मनोगत

बाईक चालवत होतो. ग्रे रंगाची ऍक्टिवा दिसली कि मनात चूळबूळ झाल्याविना राहत नाही. कम-नशीबी म्हणा किंवा खरंतर त्या उलट म्हणा, नेमकी कि ती तीच असली कि जग आहे तिथेच थांबतं. आजही नेमकं तेच झालं.

मनाची दारं कितीही घट्ट बंद केली तरी एक चाहूल पुरेशी असते. पाटी पुसून मग त्यावर नवं काहीतरी लिहायचे धडे सहज देतात लोक. आजही नेमकं तेच झालं.

दिवसा कामात डोकं कितीही गुंतवलं तरी आधी जेवायच्या आधी जे मेसेज जायचे, त्याची आठवण घसा दाटवून जाते, मग जेवण कसं संपवावं हा प्रश्न पडतो. आजही नेमकं तेच झालं.

भरपूर काम करतो, सगळ्यांना हसून दाखवतो, हेवा वाटेल एवढं खुश राहून दाखवतो. बोलताना अचानक अडकलेले शब्द साला कुणाला कळतंच नाहीत. माझ्यातच दडून राहिलेला मी कधी कुणाला दिसतच नाही, आजही नेमकं तेच झालं.

कधी स्वतःला कामात गुरफटून तर कधी 'दोस्ता, हातातून निसटलंय रे आता सगळं' अशी समजूत काढत जुन्या आठवणीत रमतो, आजही नेमकं तेच झालं.

दिवसा कामासाठी डोकं खर्चल्यावर रात्र मात्र मनाची, एकटेपणाची असते. नकळत गाणी गायली जातात. उत्तरं न मिळालेले प्रश्न मनात गर्दी करतात, गळा दाटून येतो, गाणं अवघड होतं. आजही नेमकं तेच झालं.

तू आहेस तिथे खुश असशील, तुला पुन्हा पाहून काय हशील होणार आहे? दिसलीस तर तरेन कि पूर्णतः तुटेन माहीत नाही, तरी एकदा तरी नजर मिळावी अशी भाबडी आशा का जाणे मनाला लागून असते, आजही नेमकं तेच झालं.

शहरात आठवणीत रमायला हजारो जागा आहेत. कधी तर दिवस कमी पडतो. तुझ्या घरासमोरून जाताना आजही नजर सैरावैरा धावते. आजवर दिसली नाहीसच, बरं झालं कि वाईट ह्याचं उत्तरच नसतं माझ्याकडे, आजही नेमकं तेच झालं.

झालेल्या गुंत्यातून आजही ती परतवाट आहे का गं जी तुझ्यापाशी येते? काळ पुढे लोटलाय, कॅलेंडरची पानं उलटली आहेत, तू पुढे गेली आहेस, कधीतरी तुझ्या आठवणी मी मात्र तिथेच असल्याची जाणीव करून देतात, आजही नेमकं तेच झालं.

छे, दुःखी तर मी मुळीच नाही. गर्दीत आजही हरवतो, आठवणीत आजही हरवतो, मनाशी घट्ट धरून ठेवलेली गोष्ट अचानक कशी हरवली ह्या प्रश्नात हरवतो, आजही नेमकं तेच झालं.

'थांबायचं नाही गड्या, गुंतायचं नाही' म्हणत वर्षे जगलो. 'ह्या पलीकडेही आयुष्य अफाट आहे' असं समजवत वर्षे जगलो. तुझा विरह भासत असला तरी कधी 'तू आणि मी' 'आपण' होतो, तो काळ जगल्याची जाणीव मनाला सुखावून जाते, आजही नेमकं तेच झालं.

प्रत्येक गोष्ट पदरात पडेलच असं नाही.. कदाचित ही गोष्ट आपल्याला आधी उमगली असती तर चित्र काही वेगळं असतं. कसं असतं ते माहीत नाही, पण वेगळं असतं हे नक्की हे वाटून जातं. आजही नेमकं तेच झालं.

मनाला टोचलं कि भूतकाळाला दोष द्यायची मुभा असते. भूतकाळाला कोसत, दुर्दैव म्हणत पुढे जाण्यापेक्षा जे होतं ते खूप चांगलं होतं आणि फक्त तुझ्यामुळे होतं असं म्हणत त्याकडे पाहणं मला योग्य वाटतं, आजही नेमकं तेच झालं.

असं काही वाचून लोकांना माझं भूतकाळाबद्दलचं मत अगम्य वाटतं. ते मला हसतात, मी ही सहज हसतो. आजही नेमकं तेच झालं.

2 comments:

  1. Too emotional... I am not sure if I should be happy to see a sensitive heart of a tough hardcore outdoors person.

    ReplyDelete