस्ता' ह्या सगळ्या सॉर्टेड-आऊट गोष्टींना मात देणारी प्रितीची ड्रायविंग! डोळा अजिबातच लागला नाही. हसत-खिदळत वेल्ह्यात पोहोचलो तेव्हा पहाट झाली होती. गावात कुस्तीची स्पर्धा असल्यानं आदल्या रात्री चपटी न लावलेले सगळे जागे झाले होते, त्यामुळं आम्हालाच उशीर झाल्यागत वाटत होतं, पण आम्ही गडबड करणाऱ्यातले नाही. आम्ही काही तासभर तिथून हललो नाही. चहा आणि क्रिमरोल पोटात कोंबून आम्ही पुढं निघालो.

      आता गाडी राजस चालवत होता. कानंद खिंडीजवळ झालेलं स्वर्गीय नर्तकाचं दर्शन, अभेद्य दिसणारा तोरणा, हवेतला गारवा आणि चांडाळ चौकडी.. सगळं काही मनासारखं. गाडी 5 मिनिट बाजूला थांबवून विशेष वटवट न करता आम्ही सगळेच निःशब्द होऊन निसर्गाची ती उधळण टिपत होतो. उगाच ट्रेक मारणं, घाटवाट उडवणं असल्या गप्पा नाहीत, घड्याळाशी स्पर्धा नाही. पासली फाट्याच्या नंतर अतिशय सुमार अश्या रस्त्यानं गाडी जपून चालवत आम्ही कुसरपेठेत आलो. एका जीपमध्ये गावातली चिल्लर पार्टी रंगबिरंगी कपडे घालून बसली होती. वेल्ह्याच्या जत्रेत जायची उत्सुकता त्यांच्यात दिसत होती. एरवी गुरापाठी बिनधास्त भटकणारी, झाडाच्या अंगाखांद्यावर खेळणारी किंवा शहरातली पोरं कायम वंचित राहतील असे ना-ना प्रकारचे खेळ खेळताना दिसणारी ही कारटी आज पावडर फासून, तयार होऊन जाताना किती वेगळी वाटत होती. गावतल्या थोरल्या मंडळींना विचारुन सावलीच्या जागी गाडी ठेवली.

      कुसरपेठेतून भिकनाळेचा साधारण अंदाज मला होता, तरी आम्ही गावात थोडी चौकशी केलीच. फाटक्या आणण्यासाठी मावशी त्याच बाजूला निघाल्या होत्या, मग आम्ही त्यांच्यासोबतच निघालो. सिंगापुरच्या दिशेनं थोडं पुढे जाऊन धुत्या हाताला वळलात की एक पत्र्याचं खोपटं दिसतं, त्याच्या समोरच एक विहीर-वजा-डबकं खोदलं आहे. पाणी पिण्यालायक आहे, तिथंच प्रवासात संपलेल्या बाटल्या भरून आम्ही चालु लागलो. कोवळ्या उन्हामुळं गारठा जरा कमी झाला होता.  छाताड काढून उभा असलेला लिंगाणा, त्यापल्याड इंचभर डोकं वर काढून मिरवणारं रायलिंग, समोरच्या बाजूला रायगड, अन् नजर थोडी डावीकडे भिरकवली की रानापलीकडं आ वासून बसलेल्या भिकनाळेचा कडा दिसायला लागला. उजव्या हाताला थोडं पुढे पोटाशी आग्या नाळ. पुढे ती बैलगाडीची चाकोरी सोडून डावीकडे वर कारवीत शिरलो, अन् मग तसंच दरी डावीकडे ठेवून सोंडेवर चालत गेलो. साधारणतः 35-40 मिनिटं तशी विशेष चढण नसलेल्या सोंडेवर पायपीट केल्यावर उजवीकडल्या कारवीच्या दाट जाळीमागे फडताड कडून येणाऱ्या वाटेजवळ मावशींने आम्हाला सोडलं आणि त्या माघारी गेल्या.

      मी त्या जागी दीड-एक वर्षांपूर्वी आलो होतो. समोरच कड्यापलीकडे भिकनाळ आणि तिच्या तोंडाशी असलेली दाट कारवी. घसा ओला करून आम्ही परत डावीकडे कारवीत शिरलो. एका ढोरवाटेवर थोडं उतरून एका छोट्या आणि कोरड्या मिऱ्यापाशी येऊन थांबलो. नाळीच्या तोंडाशी तर आलो होतो पण आत शिरायला वाट मिळते का हे पाहायचं होतं. प्रिती आणि यज्ञेश थोडं पुढे पाहायला गेले आणि मी आणि राजस कारवीत शिरलो. दोनच मिनिटांत कारवीत शिरलो. दोनच मिनिटांत कारवी ओलांडून नाळेच्या तोंडाशी पोहोचलो आणि प्रिती आणि यज्ञेशला हाळी दिली, मग तसे ते दोघेही हजर झाले.

      पोटातल्या कावळ्यांचा ऑपेरा ऐकू यायच्या आत वाटेच्या सुरुवातीलाच बूड टेकवायला सोयीस्कर अशी सावली पाहुन नाश्ता करून घ्यायचा ठराव बिनविरोध मंजूर झाला. तितक्यात चान्स पाहून मी तोट्या उघडून धारातीर्थी पडून आलो. मग ब्रेड, बिस्किट, चिवड्या पाठोपाठ खजूर पोटात ढकलले आणि आम्ही निघालो. तासभर कधी आणि कसा गेला ते कळलंच नाही, पण मग उत्तराभिमुख असल्यानं नाळेत दिवसभर सावली राहणार हे साहजिक होतं, आणि जमेची बाजू अशी होती की आजचा मुक्काम पणदेरी गावात होता, त्यामुळे वेळेचं विशेष बंधन नव्हतं. उगाच हायामारी करत उड्या मारत जाणे हा प्लॅनच नव्हता.

      'एकच पायवाट' असं काही कौतुकास्पद प्रकरण ते नव्हतंच. उन्हाळ्यातही चिवटपणे तग धरून असलेली बोचरी झुडपी आणि निसटणारे दगड ह्यातनं वाट काढत, अनेकदा मिसकॉल देत आम्ही खाली उतरत होतो. बूटाच्या तोंडाशी, मोज्याच्या लोकरात, पॅंटच्या पायाशी अडकणारी रावणं आणि काटाळं झटकत साधारण अर्ध्या तासात आम्ही एका मोठ्या धोंड्यापाशी आलो. त्या पलिकडची उडी पाहता मी आणि यज्ञेश पाठीवरून काढून सॅक खाली ठेवली, आणि रोप आणि बाकीचं सामान बाहेर काढलं. थोडं वरच्या बाजूला रोप बांधायला योग्य जागा पाहून आम्ही रोप बांधला आणि यज्ञेशला खाली सोडलं. त्या पाठोपाठ राजस आणि प्रिती मग मी. पॅच संपतो तिथंच कोपऱ्यात एक माणूस पद्धतशीर फेरी मारून येईल एवढी नैसर्गिक गुहा आहे. ती गुहा म्हणजे वटवाघुळांचं आगार! ब्याटम्यानमधल्या बेल भौ सारखं आम्ही डोकं खाली वाकवून रोप गूंडाळून बॅगेत भरला आणि निघालो.

      जसं थोडं खाली आलो तशी नाळ रुंद झाली. झाडी-काटकी वाढली, तरी उतार काही मंदावेना. तसंच टप्पे उतरत आम्ही खाली येऊ लागलो. वाटेत एका ठिकाणी थबकलो. समोर उडी टाकायला 60 फूटाचा कडा, आणि इथं पडी टाकायला मस्त सावली! मग टेकायला छानशी सावली हेरली आणि बसलो. उदरभरणाचा कार्यक्रम उरकण्यात आला. ते 'वदनी कवळ घेता' राहिलं बाजूला आणि आमच्या पैजा चालु झाल्या त्या समोरच्या नाळेवर. मी ठाम होतो पाहुनच की त्यात वाट असणार! समोरच्या अभेद्य वाटणाऱ्या कड्याला माणसाच्या अचाट इच्छाशक्तीनं कुठंतरी भेद दिला असावा असं वाटत होतं.

      पोळ्या, लसुण-शेंगादाण्याची चटणी, दही, गोडलिंबू आणि खजूराचं लोणचं आणि मग त्यावर  गूळ-खवा पोळी असं जेवण आणि मग त्यावर ताक असं सगळं पोटात ढकलल्यावर आमची आळशी गाढवं झाली. बॅगेला पाठ टेकवून आम्ही परत नाळ चर्चेत आणली.  यज्ञेश आणि माझं एकच म्हणणं: वाट असणार, वर एखादा पॅच असणार. प्रिती, राजस् आणि यज्ञेशचं मत असं होतं की खाली जाऊ, गावात थोडी विचारपूस करू म्हणजे नक्की काय ते कळेल. आता खाली जाण्याचा मार्ग शोधणं गरजेचं होतं. मी उजवीकडे शिरलो तर यज्ञेश एक टप्पा उतरून खाली गेला. बराच आटापिटा केल्यावर सुद्धा मला वरून वाट मिळाली नाही. मग यज्ञेशने आम्हाला हाक दिली आणि आम्ही तिघे तो टप्पा उतरून यज्ञेशपर्यंत गेलो. उजवीकडे दिसणाऱ्या कड्याखालच्या घळीत आम्ही पोहोचलो. वाट शोधायला गेल्यावर कारवी आणि ऊन्हामुळे जो काही छळ झाला होता त्यानंतर मोकळ्या घळीत येऊन हायसं वाटलं.

      पुढे गावात पोहोचणं काही विशेष अवघड नसलं तरी बराच डिसेंट बाकी होता. मग विशेष घाई न करता आम्ही निवांत खाली उतरत गेलो. नाळेत असल्याने इथे-तिथे भरकटण्याचा प्रश्नच नव्हता. थोडं पुढे राहून मी आपला सुपर मारिओ खेळाल्यागत उड्या मारत मारत सावली हेरायचो आणि डुलकी काढायचो. जसं खाली आलो तसं मग आम्ही अजूनच निवांत झालो. मध्येच एका ठिकाणी एकाच कुटुंबाची वस्ती लागली. हे लोक सगळ्यात बेकार. एकाच पट्टयातली झाडं उभीच्या उभी तोडतात, पेटवतात आणि त्यावर माती-वाळू दाबून धूर करतात. त्यातनं कोळसा होतो. जंगलातले अख्खेच्या अख्खे पट्टे गायब करणारे हे लोक. सद्यपरिस्थिती पाहता डोमेस्टिक मागणीसाठी जीवंत झाडातून असा कोळसा काढणं पर्यावरणाच्या आणि विशेषतः वन्यजीवासाठी किती नुकसानदायी आहे, तसंच ते कितपत महाग पडेल हे सांगायची गरज नाहीये. त्यांना उचक्या देत आम्ही तासाभारात पणदेरी गावाशी पोहोचलो. ५.३० च्या सुमारास पोहोचल्यानं शेताची कामं संपवून गावाबाहेर निवांत बसलेला बळीराजा. त्यांच्याशी वाटेबद्दल विचारपूस केली आणि भिकनाळेतून दिसलेल्या 'त्या' वाटेवर शिक्कामोर्तब झालं. गावात क्रिकेट  खेळत असणाऱ्या पोरांमध्ये जाऊन चार पट्टे फिरवायचा मोह आवरून मी आणि यज्ञेश सरपंचांच्या घराकडे निघालो. त्यांनीही वाट असल्याच्या दाव्याला दुजोरा दिला. शाळेत मुक्कामाची परवानगी घेऊन आम्ही पुन्हा उरलेल्या दोन कारटयांपाशी आलो.

      बदललेल्या प्लॅननुसार आम्ही पालखीच्या नाळेनं वर जायचं ठरवलं. कोळसेवाल्यांच्या वस्तीपर्यंत कालच्याच वाटेने जायचं होतं. कोरड्या नाळेतून जाताना गुढघ्याच्या वाट्या करकरतात आणि मांड्या बोंबलतात. म्हणून तिथून पुढे नाळेनं वर जाण्याऐवजी आम्ही डावीकडल्या सोंडेवर चढून मधल्या पट्टयातल्या जंगलातून त्या छोट्या धारेवर चढायचं ठरवलं.

      कोळसेवाल्यांच्या वस्तीपाशी वर जायची वाट विचारली असता त्यांच्यातला एक दादा थोडं वर वाट दाखवायला आला. पुसट अशी ती पाऊल वाट. दादाच्या सांगण्यानुसार तीच वाट फडताडला जाण्यासाठीही वापरली जाऊ शकते हे कळल्यावर त्यांना ती ही वाट विचारून घेतली. कातळकड्याच्या खाली मधल्या गचपणात उजवीकडे वळालो. डुकराच्या शिकारीसाठी केलेला चर ओलांडण्यासाठी बरेच द्राविडी प्राणायाम करावे लागले. ते करून आम्ही पदरातल्या रानात शिरलो. इंजिन आधीच तापलेलं असल्यानं आणि त्यात तिथं दाट पण उंच झाडी असल्यानं तो सुखद पट्टा पार करायला विशेष वेळ लागला नाही. त्यात तिथं झाडीत एका कारची चावी मिळाल्यानं विशेष वापरात नसली तरी योग्य वाटेवर असल्याची खात्री झाली.

    रानातून पालखीच्या नाळेत शिरायची जागा दाखवली आणि दादा खाली निघून गेले. 'वाट' म्हणायला तसं फारसं काही नव्हतंच तिथे, पण 'वाट' लागायला बरंच काही. भर उन्हात त्या वाटेनं जायचं म्हणजे शिक्षा! स्क्रीचे दोन खडे पॅच चढून एका झुडपीपाशी आम्ही विसावलो. नरडं ओलं करून पुन्हा निघणं जीवावर आलं होतं पण तिथं बसून उन्हानं काहिली करून घेण्यात काही हाशिल नव्हतं. मग पुढे यज्ञेश, मग प्रिती आणि राजस आणि गरजेनुसार मध्ये किंवा शेवटी मी असा कॉन्वॉय वरवर सरकू लागला.  पुढे आणिएक छोटा पॅच आणि दोन एक्सपोज्ड  ट्रॅवर्स पार करून आम्ही नाळेत पोहोचलो. नाळेची लांबी जास्त नसल्याने नाळ कमी खिंड जास्त वाटली ती. बरीच हायामारी करून झाली असल्यानं आणि वरची झाडी नजरेत आल्यानं आपण वर पोहोचल्यात जमा आहोत असं गृहीत धरलं आणि जेवण उरकायचं ठरवलं. खिंडीत असल्यानं तिथं सावली होती. जेवणाचा कार्यक्रम गप्पा रंगल्यानं दीड तास चालला. मी, प्रिती आणि राजस बऱ्याच वर्षांनंतर एकत्र ट्रेक करत होतो, त्यामुळे बरेच किस्से एक्सचेंज झाले. कसलीच घाई नव्हती.

      शेवटी ४.३० वाजता आम्ही तिथून निघालोच. १५ मिनिट वर चढून आलो आणि जसजसं वर आलो तसतसं एक-एक करत चार बोटं तोंडात घालायची वेळ आली. समोर ५० फुटाचा अवघड, खडा पॅच. मग मात्र इशारे झाले की झाला तो टाईमपास पुरेसा आहे, आता कामाला लागा. इथून-तिथून मिथुन झाल्यावर चढायला योग्य जागा पाहून यज्ञेश वर चढू लागला. यज्ञेशच्या हालचालीतला द्राविडी प्राणायाम पाहता पॅच तसा अवघड वाटला. जे धरेल ते निसटून हातात येत होतं. यज्ञेश वर पोहोचला आणि त्यानं रोप लावला. पण यज्ञेश गेला तिथून वर जाणं म्हणजे जरा अवघडच होतं म्हणून मी थोडं बाजूने जिथं कातळ होता तिथून प्रयत्न केला आणि वर गेलो. हा खटाटोप उरकेपर्यंत अंधारून आलं. नाळीच्या तोंडाशी उजेड असला तरी अजुन बरंच अंतर कापायचं होतं, आणि बाकीचे दोघे + सामान वर येतायेता काळोख होणं साहजिक होतं. त्यात उल्हास म्हणजे मी वर आलो तिथं वर रोप बांधायला जागा नव्हती आणि रोप आहे त्या ठिकाणी ठेवून मी चढलो तसं चढताना जरा गडबड झाली की झोपाळा झालाच म्हणून समजा.  मग मी थोडं खाली उतरून सेल्फ-अरेस्टसाठी छानशी जागा निवडली आणि रोप फिरवून घेतला जेणेकरून कुणी स्विंग झालंच तर ते मला कंट्रोल करता येईल आणि बॅगा झपझप ओढता येतील. आधी २ बॅगा वर घेतल्या ज्यात पाणी + हेडलँप होते. मग प्रिती चढून वर आली आणि राजसने उरलेल्या २ बॅगा वर पाठवल्या. त्या वर ओढताना आई आठवाली आणि लगेच वाटून गेलं की गंज चढता कामा नये, ह्या असल्या आडवाटेची सवय असलीच पाहिजे. ओढलेल्या २ बॅगा तिनं वर नेईपर्यंत अंधारात राजस वर आला. सगळा सेट-अप व्यवस्थित बॅगेत जाईपर्यंत ८ वाजले होते. तसं म्हणावं तर पालखीची वाट झाली होती आणि आम्ही खुश होतो. थोडी बिस्किटं पोटात ढकलून आम्ही रवाना झालो.

      घाटमाथ्यावर आलो तरी अजुन गंमत बाकी होतीच. रात्री त्या कारवीतल्या गचपणातून कुसरपेठ ते मोठ्या नाळेच्या वरपर्यंत आलेल्या धारेवर येणं म्हणजे छळ होता. पण मी आधी तिथं वरवरंच ३ वेळा भटकल्यानं मला नेमकी वाट माहित नसली तरी दिशेचा अंदाज होता. शेवटी अंधारात कारवीच्या दाट जाळीतून मारामारी करत आम्ही एका सपाटीला आलो. इथून पुढे वाट मला नक्की माहित होती. मग, दुपारचं खाणं पार जिरलं असल्यानं आम्ही तिथं निवांत बसून खजूरावर ताव मारला. दमछाक झाल्यासारखं वाटणं स्वाभाविक होतं. उशीर तर झालाच होता, पण आता धावपळ करण्यात काही हाशील नव्हतं. तसंही असे ट्रेक करताना आपण उगाच घाई करत येण्यात अर्थ नाहीये हे माझं वैयक्तिक मत. पण मग चारही डोकी एकाच विचाराची असली की घड्याळ पाहत ट्रेक 'मारण्या'पेक्षा निवांत गप्पा मारत खोल दरीत दिसणाऱ्या टीमटीमत्या लाईट पाहण्यात भरपूर काही हाशील होतं. आम्ही तसंही पुण्यात पहाटेच जाणार होतो. त्यात चांदोबा पण साथीला होताच.

      रमत-गमत आदल्या दिवशी सकाळी आलो त्याच धारेवरच्या वाटेनं आम्ही रात्री १२ वाजता कुसरपेठेत आलो. गाडी काढून मध्ये वाटेत काणंद खिंडीच्या अलीकडे एका छानशा जागी गाडी थांबवून झोप काढली आणि पहाटे पुण्यात. आता फडताड साठीचा योग येणं गरजेचं झालं होतं.


No comments:

Post a Comment